वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 ऑगस्ट पृ. २-७
  • तरुणांनो​—बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तरुणांनो​—बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी . . .
  • ध्येय ठेवल्यामुळे तुम्हाला प्रगती करायला कशी मदत होईल?
  • तुमचं प्रेम वाढवत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • आध्यात्मिक प्रगती करीत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • पुढेही प्रगती करत राहा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • आध्यात्मिक प्रगती करण्याची गरज ओळखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 ऑगस्ट पृ. २-७

अभ्यास लेख ३२

तरुणांनो​—बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहा

“सगळ्या गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावं.”​—इफिस. ४:१५.

गीत ३४ आपल्या नावाला जागू या!

सारांशa

१. तरुण भाऊ-बहिणींनी कशा प्रकारे चांगली प्रगती केली आहे?

दरवर्षी ख्रिस्ती मंडळीत हजारो तरुण मुलं-मुली बाप्तिस्मा घेतात. तुमचाही बाप्तिस्मा झालाय का? जर असेल, तर तुमच्या या निर्णयामुळे मंडळीतल्या भाऊबहिणींना आणि यहोवाला किती आनंद झाला असेल याचा विचार करा. (नीति. २७:११) आतापर्यंत तुम्ही नक्कीच भरपूर प्रगती केली आहे. जसं की, बायबलचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आणि कदाचित बऱ्‍याच वर्षांपर्यंत तुम्ही बायबलचा अभ्यास केला असेल. या अभ्यासामुळे बायबल हे देवाचं वचन आहे याची तुम्हाला पक्की खातरी पटली असेल. आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे, बायबलचा लेखक यहोवा देव याला तुम्ही जाणून घेतलं आणि त्याच्यावर प्रेम करू लागला. या प्रेमामुळेच तुम्ही आज यहोवाचे समर्पित आणि बाप्तिस्मा घेतलेले सेवक आहात. खरंच आतापर्यंत तुम्ही खूप छान प्रगती केली आहे!

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

२ बाप्तिस्म्याआधी नक्कीच तुम्हाला बऱ्‍याच समस्या आल्या असतील. आणि त्यामुळे यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणं तुम्हाला कठीण गेलं असेल. आणि आता तुम्ही जसजसं मोठे व्हाल तसतसं तुम्हाला आणखी नवीन समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्ही यहोवावर प्रेम करायचं आणि त्याची सेवा करायचं सोडून द्यावं म्हणून सैतान नक्कीच प्रयत्न करेल. (इफिस. ४:१४) पण असं कधीच होऊ देऊ नका. उलट, यहोवाला एकनिष्ठ राहायचा आणि समर्पणाच्या वेळी तुम्ही त्याला जे वचन दिलं ते पूर्ण करायचा पक्का निश्‍चय करा. पण तुम्हाला हे कसं करता येईल? यासाठी तुम्ही पुढेही प्रगती करत राहायचा प्रयत्न करत राहिलं पाहिजे. म्हणजेच, यहोवाच्या सेवेत प्रौढतेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही “खटपट” केली पाहिजे. (इब्री ६:१) मग यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागेल?

प्रौढ ख्रिस्ती बनण्यासाठी . . .

३. बाप्तिस्म्यानंतरही आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे?

३ बाप्तिस्म्यानंतर आपण सगळ्यांनीच, प्रेषित पौलने इफिसच्या मंडळीला दिलेला सल्ला पाळला पाहिजे. त्याने ख्रिस्ती या नात्याने त्यांना ‘पूर्णपणे विकसित व्हायचं’ प्रोत्साहन दिलं. (इफिस. ४:१३, तळटीप.) म्हणजे ‘पुढेही प्रगती करत राहा’ असं तो त्यांना सांगत होता. या वचनात प्रेषित पौलने एखाद्याच्या आध्यात्मिक प्रगतीची तुलना लहान मुलाच्या वाढीशी केली आहे. आईवडिलांना आपल्या लहान बाळाला पाहून खूप आनंद होतो आणि त्यांना त्याचं खूप कौतुक असतं. पण ते बाळ काही कायम बाळ राहत नाही. हळूहळू ते मोठं होत जातं. आणि “लहानपणीच्या गोष्टी” सोडून देतं. (१ करिंथ. १३:११) आध्यात्मिक वाढीच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. बाप्तिस्म्यानंतरही आपण पुढे प्रगती करत राहणं गरजेचं आहे. आपण हे कोणकोणत्या मार्गांनी करू शकतो ते आता आपण पाहू या.

४. प्रगती करत राहण्यासाठी आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल? स्पष्ट करा. (फिलिप्पैकर १:९)

४ यहोवावर असलेलं तुमचं प्रेम वाढवत राहा. यहोवावर तुमचं खूप प्रेम आहे यात काही शंका नाही. पण तुम्ही हे प्रेम आणखी वाढवू शकता. ते कसं? फिलिप्पैकर १:९ मध्ये (वाचा.) प्रेषित पौलने याचा एक मार्ग सांगितलाय. पौलने अशी प्रार्थना केली की फिलिप्पैमधल्या भाऊबहिणींचं प्रेम “दिवसेंदिवस आणखी वाढत राहावं.” यावरून कळतं, की यहोवावरचं आपलं प्रेम आपण आणखी वाढवू शकतो. पण हे आपल्याला कसं करता येईल? त्यासाठी आपण “सत्याचं अचूक ज्ञान आणि पूर्ण समज” मिळवली पाहिजे. आपण यहोवाला जितकं जास्त जाणून घेतो, तितकं आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढत जातं. तसंच त्याच्या सुंदर गुणांबद्दल आणि तो ज्या प्रकारे काम करतो त्याबद्दल आपली कदर वाढते. त्यामुळे त्याचं मन आनंदित करायची आपली इच्छाही वाढते. आणि त्याला न आवडणाऱ्‍या गोष्टी टाळायचा आपला निश्‍चयही पक्का होतो. यासोबतच, त्याची काय इच्छा आहे आणि आपण त्याप्रमाणे कसं वागू शकतो हे समजून घ्यायचा आपण नेहमी प्रयत्न करतो.

५-६. यहोवावरचं प्रेम आपण कसं वाढवू शकतो? समजावून सांगा.

५ येशूने आपल्या पित्याच्या व्यक्‍तिमत्वाचं अगदी हुबेहुब अनुकरण केलं. त्यामुळे यहोवावरचं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण येशूबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. (इब्री १:३) येशूबद्दल जास्त जाणून घेण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांचा अभ्यास करणं. जर तुम्हाला दररोज बायबल वाचायची सवय नसेल तर आतापासूनच तुम्ही ते सुरू करू शकता. येशूबद्दलचे अहवाल वाचत असताना खासकरून त्याच्या गुणांकडे लक्ष द्या. लोकांना त्याच्यासोबत राहायला आणि त्याच्यासोबत बोलायला आवडायचं. तो लहान मुलांना प्रेमाने आपल्या जवळ घ्यायचा. (मार्क १०:१३-१६) शिष्यांना त्याच्यासोबत बोलायला कधीच संकोच वाटत नव्हता. ते अगदी सहजपणे आपल्या मनातल्या गोष्टी त्याला सांगू शकत होते. (मत्त. १६:२२) तो आपल्या पित्यासारखाच होता. यहोवासुद्धा नेहमी आपलं ऐकून घ्यायला तयार असतो. म्हणून आपण त्याला प्रार्थना करू शकतो आणि आपले विचार आणि आपल्या भावना त्याला मनमोकळेपणाने सांगू शकतो. तो आपल्याबद्दल काय विचार करेल अशी भीती मनात बाळगायची आपल्याला गरज नाही. कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला आपली काळजी आहे.​—१ पेत्र ५:७.

६ येशूला लोकांबद्दल सहानुभूती होती. प्रेषित मत्तयने म्हटलं: “त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.” (मत्त. ९:३६) आणि यहोवाबद्दल काय? यहोवाला लोकांबद्दल कसं वाटतं? येशूने म्हटलं: “या लहानांपैकी एकाचाही नाश व्हावा अशी स्वर्गातल्या माझ्या पित्याची इच्छा नाही.” (मत्त. १८:१४) हे शब्द वाचून आपल्याला किती बरं वाटतं! कारण यावरून आपल्याला कळतं, की येशूला जशी लोकांबद्दल सहानुभूती होती तशीच यहोवालासुद्धा आहे. आणि त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. खरंच, आपण येशूबद्दल जितकं जास्त जाणून घेऊ तितकंच यहोवावरचं आपलं प्रेम वाढत जाईल.

७. आध्यात्मिक रीतीने प्रौढ असलेल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

७ तुम्हालाही यहोवा आणि येशूसारखंच इतरांशी प्रेमळपणे वागायची आणि ख्रिस्ती या नात्याने प्रगती करायची इच्छा आहे का? मग आध्यात्मिक रीत्या प्रौढ असलेल्या तुमच्या मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवायचा आणि त्यांची चांगल्या प्रकारे ओळख करून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला दिसून येईल, की ते किती आनंदी आहेत. आणि यहोवाची सेवा करायचा त्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांना कधीच पस्तावा झाला नाही. यहोवाच्या सेवेत त्यांना कोणकोणते अनुभव आले त्याबद्दल त्यांना विचारा. तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यांचा सल्ला घ्या. कारण बायबल सांगतं, की “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे यश मिळतं.”​—नीति. ११:१४.

कोलाज: १. एक तरुण बहीण “वॉज लाइफ क्रियेटेड?” आणि “जीवसृष्टीची सुरुवात​—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न” ही माहितीपत्रकं वापरून संशोधन करत आहे. २. तिच बहीण कॉलेजमधल्या वर्गसोबत्यांना आणि शिक्षकांना तिने केलेल्या संशोधनाबद्दल सांगत आहे.

शाळेत उत्क्रांतीबद्दल शिकवलं जातं तेव्हा तुम्ही आपल्या विश्‍वासाबद्दल सांगायला कशी तयारी करू शकता? (परिच्छेद ८-९ पाहा)

८. बायबलमध्ये जे सांगितलंय त्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही काय करू शकता?

८ तुमच्या मनातल्या शंका दूर करा. परिच्छेद २ मध्ये आपण पाहिलं होतं की सैतान तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यापासून रोखायचा प्रयत्न करेल. आणि यासाठी तो बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या बाबतीत तुमच्या मनात शंका निर्माण करेल. जसं की, काही लोक तुम्हाला असं पटवून द्यायचा प्रयत्न करतील की आपल्याला देवाने निर्माण केलं नाही, तर आपण उत्क्रांतीमुळे अस्तित्वात आलो. लहान असताना कदाचित तुम्ही याबद्दल जास्त विचार केला नसेल. पण आता तुम्हाला शाळेत त्याबद्दल शिकवलं जात असेल. आणि शिक्षक तुम्हाला याबाबतीत जे शिकवतात ते अगदी पटण्यासारखं आहे असं तुम्हाला वाटेल. पण कदाचित त्यांनी निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाबद्दलचे पुरावे कधीच तपासून पाहिले नसतील. नीतिवचनं १८:१७ मधलं तत्त्व नेहमी लक्षात ठेवा. तिथे म्हटलंय: “जो आपला दावा आधी मांडतो, त्याचं म्हणणं योग्य वाटतं, पण नंतर दुसरा पक्ष येऊन त्याची उलटतपासणी करतो.” तर यावरून आपण काय शिकतो? शाळेत जे काही शिकवलं जातं त्यावर डोळे झाकून विश्‍वास ठेवण्याऐवजी बायबलमध्ये जे सांगितलंय त्याचं चांगल्या प्रकारे परीक्षण करा. आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करा. ज्या भाऊबहिणींचा आधी उत्क्रांतीवर विश्‍वास होता त्यांच्याशी बोला. आपल्यावर प्रेम करणारा एक निर्माणकर्ता आहे या गोष्टीची त्यांना खातरी कशी पटली याबद्दल त्यांना विचारा. अशा प्रकारच्या चर्चांमुळे निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या पुराव्यांचं परीक्षण करायला तुम्हाला मदत होईल.

९. मेलिसाच्या उदाहरणातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

९ मेलिसा नावाच्या एका बहिणीने निर्मितीच्या विषयावर संशोधन केलं. यामुळे तिला तिच्या शंका दूर करायला मदत झाली.b ती म्हणते: “शाळेत उत्क्रांतीबद्दल शिकवताना शिक्षक तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न करतात की तेच खरंय. पहिल्यांदा मी याबद्दल जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करत नव्हते. कारण मला भीती होती, की मला निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सापडणार नाहीत. पण मला हे माहीत होतं, की आपण डोळे झाकून यहोवावर विश्‍वास ठेवावा अशी त्याची इच्छा नाही. म्हणून मी या विषयावर संशोधन करायचं ठरवलं. इझ देअर अ क्रियेटर हू केअर्स अबाऊट यू?  (आपल्याबद्दल काळजी असणारा एक निर्माणकर्ता आहे का?) आणि वॉज लाइफ क्रियेटेड?  (जीवसृष्टी खरंच निर्माण करण्यात आली आहे का?) हे माहितीपत्रक मी वाचायला घेतलं. आणि याच सोबत जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न  हे माहितीपत्रकही मी वाचलं. ही प्रकाशनं वाचल्यानंतर माझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. मी हे आधीच का केलं नाही असं मला वाटलं.”

१०-११. आपल्या वाईट इच्छांवर मात करायला कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? (१ थेस्सलनीकाकर ४:३, ४)

१० वाईट कामांपासून दूर राहा. किशोरवयात लैंगिक भावना खूप तीव्र असतात आणि वाईट काम करायचा दबावही तुमच्यावर येण्याची शक्यता असते. सैतानाचीसुद्धा हीच इच्छा आहे की तुम्ही अशी वाईट कामं करावी. मग अशा वाईट कामांपासून दूर राहायला तुम्हाला कशामुळे मदत मिळेल? (१ थेस्सलनीकाकर ४:३, ४ वाचा.) त्यासाठी यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करा. तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे त्याला सांगा. आणि चुकीच्या कामांपासून दूर राहायला त्याच्याजवळ मदत मागा. (मत्त. ६:१३) यहोवाला आपल्याबद्दल काय वाटेल, असा विचार करू नका. त्याला तुम्हाला शिक्षा द्यायची नाही तर मदत करायची इच्छा आहे. (स्तो. १०३:१३, १४) बायबल वाचल्यामुळेसुद्धा तुम्हाला मदत होईल. आधी उल्लेख केलेल्या मेलिसालासुद्धा वाईट इच्छांवर मात करायला खूप प्रयत्न करावा लागला. ती म्हणते, “रोज बायबल वाचल्यामुळे हार न मानता प्रयत्न करत राहायला मला मदत झाली. शिवाय, मी यहोवाला आपलं जीवन समर्पित केलंय आणि मला त्याचीच सेवा करायची आहे ही गोष्ट नेहमी आठवणीत ठेवायलाही मला मदत झाली.”​—स्तो. ११९:९.

११ तुम्हाला एकट्यानेच या सगळ्या समस्यांचा सामना करायचाय असा विचार करू नका. तर याबद्दल तुमच्या आईवडिलांशी बोला आणि त्यांना तुमच्या समस्या सांगा. कदाचित अशा विषयांवर त्यांच्याशी बोलायला तुम्हाला अवघड जाईल. पण हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. मेलिसा म्हणते: “सगळ्यात आधी मी यहोवाला प्रार्थना केली की त्याने मला हिंमत द्यावी. आणि मग मी माझ्या समस्येबद्दल माझ्या पप्पांशी बोलले. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला खूप बरं वाटलं. मला माहीत होतं, की या गोष्टीमुळे यहोवा माझ्यावर खूश झाला असेल.”

१२. तुम्ही चांगले निर्णय कसे घेऊ शकता?

१२ बायबलच्या तत्त्वांप्रमाणे निर्णय घ्यायला शिका. तुम्ही लहान होता तेव्हा तुमचे मम्मी-पप्पा तुम्हाला काय करायचं ते सांगायचे. पण आता तुम्ही जसजसं मोठं होत जाल, तसतसं तुम्हाला स्वतः निर्णय घ्यावे लागतील. पण अजूनही तुमच्याजवळ पुरेसा अनुभव नाही. एखादा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं बिघडू नये म्हणून तुम्ही काय करू शकता? (नीति. २२:३) कॅरी नावाच्या एका बहिणीला चांगले निर्णय घ्यायला कशामुळे मदत झाली याबद्दल ती आपला अनुभव सांगते. तिला समजलं की आध्यात्मिक रितीने प्रौढ झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी एका नियमाची गरज नसते. ती म्हणते: “फक्‍त नियम नाही, तर बायबलमधली तत्त्वं समजून घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं.” बायबल वाचत असताना स्वतःला विचारा: ‘या माहितीवरून मला यहोवाच्या विचारसरणीबद्दल काय कळतं? यामध्ये अशी काही तत्त्वं आहेत का ज्यांमुळे मला दररोजच्या जीवनात फायदा होईल? आणि होईल तर तो कसा होईल?’ (स्तो. १९:७; यश. ४८:१७, १८) दररोज बायबल वाचल्यामुळे आणि त्यातल्या तत्त्वांवर मनन केल्यामुळे तुम्हाला यहोवाला आवडतील असे निर्णय घ्यायला सोपं जाईल. तुम्ही जर असं करत राहिला तर तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्टीसाठी नियमांची गरज नसते. उलट यहोवा कसा विचार करतो हे समजून घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे निर्णय घेता येतील.

दोन बहिणी “टेहळणी बुरूज” मासिकातून अभ्यास करत आहेत.

एका तरुण बहिणीने कोणाशी मैत्री केली? (परिच्छेद १३ पाहा)

१३. चांगले मित्र तुम्हाला कशी मदत करू शकतात? (नीतिवचनं १३:२०)

१३ यहोवावर प्रेम करणारे मित्र निवडा. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर यहोवाच्या सेवेत प्रगती करायची असेल, तर चांगले मित्र निवडणं खूप गरजेचं आहे. (नीतिवचनं १३:२० वाचा.) सारा नावाच्या एका बहिणीला यहोवाच्या सेवेत आधीसारखा आनंद मिळत नव्हता. पण मग असं काहीतरी घडलं ज्यामुळे तिचा दृष्टिकोन बदलला. सारा म्हणते: “मला जीवनात अगदी योग्य वेळी चांगले मित्र मिळाले. एका तरुण बहिणीने मला खूप मदत केली. ती दर आठवडी माझ्यासोबत टेहळणी बुरूज मासिकाचा अभ्यास करायची. दुसऱ्‍या एका बहिणीने मला सभांमध्ये उत्तरं द्यायचं प्रोत्साहन दिलं. माझ्या मित्रमैत्रिणींच्या मदतीमुळेच मी आणखी चांगल्या प्रकारे व्यक्‍तिगत अभ्यास आणि प्रार्थना करू लागले. हळहळू यहोवासोबतचं माझं नातं आणखी घट्ट झालं आणि मी पुन्हा एकदा आनंदाने यहोवाची सेवा करू लागले.”

१४. ज्युलियनने चांगले मित्र कसे बनवले?

१४ तुम्हाला प्रगती करायला मदत करतील असे चांगले मित्र तुम्ही कसे बनवू शकता? वडील म्हणून सेवा करणारा ज्युलियन नावाचा एक भाऊ म्हणतो: “मी लहान होतो तेव्हा वेगवेगळ्या भाऊबहिणींसोबत प्रचार करायचो. आणि यामुळे माझी त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. हे भाऊबहीण खूप आवेशी होते. आणि प्रचारकार्य केल्यामुळे किती आनंद मिळतो, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. तेव्हापासून मी पूर्ण वेळची सेवा करायचं ध्येय ठेवलं. आधी मी फक्‍त माझ्याच वयाच्या लोकांशी मैत्री करायचो. पण नंतर मला जाणवलं, की मोठ्या लोकांशीसुद्धा आपली चांगली मैत्री होऊ शकते. पुढे बेथेलला गेल्यानंतर, तिथेही मला खूप चांगले मित्र मिळाले. त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे मला योग्य मनोरंजन निवडायला मदत झाली. आणि यामुळे यहोवासोबतचं माझं नातं आणखी मजबूत झालं.”

१५. पौलने तीमथ्यला कोणता सल्ला दिला? (२ तीमथ्य २:२०-२२)

१५ मंडळीमध्ये एखाद्या व्यक्‍तीसोबत जास्त वेळ घालवल्यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं बिघडू शकतं असं जर तुम्हाला जाणवलं तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिल्या शतकात ख्रिस्ती मंडळीमध्ये असे काही जण होते. त्यांचे विचार आणि त्यांची वागणूक देवाच्या सेवकांना शोभणारी नव्हती. आणि म्हणूनच पौलने तीमथ्यला त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. (२ तीमथ्य २:२०-२२ वाचा.) यहोवासोबतची मैत्री आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. ही मैत्री जोडण्यासाठी आपण आत्तापर्यंत खूप मेहनत घेतली आहे. आणि म्हणून कोणत्याही व्यक्‍तीमुळे आपलं हे नातं बिघडणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे.​—स्तो. २६:४.

ध्येय ठेवल्यामुळे तुम्हाला प्रगती करायला कशी मदत होईल?

१६. तुम्ही कोणती ध्येयं ठेवू शकता?

१६ योग्य ध्येयं ठेवा. अशी ध्येयं ठेवा ज्यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होईल आणि तुम्हाला एक प्रौढ ख्रिस्ती बनायला मदत होईल. (इफिस. ३:१६) जसं की, तुम्ही नियमितपणे वैयक्‍तिक अभ्यास करायचं आणि दररोज बायबल वाचायचं ध्येय ठेवू शकता. (स्तो. १:२, ३) तसंच, तुम्ही दिवसातून जास्त वेळा आणि मनापासून प्रार्थना करायचा प्रयत्न करू शकता. कदाचित तुम्ही कोणत्या प्रकारचं मनोरंजन करता आणि तुमच्या वेळेचा वापर कसा करता याकडे लक्ष द्यायची गरज असेल. याबाबतीत योग्य निर्णय घ्यायचं ध्येय तुम्ही ठेवू शकता. (इफिस. ५:१५, १६) प्रगती करण्यासाठी तुम्ही किती मेहनत घेत आहात हे जेव्हा यहोवा पाहील तेव्हा त्याला खूप आनंद होईल.

“टेहळणी बुरूज” मासिकातून अभ्यास करणाऱ्‍या दोन बहिणींपैकी एक बहीण एका वयस्कर बहिणीला सामान खरेदी करायला मदत करत आहे.

एका तरुण बहिणीने कोणतं ध्येय ठेवलं? (परिच्छेद १७ पाहा)

१७. इतरांची मदत केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल?

१७ इतरांची मदत करूनही तुम्ही एक प्रौढ ख्रिस्ती बनू शकता. येशूने म्हटलं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्यं २०:३५) तुमच्याकडे असलेल्या वेळेचा आणि शक्‍तीचा इतरांची मदत करायला तुम्ही उपयोग केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. जसं की, तुम्ही तुमच्या मंडळीतल्या वयस्कर आणि आजारी भाऊबहिणींना मदत करायचं ध्येय ठेवू शकता. त्यांची काही कामं तुम्ही करून देऊ शकता किंवा त्यांना मोबाईल किंवा टॅब वापरायला मदत करू शकता. तुम्ही एक भाऊ असाल तर मंडळीतल्या भाऊबहिणींची आणखी चांगल्या प्रकारे मदत करता यावी म्हणून तुम्ही सहायक सेवक बनायचं ध्येय ठेवू शकता. (फिलिप्पै. २:४) तसंच, राज्याचा संदेश सांगण्याद्वारे तुम्ही लोकांना प्रेम दाखवू शकता. (मत्त. ९:३६, ३७) शक्य असेल तर पूर्ण वेळेची सेवा करण्याचं ध्येयसुद्धा तुम्ही ठेवू शकता.

१८. पूर्ण वेळेची सेवा केल्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करायला कशी मदत होईल?

१८ पूर्ण वेळेच्या सेवेमुळे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी बऱ्‍याच संधी मिळतील. उदाहरणार्थ, पायनियर सेवा केल्यामुळे तुम्हाला पुढे सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेला जाता येईल. तसंच, तुम्ही बेथेलमध्ये किंवा बांधकाम प्रकल्पांवरसुद्धा काम करू शकाल. कॅथी नावाची एक पायनियर बहीण म्हणते: “अनुभवी भाऊबहिणींसोबत सेवाकार्य केल्यामुळे मला बाप्तिस्म्यानंतर प्रगती करायला खूप मदत झाली. बायबलचं आणखी सखोल ज्ञान घेण्यासाठी आणि शिकवण्याचं कौशल्य आणखी वाढवण्यासाठी मला त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे खूप प्रोत्साहन मिळालं.”

१९. आध्यात्मिक प्रगती करत असताना तुम्हाला कोणकोणते आशीर्वाद मिळतील?

१९ तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत राहाल तसतसे तुम्हाला बरेच आशीर्वाद मिळत राहतील. तुमचा वेळ आणि शक्‍ती निरर्थक गोष्टींमध्ये वाया जाणार नाही. (१ योहा. २:१७) तसंच, चुकीचे निर्णय घेतल्यामुळे येणाऱ्‍या निराशेचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही. उलट, तुम्ही जीवनात यशस्वी आणि आनंदी व्हाल. (नीति. १६:३) तुमच्या चांगल्या उदाहरणामुळे तरुण आणि वयस्कर अशा सगळ्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळेल. (१ तीम. ४:१२) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाचं मन आनंदित केल्यामुळे आणि त्याच्यासोबत जवळची मैत्री केल्यामुळे तुम्हाला शांती आणि समाधान मिळेल.​—नीति. २३:१५, १६.

तुमचं उत्तर काय असेल?

  • बाप्तिस्म्यानंतरही प्रगती करत राहणं का गरजेचं आहे?

  • आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी एक तरुण व्यक्‍ती काय करू शकते?

  • योग्य ध्येयं ठेवल्यामुळे आध्यात्मिक प्रगती करायला कशी मदत होऊ शकते?

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

a मंडळीत जेव्हा तरुण मुलं-मुली बाप्तिस्मा घेतात तेव्हा आपल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आणि सहाजिकच या तरुणांनी बाप्तिस्म्यानंतर प्रगती करत राहणं खूप महत्त्वाचं आहे. हे तरुण कोणकोणत्या मार्गांनी प्रगती करू शकतात आणि प्रौढ ख्रिस्ती बनू शकतात त्याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, मंडळीतल्या इतरांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा