जीवन कथा
यहोवाने ‘माझे मार्ग मोकळे केले’
एकदा एका तरुण भावाने मला विचारलं: “तुमचं आवडतं वचन कोणतं आहे?” मी पटकन म्हणालो, “नीतिवचनं तिसरा अध्याय ५ आणि ६ वचन. त्यात म्हटलंय: ‘यहोवावर अगदी मनापासून भरवसा ठेव आणि स्वतःच्या समजशक्तीवर अवलंबून राहू नकोस. तुझ्या सर्व कार्यांत त्याची आठवण ठेव, म्हणजे तो तुझे मार्ग मोकळे करेल.’” खरंच, प्रत्येक वेळेस यहोवाने माझे मार्ग मोकळे केले. ते कसे, हे मी तुम्हाला सांगतो.
माझ्या आईबाबांनी मला योग्य मार्गावर चालायला मदत केली
१९२० च्या काळात माझ्या आईबाबांचं लग्न झालं. पण लग्नाआधीच त्यांना सत्य मिळालं होतं. माझा जन्म १९३९ मध्ये इंग्लंडमध्ये झाला होता. लहान असताना आईबाबांसोबत मी सभांना जायचो. आणि ईश्वरशासित सेवा प्रशाला तर मला खूप आवडायची. त्या प्रशालेत मी पहिल्यांदा दिलेलं भाषण आजपर्यंत मला आठवतं. तेव्हा मी फक्त सहा वर्षांचा होतो. मला सगळे दिसावेत म्हणून एका खोक्यावर उभा राहून मी ते भाषण दिलं होतं. समोर बसलेली सगळी मोठी माणसं पाहून माझ्या पोटात तर गोळाच आलाच होता.
आईबाबांसोबत रस्त्यावरचं साक्षकार्य करताना
प्रचारकार्यात कसं बोलायचं हे माझ्या बाबांनी एका छोट्याशा कार्डवर मला लिहून दिलं होतं. मी पहिल्यांदा एकट्यानेच प्रचारकार्य केलं, तेव्हा मी फक्त आठ वर्षांचा होतो. पहिल्याच घरातल्या त्या माणसाने कार्डवर लिहिलेला संदेश वाचला आणि “देव सत्य होवो” हे पुस्तक घेतलं, तेव्हा मला किती आनंद झाला होता हे मी सांगू शकत नाही. मी पळत जाऊन माझ्या बाबांना ही गोष्ट सांगितली. सभांना आणि प्रचारकार्याला जायला मला खूप आवडायचं. आणि त्यामुळे यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली.
माझ्या बाबांनी खास माझ्यासाठी टेहळणी बुरूज मासिकाची वर्गणी लावली होती. तेव्हा बायबलमधलं सत्य मला आणखी जास्त आवडू लागलं. पोस्टाने येणारं ते प्रत्येक मासिक मी आवडीने वाचू लागलो. त्यामुळे यहोवावरचा माझा भरवसा वाढला आणि मी माझं जीवन यहोवाला समर्पित केलं.
१९५० साली न्यूयॉर्क शहरात होणाऱ्या ‘देवाच्या शासनाची उन्नती,’ या संमेलनात मी आणि माझे आईबाबा गेलो होतो. गुरुवारी ३ ऑगस्टला जो कार्यक्रम झाला त्याचा विषय, “मिशनऱ्यांचा दिवस” असा होता. त्या दिवशी बंधू कॅरी बार्बर यांनी बाप्तिस्म्याचं भाषण दिलं. ते बांधव पुढे नियमन मंडळाचे सदस्य बनले. त्यांच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी बाप्तिस्मा घेणाऱ्यांना दोन प्रश्न विचारले. तेव्हा मी उभा राहून “हो!” असं उत्तर दिलं. त्या वेळी मी फक्त ११ वर्षांचा होतो. पण मला याची जाणीव होती, की मी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. मला पाण्यात उतरायला खूप भीती वाटत होती. कारण तेव्हा मला पोहायला येत नव्हतं. पण माझे काका मला स्विमिंग पूलकडे घेऊन गेले आणि सगळं काही व्यवस्थित होईल, असं त्यांनी मला सांगितलं. आणि खरंच सगळं काही इतक्या पटकन झालं, की माझे पाय स्विमिंग पूलच्या तळालाही लागले नाहीत. एका बांधवाने मला बाप्तिस्मा दिला आणि दुसऱ्याने मला वरच्या वर उचलून पाण्यातून बाहेर काढलं. त्या महत्त्वाच्या दिवसानंतर यहोवाने नेहमी माझे मार्ग मोकळे केले.
मी यहोवावर भरवसा ठेवला
शाळेचं शिक्षण संपल्यावर मला पायनियरिंग करायची इच्छा होती. पण माझ्या शिक्षकांनी मला पुढचं शिक्षण घ्यायचं प्रोत्साहन दिलं. त्यांचं ऐकून पुढच्या शिक्षणासाठी मी ॲडमिशन घेतलं. पण लवकरच मला जाणवलं की एकाच वेळी मी दोन्ही गोष्टी करू शकत नाही; म्हणजे, मी माझ्या शिक्षणाकडे लक्ष दिलं, तर आध्यात्मिक गोष्टींकडे माझं दुलर्क्ष होईल. त्यामुळे मी माझं शिक्षण सोडून द्यायचं ठरवलं. त्याबद्दल मी यहोवाला प्रार्थना केली. आणि पहिल्या वर्षाच्या शेवटी मी माझ्या शिक्षकांना पत्र लिहून कळवलं, की मी माझं शिक्षण इथेच थांबवत आहे. मग यहोवावर भरवसा ठेवून मी लगेच पायनियर सेवा सुरू केली.
जुलै १९५७ साली वेलिंगबरो या शहरात मी पूर्ण वेळेची सेवा सुरू केली. मला एका अनुभवी पायनियर बांधवासोबत मिळून काम करायची इच्छा होती. त्यामुळे मी लंडन बेथेलमधल्या बांधवांना विचारलं, की अशा एखाद्या अनुभवी बांधवाचं नाव तुम्ही मला सुचवू शकता का? त्यावर त्यांनी बंधू बर्ट वॅसी यांचं नाव सुचवलं. या बांधवाने मला अनेक गोष्टी शिकवल्या. ते खूप आवेशी होते. आणि त्यांनी मला प्रचारकार्याचा एक चांगला आराखडा बनवायला मदत केली. आमच्या मंडळीमध्ये आम्ही दोघं आणि सहा वयस्कर बहिणी, इतकेच लोक होतो. सगळ्या सभांची तयारी केल्यामुळे आणि त्यात उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे माझा यहोवावरचा भरवसा वाढला. आणि आपला विश्वास व्यक्त करायच्या अनेक संधी मला मिळाल्या.
लष्करी सेवा करायला नकार दिल्यामुळे काही काळासाठी मला तुरुंगात राहावं लागलं. तुरुंगातून सुटल्यानंतर माझी भेट बार्बरा नावाच्या खास पायनियर बहिणीशी झाली. आणि १९५९ मध्ये आमचं लग्न झालं. सेवा करायला जिथे कुठे पाठवलं जाईल तिथे जायची आमची तयारी होती. सगळ्यात आधी आम्हाला इंग्लंडच्या उत्तर-पश्चिमेकडे असलेल्या लँकशायर इथे सेवा करायला पाठवण्यात आलं. मग १९६१ च्या जानेवारी महिन्यात मला लंडन बेथेलमध्ये राज्य सेवा प्रशालेसाठी बोलवण्यात आलं. ते प्रशिक्षण एक महिन्याचं होतं. आणि आश्चर्य म्हणजे प्रशिक्षणाच्या शेवटी मला प्रवासी कार्य करायला नेमण्यात आलं. त्यासाठी दोन आठवडे बर्मिंगम या शहरात एका अनुभवी विभागीय पर्यवेक्षकाने मला प्रशिक्षण दिलं. त्या वेळी बार्बरासुद्धा माझ्यासोबत होती. त्यानंतर प्रवासी कार्यासाठी आम्ही पुन्हा लँकशायर आणि चेशायर या ठिकाणी गेलो.
यहोवावर भरवसा ठेवल्याचा मला कधीच पस्तावा झाला नाही
१९६२ च्या ऑगस्ट महिन्यात आम्ही सुट्टीवर होतो. त्या वेळी शाखा कार्यालयातून आम्हाला एक पत्र आलं. त्यात गिलियड प्रशालेचे फॉर्म होते. मी आणि बार्बराने याबद्दल प्रार्थना केली आणि लवकरात लवकर ते फॉर्म भरून शाखा कार्यालयाला पाठवले. पाचच महिन्यांनंतर आम्ही ३८ व्या गिलियड प्रशालेसाठी ब्रुकलीन, न्यूयॉर्क इथे गेलो. ती प्रशाला दहा महिन्यांची होती.
गिलियड प्रशालेमध्ये आम्हाला फक्त देवाच्या वचनाबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दलच शिकवण्यात आलं नाही, तर जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींबद्दलही माहिती देण्यात आली. त्या वेळी आम्ही फक्त २३-२४ वर्षांचे होतो. त्यामुळे प्रशालेतल्या इतर विद्यार्थ्यांकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आमच्या प्रशालेचे एक शिक्षक बंधू फ्रेड रस्क यांच्यासोबत रोज काम करायची संधी त्या वेळी मला मिळाली. त्यांच्याकडून मला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, आपण इतरांना जो काही सल्ला देतो तो नेहमी बायबलवर आधारित असला पाहिजे. त्या प्रशालेत वेगवेगळ्या अनुभवी बांधवांनी भाषणं दिली. जसं की, बंधू नेथन नॉर, बंधू फ्रेड्रिक फ्रान्स, बंधू कार्ल क्लाइन. आणि बंधू ए. एच. मॅकमिलन या अतिशय नम्र स्वभावाच्या बांधवाकडूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. १९१४ ते १९१९ हा काळ संघटनेतल्या बांधवांसाठी एक परीक्षेचा काळ होता. पण त्या काळात यहोवाने आपल्या लोकांना कशी मदत केली, याबद्दल बंधू मॅकमिलनने आपल्या भाषणात सुंदर माहिती दिली!
एक नवीन नेमणूक
प्रशालेच्या शेवटी बंधू नॉरने मला आणि बार्बराला सांगितलं, की आम्हाला आफ्रिका खंडातल्या बुरुंडी देशात सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं आहे. आम्ही लगेच लायब्ररीमध्ये गेलो आणि वार्षिक पुस्तकात पाहिलं, की त्या देशात किती प्रचारक आहेत. पण ती माहिती आम्हाला कुठेच सापडली नाही. याचाच अर्थ, आम्ही अशा क्षेत्रात जाणार होतो जिथे कधीच प्रचारकार्य झालं नव्हतं. याशिवाय, ज्या आफ्रिका खंडात आम्ही जाणार होतो त्याबद्दलही फारशी माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आमच्या मनात अनेक प्रश्न होते, भीती होती. पण यहोवाला कळकळून प्रार्थना केल्यामुळे मन खूप शांत झालं.
बुरुंडीमध्ये आमच्यासाठी सगळंच नवीन होतं. तिथलं हवामान, संस्कृती, भाषा, सगळंच. आणि आता आम्हाला फ्रेंच भाषा शिकावी लागणार होती. शिवाय, कुठे राहायचं हासुद्धा एक मोठा प्रश्न होता. तिथे आल्याच्या दोन दिवसांनंतर गिलियडमध्ये आमच्यासोबत असलेले बंधू हॅरी अरनॉट आम्हाला भेटायला आले होते. ते सेवा करण्यासाठी झांबियाला परत चालले होते. त्यांनी आम्हाला घर शोधायला मदत केली. मिशनरी सेवेतलं ते आमचं पहिलं घर होतं. तिथल्या अधिकाऱ्यांना यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि त्यामुळे ते आमचा विरोध करू लागले. तिथे सेवा करण्यात नुकतंच आमचं मन रमू लागलं होतं. पण तेव्हाच तिथल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, की कामाचा परवाना नसल्यामुळे आम्ही इथं राहू शकत नाही. त्यामुळे आम्हाला बुरुंडी सोडून एका नवीन देशात, युगांडामध्ये जावं लागलं. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटलं.
युगांडाला जाण्यासाठी आमच्याकडे विझा नव्हते. त्यामुळे आमच्या मनात खूप भीती होती. पण आमचा सगळा भरवसा यहोवावर होता. युगांडामध्ये प्रचारकांची खूप गरज असल्यामुळे कॅनडामधून एक भाऊ तिथे सेवा करायला आला होता. त्याने आमची परिस्थिती तिथल्या अधिकाऱ्याला समजावून सांगितली. त्यामुळे देशात राहण्याचा परवाना मिळवण्यासाठी त्या अधिकाऱ्याने आम्हाला काही महिन्यांची मुदत दिली. यावरून आम्हाला स्पष्टपणे दिसून आलं, की यहोवा आमच्यासोबत आहे आणि तो आम्हाला मदत करत आहे.
युगांडामधली परिस्थिती बुरुंडीपेक्षा फार वेगळी होती. तिथे प्रचारकार्य आधीच सुरू झालं होतं. आणि संपूर्ण देशात २८ प्रचारक होते. या क्षेत्रात इंग्रजी बोलणारे अनेक जण आम्हाला भेटले. पण लवकरच आमच्या लक्षात आलं, की सत्याबद्दल आवड दाखवणाऱ्या लोकांना प्रगती करायला मदत करायची असेल, तर त्यांची निदान एक तरी भाषा आपण शिकून घेतली पाहिजे. आम्ही कम्पाला या ठिकाणी प्रचारकार्य करायला सुरुवात केली होती. तिथे जास्तकरून लुगांडा भाषा बोलली जायची. त्यामुळे आम्ही ही भाषा शिकून घ्यायचं ठरवलं. आम्हाला ही भाषा चांगल्या प्रकारे शिकून घ्यायला बरीच वर्षं लागली. पण ती शिकल्यामुळे खूप फरक पडला. आम्ही आमच्या बायबल विद्यार्थ्यांना प्रगती करायला आणखी चांगल्या प्रकारे मदत करू शकलो. आणि तेसुद्धा आमच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागले. ते जे काही शिकत होते, त्याबद्दल त्यांना कसं वाटतं हे ते आम्हाला सांगू लागले.
वेगवेगळ्या ठिकाणी केलेला प्रवास
युगांडात प्रवास करत असताना
सत्याबद्दल आवड दाखवणारे लोक भेटायचे तेव्हा आम्हाला खूप आनंद व्हायचा. आणि जेव्हा आम्हाला संपूर्ण देशात प्रवासी कार्य करायला सांगण्यात आलं, तेव्हा तर आमच्या आनंदात आणखीनच भर पडली. केनियाच्या शाखा कार्यालयाने आम्हाला एक काम दिलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की आम्ही संपूर्ण देशात फिरून अशी क्षेत्रं शोधून काढावीत जिथे खास पायनियरांना पाठवण्याची गरज आहे. यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काहीच माहीत नसतानाही कितीतरी वेळा लोकांनी मनापासून आमचा पाहुणचार केला. त्यांनी आमच्यासाठी जेवण बनवलं आणि खूप आपलेपणा दाखवला.
नंतर शाखा कार्यालयाने मला सेशेल्झमधल्या दोन प्रचारकांना मदत करायला पाठवलं. सेशेल्झ हा हिंदी महासागरातला एक द्वीप-समूह आहे. तिथे पोचण्यासाठी मी दोन दिवसांचा ट्रेनचा प्रवास करून केनियाचं बंदर मोंबासा इथे पोचलो. आणि तिथून जहाजाने प्रवास करून मी सेशेल्झला पोहचलो. पुढे, १९६५ ते १९७२ या काळादरम्यान बार्बरासुद्धा माझ्यासोबत सेशेल्झला येऊ लागली. सेशेल्झमध्ये खूप वाढ होऊ लागली. सुरुवातीला तिथे फक्त दोन प्रचारक होते. पण नंतर एक गट आणि मग एक मोठी मंडळी तयार झाली. सेशेल्झशिवाय, मी एरिट्रिया, इथियोपिया आणि सुदान इथल्या बांधवांनासुद्धा भेट दिली.
त्या वेळी एका लष्करी गटाने सरकारचा ताबा घेतल्यामुळे युगांडाचं राजकीय वातावरण झपाट्याने बदलू लागलं होतं. सगळीकडे दहशतीचं वातावरण पसरलं होतं. पण बायबलचा सल्ला पाळल्यामुळे आपलं भलंच होतं हे मी शिकलो. बायबल म्हणतं: “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या.” (मार्क १२:१७) एकदा तिथल्या अधिकाऱ्यांनी परदेशातून आलेल्या सगळ्या लोकांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपली नावं नोंदवायला सांगितली. आम्ही लगेच पोलीस स्टेशनमध्ये आमची नावं नोंदवली. याच्या काही दिवसानंतरच मी आणि आणखी एक मिशनरी भाऊ कम्पालामधून आमच्या गाडीने जात होतो. तेव्हा काही पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला अडवलं. त्या वेळी आमचं मन खूप धडधडू लागलं. आम्ही गुप्तहेर आहोत असा आरोप लावून त्यांनी आम्हाला मुख्य पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथल्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, की आम्ही मिशनरी आहोत आणि शांतीने आमचं काम करत आहोत. आणि आम्ही आमची नावं नोंदवली आहेत, हे आम्ही त्यांना सांगत होतो; पण ते काही आमचं ऐकायला तयार नव्हते. उलट आम्हाला अटक करून ते आम्हाला आमच्या घराजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला ओळखलं तेव्हा आम्हाला खूप हायसं वाटलं. आम्ही आमची नावं नोंदवली आहेत त्यामुळे आम्हाला सोडून द्यावं, असं त्याने आमच्यासोबत असलेल्या पोलिसाला सांगितलं.
आपली राज्य सेवा याच्या प्रती तयार करताना, अबिजान, कोट दि वार इथल्या शाखा कार्यालयात
त्या काळात लष्करी नाकेबंदी असलेल्या ठिकाणी आम्हाला अडवून आमची चौकशी केली जायची. तेव्हा आम्हाला खूप भीती वाटायची. खासकरून दारूच्या नशेत धूत असलेले सैनिक आम्हाला अडवायचे तेव्हा. पण प्रत्येक वेळी यहोवाला प्रार्थना केल्यामुळे आमची भीती नाहीशी व्हायची. कारण कितीतरी वेळा तर आमची कोणतीही चौकशी न करता सैनिक आम्हाला जाऊ द्यायचे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे १९७३ मध्ये परदेशातून आलेल्या सगळ्या मिशनरींना देश सोडायचा हुकूम देण्यात आला.
मग पुन्हा आमची नेमणूक बदलली. या वेळी आम्हाला पश्चिम आफ्रिकेतल्या कोट दि वार या देशात पाठवण्यात आलं. आमच्यासाठी हा पुन्हा एक मोठा बदल होता. पुन्हा एकदा आम्हाला इथल्या नवीन संस्कृतीशी आणि वेगवेगळ्या देशांतून आलेल्या मिशनरींशी जुळवून घ्यावं लागलं. याशिवाय, इथे प्रत्येक वेळी आम्हाला फ्रेंच भाषेत बोलावं लागायचं. पण इथल्या नम्र, प्रामाणिक मनाच्या लोकांनी सत्याबद्दल लगेच आवड दाखवली. त्यामुळे आम्हाला जाणवलं, की आम्ही इथे यावं ही यहोवाचीच इच्छा होती. यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे त्याने कशा प्रकारे आमचे मार्ग मोकळे केले, हे आम्ही दोघांनीही अनुभवलं.
जीवनात झालेले बदल
काही काळानंतर अचानक आम्हाला समजलं की बार्बराला कॅन्सरचा आजार झालाय. तिला चांगला उपचार मिळावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा युरोपला आमच्या घरी जायचो. पण १९८३ मध्ये आमच्या लक्षात आलं, की बार्बराच्या तब्येतीमुळे आम्हाला जास्त दिवस आफ्रिकेत सेवा करता येणार नाही. यामुळे आम्हा दोघांना खूप वाईट वाटलं.
ॲनसोबत ब्रिटन बेथेलच्या नवीन जागेसमोर
लंडन बेथेलमध्ये सेवा करत असताना बार्बराची तब्येत आणखी खराब झाली आणि शेवटी ती वारली. त्या वेळी बेथेलमधल्या भाऊबहिणींनी मला खूप आधार दिला. खासकरून, एका जोडप्याने मला सावरायला आणि यहोवावर भरवसा ठेवायला खूप मदत केली. काही काळानंतर माझी भेट ॲन नावाच्या बहिणीशी झाली. ती बेथेलमध्ये येऊन सेवा करायची. पूर्वी तिने खास पायनियर म्हणून सेवा केली होती. आणि यहोवाबद्दल तिला खूप प्रेम होतं. १९८९ मध्ये आम्ही दोघांनी लग्न केलं. आणि आजपर्यंत आम्ही लंडन बेथेलमध्ये सेवा करत आहोत.
१९९५ पासून ते २०१८ पर्यंत मला जागतिक मुख्यालयाचा प्रतिनिधी म्हणून सेवा करायचा बहुमान मिळाला. त्या निमित्ताने मी जवळजवळ ६० देशांना भेट दिली. त्या प्रत्येक भेटीत मी पाहिलं, की परिस्थिती कशीही असो यहोवा आपल्या लोकांचा सांभाळ करतो.
२०१७ मध्ये मी आफ्रिकेला प्रतिनिधी म्हणून भेट दिली. ॲनला पहिल्यांदाच बुरुंडीला घेऊन जायला मला खूप आनंद झाला. १९६४ साली ज्या रस्त्यावर मी घरोघरचं प्रचारकार्य करायचो तिथे आता एक सुंदर बेथेल-गृह आहे. आणि देशात १५,५०० पेक्षा जास्त प्रचारक आहेत. ही वाढ पाहून आम्ही दोघंही थक्क झालो!
२०१८ मध्ये मला कोणकोणत्या देशांना भेट द्यायची आहे त्याची एक यादी मला मिळाली होती. ती पाहून मी खूप खूश झालो. कारण त्या यादीमध्ये कोट दि वार हेही नाव होतं. अबिजान या राजधानी शहरात पोचताच मला घरी आल्यासारखं वाटलं. बेथेलमधल्या आमच्या रूममध्ये टेलीफोन नंबरची एक यादी ठेवली होती. त्यावरून मी माझी नजर फरवली. आणि माझ्या लक्षात आलं, की शेजारच्याच रूममध्ये सोसू नावाचा एक भाऊ राहतो. ते नाव मला खूप ओळखीचं वाटलं. मला आठवलं की पूर्वी मी अबिजानमध्ये होतो तेव्हा हा बांधव शहर पर्यवेक्षक म्हणून सेवा करत होता. पण माझा अंदाज चुकला होता. कारण हा तो सोसू नव्हता, हा त्याचा मुलगा होता.
खरंच, दिलेला शब्द यहोवा नेहमी पाळतो. आपण जेव्हा यहोवावर भरवसा ठेवतो तेव्हा तो आपले सगळे मार्ग मोकळे करतो. आता नवीन जगाकडे नेणाऱ्या त्या मार्गावर माझी सतत चालत राहण्याची इच्छा आहे!—नीति. ४:१८.