अभ्यास लेख १२
बोलण्याची योग्य वेळ कोणती हे कसं ठरवावं?
“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.”—उप. ३:१, ७.
गीत १८ देवाचे खरे प्रेम
सारांशa
१. उपदेशक ३:१, ७ या वचनांतून आपल्याला काय शिकायला मिळतं?
काही लोकांना खूप बोलायला आवडतं, तर काहींना शांत राहायला आवडतं. या लेखाच्या मुख्य वचनात सांगितलं आहे की बोलण्याची आणि शांत राहण्याची योग्य वेळ असते. (उपदेशक ३:१, ७ वाचा.) असं असलं तरी मोजकंच बोलणाऱ्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला वाटतं की त्यांनी बोलकं असावं. तर काहींच्या बाबतीत वाटतं की त्यांनी कमी बोलावं.
२. आपण कधी आणि कसं बोलावं याचे स्तर ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे?
२ आपल्याला बोलता येणं ही देवाकडून मिळालेली देणगी आहे. (निर्ग. ४:१०, ११; प्रकटी. ४:११) या देणगीचा चांगला वापर कसा करावा हे समजण्यासाठी बायबल आपल्याला मदत करतं. या लेखात आपण बायबलमध्ये दिलेल्या अशा उदाहरणांवर चर्चा करणार आहोत ज्यांमुळे कधी बोलावं आणि कधी शांत राहावं हे समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. तसंच, आपण इतरांशी ज्या प्रकारे बोलतो त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं हेही आपण पाहणार आहोत. पण सर्वात आधी आपण हे पाहू या की आपण कधी बोललं पाहिजे.
आपण कधी बोललं पाहिजे?
३. रोमकर १०:१४ या वचनानुसार साक्ष देण्याबद्दल आपली मनोवृत्ती कशी असली पाहिजे?
३ यहोवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल बोलायला आपण नेहमी तयार असलं पाहिजे. (मत्त. २४:१४; रोमकर १०:१४ वाचा.) असं करून आपण येशूचं अनुकरण करतो. येशू पृथ्वीवर येण्याच्या अनेक महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे त्याला त्याच्या पित्याबद्दलचं सत्य इतरांना सांगायचं होतं. (योहा. १८:३७) पण आपण जेव्हा हे सत्य इतरांना सांगतो तेव्हा आपण ते कसं सांगतो हेसुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे यहोवाबद्दल इतरांशी बोलताना आपण “सौम्यतेने आणि मनापासून आदर” दाखवून बोललं पाहिजे. तसंच, त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि विश्वासाला धक्का लागणार नाही या गोष्टीचीही आपण काळजी घेतली पाहिजे. (१ पेत्र ३:१५) या सर्व गोष्टी केल्या तर आपण त्यांच्याशी बोलण्यासोबतच त्यांना शिकवण्याचा आणि कदाचित त्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न करत असू.
४. नीतिसूत्रे ९:९ या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्या बोलण्यामुळे इतरांना कशी मदत होऊ शकते?
४ एखाद्या बांधवाला किंवा बहिणीला सल्ल्याची गरज असल्याचं मंडळीतल्या वडिलांना जाणवतं तेव्हा त्यांनी तो सल्ला देण्यासाठी कचरू नये. हे स्पष्टच आहे की ज्या व्यक्तीला सल्ला दिला जात आहे तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून वडील तिच्याशी बोलण्यासाठी योग्य वेळ निवडतील. तसंच, सल्ला देत असताना आजूबाजूला दुसरं कोणी नसेल याकडेही ते लक्ष देतील. समोरच्या व्यक्तीशी बोलताना वडील नेहमी आदराने बोलण्याचा प्रयत्न करतात. इतरांना सुज्ञ निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून ते त्यांना बायबल आधारित तत्त्वं समजावून सांगतात. (नीतिसूत्रे ९:९ वाचा.) बोलण्याची गरज पडते तेव्हा आपल्याकडे धैर्य असणं का गरजेचं आहे? आता आपण दोन वेगवेगळ्या उदाहरणांवर चर्चा करू या. पहिल्या उदाहरणात, एका व्यक्तीला तिच्या दोन मुलांच्या चुका सुधारण्याची गरज होती. आणि दुसऱ्या उदाहरणात, एका माणसाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल एका स्त्रीला त्याला सांगायचं होतं. हा माणूस भविष्यात राजा बनणार होता.
५. कोणत्या प्रसंगी बोलण्याची गरज असूनही महायाजक एली बोलला नाही?
५ महायाजक एलीला दोन मुलं होती आणि त्यांच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. पण त्या मुलांना यहोवाबद्दल काहीच आदर नव्हता. याजक म्हणून निवासमंडपात सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. असं असलं तरी त्यांना मिळालेल्या अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला, यहोवासाठी केल्या जाणाऱ्या अर्पणांचा घोर अनादर केला आणि निर्लज्जपणे अनैतिक कामं केली. (१ शमु. २:१२-१७, २२) नियमशास्त्राप्रमाणे एलीच्या मुलांना मृत्युदंडाची शिक्षा मिळायला हवी होती. पण त्यांना कडक शब्दात ताडन देण्याऐवजी एलीने त्यांना सौम्यपणे सल्ला दिला आणि निवासमंडपात सेवा करू दिली. (अनु. २१:१८-२१) या परिस्थितीला एलीने ज्या प्रकारे हाताळलं त्याबद्दल यहोवाला कसं वाटलं? त्याने एलीला म्हटलं: “तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करत आहेस?” यहोवाने ठरवलं की एलीच्या दोन्ही दुष्ट मुलांना तो मृत्युदंड देईल.—१ शमु. २:२९, ३४.
६. आपण एलीकडून काय शिकतो?
६ एलीकडून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. आपल्या एखाद्या मित्राने किंवा नातेवाइकाने यहोवाची आज्ञा मोडली असेल तर आपण त्याच्याशी बोललं पाहिजे आणि त्याला यहोवाच्या स्तरांची आठवण करून दिली पाहिजे. त्यानंतर त्याला वडिलांकडून मदत मिळेल याची आपण खातरी केली पाहिजे. (याको. ५:१४) आपण कधीच एलीसारखं वागणार नाही. आपण आपल्या त्या मित्राला किंवा नातेवाइकाला यहोवापेक्षा जास्त महत्त्व देणार नाही. हे खरं आहे की एखाद्या व्यक्तीची चूक सुधारायची असेल तर तिच्याशी बोलायला धैर्य लागतं. पण आपण असं केलं तर त्या व्यक्तीला याचा नक्की फायदा होईल. आता आपण एलीच्या वागण्यातला आणि अबीगईलच्या वागण्यातला फरक पाहू या.
योग्य वेळ निवडून बोलायच्या बाबतीत अबीगईलने चांगलं उदाहरण मांडलं (परिच्छेद ७-८ पाहा)d
७. अबीगईल दावीदशी का बोलली?
७ अबीगईल ही नाबाल नावाच्या एका श्रीमंत जमीनदाराची पत्नी होती. दावीद आणि त्याची माणसं शौल राजापासून आपला जीव वाचवण्यासाठी रानात लपली होती. त्या वेळी त्यांनी नाबालच्या गुराढोरांची राखण केली. नाबालने दावीदच्या मदतीची आठवण ठेवली का? नाही. दावीदने स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी नाबालकडे थोडं अन्न-पाणी मागितलं तेव्हा नाबाल खूप चिडला. त्याने त्यांना शिव्याशाप दिले. (१ शमु. २५:५-८, १०-१२, १४) यामुळे दावीदने ठरवलं की तो नाबालच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाला मारून टाकेल. (१ शमु. २५:१३, २२) हे पाप करण्यापासून दावीदला कसं थांबवलं जाऊ शकत होतं? अबीगईला जाणवलं की या परिस्थितीत बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे ती धैर्याने त्या चिडलेल्या आणि भुकेल्या ४०० सैनिकांसमोर गेली आणि दावीदशी बोलली.
८. अबीगईलच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?
८ अबीगईल दावीदला भेटली तेव्हा ती त्याच्याशी धैर्याने आणि आदराने बोलली. यामुळे त्याने तिचं ऐकलं. जे घडलं त्यासाठी अबीगईल जबाबदार नव्हती तरीपण तिने दावीदकडे माफी मागितली. दावीद एक चांगला माणूस आहे आणि तो योग्य तेच करेल हे तिला माहीत आहे असं तिने म्हटलं. (१ शमु. २५:२४, २६, २८, ३३, ३४) जेव्हा आपल्याला कळतं की एखादी व्यक्ती गंभीर चूक करण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा आपण अबीगईलसारखं धैर्य दाखवून त्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. (स्तो. १४१:५) अशा वेळी आपण आदराने बोलण्यासोबतच स्पष्टपणेसुद्धा बोललं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला सल्ल्याची गरज असते तेव्हा तो प्रेमळपणे देण्याद्वारे आपण दाखवून देतो की आपण तिचे खरे मित्र आहोत.—नीति. २७:१७.
९-१०. इतरांना सल्ला देताना वडिलांनी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
९ मंडळीत एखाद्या व्यक्तीने चुकीचं पाऊल उचललं असेल तर तिच्याशी बोलण्यासाठी खासकरून वडिलांनी धैर्य दाखवण्याची गरज आहे. (गलती. ६:१) वडिलांना जाणीव असते की तेसुद्धा अपरिपूर्ण आहेत आणि त्यांनाही कधी ना कधी सल्ल्याची गरज पडू शकते. पण यामुळे ते असा विचार करत नाहीत की ज्या व्यक्तीला सुधारण्याची गरज आहे तिला त्यांनी सल्ला देऊ नये. याउलट ते तिला मदत करतात. (२ तीम. ४:२; तीत १:९) सल्ला देताना ते आपल्या बोलण्याच्या देणगीचा कुशलपणे वापर करून तिला समजवतात आणि तिच्याशी धीराने वागतात. त्यांचं त्या व्यक्तीवर प्रेम असल्यामुळे ते तिला मदत करण्याचा प्रयत्न करतात. (नीति. १३:२४) पण या सर्वांपेक्षा यहोवाला सन्मान देणं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ते देवाच्या स्तरांचं समर्थन करतात आणि वाईट प्रभावापासून मंडळीचं संरक्षण करतात.—प्रे. कार्ये २०:२८.
१० आतापर्यंत आपण चर्चा केली की आपण कधी बोललं पाहिजे. पण असेही काही प्रसंग असतात जेव्हा शांत राहणं सर्वात चांगलं असतं. तरी अशा वेळी कोणत्या गोष्टींमुळे शांत राहणं कठीण जाऊ शकतं?
आपण कधी शांत राहिलं पाहिजे?
११. याकोबने कोणतं उदाहरण दिलं आणि त्याचा आपल्या बोलण्याशी काय संबंध आहे?
११ आपल्या बोलण्यावर ताबा ठेवणं कधीकधी आपल्याला कठीण जाऊ शकतं. ही गोष्ट समजवण्यासाठी याकोबने एक अगदी योग्य उदाहरण दिलं. त्याने म्हटलं: “जर कोणी बोलण्यात चुकत नसेल, तर तो मनुष्य परिपूर्ण असून आपल्या संपूर्ण शरीराला ताब्यात ठेवू शकतो. आपण घोड्यांना आपल्या मनासारखे वागवण्यासाठी त्यांच्या तोंडांत लगाम घालून त्यांच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो.” (याको. ३:२, ३) लगाम हा घोड्याच्या डोक्यावर आणि तोंडाला लावलेला असतो. लगाम खेचून घोडेस्वार घोड्याला मार्ग दाखवू शकतो किंवा त्याला थांबवू शकतो. घोडेस्वाराच्या हातून जर लगामावरचा ताबा सुटला तर घोडा बेभान होऊ शकतो आणि यामुळे त्याला आणि घोडेस्वाराला दुखापत होऊ शकते. त्याच प्रकारे, आपण जर आपल्या बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर बरंच नुकसान होऊ शकतं. आता आपण अशा काही परिस्थितींवर चर्चा करू या जेव्हा आपल्याला आपल्या जिभेवर ‘लगाम घालण्याची’ गरज पडू शकते.
१२. कोणत्या परिस्थितीत आपण आपल्या जिभेला “लगाम” घालून आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे?
१२ जेव्हा एखाद्या भावाजवळ किंवा बहिणीजवळ अशी माहिती असते, जी ते इतरांना सांगू शकत नाहीत, तेव्हा तुम्ही काय करता? उदाहरणार्थ, आपल्या कार्यावर बंदी आहे अशा देशात राहणारा एखादा भाऊ किंवा बहीण तुम्हाला भेटते, तेव्हा त्या देशात आपलं काम कसं केलं जातं याबद्दल बारीकसारीक माहिती तुम्ही त्यांना विचारता का? असं करण्यामागचा तुमचा हेतू नक्कीच चांगला असेल. आपलं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम आहे, आपल्याला त्यांची काळजी वाटते आणि त्यांचं कसं चाललं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तसंच, त्यांच्यासाठी प्रार्थना करताना काही खास गोष्टींचा उल्लेख करायची आपली इच्छा असते. हे खरं असलं, तरी ही एक अशी वेळ आहे जेव्हा आपण आपल्या जिभेला “लगाम” घातला पाहिजे आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. गुप्त माहिती देण्याचा आपण एखाद्यावर दबाव आणतो तेव्हा आपलं त्या व्यक्तीवर प्रेम नसल्याचं आपण दाखवतो. तसंच, ज्या भाऊबहिणींनी त्यांच्या कार्याबद्दल माहिती गुप्त ठेवण्यासाठी त्या व्यक्तीवर भरवसा ठेवला आहे, अशा भाऊबहिणींवरही आपलं प्रेम नसल्याचं आपण दाखवतो. आपल्यापैकी कोणाचीच अशी इच्छा नाही की ज्या देशांत आपल्या कार्यावर बंदी आहे तिथल्या भाऊबहिणींच्या त्रासात आपण आणखी भर घालावी. अशा देशात सेवा करणाऱ्या कोणत्याही भावाने किंवा बहिणीने, तिथले साक्षीदार सेवाकार्य किंवा उपासनेशी संबंधित इतर कार्यं कशी करतात याबद्दल कोणालाही माहिती देऊ नये.
१३. नीतिसूत्रे ११:१३ यात सांगितल्याप्रमाणे वडिलांनी काय केलं पाहिजे आणि का?
१३ माहिती गुप्त ठेवण्याच्या बाबतीत खासकरून वडिलांनी नीतिसूत्रे ११:१३ यात दिलेलं तत्त्व लागू केलं पाहिजे. (वाचा.) पण जे वडील विवाहित आहेत त्यांना हे खासकरून कठीण जाऊ शकतं. सहसा विवाहित जोडीदार एकमेकांना आपल्या मनातले विचार, भावना आणि चिंता सांगतात. यामुळे त्यांचं नातं मजबूत होतं. पण, वडील म्हणून सेवा करणाऱ्या बांधवाने ही गोष्ट ओळखली पाहिजे, की मंडळीतल्या भाऊबहिणींच्या “गुप्त गोष्टी” त्याने कोणालाही सांगू नये. जर त्याने त्या सांगितल्या, तर भाऊबहिणींचा त्याच्यावरचा विश्वास कमजोर होईल आणि त्याचं नाव खराब होईल. ज्यांच्याकडे मंडळीत जबाबदाऱ्या आहेत असे बांधव “दुतोंडे” किंवा कपटीपणे बोलणारे नसावेत. (१ तीम. ३:८, तळटीप) म्हणजेच त्यांनी इतरांना फसवू नये किंवा त्यांना इतरांबद्दल गप्पागोष्टी करायची सवय असू नये. एका वडिलाचं आपल्या पत्नीवर प्रेम असेल तर तो तिला अशी माहिती सांगणार नाही जी तिच्यासाठी गरजेची नाही.
१४. वडील म्हणून सेवा करणाऱ्या बांधवाची पत्नी त्याला चांगलं नाव टिकवून ठेवायला कशी मदत करू शकते?
१४ ज्या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत त्यांबद्दल बोलायचा दबाव पत्नीने कधीही आपल्या पतीवर टाकू नये. असं करण्याद्वारे ती त्याला त्याचं चांगलं नाव टिकवून ठेवायला मदत करू शकते. एक पत्नी या सल्ल्याचं पालन करते, तेव्हा ती आपल्या पतीला मदत तर करतेच, पण त्यासोबतच ज्यांनी तिच्या पतीवर भरवसा ठेवून त्याला गुप्त माहिती सांगितली आहे, त्यांच्याबद्दलही आदर असल्याचं दाखवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवायला हातभार लावल्यामुळे ती यहोवाचं मन आनंदित करते.—रोम. १४:१९.
आपण जे बोलतो त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?
१५. ईयोबच्या तीन मित्रांबद्दल यहोवाला कसं वाटलं आणि का?
१५ आपण कसं आणि केव्हा बोलावं याबद्दल बायबलमधल्या ईयोब या पुस्तकातून आपण बरंच काही शिकू शकतो. ईयोबवर एकापाठोपाठ एक भयानक संकटं कोसळल्यावर, चार माणसं त्याला सांत्वन आणि सल्ला द्यायला आली. ती माणसं बराच वेळ काहीच बोलली नाहीत. पण त्यांपैकी अलीफज, बिल्दद आणि सोफर हे तिघं जण नंतर जे बोलले, त्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की ईयोबला कशी मदत करता येईल याबद्दल त्यांनी जराही विचार केला नव्हता. उलट, ईयोबने काहीतरी चुकीचं केलं आहे हे कसं सिद्ध करता येईल याचाच ते विचार करत होते. ते ज्या गोष्टी बोलले त्यांपैकी काही गोष्टी खऱ्या होत्या. पण ईयोबबद्दल आणि यहोवाबद्दल ते जे काही बोलले त्यापैकी बहुतेक गोष्टी क्रूर आणि खोट्या होत्या. ईयोब खूप वाईट माणूस आहे असा आरोप त्यांनी लावला. (ईयो. ३२:१-३) हे पाहून यहोवाने काय केलं? त्याला त्या तिघांचा खूप राग आला. यहोवाने त्या तिघांना मूर्ख म्हटलं आणि सांगितलं की त्यांनी ईयोबला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगावी.—ईयो. ४२:७-९.
१६. अलीफज, बिल्दद आणि सोफर यांच्या वाईट उदाहरणावरून आपण काय शिकतो?
१६ अलीफज, बिल्दद आणि सोफर यांच्या वाईट उदाहरणावरून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. पहिली गोष्ट म्हणजे, आपण कधीही आपल्या भाऊबहिणींना दोषी ठरवू नये. (मत्त. ७:१-५) त्याऐवजी, काहीही बोलण्याआधी आपण त्यांचं नीट ऐकून घेतलं पाहिजे. तरच आपल्याला त्यांची परिस्थिती नीट समजून घेता येईल. (१ पेत्र ३:८) दुसरी गोष्ट, आपलं बोलणं प्रेमळ आणि खरं असलं पाहिजे. (इफिस. ४:२५) आणि तिसरी गोष्ट, आपण एकमेकांशी जे काही बोलतो त्याकडे यहोवा बारकाईने लक्ष देतो.
१७. अलीहूच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
१७ ईयोबला भेटायला आलेला चौथा माणूस म्हणजे अलीहू. तो अब्राहामचा एक नातेवाईक होता. ईयोब आणि बाकीचे तिघं जण बोलत होते तेव्हा अलीहूने शांतपणे ऐकून घेतलं. त्याने नक्कीच त्यांच्या बोलण्याकडे नीट लक्ष दिलं असेल. कारण नंतर त्याने ईयोबचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी त्याला दयाळूपणे, पण अगदी स्पष्ट शब्दांत सल्ला दिला. (ईयो. ३३:१, ६, १७) अलीहूला स्वतःचा किंवा इतर कोणत्याही माणसाचा नाही तर खासकरून यहोवाचा गौरव करायचा होता. (ईयो. ३२:२१, २२; ३७:२३, २४) अलीहूच्या उदाहरणावरून आपण शिकतो, की काही वेळा शांत राहून ऐकणं योग्य असतं. (याको. १:१९) तसंच, आपण हेही शिकतो की आपण इतरांना सल्ला देतो तेव्हा स्वतःचा नाही तर यहोवाचा गौरव करणं हा आपला मुख्य हेतू असला पाहिजे.
१८. बोलण्याच्या देणगीची आपण कदर करतो हे आपण कसं दाखवू शकतो?
१८ कधी आणि कसं बोलावं याबद्दल बायबलमधल्या सल्ल्याचं पालन करून आपण दाखवतो, की आपण बोलण्याच्या देणगीची मनापासून कदर करतो. देवाच्या प्रेरणेने शलमोन राजाने असं लिहिलं: “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” (नीति. २५:११) जेव्हा आपण इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो आणि नीट विचार करून बोलतो, तेव्हा आपले शब्द त्या सोन्याच्या फळांसारखे असतात; म्हणजेच, ते मौल्यवान आणि सुंदरही असतात. मग, आपण कमी बोललो किंवा जास्त, आपल्या बोलण्यामुळे इतरांना उत्तेजन मिळेल आणि यहोवाला आपला अभिमान वाटेल. (नीति. २३:१५; इफिस. ४:२९) देवाने आपल्याला दिलेल्या या देणगीबद्दल आपली कदर दाखवण्याचा हाच सर्वात चांगला मार्ग आहे!
गीत ४५ उन्नती करू या!
a देवाच्या वचनांत दिलेली तत्त्वं आपल्याला हे समजण्यासाठी मदत करतील की आपण कधी बोलावं आणि कधी शांत राहावं. ही तत्त्वं आपल्याला माहीत असली आणि आपण ती जीवनात लागू केली तर आपलं बोलणं असं असेल ज्यामुळे यहोवाला आनंद होईल.
b चित्रांचं वर्णन: एक बहीण दुसऱ्या बहिणीला योग्य सल्ला देते.
c चित्रांचं वर्णन: एक भाऊ स्वच्छतेबद्दल काही सल्ले देतो.
d चित्रांचं वर्णन: योग्य वेळी अबीगईल दावीदशी बोलली आणि यामुळे चांगला परिणाम झाला.
e चित्रांचं वर्णन: बंदी असलेल्या देशात आपलं कार्य कसं केलं जातं याबद्दल एक जोडपं माहिती द्यायचं टाळतं.
f चित्रांचं वर्णन: मंडळीतल्या गुप्त गोष्टीबद्दल बोलताना कोणालाही ऐकू येणार नाही याची एक वडील काळजी घेतो.