अभ्यास लेख ३७
शमशोनप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवा
‘हे सर्वोच्च प्रभू यहोवा, माझी आठवण कर, मला शक्ती दे.’—शास्ते १६:२८.
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
सारांशa
१-२. बायबलमधल्या शमशोनच्या अहवालाचा अभ्यास करणं आपल्यासाठी का फायद्याचं ठरू शकतं?
शमशोन हे नाव ऐकलं तर पहिल्यांदा तुमच्या मनात काय येतं? तुमच्या मनात नक्कीच एका अतिशय शक्तिशाली माणसाचं चित्र उभं राहत असेल. आणि तो तसाच होता. पण त्याने त्याच्या जीवनात एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागेल. तरी त्याने त्याच्या एकंदरीत आयुष्यात विश्वासूपणाचं जे चांगलं उदाहरण मांडलं त्याकडे यहोवाने पाहिलं. आणि आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी ते बायबलमध्ये लिहूनही ठेवलं.
२ यहोवाने त्याच्या निवडलेल्या इस्राएली लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी मोठमोठ्या अद्भुत गोष्टी करण्यासाठी शमशोनचा उपयोग केला. शमशोनच्या मृत्यूच्या बऱ्याच शतकांनंतर, यहोवाने विश्वासू स्त्री-पुरुषांच्या यादीत त्याच्याही नावाचा उल्लेख करण्यासाठी प्रेषित पौलला प्रेरित केलं. (इब्री ११:३२-३४) त्याच्या उदाहरणातून आपल्यालाही प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्या जीवनात बऱ्याच कठीण समस्या आल्या तेव्हासुद्धा तो यहोवावर विसंबून राहिला. शमशोनच्या उदाहरणातून आपल्याला कसं प्रोत्साहन मिळतं आणि त्याच्या उदाहरणातून आपल्याला आणखीन कोणते व्यावहारिक धडे शिकायला मिळतात ते आपण पाहू या.
शमशोनचा यहोवावर भरवसा होता
३. यहोवाने शमशोनवर कोणती जबाबदारी सोपवली होती?
३ शमशोनचा जन्म झाला तेव्हा पलिष्टी लोक इस्राएलवर राज्य करत होते आणि त्यांचा खूप छळ करत होते. (शास्ते १३:१) त्यांच्या या क्रूर छळामुळे इस्राएली लोकांना खूप दुःख सोसावं लागत होतं. म्हणून यहोवाने “इस्राएलला पलिष्टी लोकांच्या हातून” वाचवण्यासाठी शमशोनला निवडलं. (शास्ते १३:५) ही खरंच खूप कठीण जबाबदारी होती. पण ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शमशोनला पूर्णपणे यहोवावर विसंबून राहावं लागणार होतं.
शमशोन यहोवावर विसंबून होता आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार होता. यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे जे काही होतं त्याचा वापर त्याने केला (परिच्छेद ४-५ पाहा)
४. पलिष्टी लोकांच्या हातून स्वतःला सोडवण्यासाठी यहोवाने शमशोनला कशी मदत केली? (शास्ते १५:१४-१६)
४ शमशोन यहोवावर आणि त्याने पुरवलेल्या मदतीवर कसा विसंबून राहिला याच्या एका उदाहरणाचा विचार करा. एकदा असं झालं, की पलिष्ट्यांच्या सैन्याने शमशोनला पकडण्यासाठी लेही इथे छावणी केली होती. आणि हे ठिकाण यहूदामध्ये असावं. हे पाहून यहूदाचे लोक खूप घाबरले आणि त्यांनी शमशोनला शत्रूंच्या हाती द्यायचं ठरवलं. शमशोनच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला दोन नवीन रश्यांनी बांधलं आणि ते त्याला पलिष्ट्यांकडे घेऊन आले. (शास्ते १५:९-१३) पण “त्या वेळी यहोवाची पवित्र शक्ती शमशोनवर कार्य करू लागली” आणि त्याने स्वतःला सोडवलं. मग त्याला “गाढवाच्या जबड्याचं हाड” सापडलं आणि त्याने त्याचा उपयोग करून १,००० पलिष्टी लोकांना मारून टाकलं.—शास्ते १५:१४-१६ वाचा.
५. शमशोन यहोवावर विसंबून होता हे त्याने कसं दाखवून दिलं?
५ पण शमशोनने गाढवाच्या जबड्याचा वापर का केला असेल? कारण ही नक्कीच एक अशी गोष्ट नव्हती ज्याचा वापर शस्त्रासारखा करता येईल. कारण शमशोनला हे चांगलं माहीत होतं, की त्याला मिळणारं यश तो कुठलं हत्यार वापरतो यावर नाही, तर यहोवावर अवलंबून होतं. या विश्वासू माणसाने त्याच्याकडे जे काही होतं त्याचा उपयोग करून यहोवाची इच्छा पूर्ण केली. आणि अशा प्रकारे यहोवावर विसंबून राहिल्यामुळे शमशोनला जबरदस्त यश मिळालं.
६. यहोवाच्या सेवेत आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करताना आपण शमशोनकडून काय शिकू शकतो?
६ आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं खूप कठीण वाटत असलं, तरी यहोवा आपल्यालासुद्धा त्या पूर्ण करण्यासाठी बळ देऊ शकतो. तो हे अशा मार्गांनी करू शकतो ज्यांमुळे आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. यहोवाने जशी शमशोनला मदत केली तशी तो त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही मदत करेल असा भरवसा बाळगा. पण त्यासाठी तुम्हाला त्याच्यावर विसंबून राहावं लागेल.—नीति. १६:३.
७. यहोवाचं मार्गदर्शन घेणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवणारं एक उदाहरण सांगा.
७ संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात काम करणाऱ्या बऱ्याच भाऊबहिणींनी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवलं आहे. आधीच्या काळात बांधव आपली राज्य सभागृहं आणि इतर इमारतींचा आराखडा स्वतःच बनवायचे आणि त्या इमारती बांधायचे. पण काही काळानंतर संघटनेत होणाऱ्या वाढीमुळे या पद्धतीमध्ये बदल करायची गरज पडली. त्यामुळे जबाबदार बांधवांनी यहोवाकडे प्रार्थनेत मदत मागितली आणि नवनवीन पद्धती वापरून पाहिल्या. जसं की, आधीच तयार झालेल्या इमारती विकत घेऊन त्यांत हवे ते फेरबदल करणं. रॉबर्ट नावाचे एक भाऊ जगभरात चाललेल्या आपल्या संघटनेच्या बऱ्याच बांधकाम प्रकल्पांमध्ये अलीकडच्या काही वर्षांपासून काम करत आहे. ते म्हणतात, “सुरुवातीला या नवीन पद्धतीप्रमाणे काम करणं काहींना सोपं गेलं नाही. बऱ्याच वर्षांपासून आम्ही जे करत होतो त्यापेक्षा हे खूप वेगळं होतं. पण बांधव जुळवून घ्यायला तयार होते. आणि यहोवा या नवीन पद्धतीवर आशीर्वाद देत आहे हेही दिसून आलं.” यहोवा आपल्या लोकांचं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतो याचं हे फक्त एकच उदाहरण आहे. म्हणून आपल्या सगळ्यांनीच स्वतःला वेळोवेळी हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘मी यहोवाचं मार्गदर्शन घ्यायचा प्रयत्न करतो का आणि त्याची सेवा करत असताना होणाऱ्या बदलांना मी जुळवून घ्यायला तयार असतो का?’
शमशोनने यहोवाच्या तरतुदींचा फायदा घेतला
८. एकदा शमशोनला खूप तहान लागली तेव्हा त्याने काय केलं?
८ तुम्ही बायबलमधून असे इतरही अहवाल वाचले असतील ज्यांत शमशोनने आश्चर्याची कामं केली. त्याने एकट्यानेच एका सिंहाला ठार मारलं आणि अष्कलोन या पलिष्टी लोकांच्या शहरात ३० लोकांनासुद्धा मारून टाकलं. (शास्ते १४:५, ६, १९) शमशोनला माहीत होतं की यहोवाच्या मदतीशिवाय त्याला हे करणं शक्यच नव्हतं. उदाहरणार्थ, १,००० पलिष्टी लोकांशी लढून त्यांना ठार मारल्यानंतर तो तहानेने व्याकूळ झाला होता. अशा वेळी त्याने काय केलं? आपली तहान भागवण्यासाठी स्वतःच काहीतरी करण्याऐवजी त्याने त्यासाठी यहोवाकडे मदत मागितली.—शास्ते १५:१८.
९. शमशोनने मदतीसाठी केलेल्या प्रार्थनेचं यहोवाने कसं उत्तर दिलं? (शास्ते १५:१९)
९ शमशोनने मदतीसाठी केलेली प्रार्थना यहोवाने ऐकली आणि त्याला चमत्कार करून पाणी पुरवलं. ते पाणी प्यायल्यावर “शमशोनच्या जिवात जीव आला आणि तो ताजातवाना झाला.” (शास्ते १५:१९ वाचा.) असं दिसतं की हा पाण्याचा झरा पुढेही कित्येक वर्षांनंतरसुद्धा अस्तित्वात होता; म्हणजे, यहोवाने शमुवेलला शास्ते पुस्तक लिहायची प्रेरणा दिली तेव्हासुद्धा होता. वाहत्या पाण्याचा हा झरा पाहून इस्राएली लोकांना याची आठवण होत असेल, की जे यहोवावर विसंबून राहतात त्या विश्वासू सेवकांना त्यांच्या गरजेच्या वेळी तो मदत करतो.
यहोवाने पुरवलेलं पाणी प्यायल्यानंतर शमशोन ताजातवाना झाला. आपल्याला आध्यात्मिक रितीने मजबूत करण्यासाठी यहोवाने ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचाही आपण फायदा करून घेतला पाहिजे (परिच्छेद १० पाहा)
१०. यहोवाची मदत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१० आपल्याकडेसुद्धा बरीच कौशल्यं किंवा क्षमता असल्या किंवा यहोवाच्या सेवेत आपण काही गोष्टी साध्य केलेल्या असल्या, तरीसुदधा आपण मदतीसाठी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आपण हे नम्रपणे मान्य केलं पाहिजे, की खरं यश फक्त यहोवावर विसंबून राहिल्यामुळेच मिळतं. यहोवाने पुरवलेल्या पाण्यामुळे जसं शमशोन ताजातवाना झाला, तसंच आपणसुद्धा जेव्हा यहोवाने केलेल्या तरतुदींचा फायदा घेतो तेव्हा आध्यात्मिक रितीने आपण मजबूत होऊ शकतो.—मत्त. ११:२८.
११. आपण यहोवाकडून मिळणाऱ्या मदतीचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो? उदाहरण द्या.
११ रशियामध्ये राहणाऱ्या ॲलेक्सी नावाच्या आपल्या एका भावाचा विचार करा. त्याचा खूप वाईट रितीने छळ होत आहे. अशा कठीण परिस्थितीत खंभीर राहायला त्याला कशामुळे मदत होत आहे? तो आणि त्याची पत्नी नियमितपणे बायबल अभ्यास आणि उपासनेशी संबंधित इतर गोष्टी करत होते. याबद्दल तो म्हणतो: “मी माझा व्यक्तिगत अभ्यास आणि दररोजचं बायबल वाचन नियमितपणे करायचा प्रयत्न करतो. दररोज सकाळी मी आणि माझी पत्नी दैनिक वचनावर चर्चा करतो आणि सोबत मिळून यहोवाला प्रार्थना करतो.” यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? या बांधवाप्रमाणे आपणसुद्धा स्वतःवर अवलंबून राहण्याऐवजी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे. आपण हे कसं करू शकतो? आपण व्यक्तिगत अभ्यास नियमितपणे करून आणि उपासनेशी संबंधित इतर गोष्टींमध्ये भाग घेऊन आपला विश्वास मजबूत करू शकतो. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जी मेहनत घेतो त्यावर तो भरभरून आशीर्वाद देईल. त्याने शमशोनला जसं बळ दिलं तसं तो आपल्यालाही देईल.
शमशोनने हार मानली नाही
१२. शमशोनने कोणता चुकीचा निर्णय घेतला? आणि त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या इतर निर्णयांपेक्षा वेगळा का होता?
१२ शमशोन हा आपल्यासारखाच अपरिपूर्ण होता. त्यामुळे काही वेळा त्याने चुकीचे निर्णय घेतले. जसं की, त्याने एक असा निर्णय घेतला ज्याचे त्याला खूप वाईट परिणाम भोगावे लागले. तो शास्ता म्हणून काम करू लागला याच्या काही काळानंतर तो “दलीला नावाच्या एका स्त्रीच्या प्रेमात पडला; ती सोरेक खोऱ्यात राहायची.” (शास्ते १६:४) आधी शमशोनला एका पलिष्टी स्त्रीशी लग्न करायचं होतं. पण ‘हे सगळं यहोवाने घडवून’ आणलं होतं, कारण यहोवा “पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची संधी पाहत होता.” नंतर शमशोन गाझा या पलिष्टी शहरात एका वैश्येच्या घरी राहिला. आणि त्या वेळी यहोवा देवाने शमशोनला शहराचे दरवाजे उचलून न्यायची शक्ती दिली. त्यामुळे शहराची सुरक्षा धोक्यात आली. (शास्ते १४:१-४; १६:१-३) पण जेव्हा तो दलीलाच्या प्रेमात पडला तेव्हा गोष्ट वेगळी होती. ती कदाचित एक इस्राएली स्त्री असावी. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या त्याच्या संबंधामुळे त्याला पलिष्टी लोकांविरुद्ध लढायची संधी मिळणार नव्हती.
१३. दलीलाने शमशोनला कसं फसवलं?
१३ शमशोनला फसवण्यासाठी दलीलाने पलिष्टी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. शमशोन दलीलाच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता का, की तिचा नेमका हेतू काय आहे हे त्याला समजलं नाही. कारण काहीही असो, पण शमशोनला शक्ती कुठून मिळते, हे त्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी तिने त्याच्याकडे हट्ट धरला आणि शमशोनने शेवटी तिला सगळं काही सांगून दिलं. दुःखाची गोष्ट म्हणजे, शमशोनच्या या चुकीमुळे तो अडचणीत सापडला आणि त्याने त्याची शक्ती गमावली. आणि निदान काही काळासाठी तरी त्याने यहोवाची स्वीकृती गमावली.—शास्ते १६:१६-२०.
१४. दलीलावर भरवसा ठेवल्यामुळे शमशोनला कोणते परिणाम भोगावे लागेल?
१४ शमशोनने यहोवावर भरवसा ठेवण्याऐवजी दलीलावर भरवसा ठेवल्यामुळे त्याला त्याचे खूप दुःखद परिणाम भोगावे लागले. पलिष्टी लोकांनी त्याला पकडून त्याचे डोळे फोडले. त्याला गाझामध्ये तुरुंगात टाकण्यात आलं. काही काळाआधी त्याने याच शहराचे दरवाजे उखडून पलिष्टी लोकांचा अपमान केला होता. पण आता लोकांनी त्याला त्याच ठिकाणी धान्य दळायला लावलं होतं. यानंतर पलिष्टी लोकांनी त्याचा आणखीन अपमान करण्यासाठी मोठा आनंदोत्सव साजरा केला. त्यांनी दागोन या त्यांच्या खोट्या दैवतासाठी यज्ञ केला, कारण त्यांच्या देवाने शमशोनला त्यांच्या हाती दिलंय असं त्यांना वाटत होतं. त्यांनी शमशोनला त्यांची “करमणूक” करायला तुरुंगातून त्या ठिकाणी बाहेर आणलं.—शास्ते १६:२१-२५.
पलिष्टी लोकांविरुद्ध आपला न्यायदंड बजावण्यासाठी यहोवाने शमशोनला ताकद दिली (परिच्छेद १५ पाहा)
१५. शमशोनचा यहोवावर भरवसा होता हे त्याने पुन्हा एकदा कसं दाखवून दिलं? (शास्ते १६:२८-३०) (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)
१५ शमशोनने गंभीर चूक केली होती पण त्याने हार मानली नाही. पलिष्टी लोकांविरुद्ध लढण्याची देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो संधी शोधत राहिला. (शास्ते १६:२८-३० वाचा.) ‘मला पलिष्टी लोकांचा बदला घेऊ दे’ अशी विनंती त्याने यहोवाकडे केली. यहोवाने शमशोनच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्याला त्याची शक्ती परत दिली. त्यामुळे त्याने आतापर्यंत जितक्या पलिष्टी लोकांना मारलं होतं त्यापेक्षा जास्त लोकांना या वेळी ठार मारलं.
१६. चुका होऊनसूद्धा शमशोनने जे केलं त्यातून आपण काय शिकू शकतो?
१६ शमशोनला त्याच्या चुकीच्या निर्णयाचे जरी वाईट परिणाम भोगावे लागले, तरी त्याने यहोवाची इच्छा पूर्ण करायचं सोडलं नाही. आपल्या हातूनपण जेव्हा चुका होतात, आपल्याला ताडन देण्याची गरज पडते किंवा एखादी जबाबदारी आपण गमावतो, तेव्हा आपण हार मानली नाही पाहिजे. लक्षात ठेवा की यहोवा आपल्याबद्दल आशा सोडत नाही. (स्तो. १०३:८-१०) आपल्याकडून चुका झाल्या तरी शमशोनप्रमाणे यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करून घेऊ शकतो.
शमशोनला त्याच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर त्याला नक्कीच वाईट वाटलं असेल पण त्याने हार मानली नाही. आपणही असंच केलं पाहिजे (परिच्छेद १७-१८ पाहा)
१७-१८. मायकलच्या अनुभवातली कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली? (चित्रसुद्धा पाहा.)
१७ मायकल नावाच्या एका तरुण भावाच्या उदाहरणाचा विचार करा. तो यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त होता. तो मंडळीत सहायक सेवक आणि पायनियर म्हणून सेवा करायचा पण दुःखाची गोष्ट म्हणजे काही काळानंतर त्याच्या हातून एक चूक झाली. आणि त्यामुळे मंडळीत असलेल्या जबाबदाऱ्या त्याने गमावल्या. तो म्हणतोः “सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, मी यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त होतो. पण अचानक या गोष्टीमुळे मी काहीच कामाचा नाही असं मला वाटू लागलं. जसं की एक मोठी भिंतच माझासमोर उभी आहे असं मला वाटत होतं. यहोवाने मला सोडलंय असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. पण त्याच्यासोबत असलेलं माझं नातं आधीसारखं होईल का? आणि मंडळीत मला पहिल्यासारखी आवेशाने त्याची सेवा करता येईल का अशी शंका मला होती.”
१८ पण चांगली गोष्ट म्हणजे मायकलने हार मानली नाही. तो म्हणतो: “यहोवासोबतचं नातं चांगलं करत राहण्यासाठी मी प्रयत्न करत राहिलो. मी दररोज त्याला प्रार्थना करून त्याला मनातलं सांगायचो तसंच अभ्यास आणि मननसुद्धा करायचो.” काही काळानंतर, मायकलने मंडळीमध्ये पुन्हा एक चांगलं नाव कमवलं. तो आता एक वडील आणि पायनियर म्हणून सेवा करतो. तो म्हणतो: “मंडळीकडून आणि खासकरून वडिलांकडून मला जी मदत आणि उत्तेजन मिळालं त्यामुळे यहोवाचं माझ्यावर खरंच किती प्रेम आहे याची जाणीव मला झाली. मी आता पुन्हा एकदा शुद्ध विवेकाने मंडळीमध्ये सेवा करू शकत होतो. या अनुभवातून मला शिकायला मिळालं की जे मनापासून पश्चात्ताप करतात त्यांना क्षमा करायला यहोवा तयार असतो.” आपल्या हातूनही जरी चुका झाल्या तरी आपण त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि यहोवावर विसंबून राहू शकतो. असं केल्यामुळे आपण ही खातरी बाळगू शकतो की यहोवा त्याच्या सेवेत आपला उपयोग करेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल.—स्तो. ८६:५; नीति. २८:१३.
१९. शमशोनच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे तुम्हाला कशी मदत झाली आहे?
१९ या लेखात आपण शमशोनच्या आयुष्यात घडलेल्या काही अद्भुत घटनांबद्दल चर्चा केली. तो परिपूर्ण नव्हता. दलीलाच्या बाबतीत त्याच्या हातून एक चूक झाली, तरी यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने हार मानली नाही. आणि यहोवानेही त्याला सोडलं नाही. आणि जबरदस्त गोष्टी करण्यासाठी पुन्हा एकदा त्याचा वापर केला. त्याच्या हातून चूक झाली तरी यहोवाने विश्वासाचं एक भक्कम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं. आणि इब्री लोकांना ११ व्या अध्यायात सांगितलेल्या विश्वासू स्त्री-पुरुषांमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख केला. अशा प्रेमळ पित्याची सेवा करणं ही गोष्ट खरंच किती प्रोत्साहनदायक आहे! खासकरून आपण कमजोर असताना तो आपल्याला मदत करायला आणि बळ द्यायला तयार असतो. त्यामुळे शमशोनसारखं आपण यहोवाला विनंती करू या: ‘यहोवा, माझी आठवण कर, मला शक्ती दे.’—शास्ते १६:२८.
गीत ३ यहोवा आपलं बळ आणि आसरा
a शमशोन—हे नाव अनेकांना माहीत आहे. ज्यांना बायबलबद्दल जास्त माहिती नाही, त्यांच्यासाठीसुद्धा हे नाव ओळखीचं आहे. त्याच्या जीवनावर बऱ्याच नाटककारांनी, गीतकारांनी आणि चित्रपट बनवणाऱ्यांनी लिहिलंय. असं असलं तरी बायबलमध्ये दिलेला त्याचा अहवाल ही फक्त एक कथा नाही. शमशोन एक खराखुरा व्यक्ती होता आणि त्याने विश्वासाचं एक जबरदस्त उदाहरण मांडलं. त्याच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो.