जीवन कथा
“प्रत्येक निर्णय घेताना आम्ही यहोवाच्या सेवेला महत्त्व दिलं”
१९८४ ची गोष्ट. व्हेनिझुएलाच्या काराकास शहराच्या एका पॉश एरियामध्ये मी राहत होतो. एका सकाळी मी कामाला चाललो होतो. त्या वेळी मी टेहळणी बुरूज मासिकात वाचलेल्या एका विषयावर विचार करत होतो. आपले शेजारी आपल्याबद्दल कसा विचार करतात याबद्दल तो लेख होता. जाताना मी माझ्या आजूबाजूची घरं पाहत होतो आणि विचार करत होतो, ‘हे लोक मला काय म्हणून ओळखतात? बँकेत चांगल्या पदावर काम करणारा, की देवाचा सेवक जो आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी बँकेत काम करतो?’ मला जाणवलं, की लोक मला फक्त बँकेत काम करणारा म्हणून ओळखतात आणि ते मला बिलकूल आवडलं नाही. म्हणून मी ठरवलं की याबद्दल काहीतरी करायचं.
माझा जन्म १९ मे १९४० मध्ये लेबनानच्या अमिऊन शहरात झाला. आम्ही पाच भावंडं. तीन बहिणी, दोन भाऊ. त्यांच्यापैकी मी सर्वात लहान. काही वर्षांनंतर आम्ही ट्रिपोली या ठिकाणी राहायला गेलो. मी एका प्रेमळ वातावरणात वाढलो. माझे आईबाबा माझ्या जन्माच्या आधीपासून सत्यात होते. त्यांचं यहोवावर खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी पैसे कमवण्यापेक्षा बायबलचा अभ्यास, सभा, प्रचारकार्य या गोष्टींना जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं.
आम्ही ज्या मंडळीत होतो तिथे बरेच अभिषिक्त ख्रिस्ती होते. त्यांच्यापैकी एक होते मिशेल अबूद. त्या वेळी ते मंडळीचा पुस्तक अभ्यास घ्यायचे. न्यूयॉर्कमध्ये त्यांना सत्य मिळालं होतं आणि १९२१ साली लंडनमध्ये येऊन त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली. आमच्या मंडळीमध्ये गिलियड प्रशालेतून पदवीधर झालेल्या दोन बहिणी होत्या. ॲन आणि ग्वेन बिवर. मला आठवतं भाऊ मिशेल त्यांच्याशी खूप आदराने वागायचे आणि त्यांना नेहमी मदत करायचे. त्या बहिणींशी माझी चांगली मैत्री झाली होती. बऱ्याच वर्षांनंतर अमेरिकेत माझी भेट ॲनसोबत झाली. तेव्हा मला खूप आनंद झाला आणि काही काळानंतर ग्वेनसुद्धा मला भेटली. तिचं लग्न विल्फ्रेड गूछ या भावासोबत झालं होतं आणि ते दोघं लंडनच्या बेथेलमध्ये सेवा करत होते.
लेबनानमधलं आपलं प्रचारकार्य
मी तरुण होतो तेव्हा लेबनानमध्ये खूप कमी प्रचारक होते. पण आम्ही खूप उत्साहाने बायबलमधून शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगायचो. काही धर्मगुरूंचा विरोध होता अगदी तेव्हासुद्धा. आमच्यासोबत घडलेल्या त्यातल्या काही घटना मला अजूनही आठवतात.
एकदा मी आणि माझी बहीण सना एका बिल्डिंगमध्ये प्रचार करत होतो. आम्ही ज्या मजल्यावर प्रचार करत होतो तिथे एक धर्मपुढारी आला. कोणीतरी त्याला बोलवलं असेल. तो माझ्या बहिणीला खूप वाईटसाईट बोलला आणि इतका संतापला की त्याने सनाला पायऱ्यांवरून ढकललं. त्यामुळे ती जखमी झाली. कोणीतरी पोलिसांना फोन करून बोलवलं. ते आले आणि सनाला उपचार दिला जात आहे की नाही याकडे लक्ष दिलं. ते त्या धर्मपुढाऱ्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे त्यांना समजलं की त्याच्याकडे बंदूक होती. हे पाहून पोलिसांचा प्रमुख त्याला म्हणाला, “तू धर्मपुढारी आहेस की गुंड?”
आणखी एक घटना मला चांगली आठवते. एका दूरच्या भागात प्रचार करण्यासाठी आमच्या मंडळीने एक बस केली होती. आमचं प्रचारकार्य चांगलं चाललं होतं. पण एका धर्मपुढाऱ्याला समजलं आम्ही काय करत आहोत आणि म्हणून आम्हाला मारण्यासाठी तो लोकांना घेऊन आला. त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला. इतकंच नाही तर त्यांनी आम्हाला दगडही फेकून मारले. त्यामुळे माझ्या बाबांना खूप लागलं. मला आठवतं त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. आई बाबांना बसमध्ये घेऊन आली आणि आम्हीही त्यांच्यामागून लगेच आलो. बाबांचा चेहरा साफ करताना आई जे म्हणाली ते मी कधीच विसरू शकत नाही. ती म्हणाली होती, “यहोवा यांना माफ कर. ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.”
आणखी एक घटना तुम्हाला सांगतो. एकदा आम्ही लेबनानमध्येच आमच्या आजोबांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी त्यांच्या घरी चर्चचा प्रमुख धर्मगुरू, म्हणजे बिशप आला होता. त्याला माहीत होतं की आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत. त्याने मला बोलवलं आणि विचारलं, “काय रे, तुझा अजून बाप्तिस्मा का नाही झाला?” तेव्हा मी फक्त ६ वर्षांचा होतो. मी म्हटलं, “त्यासाठी मी अजून लहान आहे. आणि मला बायबलबद्दल आणखीन शिकायचंय आणि माझा विश्वास मजबूत करायचाय.” बिशपला माझं उत्तर आवडलं नाही, म्हणून तो आजोबांना म्हणला की मी खूप उद्धटपणे त्याला उत्तर दिलं.
असे वाईट अनुभव खूप कमी आहेत. कारण लेबनानमधले लोक बोलायला खूप चांगले आहेत आणि आपण त्यांच्या घरी गेलो की चांगला पाहुणचारही करतात. त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांशी बायबलबद्दल बोलू शकत होतो, आणि त्यांच्यापैकी कित्येकांनी बायबल अभ्यासही सुरू केला होता.
आमचं कुटुंब दुसऱ्या देशात राहायला गेलं
मी शाळेत होतो तेव्हा व्हेनिझुएलामधून एक तरुण भाऊ आमच्या इथे आला होता. तो आमच्या सभांनाही यायचा. तेव्हा त्याची ओळख माझ्या बहिणीशी, वफाशी झाली. लवकरच त्यांचं लग्न झालं आणि ते व्हेनिझुएलाला राहायला गेले. वफाला आमची खूप आठवण यायची. त्यामुळे पत्रांद्वारे ती सारखी बाबांना म्हणायची, की पूर्ण कुटुंबाला घेऊन इथे या. शेवटी बाबांनी तिचं ऐकलं आणि आम्ही सगळे व्हेनिझुएलाला राहायला गेलो.
१९५३ मध्ये आम्ही व्हेनिझुएलाला आलो आणि काराकास या शहरात स्थायिक झालो. राष्ट्रपतीभवन आमच्यापासून खूप जवळ होतं. तेव्हा मी काय जास्त मोठा नव्हतो. त्यामुळे राष्ट्रपती जेव्हा आपल्या मोठ्या महागड्या कारमधून जायचे तेव्हा ते पाहायला मला खूप मज्जा वाटायची. पण त्या नवीन ठिकाणाशी जुळवून घेणं माझ्या आईबाबांना सोपं नव्हतं. कारण तिथली संस्कृती, भाषा, खाणं-पिणं, वातावरण सगळंच नवीन होतं. ते नुकतेच तिथल्या राहणीमानाशी जुळवून घेत होते, तेव्हाच एक दुर्घटना घडली.
डावीकडून उजवीकडे: माझे बाबा. माझी आई. १९५३ मध्ये आम्ही व्हेनिझुएलाला राहायला गेलो तेव्हाचा माझा फोटो
एक दुःखद घटना घडते
माझे बाबा आजारी पडू लागले. हे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. कारण ते चांगले धडधाकट होते. आणि इतके आजारी कधीच पडले नव्हते. मग आम्हाला कळलं, की त्यांना स्वादूपिंडाचा (पॅनक्रियासचा) कॅन्सर आहे. त्यांचं ऑपरेशन झालं, पण एका आठवड्यानंतर ते वारले.
या घटनेमुळे आम्ही पूर्णपणे हादरून गेलो होतो. आम्हाला इतकं दुःख होत होतं, की ते आम्ही शब्दांत सांगू शकत नाही. तेव्हा मी फक्त १३ वर्षांचा होतो. आणि बाबांसोबत असं काही होईल याची आम्ही अपेक्षाच केली नव्हती. असं वाटत होतं, की आता आम्ही पुढे कधीच खूश राहणार नाही. काही काळासाठी माझ्या आईला हे मान्य करणं खूप कठीण गेलं, की तिचे पती आता तिच्यासोबत नाहीएत. पण आम्हाला जाणवलं, की या गोष्टीचा आम्हाला धीराने सामना करावा लागेल, आणि यहोवाच्या मदतीमुळे आम्ही ते करू शकलो. मी १६ वर्षांचा झालो तेव्हा काराकासमध्ये असतानाच माझं शाळेचं शिक्षण पूर्ण झालं. त्या वेळी मला असं वाटलं, की मीसुद्धा कुटुंबाला हातभार लावला पाहिजे.
माझ्या बहिणीने आणि भाऊजींनी, म्हणजे सना आणि रुबेन यांनी मला आध्यात्मिक प्रगती करायला खूप मदत केली
काही वर्षांनी सनाचं लग्न रुबेन अराऊहो या भावासोबत झालं. तो गिलियड प्रशालेतून पदवीधर झाला होता. आणि व्हेनिझुएलाला परत आला होता. लग्नानंतर त्यांनी न्यूयॉर्कला राहायचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्या कुटुंबाने ठरवलं, की मी उच्च शिक्षण घ्यावं. म्हणून मी न्यूयॉर्कला गेलो, कारण तिथे माझी ताई आणि भाऊजी होते. तिथे मी त्यांच्यासोबतच राहत होतो. त्यांनी मला आध्यात्मिक प्रगती करायला खूप मदत केली. इतकंच नाही, तर मी ब्रुकलिनमध्ये ज्या स्पॅनिश भाषेच्या मंडळीत होतो, तिथे बरेच प्रौढ आणि अनुभवी भाऊ होते. त्यांचीही मला मदत झाली. त्यांच्यापैकी दोन भाऊ मिल्टन हेन्शेल आणि फ्रेडरिक फ्रांझ हे होते. ते दोघंही ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करत होते. त्यांच्यासोबत वेळ घालवायची आणि त्यांना जाणून घ्यायची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंदय.
१९५७ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला
युनिव्हर्सिटीतलं माझं पहिलं वर्ष संपत आलं होतं. तेव्हा मी विचार करू लागलो, ‘मी हे काय करतोय? माझं ध्येय काय असायला हवं?’ तेव्हा मी टेहळणी बुरूज मासिकात अशा काही भाऊबहिणींचे अनुभव वाचले ज्यांनी यहोवाची सेवा करायचं ध्येय ठेवलं होतं. त्यावर मी खूप विचार केला. इतकंच नाही तर आमच्या मंडळीतले पायनियर आणि बेथेलमध्ये सेवा करणारे खूप खूश असायचे. मलासुद्धा त्यांच्यासारखीच पूर्णवेळची सेवा करायची होती. पण तोपर्यंत माझा बाप्तिस्मा झाला नव्हता. मला जाणवलं, की सर्वात आधी मी यहोवाला माझं जीवन समर्पण करायची गरज आहे. मी तसंच केलं आणि ३० मार्च १९५७ मध्ये मी बाप्तिस्मा घेतला.
जीवनातले महत्त्वाचे निर्णय
बाप्तिस्मा घेतल्यानंतर मी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा विचार केला. तो म्हणजे, पायनियर बनायचा निर्णय. पायनियर बनायची माझी खूप इच्छा होती. पण तो निर्णय घेणं इतकं सोपं नव्हतं. ‘शिक्षणासोबत पायनियरिंग करायला मला जमेल का?’ असा प्रश्न मला पडायचा. त्यामुळे मी युनिव्हर्सिटीतलं शिक्षण थांबवायचा आणि व्हेनिझुएलाला परत जाऊन पायनियर बनायचा निर्णय घेतला. आणि या निर्णयाबद्दल माझ्या कुटुंबासोबत पत्रांद्वारे माझं बरंच बोलणं झालं.
१९५७ च्या जून महिन्यात मी काराकासला परत आलो. पण मला जाणवलं, की माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाहीए. घरात आणखी एका कमवणाऱ्याची गरज होती. मी विचार केला, ‘मी कशा प्रकारे माझ्या कुटुंबाला मदत करू शकतो?’ तेव्हा एका बँकेत मला नोकरी मिळाली. पण मला पायनियरिंगसुद्धा करायची होती. कारण त्यासाठीच तर मी परत आलो होतो. म्हणून मी दोन्ही करायचं ठरवलं. कितीतरी वर्षं बँकेत पूर्ण वेळ नोकरी करून मी पायनियरिंगपण केली. मी इतका व्यस्त, पण इतका आनंदी कधीच नव्हतो.
मी सिलवियाला भेटलो तेव्हा तर मी आणखीनच खूश झालो. ती जर्मनीची होती. आणि आपल्या आईवडिलांसोबत व्हेनिझुएलाला राहायला आली होती. तिचं यहोवावर खूप प्रेम होतं. नंतर आमचं लग्न झालं आणि आम्हाला दोन मुलं झाली. मुलाचं नाव मिशेल (माईक) आणि मुलीचं समिरा. तसंच, मला आईचीही काळजी घ्यायची होती. त्यामुळे ती आमच्यासोबत राहायला आली. हे खरंय, की कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मला पायनियरिंग सोडावी लागली; पण मी प्रचारातला माझा आवेश कमी होऊ दिला नाही. म्हणून सुट्ट्यांमध्ये जेव्हा कधी शक्य असायचं तेव्हा मी आणि सिलविया सहायक पायनियरिंग करायचो.
आणखी एक महत्त्वाचा निर्णय
लेखाच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक अनुभव सांगितला. त्या वेळी माझी मुलं शाळेत शिकत होती. आमचं सगळं खूप सुरळीत चाललं होतं आणि बँकेत माझं चांगलं नाव होतं. पण लोकांनी मला यहोवाचा सेवक म्हणून ओळखावं असं मला वाटत होतं. त्या दिवशी ते विचार सतत माझ्या मनात घोळत होते. म्हणून मी आणि सिलवियाने बसून आमचा जमाखर्च पाहिला. बँकेची नोकरी सोडल्यावर मला एक मोठी रक्कम मिळणार होती आणि आमच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. त्यामुळे आम्ही विचार केला, की आम्ही आमचं राहणीमान साधं ठेवलं तर मिळणाऱ्या या पैशांतून आमचं भागू शकतं.
हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण माझ्या पत्नीने आणि माझ्या आईने मला चांगली साथ दिली. मी पायनियरिंग सुरू करणारच होतो की तेवढ्यात आम्ही अपेक्षाही केली नव्हती अशी बातमी आम्हाला मिळाली.
आश्चर्याचा एक सुखद धक्का!
आमचा तिसरा मुलगा, गेब्रीएल झाला तेव्हा आम्हाला आश्चर्य तर वाटलं, पण आनंदही तितकाच झाला
एकदा सिलवियाला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरने सांगितलं, की ती गरोदर आहे. हे ऐकून आम्हा दोघांना धक्काच बसला. पण आनंदही तितकाच होत होता. मी पायनियरिंगबद्दल मात्र तेव्हासुद्धा विचार करत होतो. येणाऱ्या बाळासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. पण ‘पैशाचं आम्ही जे नियोजन केलं होतं तेवढ्यात आता आपलं भागेल का? मला पायनियरिंग करता येईल का?’ असे प्रश्नसुद्धा माझ्या मनात येत होते.
आमच्या ध्येयांबद्दल बरीच चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवलं, की मी पायनियरिंगचा जो निर्णय घेतला होता तो बदलायचा नाही. मग आमच्या मुलाचा, गेब्रीएलचा जन्म एप्रिल १९८५ मध्ये झाला. तरीसुद्धा मी बँकेची नोकरी सोडली आणि दोनच महिन्यांनी परत पायनियरिंग सुरू केली. काही वर्षांनी मला व्हेनिझुएलाच्या बेथेलमध्ये शाखा समितीचा सदस्य म्हणून सेवा करायची संधी मिळाली. पण ते बेथेल काराकासमध्ये नव्हतं. त्यामुळे मला आठवड्यातून २-३ वेळा जवळजवळ ८० किलोमीटर प्रवास करावा लागायचा.
आमचा दुसऱ्या ठिकाणी जायचा निर्णय
तिथलं बेथेल ला व्हिक्टोरिया या छोट्या शहरात होतं. आणि म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब मिळून बेथेलच्या जवळपास राहायचं ठरवलं. हा निर्णय आमच्यासाठी खरंच खूप मोठा होता. माझ्या घरच्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आम्ही ला व्हिक्टोरियाला जाणार होतो तेव्हा माझ्या बहिणीने, बाहाने आईला आपल्याकडे ठेवून घेतलं. आमच्या मोठ्या मुलाचं, माईकचं लग्न होऊन तो वेगळा झाला. पण समिरा आणि गेब्रीएल हे आमच्यासोबतच होते. नवीन ठिकाणी गेल्यामुळे या दोघांना काराकासमधल्या आपल्या मित्रमैत्रिणींना सोडावं लागलं. तसंच सिलवियालासुद्धा त्याग करावे लागले. तिला मोठ्या शहरात राहायची सवय होती. पण आता तिला छोट्या शहरातल्या राहणीमानाशी जुळवून घ्यावं लागणार होतं. आणि नवीन ठिकाणी आमचं घर आधीपेक्षा खूप लहान होतं. खरंच, काराकासपासून ला व्हिक्टोरियाला यायचा आम्ही जो निर्णय घेतला होता तेव्हा आम्हाला बरेच बदल करावे लागले.
पण आता बरंच काही बदललंय. गेब्रीएलचं लग्न झालं आणि समिरा वेगळी राहते. मग २००७ मध्ये मला आणि सिलवियाला बेथेलमध्ये राहून सेवा करायची संधी मिळाली. आजही आम्ही तिथेच आहोत. आमचा मोठा मुलगा माईक मंडळीत वडील आहे आणि आपल्या बायकोसोबत, मोनिकासोबत पायनियरिंगही करत आहे. गेब्रीएलसुद्धा वडील आहे आणि आपल्या पत्नीसोबत, ॲम्ब्रासोबत इटलीमध्ये सेवा करत आहे. समिरा पायनियरिंग करते आणि त्यासोबतच ती घरून बेथेलच्या कामात मदत करते.
डावीकडून उजवीकडे: माझ्या पत्नीसोबत, सिलवियासोबत व्हेनिझुएला शाखा कार्यालयामध्ये असताना. आमचा मोठा मुलगा माईक आणि मोनिका. आमची मुलगी समिरा. आमचा धाकटा मुलगा गेब्रीएल आणि ॲम्ब्रा
माझ्या निर्णयांचा मला कधीच पस्तावा झाला नाही
हे खरंय की मला माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. पण मी घेतलेल्या निर्णयांचा मला कधीच पस्तावा झाला नाही. मला यहोवाच्या सेवेत बरंच काही करायची संधी मिळाली. त्यासाठी मी त्याचे खूप आभार मानतो. या सगळ्या अनुभवांतून मी शिकलो, की यहोवासोबत घट्ट मैत्री असणं किती महत्त्वाचं आहे! यहोवाच्या सेवेसाठी आपण घेतलेले निर्णय छोटे असोत किंवा मोठे त्यांनुसार काम करण्यासाठी तो आपल्याला मदत करतो. तो आपल्याला “सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली,” त्याची शांती देतो. (फिलिप्पै. ४:६, ७) आज मी आणि सिलविया आनंदाने बेथेलमध्ये सेवा करत आहोत. आम्हाला वाटतं आम्ही आमच्या आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर यहोवाचा आशीर्वाद होता. कारण प्रत्येक निर्णय घेताना आम्ही यहोवाच्या सेवेला महत्त्व दिलं.