वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w22 फेब्रुवारी पृ. २-७
  • यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • बायबल वाचताना यहोवावर भरवसा ठेवा
  • संघटनेकडून मार्गदर्शन मिळतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा
  • यहोवावर जर आत्ताच भरवसा ठेवला तर भविष्यातही ठेवता येईल
  • आपल्या भाऊबहिणींवर भरवसा ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आनंदी जीवनाकरता भरवसा अत्यावश्‍यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • यहोवावरील तुमचा भरवसा भक्कम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • नेहमी यहोवावर भरवसा ठेवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
w22 फेब्रुवारी पृ. २-७

अभ्यास लेख ६

यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवा

“तो खडक आहे; त्याची कार्यं परिपूर्ण आणि त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो विश्‍वासू देव आहे, तो कधीच अन्याय करत नाही, तो नीतिमान आणि प्रामाणिक आहे.”—अनु. ३२:४.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांशa

१-२. (क) आज जगात ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्यावर भरवसा ठेवायला अनेकांना कठीण का जातं? (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आज जगात ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांच्यावर भरवसा ठेवायला अनेकांना कठीण जातं. कारण सध्याची न्याय व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था पैसेवाल्यांच्या आणि सत्तेवर असणाऱ्‍यांच्या खिशात आहे असं दिसतं. गरिबांना मात्र अन्याय सहन करावा लागतो. म्हणून बायबल जे म्हणतं, ते अगदी योग्यच आहे: “माणसाने माणसावर अधिकार गाजवून त्याचं नुकसान केलं आहे.” (उप. ८:९) याशिवाय, धर्मगुरूंचा ढोंगीपणा पाहून काहींचा देवावरचा विश्‍वासच उडाला आहे. त्यामुळे जेव्हा एक व्यक्‍ती बायबल अभ्यास करू लागते, तेव्हा तिला यहोवावर आणि त्याच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्‍या माणसांवर भरवसा ठेवणं कठीण जाऊ शकतं. आणि त्यासाठी तिला मदत करताना आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते.

२ पण यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर भरवसा ठेवायची गरज फक्‍त बायबल विद्यार्थ्यांनाच आहे असं नाही. तर जे अनेक वर्षांपासून सत्यात आहेत त्यांनासुद्धा आहे. त्यांनीही या गोष्टीवर भरवसा ठेवला पाहिजे, की यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं. पण काही वेळा यहोवावरच्या आपल्या भरवशाची परीक्षा होऊ शकते. या लेखात आपण अशा तीन परिस्थितींचा विचार करू या: (१) बायबलमधला एखादा अहवाल वाचत असताना, (२) संघटनेकडून काही मार्गदर्शन किंवा सूचना मिळतात तेव्हा, आणि (३) भविष्यात समस्यांचा सामना करत असताना.

बायबल वाचताना यहोवावर भरवसा ठेवा

३. बायबलमधल्या काही अहवालांमुळे यहोवावरच्या आपल्या भरवशाची परीक्षा कशी होऊ शकते?

३ बायबल वाचत असताना यहोवा काही लोकांशी असा का वागला किंवा त्याने असे निर्णय का घेतले, असे प्रश्‍न कदाचित आपल्या मनात येतील. उदाहरणार्थ, गणना पुस्तकात आपण अशा एका इस्राएली व्यक्‍तीबद्दल वाचतो, ज्याने शब्बाथाच्या दिवशी लाकडं गोळा केली म्हणून यहोवाने त्याला मृत्युदंड दिला. याच्या अनेक शतकांनंतर शमुवेलच्या दुसऱ्‍या पुस्तकात आपण असं वाचतो, की दावीद राजाने व्यभिचार आणि खून करूनसुद्धा यहोवाने त्याला माफ केलं. (गण. १५:३२, ३५; २ शमु. १२:९, १३) त्यामुळे आपल्याला कदाचित असा प्रश्‍न पडेल, की एका व्यक्‍तीने एक छोटीशी चूक केली तरी यहोवाने त्याला मृत्युदंड दिला, आणि दावीदने तर इतकं मोठं पाप केलं तरीसुद्धा यहोवाने त्याला कसं काय माफ केलं? पण बायबलमधला असा एखादा अहवाल वाचताना आपण तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

४. उत्पत्ती १८:२०, २१ आणि अनुवाद १०:१७ या वचनांमुळे न्याय करण्याच्या यहोवाच्या पद्धतीवरचा आपला भरवसा कसा वाढतो?

४ एखाद्या अहवालाबद्दल बायबल नेहमीच सगळी माहिती देतं असं नाही.  उदाहरणार्थ, दावीदबद्दल आपल्याला हे माहीत आहे, की त्याने जे काही केलं होतं त्याबद्दल त्याने मनापासून पश्‍चाताप केला. (स्तो. ५१:२-४) पण शब्बाथाचा नियम मोडणाऱ्‍या त्या इस्राएली माणसाबद्दल काय म्हणता येईल? तो कसा होता? केलेल्या चुकीबद्दल त्याला पश्‍चाताप झाला होता का? याआधीसुद्धा त्याने देवाचा नियम मोडला होता का? बऱ्‍याच वेळा सांगूनसुद्धा त्याने तीच चूक पुन्हा केली होती का? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं बायबल देत नाही. पण एक गोष्ट आपण अगदी खातरीने म्हणू शकतो. ती म्हणजे, यहोवा “कधीच अन्याय करत नाही.” (अनु. ३२:४) माणसांसारखं, तो ऐकलेल्या गोष्टींवर किंवा इतरांबद्दल असलेल्या चुकीच्या मतांवर किंवा अशाच इतर गोष्टींच्या आधारावर न्याय करत नाही. तर तो सगळी माहिती आणि परिस्थिती विचारात घेऊन न्याय करतो. (उत्पत्ती १८:२०, २१; अनुवाद १०:१७ वाचा.) आपण यहोवाबद्दल आणि त्याच्या स्तरांबद्दल जितकं जास्त शिकून घेऊ, तितकाच त्याच्या न्याय करण्याच्या पद्धतीवरचा आपला भरवसा वाढेल. हे खरं आहे, की बायबलमधले काही अहवाल वाचताना आपल्या मनात शंका येतील आणि आज कदाचित त्यांची उत्तरं आपल्याला देता येणार नाहीत. पण तरीसुद्धा यहोवाबद्दल आत्तापर्यंत आपल्याला जितकं माहीत आहे, त्यावरून एका गोष्टीचा आपण भरवसा ठेवू शकतो. ती म्हणजे, यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं, कारण ‘त्याचे सर्व मार्ग नीतिमान असतात.’—स्तो. १४५:१७.

५. अपरिपूर्ण असल्यामुळे कधीकधी आपल्याकडूनही काय होऊ शकतं? (“अपरिपूर्णतेमुळे आपल्याला सगळं काही स्पष्ट दिसेलच असं नाही” ही चौकटसुद्धा पाहा.)

५ अपरिपूर्ण असल्यामुळे, आपण नेहमीच योग्य न्याय करत नाही.  आपल्याला यहोवाच्या प्रतिरूपात बनवलं आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय झालेला आपल्याला पाहवत नाही. (उत्प. १:२६) पण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याकडून कधीकधी अन्याय होऊ शकतो. आपल्याला कदाचित असं वाटेल, की आपल्याला सगळं माहीत आहे. पण तरीसुद्धा आपल्याकडून चूक होऊ शकते. उदाहरणार्थ, यहोवाने निनवेच्या लोकांना दया दाखवायचा निर्णय घेतला तेव्हा तो योनाला आवडला नाही. (योना ३:१०–४:१) पण खरंतर काय घडलं? निनवेच्या १,२०,००० पेक्षा जास्त लोकांनी पश्‍चाताप केला आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला! खरंच, यहोवाला नाही तर योनाला आपल्या दृष्टिकोनात बदल करण्याची गरज होती.

अपरिपूर्णतेमुळे आपल्याला सगळंच स्पष्ट दिसत नाही

एका माणसाच्या चष्म्याच्या काचा धुक्याने धूसर झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याला आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत.

अपरिपूर्ण असल्यामुळे यहोवाच्या आणि आपल्या दृष्टिकोनात खूप फरक असू शकतो. ज्या गोष्टी यहोवा अगदी गंभीरपणे घेतो, त्या आपण कदाचित हलकेपणाने घेऊ. तसंच, ज्या गोष्टींच्या बाबतीत यहोवा कोमलतेने व्यवहार करतो, त्या आपण कदाचित खूप कठोरतेने घेऊ. (१ शमु. १६:७) त्यामुळे यहोवा ज्या पद्धतीने गोष्टींना हाताळतो त्यांबद्दल आपल्या मनात शंका निर्माण होऊ शकतात. आपली स्थिती अशा एका व्यक्‍तीसारखी आहे ज्याच्या चष्म्याच्या काचा धुक्यामुळे धूसर झाल्या आहेत. त्याने कितीही निरखून पाहण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला अंधूकच दिसेल. त्यामुळे एखादी गोष्ट यहोवाने अशी का केली, हे जर आपल्याला समजत नसेल तर त्याचं कारण दुसरं काही नसून आपली अपरिपूर्णताच आहे. अशा वेळी यहोवाचा दृष्टिकोन  नाही, तर आपलाच दृष्टिकोन  चुकीचा असतो.—यहे. १८:२९.

६. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची यहोवाला गरज का नाही?

६ यहोवाला त्याच्या निर्णयांबद्दल आपल्याला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.  हे खरं आहे, की पूर्वी यहोवाने आपल्या काही निर्णयांबद्दल त्याच्या सेवकांना चिंता व्यक्‍त करू दिल्या. (उत्प. १८:२५; योना ४:२, ३) आणि काही वेळा तर त्याने त्याबद्दल स्पष्टीकरणही दिलं. (योना ४:१०, ११) पण यहोवा आपला निर्माणकर्ता आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्याआधी त्याला आपल्याला विचारायची गरज नाही किंवा कोणतीही गोष्ट केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण द्यायचीही गरज नाही.—यश. ४०:१३, १४; ५५:९.

संघटनेकडून मार्गदर्शन मिळतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा

७. कोणती गोष्ट आपल्यासाठी कठीण असू शकते, आणि का?

७ यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं याबद्दल आपल्याला कोणतीही शंका नाही. पण पृथ्वीवर आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने ज्या बांधवांना नेमलं आहे त्यांच्यावर भरवसा ठेवणं काही वेळा आपल्याला कठीण जाऊ शकतं. यहोवाच्या संघटनेत ज्यांना अधिकार देण्यात आला आहे, ते खरंच यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात, की स्वतःच्या मनाप्रमाणे, असा प्रश्‍न कदाचित आपल्याला पडेल. बायबल काळातल्या काही लोकांनाही असा प्रश्‍न पडला असावा. तिसऱ्‍या परिच्छेदात आपण जी उदाहरणं पाहिली होती, त्यांचाच विचार करा. शब्बाथाचा नियम मोडणाऱ्‍या त्या इस्राएली माणसाच्या एखाद्या नातेवाइकाला कदाचित असा प्रश्‍न पडला असेल, की मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याआधी मोशेने खरंच यहोवाला विचारलं असेल का? तसंच, उरीयाच्या एखाद्या मित्रानेही कदाचित असा विचार केला असेल, की दावीद तर राजा आहे, त्यामुळे शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर तर केला नसेल ना? आज यहोवाने त्याच्या संघटनेत आणि मंडळीत नेतृत्व करण्यासाठी ज्या बांधवांना नेमलं आहे, त्यांच्यावर तो पूर्ण भरवसा ठेवतो. त्यामुळे आपण जर या बांधवांवर भरवसा ठेवला नाही, तर यहोवावर आपला भरवसा आहे असं म्हणता येणार नाही.

८. प्रेषितांची कार्यं १६:४, ५ यात जे सांगितलं आहे आणि आज ख्रिस्ती मंडळी ज्या प्रकारे काम करते त्यात कोणता सारखेपणा आहे?

८ आज यहोवा ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ आपल्या संघटनेच्या पृथ्वीवरच्या भागाचं नेतृत्व करत आहे. (मत्त. २४:४५) पहिल्या शतकातल्या नियमन मंडळाप्रमाणे हा ‘दास’ जगभरातल्या देवाच्या लोकांची देखरेख करतो आणि मंडळीतल्या वडिलांना मार्गदर्शन पुरवतो. (प्रे. कार्यं १६:४, ५ वाचा.) मग वडील मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मंडळीत काम करतात. आज आपण संघटनेकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचं पालन करतो, तेव्हा हेच दाखवत असतो की यहोवावर आपलाही पूर्ण भरवसा आहे.

९. वडिलांनी घेतलेल्या निर्णयांप्रमाणे काम करणं आपल्याला कधी कठीण जाऊ शकतं, आणि का?

९ काही वेळा वडिलांनी घेतलेल्या निर्णयांप्रमाणे काम करणं आपल्याला कठीण वाटू शकतं. उदाहरणार्थ, अलीकडच्या वर्षांमध्ये बऱ्‍याच मंडळ्यांना एकत्र करण्यात आलं आहे. त्यामुळे त्या मंडळ्या आता वेगळ्या विभागांमध्ये किंवा सर्किटमध्ये आहेत. काही ठिकाणी, राज्य सभागृहाच्या क्षमतेप्रमाणे वडिलांनी काही प्रचारकांना वेगळ्या मंडळीत जायला सांगितलं आहे. आपल्यालाही जर एखाद्या नवीन मंडळीत जायला सांगितलं, तर नातेवाइकांना आणि मित्रांना सोडून जाणं आपल्याला कदाचित कठीण जाऊ शकतं. एखाद्या प्रचारकाला कुठे नेमलं जावं याबद्दल मंडळीतल्या वडिलांना थेट देवाकडून मार्गदर्शन मिळतं का? नाही. आणि यामुळेच वडिलांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पण वडील अशा प्रकारचे निर्णय घेतात, तेव्हा यहोवा त्यांच्यावर भरवसा ठेवतो आणि म्हणून आपणही त्यांच्यावर भरवसा ठेवला पाहिजे.b

१०. आपण मंडळीतल्या वडिलांना सहकार्य का केलं पाहिजे? (इब्री लोकांना १३:१७)

१० मंडळीत वडिलांनी घेतलेले निर्णय आपल्या मनासारखे नसले, तरीसुद्धा आपण त्या निर्णयांप्रमाणे का वागलं पाहिजे? कारण असं केल्यामुळे मंडळीतली शांती आणि एकता टिकून राहते. (इफिस. ४:२, ३) मंडळीतले सगळेच जण जेव्हा वडिलांनी घेतलेल्या निर्णयांना पाठिंबा देतात, तेव्हा मंडळीची वाढ होते. (इब्री लोकांना १३:१७ वाचा.) सगळ्यात मुख्य म्हणजे आपली काळजी घेण्यासाठी यहोवा ज्यांच्यावर भरवसा ठेवतो, त्यांना सहकार्य केल्यामुळे आपण खरंतर यहोवावरच भरवसा असल्याचं दाखवत असतो.—प्रे. कार्यं २०:२८.

११. वडिलांकडून मिळणारं मार्गदर्शन योग्यच आहे यावर आपण भरवसा का ठेवू शकतो?

११ वडिलांकडून मिळणारं मार्गदर्शन योग्यच आहे यावर आपण भरवसा का ठेवू शकतो? त्यासाठी आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की मंडळीच्या बाबतीत एखाद्या विषयावर निर्णय घेण्याआधी वडील पवित्र शक्‍तीसाठी प्रार्थना करतात. मग त्या विषयावर असणाऱ्‍या बायबलच्या तत्त्वांचा आणि संघटनेकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा ते काळजीपूर्वक विचार करतात. कारण त्यांना यहोवाला खूश करायचं असतं आणि मंडळीतल्या लोकांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची असते. तसंच, आपण ज्या प्रकारे आपल्या जबाबदाऱ्‍या हाताळतो त्याबद्दल आपल्याला देवाला हिशोब द्यायचा आहे, हे या विश्‍वासू पुरुषांना माहित असतं. (१ पेत्र ५:२, ३) विचार करा, आज संपूर्ण जगात जाती-धर्मांमुळे आणि राजकारणामुळे लोकांमध्ये फुटी पडल्या आहेत. पण यहोवाचे लोक मात्र एकत्र मिळून त्याची उपासना करत आहेत. आणि हे फक्‍त यहोवाच्या आशीर्वादामुळेच शक्य आहे!

१२. एखाद्या व्यक्‍तीला खरंच पश्‍चाताप झाला आहे की नाही हे पाहताना वडील कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतात?

१२ मंडळी शुद्ध ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी यहोवाने वडिलांवर सोपवली आहे. एखाद्या ख्रिश्‍चनाने जर एखादं गंभीर पाप केलं, तर त्या व्यक्‍तीला मंडळीत ठेवावं की नाही हे वडिलांनी ठरवावं अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. या बाबतीत बऱ्‍याच गोष्टी लक्षात घेताना वडिलांना हेही पाहावं लागतं, की केलेल्या चुकीबद्दल त्या व्यक्‍तीला खरंच पस्तावा होत आहे का? आपल्याला पस्तावा होत आहे असं तो म्हणत असला तरी त्याच्या वागण्यावरून काय दिसतं? त्याने जे केलं त्याचा त्याला खरंच तिरस्कार वाटतो का? आणि अशी चूक पुन्हा करायची नाही असं त्याने मनाशी ठरवलं आहे का? ही चूक जर वाईट संगतीमुळे झाली असेल, तर ती संगत सोडून द्यायला तो तयार आहे का? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करताना वडील प्रार्थना करतात, तसंच बायबलमधली वचनं आणि तत्त्वं विचारात घेतात. याशिवाय, चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीला आपल्या चुकीबद्दल खरंच कसं वाटतं हेसुद्धा ते पाहतात. आणि त्यानंतरच तिला मंडळीत ठेवायचं की नाही, हा निर्णय घेतात. काही वेळा अशा व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृतसुद्धा करावं लागतं.—१ करिंथ. ५:११-१३.

१३. आपल्या एखाद्या नातेवाईकाला किंवा जवळच्या मित्राला बहिष्कृत करण्यात आलं, तर आपल्याला कदाचित काय वाटू शकतं?

१३ वडिलांवर असलेल्या आपल्या भरवशाची कशा प्रकारे परीक्षा होऊ शकते? अशी कल्पना करा, की मंडळीतल्या एखाद्या व्यक्‍तीला बहिष्कृत करण्यात आलं आहे. जर तो आपला नातेवाईक किंवा जवळचा मित्र नसेल, तर वडिलांनी घेतलेला निर्णय आपल्याला लगेच पटेल. पण जर तो आपला जवळचा नातेवाईक किंवा मित्र असेल तर काय? अशा वेळी आपल्याला कदाचित असं वाटू शकतं, की वडिलांनी सगळ्याच गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत. किंवा आपल्या मनात असाही प्रश्‍न येऊ शकतो, की वडिलांनी घेतलेला हा निर्णय खरंच योग्य आहे का? यहोवानेही असाच निर्णय घेतला असता का? पण आपल्या मनात अशा शंका आल्या तरीसुद्धा, वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१४. वडिलांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

१४ आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की बहिष्कृत करणं ही खरंतर यहोवाने घालून दिलेली एक प्रेमळ व्यवस्था आहे. ही व्यवस्था मंडळीच्या आणि चूक करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या भल्यासाठीच आहे. कारण पश्‍चाताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीला जर मंडळीत राहू दिलं, तर त्याचा मंडळीतल्या इतरांवर वाईट परिणाम होऊ शकतो. (गलती. ५:९) तसंच, आपण किती मोठी चूक केली आहे, हेसुद्धा त्या व्यक्‍तीला कधीच कळणार नाही. आणि यहोवासोबत पुन्हा नातं जोडण्यासाठी आपल्याला काहीतरी करायची गरज आहे, असंही त्याला वाटणार नाही. (उप. ८:११) एखाद्या व्यक्‍तीला बहिष्कृत करायचं की नाही, हे ठरवताना वडील आपली जबाबदारी खूप गंभीरपणे घेतात याची आपण खातरी बाळगू शकतो. त्यांना कायम याची जाणीव असते, की प्राचीन इस्राएलमधल्या न्यायाधीशांप्रमाणेच ते ‘माणसांसाठी नाही, तर यहोवासाठी न्याय करतात.’—२ इति. १९:६, ७.

यहोवावर जर आत्ताच भरवसा ठेवला तर भविष्यातही ठेवता येईल

एका तळघरात भाऊ-बहीण सभेकरता एकत्र जमले आहेत. एक बांधव काही महत्त्वाच्या सूचना देत आहे, पण दुसरा बांधव त्याच्याकडे शंकेने पाहत आहे.

मोठ्या संकटादरम्यान मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर भरवसा ठेवून त्याचं पालन करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होईल? (परिच्छेद १५ पाहा)

१५. यहोवाकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर आत्ताच भरवसा ठेवायची गरज का आहे?

१५ या दुष्ट जगाचा अंत जवळ येत असताना यहोवाच्या कार्य करायच्या पद्धतीवर आपल्याला भरवसा ठेवायची जास्त गरज आहे. असं का म्हणता येईल? कारण मोठ्या संकटाच्या वेळी आपल्याला कदाचित अशा सूचना मिळतील ज्या अगदीच विचित्र आणि तर्काला न पटणाऱ्‍या वाटतील. आणि आजच्या सारखंच त्या वेळीसुद्धा यहोवा आपल्याशी प्रत्यक्ष बोलणार नाही. संघटनेत नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांद्वारे तो आपल्याला मार्गदर्शन देईल. त्या वेळी हे मार्गदर्शन खरंच यहोवाकडून आहे का, की हे बांधव स्वतःच्या मनाप्रमाणे वागत आहेत, अशी शंका घ्यायची किंवा टीका करायची ती मुळीच वेळ नसेल. मानवी इतिहासातल्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या काळात तुम्ही काय कराल? तुम्ही यहोवावर आणि त्याच्या संघटनेवर भरवसा ठेवाल का? संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाला तुम्ही आत्ता  कसं घेता, त्यावर या प्रश्‍नाचं उत्तर अवलंबून आहे. संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारून त्यावर लगेच काम करायची तुम्ही जर आत्ताच तयारी दाखवली, तर मोठ्या संकटाच्या वेळीही तुम्ही तेच कराल.—लूक १६:१०.

१६. यहोवावरच्या आपल्या भरवशाची कशा प्रकारे परीक्षा होऊ शकते?

१६ या दुष्ट जगाच्या अंताच्या वेळी यहोवा ज्या प्रकारे न्याय करेल त्याकडे आपण कसं पाहू याचासुद्धा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. आपल्या काही नातेवाइकांबद्दल किंवा जवळच्या लोकांबद्दल आपल्याला कदाचित असं वाटत असेल, की अंत येण्याआधी ते सत्यात येतील. पण हर्मगिदोनच्या वेळी त्यांचा जीव वाचेल की नाही हे आपल्या हातात नाही, तर यहोवाच्या हातात आहे. तोच येशूद्वारे अंतिम निर्णय घेईल. (मत्त. २५:३१-३४, ४१, ४६; २ थेस्सलनी. १:७-९) पण त्या वेळी यहोवा जो काही निर्णय घेईल त्यावर आपण भरवसा ठेवू का, की आपण निराश होऊन यहोवाची सेवा करायचं सोडून देऊ? म्हणून आत्ताच आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग पुढेही आपण तेच करू.

१७. यहोवाने ज्या प्रकारे न्याय केला त्यामुळे पुढे कोणते चांगले परिणाम घडून येतील?

१७ यहोवाने ज्या प्रकारे न्याय केला त्यामुळे घडून आलेले चांगले परिणाम नवीन जगात आपण पाहू, तेव्हा आपल्याला किती आनंद होईल याचा विचार करा. त्या वेळी खोट्या धर्माचं नावसुद्धा नसेल. आजपर्यंत लोकांवर जुलूम आणि अत्याचार करणारी लोभी व्यापारी आणि राजकीय व्यवस्था नाहीशी झालेली असेल. आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू नसेल. सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना हजार वर्षांसाठी कैद केलं जाईल. त्यांनी देवाविरुद्ध बंड केल्यामुळे निर्माण झालेले वाईट परिणाम नाहीसे झालेले असतील. (प्रकटी. २०:२, ३) खरंच, यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा आपण ठेवला याचा आपल्याला किती आनंद होईल!

१८. इस्राएली लोकांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? (गणना ११:४-६; २१:५)

१८ नवीन जगात गेल्यानंतरही यहोवावर असलेल्या आपल्या भरवशाची परीक्षा होऊ शकते का? इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामीतून बाहेर आले, त्याच्या थोड्याच काळानंतर काय घडलं त्याचा विचार करा. इजिप्तमध्ये असताना ते जे वेगवेगळे अन्‍नपदार्थ खायचे त्यांची आठवण काढून काही जण कुरकुर करू लागले आणि यहोवा पुरवत असलेल्या मान्‍नाला तुच्छ लेखू लागले. (गणना ११:४-६; २१:५ वाचा.) नवीन जगात गेल्यानंतर आपल्या बाबतीतही असं होऊ शकतं का? कारण या दुष्ट जगाचा नाश झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पृथ्वी स्वच्छ करावी लागेल आणि हळूहळू पृथ्वीला नंदनवन बनवावं लागेल. सुरुवातीला आपल्याला भरपूर काम असेल. शिवाय जीवनही तितकं सोपं नसेल. त्या वेळी यहोवा आपल्याला जे काही पुरवेल त्याबद्दल आपण कुरकुर किंवा तक्रार करू का? यहोवाच्या तरतुदींबद्दल आपण जर आत्ताच  कदर दाखवली तर पुढेही  दाखवू.

१९. या लेखातून आपण काय शिकलो?

१९ यहोवा जे काही करतो ते नेहमी योग्यच असतं, या गोष्टीची आपल्याला पक्की खातरी असली पाहिजे. त्यासोबतच, आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवा ज्या बांधवांचा उपयोग करत आहे, त्यांच्यावरही आपला भरवसा असला पाहिजे. यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने जे म्हटलं ते आपण कधीही विसरू नये: “तुम्ही शांत राहिलात आणि माझ्यावर भरवसा ठेवलात, तर तुम्ही शक्‍तिशाली व्हाल.”—यश. ३०:१५.

यहोवा जे काही करतो ते योग्यच असतं असा भरवसा ठेवण्यासाठी खाली सांगितलेल्या परिस्थितींमध्ये कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करतील?

  • बायबलमधला एखादा अहवाल वाचत असताना

  • संघटनेकडून काही मार्गदर्शन किंवा सूचना मिळतात तेव्हा

  • भविष्यात समस्यांचा सामना करत असताना

गीत ३७ देवप्रेरित शास्त्रवचने

a यहोवावर आणि त्याच्या लोकांचं नेतृत्व करणाऱ्‍यांवर भरवसा ठेवणं अत्यंत महत्त्वाचं का आहे, हे आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे आत्ता आपल्याला कसा फायदा होईल आणि पुढे येणाऱ्‍या संकटांचा सामना कसा करता येईल, हेसुद्धा आपण पाहू या.

b पण काही वेळा विशिष्ट परिस्थितीमुळे एखाद्या व्यक्‍तीला किंवा कुटुंबाला आहे त्याच मंडळीत राहणं भाग असतं. नोव्हेंबर २००२ च्या आमची राज्य सेवा  यात दिलेली “प्रश्‍न पेटी” पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा