जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका संदर्भ
© 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
५-११ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १२
मेहनत केल्यामुळे आशीर्वाद मिळतात
ईश्वरीय गुण हिऱ्यांपेक्षाही अधिक मौल्यवान
काही सेवकांना स्वतःच्या आर्थिक गरजा भागवणं फार कठीण जातं. पण अप्रामाणिकपणे पैसा मिळवण्याचा सोपा मार्ग निवडण्याऐवजी ते कष्ट करतात. असं करण्याद्वारे ते हे दाखवून देतात की प्रामाणिकपणा सारख्या ईश्वरीय गुणांना त्यांच्या जीवनात प्रथम स्थान आहे, इतर कोणत्याही भौतिक गोष्टींना नाही.—नीति. १२:२४; इफिस. ४:२८.
समाधानी जीवन कसं जगायचं?
देवाला वाटतं की आपण कामाचा कंटाळा करू नये, तर मेहनत करावी. का बरं? कारण मेहनत करणाऱ्याला आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवता येतात. तसंच, तो इतरांनाही गरज पडेल तेव्हा मदत करू शकतो. याशिवाय, कामाच्या ठिकाणी मेहनत केल्यामुळे त्याचा बॉस त्याची कदर करेल. त्यामुळे त्याची नोकरी टिकून राहू शकते. अशा प्रकारे मेहनत करण्याच्या बाबतीत देवाने दिलेला सल्ला आपण पाळतो तेव्हा त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याला पवित्र शास्त्रात “देवाची देणगी” असं म्हटलं आहे.—उपदेशक ३:१३.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इतरांना दिल्यामुळे मिळणारा आनंद अनुभवा!
१० शब्दांत ताकद असते हेसुद्धा विसरू नका. तुम्हाला असं कोणी माहीत आहे का, ज्याला प्रोत्साहनाची गरज आहे? किंवा असं कोणी माहीत आहे का, ज्याला सांत्वनाची गरज आहे? असं असलं तर त्याच्याशी बोलण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्या. तुम्ही त्याला प्रत्यक्ष भेटू शकता किंवा त्याच्याशी फोनवर बोलू शकता. किंवा एखादं कार्ड, इमेल किंवा मेसेज पाठवू शकता. त्यात तुम्ही जे काही म्हणाल ते खूप भारी असण्याची गरज नाही. मनापासून आलेल्या प्रेमळ आणि साध्या शब्दांनीसुद्धा त्या व्यक्तीला खूप बरं वाटू शकतं. यामुळे त्याला पुढेही विश्वासू राहायला किंवा आहे त्या परिस्थितीत सकारात्मक राहायला मदत होईल.—नीति. १२:२५; इफिस. ४:२९.
१२-१८ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १३
‘दुष्टाच्या दिव्यामुळे’ फसू नका
“सुज्ञाचा बोध”—जीवनाचा झरा
आपल्या जीवनाचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी आपण ज्यावर अवलंबून राहतो त्याला ही ज्योती सूचित करते. ‘देवाचे वचन धार्मिकाच्या पावलांकरिता दिव्यासारखे व त्याच्या मार्गावर प्रकाश आहे.’ (स्तोत्र ११९:१०५) त्यात निर्माणकर्त्याचे असीम ज्ञान आणि बुद्धी आहे. देवाच्या इच्छेविषयी आणि उद्देशाविषयी आपण जितके अधिक शिकू तितकाच आपल्याला मार्गदर्शित करणारा आध्यात्मिक प्रकाश प्रखर होईल. हे केवढ्या आनंदाचे कारण आहे! जगीक बुद्धी किंवा “जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे” तिने आपण विकर्षित का व्हावे?—१ तीमथ्य ६:२०; १ करिंथकर १:२०; कलस्सैकर २:८.
दुष्ट मनुष्याचा दिवा कितीही प्रखरतेने पेटत असला आणि तो कितीही सुसंपन्न दिसत असला तरी त्याचा दीप विझवला जाईल. त्याची स्थिती अंधकारमय होईल आणि तो निश्चित अडखळेल. शिवाय, त्याला “भावी आशा नसते.”—नीतिसूत्रे २४:२०, सुबोध भाषांतर.
स्वातंत्र्य देणाऱ्या देवाची सेवा करा
३ जर सैतान दोन परिपूर्ण मानवांना—शिवाय, अनेक आत्मिक प्राण्यांनाही देवाचे सार्वभौमत्व नाकारण्यास प्रवृत्त करू शकला, तर मग तो आपल्यालाही असे करण्यास नक्कीच प्रवृत्त करू शकतो. त्याचे डावपेच अजूनही फारसे बदललेले नाहीत. आजही तो आपल्याला असा विचार करायला लावतो की देवाचे नीतिनियम कठीण आहेत; त्यांचे पालन केल्यामुळे आपल्याला जीवनात मौज व आनंद उपभोगता येत नाही. (१ योहा. ५:३) अशा प्रकारच्या विचारांचा वारंवार आपल्या मनावर भडिमार झाल्यास ते आपल्या वागणुकीवर बराच प्रभाव पाडू शकतात. लैंगिक अनैतिकतेच्या पाशात सापडलेल्या एका २४ वर्षांच्या बहिणीने असे म्हटले: “माझ्यावर वाईट संगतीचा फार मोठा प्रभाव पडला, कारण मुळातच मला माझ्या मित्रमैत्रिणींपेक्षा वेगळं मत बाळगण्याची भीती वाटायची.” तुम्हीही कदाचित मित्रमैत्रिणींकडून येणारा अशा प्रकारचा दबाव अनुभवला असेल.
“प्रत्येक शहाणा मनुष्य अकलेने काम करितो”
खऱ्या ज्ञानानुसार वागणाऱ्या एका शहाण्या व धार्मिक मनुष्याला प्रतिफळ मिळेल. शलमोन आपल्याला अशी हमी देतो: “धार्मिक पोटभर जेवितो, परंतु दुर्जनांचे पोट रिते राहते.” (नीतिसूत्रे १३:२५) जीवनातील कोणत्याही क्षेत्रात—कौटुंबिक वर्तुळात, इतरांबरोबरच्या आपल्या नातेसंबंधात, आपल्या सेवेत किंवा आपल्याला शिक्षा दिली जाते तेव्हा आपल्यासाठी काय लाभदायक आहे हे यहोवाला माहीत आहे. त्यामुळे त्याच्या वचनातील सल्ल्याचे आपण सुज्ञपणे पालन करतो तेव्हा आपण निश्चितच सर्वोत्तम जीवनाचा आनंद लुटू.
आध्यात्मिक रत्नं शोधा
“प्रत्येक पुरुषाचं मस्तक ख्रिस्त आहे”
१३ आपण काय शिकतो? कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबासाठी जे काही करतो ते त्याने त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे केलं पाहिजे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं उत्तर प्रेषित योहान आपल्याला देतो. त्याने म्हटलं: ‘जो आपल्या भावावर [किंवा कुटुंबावर] प्रेम करत नाही, तो न पाहिलेल्या देवावर प्रेम करूच शकत नाही.’ (१ योहा. ४:११, २०) ज्या पुरुषाचं आपल्या कुटुंबावर प्रेम आहे तो यहोवा आणि येशू यांच्याप्रमाणेच आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक, भावनिक आणि रोजच्या गरजा पूर्ण करेल. (१ तीम. ५:८) तसंच, तो आपल्या मुलांवर चांगले संस्कार करेल आणि गरज पडल्यावर त्यांना शिस्तही लावेल. याशिवाय, तो नेहमी असे निर्णय घेईल ज्यांमुळे यहोवाचा सन्मान होईल आणि त्याच्या कुटुंबाचं भलं होईल. हे सगळं करण्यासाठी तो यहोवा आणि येशूचं अनुकरण कसं करू शकतो, ते आता आपण पाहू.
१९-२५ मे
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १४
नैसर्गिक विपत्ती आल्यावर प्रत्येक पाऊल उचलण्याआधी विचार करा
देवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची कदर करा
१० धोकादायक परिस्थिती आपल्याला नेहमीच टाळता येत नाही. खासकरून जेव्हा नैसर्गिक विपत्ती येते, रोगराई पसरते आणि सामाजिक दंगली उसळतात तेव्हा. पण अशा वेळी सरकारने लावलेल्या संचारबंदीच्या नियमांचं जर आपण पालन केलं तर आपल्या जिवाचं रक्षण होऊ शकतं. किंवा मग राहतं ठिकाण लगेच सोडून जाण्याच्या सूचनांचं किंवा सरकारने लावलेल्या इतर नियमांचं जर आपण पालन केलं, तर बऱ्याच प्रमाणात धोका टळू शकतो. (रोम. १३:१, ५-७) काही विपत्ती येणार आहेत याचा सरकारला आधीच अंदाज असल्यामुळे ते आपल्याला काही सूचना किंवा मार्गदर्शन देतं. आपण जर त्यांचं पालन केलं तर आपल्याला या प्रसंगाचा चांगल्या प्रकारे सामना करता येईल. उदाहरणार्थ, सरकार आपल्याला अन्न-पाण्याचा आणि औषधांचा पुरेसा साठा करून ठेवायला सांगतं तेव्हा आपण त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे.
११ आपण राहतो त्या ठिकाणी साथीचा रोग पसरत असेल तर काय? अशा वेळी शासनाने दिलेल्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. जसं की, नियमितपणे हात धुणं, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणं, मास्क घालणं आणि रोगाची लक्षणं दिसत असतील तर वेगळं राहणं. आपण जेव्हा या गोष्टींचं पालन करतो तेव्हा जीवनाच्या देणगीबद्दल आपल्याला किती कदर आहे हे दिसून येतं.
१२ तातडीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा मित्रपरिवाराकडून, शेजारपाजाऱ्यांकडून किंवा मिडीयाद्वारे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. अशा वेळी “प्रत्येक शब्दावर” विश्वास ठेवण्यापेक्षा आपण सरकारकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या भरवशालायक माहितीवर विश्वास ठेवला पाहिजे. (नीतिवचनं १४:१५ वाचा.) अशा वेळी मंडळीच्या सभांबद्दल किंवा प्रचार कार्याबद्दल मार्गदर्शन देण्याआधी नियमन मंडळ आणि शाखा कार्यालयं अचूक माहिती मिळवण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात. (इब्री १३:१७) त्यामुळे त्यांच्याकडून मिळणाऱ्या सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं आपण जेव्हा पालन करतो, तेव्हा आपण स्वतःचं आणि इतरांचंही संरक्षण करत असतो. शिवाय, असं केल्यामुळे इतर लोकांसमोर यहोवाच्या साक्षीदारांचं एक चांगलं उदाहरण राहतं.—१ पेत्र २:१२.
सादोकसारखं धाडसी बना!
११ धोकेदायक परिस्थितीत आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी जर आपल्याला सांगण्यात आलं, तर सादोकसारखं धैर्य दाखवायला आपण काय करू शकतो? (१) सूचनांचं पालन करा. स्थानिक शाखा कार्यालयाकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करा. कारण अशा परिस्थितीत सूचनांचं पालन करून एकता टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. (इब्री १३:१७) शिवाय, मंडळीतल्या वडिलांनी विपत्तीसाठी तयार राहायला स्थानिक योजना काय आहेत याबद्दल आणि विपत्ती आली तर संघटनेकडून काही सूचना आहेत का, याबद्दल नेहमी माहिती घेतली पाहिजे. (१ करिंथ. १४:३३, ४०) (२) धैर्य दाखवा पण सावध राहा. (नीति. २२:३) कोणतंही पाऊल उचलण्याआधी विचार करा आणि अनावश्यक धोके टाळा. (३) यहोवावर विसंबून राहा. हे लक्षात असू द्या, की यहोवाला तुमची आणि तुमच्यासोबतच इतर भावांचीसुद्धा काळजी आहे. त्यामुळे सुरक्षित राहून भाऊबहिणींना कशी मदत करता येईल, यासाठी तो तुम्हाला साहाय्य करू शकतो.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ १०९४
विचारशक्ती
खूप विचार करणाऱ्या आणि आपल्या विचारशक्तीचा वापर करणाऱ्या व्यक्तीचाही कधीकधी द्वेष केला जातो. खूप जास्त विचार न करणारे लोक अशांना पाण्यात पाहतात. तसंच, जे देवाच्या इच्छेप्रमाणे विचार करायचा प्रयत्न करतात त्यांचाही कदाचित द्वेष केला जाईल. कारण येशूने म्हटलं होतं: “आता तुम्ही जगाचा भाग नाही, तर मी तुम्हाला जगातून निवडून घेतलंय. यामुळेच जग तुमचा द्वेष करतं.” (योह १५:१९) ‘विचार करणं’ यासाठी असलेले मूळ भाषेतले शब्द कटकारस्थानं करण्यालाही लागू होऊ शकतात. त्यामुळे हे वचन दुष्ट योजना आखणाऱ्या व्यक्तीलाही लागू होऊ शकतं. अशा कामामुळे त्याचा द्वेष केला जातो.
२६ मे-१ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १५
दुसऱ्यांना आनंदी राहायला मदत करा
आपण तर यहोवाप्रती आपली सचोटी टिकवून ठेवू!
१६ ईयोब आतिथ्यशील होता. (ईयो. ३१:३१, ३२) आपण श्रीमंत नसलो तरीही आपण इतरांचे “आतिथ्य” करू शकतो. (रोम. १२:१३) “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनात द्वेष वागविणे, यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी” हे लक्षात ठेवून आपण इतरांना साध्याशा जेवणाचे आमंत्रण देऊ शकतो. (नीति. १५:१७) आपल्याप्रमाणे सचोटी राखणाऱ्यांसोबत प्रेमळ वातावरणात साध्याशा जेवणाचा आस्वाद घेणे खरोखरच अतिशय सुखावह व उभारणीकारक असू शकते.
टेहळणी बुरूज१८.०४ २३-२४ ¶१६-१८
एकमेकांना प्रोत्साहन द्या—खासकरून आता
१६ इतरांबद्दल असलेल्या भावना व्यक्त करणं तुम्हाला कठीण जातं का? खरं पाहिलं तर इतरांना प्रोत्साहन देणं खूप अवघड नाही. यासाठी सुरुवात म्हणून तुम्ही इतरांना पाहून स्मितहास्य करू शकता. जर इतरांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिली नाही, तर याचा अर्थ कदाचित ते एखाद्या समस्येतून जात आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. अशा प्रसंगी तुम्ही त्यांचं धीराने ऐकून त्यांना सांत्वन देऊ शकता.—याको. १:१९.
१७ हेनरी नावाचा तरुण बांधव खूप निराश होता. त्याच्या बऱ्याच जवळच्या नातेवाइकांनी यहोवाची सेवा करणं सोडून दिलं होतं. यात त्याचे बाबादेखील होते, जे मंडळीत वडील म्हणून सेवा करायचे. एकदा विभागीय पर्यवेक्षकाने पाहिलं की हेनरी खूप निराश आहे. म्हणून मग ते त्याला बाहेर कॉफी प्यायला घेऊन गेले. हेनरीने त्यांच्यासमोर आपलं मन मोकळं केलं आणि त्यांनीही त्याचं शांतपणे ऐकून घेतलं. हेनरीला जाणीव झाली की आपल्या कुटुंबाला सत्यात परत येण्यासाठी मदत करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्वतः यहोवाला विश्वासू राहणं. स्तोत्र ४६, सफन्या ३:१७ आणि मार्क १०:२९, ३० ही वचनं वाचल्यामुळे हेनरीला खूप सांत्वन मिळालं.
१८ मारथा आणि हेनरी यांच्या उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो? आपल्यापैकी प्रत्येक जण गरज असलेल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देऊ शकतो. शलमोन राजाने म्हटलं: “समयोचित बोल किती उत्तम! नेत्रांचे तेज अंतःकरणाला उल्लासवते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.” (नीति. १५:२३, ३०) मंडळीत अशी एखादी व्यक्ती आहे का जी निराश आहे? तिला मदत करण्यासाठी तुम्ही टेहळणी बुरूज मधला किंवा मग आपल्या वेबसाईटवरचा एखादा लेख वाचून दाखवू शकता का? अशा गोष्टी कदाचित आपल्याला फार छोट्या वाटतील, पण त्या करूनही आपण एखाद्याला प्रोत्साहन देऊ शकतो. तसंच, पौलने आपल्याला सांगितलं आहे की सोबत मिळून राज्य गीत गायल्यामुळेही आपण इतरांना प्रोत्साहन देऊ शकतो. त्याने म्हटलं: “स्तुतिगीते गाऊन, देवाचे गुणगान करून आणि कृतज्ञ अंतःकरणाने उपासनेची गीते गाऊन एकमेकांना शिकवत राहा व प्रोत्साहन देत राहा आणि आपल्या हृदयात यहोवासाठी गीते गा.”—कलस्सै. ३:१६; प्रे. कार्ये १६:२५
आध्यात्मिक रत्नं शोधा
बायबल प्रश्नांची उत्तरं-E ३९ ¶३
ख्रिस्ती व्यक्ती वैद्यकीय उपचार घेऊ शकतो का?
२. मी आणखी दोन-तीन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का? “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे” मदत होऊ शकते; खासकरून तुमची तब्येत जास्त नाजूक असेल तर.—नीतिवचनं १५:२२.
२-८ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १६
चांगले निर्णय घेण्यासाठी तीन प्रश्न
टेहळणी बुरूज१४ १/१५ १९-२० ¶११-१२
तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या
११ यहोवाची सेवा केल्याने आपल्याला सर्वात जास्त आनंद होतो. (नीति. १६:२०) पण, यिर्मयाचा सचिव बारूख ही गोष्ट विसरला असे दिसते. त्याच्या जीवनात अशी एक वेळ आली जेव्हा त्याला यहोवाच्या सेवेत आनंद मिळत नव्हता. यहोवाने त्याला असे सांगितले: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करतोस काय? ती करू नको, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, . . . पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.” (यिर्म. ४५:३, ५) तुम्हाला काय वाटते? बारूखला कशामुळे आनंद मिळाला असता, मोठ्या-मोठ्या गोष्टी मिळवल्याने की देवाचा विश्वासू सेवक या नात्याने जेरूसलेमच्या नाशातून बचावल्याने?—याको. १:१२.
१२ इतरांची सेवा केल्यामुळे ज्याला आनंद मिळाला असा एक बांधव म्हणजे रामीरो. तो म्हणतो: “मी अँडीज पर्वतरांगांमध्ये असलेल्या एका खेड्यातील गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झालो. मी विद्यापीठात जाऊन शिक्षण घ्यावं अशी माझ्या थोरल्या भावाची इच्छा होती. आणि तो माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यास तयार होता. ही माझ्याकरता एक मोठी संधी होती. पण, एक यहोवाचा साक्षीदार म्हणून मी नुकताच बाप्तिस्मा घेतला होता आणि माझ्यापुढे आणखी एक संधी आली होती. एका पायनियर बांधवानं मला एका लहानशा गावात येऊन राहण्याचं व त्याच्यासोबत प्रचार कार्य करण्याचं आमंत्रण दिलं. मी त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि आर्थिक रीत्या स्वतःचा सांभाळ करण्यासाठी केस कापण्याचं शिकून घेतलं व न्हाव्याचं दुकान सुरू केलं. तिथले बरेच लोक बायबलचा अभ्यास करायला आनंदानं तयार झाले.” नंतर, या ठिकाणी स्थानिक भाषेची एक मंडळी सुरू करण्यात आली. म्हणून त्याने या मंडळीसोबत सहवास करण्याचे ठरवले आणि मागील दहा वर्षांपासून तो येथे सेवा करत आहे. तो म्हणतो, की लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबलचा अभ्यास करण्यास मदत केल्यामुळे जो आनंद मिळतो तो आणखी कोणत्याही कामातून मिळू शकणार नाही.
तुमचे रूपांतर झाले आहे का?
आपल्या लहानपणाच्या अनुभवांचा तसेच आपल्या भोवतालच्या वातावरणाचा आपल्यावर खोल प्रभाव पडतो. आपण विशिष्ट प्रकारचे कपडे घालतो; विशिष्ट खाद्यपदार्थ आपल्याला आवडतात; किंवा आपण विशिष्ट प्रकारे वागतो व बोलतो. असे का? कारण आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा, तसेच आपल्या जीवनातील परिस्थितींचा कळत-नकळत आपल्यावर प्रभाव पडत असतो.
२ पण आपल्याला कोणते खाद्यपदार्थ किंवा कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात यापेक्षा कितीतरी पटीने जास्त महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, लहानपणापासूनच काही गोष्टी योग्य तर काही गोष्टी अयोग्य असे आपल्याला शिकवले जाते. पण योग्य काय आणि अयोग्य काय याविषयी वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असतात. तसेच, आपण जीवनात जे निर्णय घेतो त्यांवर आपल्या विवेकबुद्धीचाही प्रभाव पडतो. बायबलमध्ये सांगितले आहे की बऱ्याचदा, “ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय . . . नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करत असतात.” (रोम. २:१४) पण कधीकधी, एखाद्या गोष्टीबद्दल देवाचा कोणताही सुस्पष्ट नियम नसतो. अशा वेळी, आपण आपल्या कुटुंबात शिकवण्यात आल्याप्रमाणे किंवा आपल्या राहत्या परिसरात सर्व जण वागतात त्याप्रमाणे वागावे का?
३ पण खरे ख्रिस्ती केवळ कुटुंबाच्या शिकवणीप्रमाणे किंवा इतर सर्वांच्या वागणुकीप्रमाणे वागत नाहीत. यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे बायबल आपल्याला अशी आठवण करून देते: “मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.” (नीति. १६:२५) आपण अपरिपूर्ण मानव असल्यामुळे, कोणता मार्ग आपल्याकरता सर्वात हिताचा आहे हे आपल्याला नेहमीच अचूकपणे ठरवता येत नाही. (नीति. २८:२६; यिर्म. १०:२३) दुसरे कारण म्हणजे, बायबल आपल्याला सांगते की सैतान या युगाचे दैवत असल्यामुळे या जगातील चालीरीतींवर त्याचा पगडा आहे. (२ करिंथ. ४:४; १ योहा. ५:१९) त्यामुळे, जर आपल्याला यहोवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि त्याचे मन आनंदित करायचे असेल, तर आपण रोमकर १२:२ (वाचा.) यातील सल्ल्याचे पालन केले पाहिजे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ ६२९
शिस्त, शिक्षा
स्वीकारल्याचे आणि दुर्लक्ष केल्याचे परिणाम. दुष्ट किंवा मूर्ख लोक यहोवाकडून मिळणारी शिस्त पूर्णपणे नाकारतात. (स्तो ५०:१६, १७; नीत १:७) यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. कधीकधी तर यामुळे त्यांना जास्त शिस्त लावली जाते किंवा शिक्षाही मिळते. शिस्त नाकारल्यामुळे गरिबी, अपमान, आजारपण, इतकंच काय तर अकाली मृत्यूचाही सामना करावा लागू शकतो. इस्राएली लोकांच्या बाबतीतही असंच घडलं. संदेष्ट्यांकडून मिळणारी शिस्त नाकारल्यामुळे त्यांनी यहोवाचे आशीर्वाद आणि संरक्षण गमावलं. शेवटी, इतर राष्ट्रांनी त्यांच्यावर हल्ला करून कब्जा मिळवला आणि भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे त्यांना बंदिवासात नेण्यात आलं.—यिर्म २:३०; ५:३; ७:२८; १७:२३; ३२:३३; होशे ७:१२-१६; १०:१०; सफ ३:२.
९-१५ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १७
विवाहात शांती अनुभवा
सावध राहा!-HI १०/१४ ९ ¶२
नाराज़गी कैसे दूर करें
ईमानदारी से खुद की जाँच कीजिए। बाइबल इस बात को मानती है कि कुछ लोग ‘क्रोध करनेवाले’ और कुछ ‘अत्यन्त क्रोध करनेवाले’ होते हैं। (नीतिवचन २९:२२) क्या आपका स्वभाव भी कुछ ऐसा है? अगर हाँ, तो खुद से पूछिए: ‘क्या मैं अकसर कड़वाहट पालता हूँ? मुझे कितनी जल्दी गुस्सा आता है? क्या मैं बात-बात पर राई का पहाड़ बना देता हूँ?’ बाइबल कहती है, “जो [व्यक्ति] बात की चर्चा बार बार करता है, वह परम मित्रों में भी फूट करा देता है।” (नीतिवचन १७:९; सभोपदेशक ७:९) यही सिद्धांत शादीशुदा ज़िंदगी में भी लागू होता है। इसलिए नाराज़गी पालना अगर आपकी आदत है, तो खुद से पूछिए, ‘क्या मैं अपने जीवन-साथी के साथ थोड़ा और सब्र से पेश आ सकता हूँ?’—बाइबल सिद्धांत: १ पतरस ४:८.
टेहळणी बुरूज०८ ७/१ १० ¶६-११ ¶१
समस्या सोडवणे
१. समस्येची चर्चा करण्यासाठी निश्चित वेळ ठरवा. “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ७) या लेखाच्या सुरुवातीला पतीपत्नीत चाललेल्या वादाचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा वादांमुळे, पतीपत्नी कदाचित एकमेकांचा पाणउतारा करतील. असे झाल्यास, वाद आणखी चिघळण्याआधी स्वतःवर ताबा ठेवा अर्थात ‘मौन धरा.’ “कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्याने तुमचा नातेसंबंध आणखी बिघडणार नाही.—नीतिसूत्रे १७:१४.
पण जसा मौन धरण्याचा समय तसा ‘बोलण्याचाही समय’ असतो. पतीपत्नीत समस्या उद्भवतात तेव्हा त्या वेळीच सोडवणे उत्तम; त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या जंगली गवताप्रमाणे भराभर वाढत राहतील. तुमच्यात समस्या निर्माण झाली असेल तर ती लगेच सोडवा; आज ना उद्या ती ठीक होईल, असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. वाद आणखी चिघळण्याधी तुम्ही जर तो मध्येच थांबवत असाल, तर वातावरण निवळल्यानंतर त्या समस्येवर चर्चा करण्यासाठी वेळ ठरवून आपल्या सोबत्याला आदर दाखवा. असे करण्याचे वचन दिल्याने तुम्हा दोघांनाही, “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्यास सोपे जाईल. (इफिसकर ४:२६) अर्थात, दिलेले वचन तुम्ही पाळले पाहिजे.
आध्यात्मिक रत्नं शोधा
नीतिसूत्रे पुस्तकातील ठळक मुद्दे
महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ज्याचे डोळे व मन इकडे तिकडे भरकटते अशा ‘मूर्खासारखे’ होण्याऐवजी आपण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुबुद्धीने वागता येईल.
१६-२२ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १८
आरोग्याची समस्या असलेल्यांना प्रोत्साहन द्या
खरी बुद्धी मोठ्याने हाक मारत आहे
१७ बोलण्याआधी विचार करा. आपण विचार न करता बोललो तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. बायबल म्हणतं: “विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे असतात, पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.” (नीति. १२:१८) आपण इतरांच्या चुकांची चहाडी करायचं टाळलं तर आपल्यातली शांती टिकून राहील. (नीति. २०:१९) आपल्या शब्दांनी इतरांची मनं दुखावली जाऊ नये तर त्यांना सांत्वन मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण खरी बुद्धी मिळवली पाहिजे. त्यासाठी आपण रोज बायबल वाचलं पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. (लूक ६:४५) आपण जर असं केलं, तर आपले शब्द इतरांना तजेला देणाऱ्या ‘बुद्धीच्या झऱ्यासारखे’ असतील.—नीति. १८:४.
आणखी विषय, लेख १९ चौकट
अचानक आजारी पडल्यावर काय करायचं
लक्ष देऊन ऐका. आपल्या मित्राला मदत करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे, त्याला बोलायचं असतं तेव्हा त्याचं लक्ष देऊन ऐकणं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायलाच हवं असं गरजेचं नाही; कधीकधी फक्त ऐकणं पुरेसं असतं. खुल्या मनाने विचार करा आणि मत बनवायचं टाळा. आपला मित्र कदाचित असाच विचार करत असेल असा अंदाज बांधू नका; खासकरून त्याच्या आजारपणाची काही लक्षणं दिसत नसतील तर.—नीतिवचनं ११:२.
सकारात्मक बोला. अशा वेळी काय बोलायचं हे कदाचित तुम्हाला कळणार नाही. पण गप्प राहण्यापेक्षा सांत्वन देणारे काही शब्द बोलले तरी पुरेसे आहेत. जर तुम्हाला काय बोलायचं हे सुचत नसलं तर मोजक्याच पण मनापासून बोललेल्या शब्दांमुळे त्याला खूप सांत्वन मिळू शकतं. जसं की, “तुला नेमकं काय होतंय हे मला जरी नीट समजत नसलं, तरी मला तुझी खरंच खूप काळजी आहे.” पण अशा वेळी काही गोष्टी बोलायचं टाळा. जसं की, “यापेक्षा वाईट झालं असतं!” किंवा “बरंय बाबा, कमीतकमी तुला . . . तर नाही झालं ना!”
तुमच्या मित्राच्या आजारपणाबद्दल तुम्ही त्याची चौकशी करू शकता. यामुळे तुम्हाला त्याची काळजी आहे हे दिसून येईल. त्याला होणारा त्रास तुम्ही समजून घेताय हे त्याला कळेल तेव्हा त्याला तुमच्याबद्दल खूप कदर वाटेल. तुम्ही त्याच्याशी मनापासून बोलताय हे दिसून येईल. (नीतिवचनं १८:१३) पण लक्षात असू द्या, त्याने विचारल्याशिवाय त्याला सल्ले देऊ नका.
व्यावहारिक मदत करा. कशी मदत करायची असा अंदाज बांधू नका. त्याऐवजी तुमच्या मित्राला काय मदत हवी आहे ते विचारा. पण दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास होईल म्हणून तो कदाचित मदत मागणार नाही. जर असं असेल, तर तुम्ही कोणत्या व्यावहारिक मार्गांनी त्याला मदत करू शकता हे सांगा. जसं की, बाजारातून काही आणून देणं, साफसफाई करणं किंवा इतर काही कामं करणं.—गलतीकर ६:२
हार मानू नका. तुमच्या मित्रासोबत तुम्ही काही गोष्टी करायच्या कदाचित ठरवल्या असतील. पण कधीकधी त्याच्या आजारपणामुळे तो त्या गोष्टींसाठी ‘नाही‘ म्हणेल. किंवा त्याला तुमच्याशी बोलावंसं वाटणार नाही. कदाचित आजारपणामुळे त्याला असं वाटू शकतं. त्यामुळे त्याची परिस्थिती समजून घ्या. तसंच, धीराने वागून त्याला लागणारी मदत पुरवत राहा.—नीतिवचनं १८:२४.
टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती२३.१ १४ ¶३-१५ ¶१
मानसिक आजाराचा सामना करणाऱ्यांना आपण कशी मदत करू शकतो?
“सांत्वन करा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१४.
तुमचा मित्र किंवा मैत्रिण कदाचित चिंतेशी झगडत असेल किंवा त्यांना कमीपणाची भावना सतावत असेल. अशा वेळी त्यांना काय बोलावं हे जरी कळत नसलं, तरी तुम्हाला त्यांची काळजी वाटते याची त्यांना खात्री करून द्या. त्यामुळे त्यांना हायसं वाटेल आणि उभारी मिळेल.
“खरा मित्र नेहमी प्रेम करतो.”—नीतिवचनं १७:१७.
वेगवेगळ्या मार्गांनी मदत करा. त्यांना कशी मदत हवी आहे याचा अंदाज बांधण्याऐवजी त्यांना विचारा. तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ते सांगायला अवघड जात असेल, तर काही गोष्टी सोबत मिळून करण्यासाठी तुम्ही त्यांना सुचवू शकता. मग ते सोबत मिळून फेरफटका मारायला जाणं असो, घराची स्वच्छता किंवा इतर कामं करणं असो.—गलतीकर ६:२.
“सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१४.
कधीकधी तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला बोलावंसं वाटणार नाही. पण त्यांना जेव्हा बोलावंसं वाटेल तेव्हा त्यांचं ऐकायला तुम्ही नेहमी तयार असाल हे त्यांना सांगा. लक्षात असू द्या, की मानसिक आजारामुळे ते असं काहीतरी बोलतील किंवा करतील ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. जसं की तुम्ही काहीतरी करायचं ठरवलं असेल आणि ते अचानक तुम्हाला नाही म्हणतील किंवा तुमच्यावर चिडतील. अशा वेळी त्यांना मदत करत असताना त्यांच्याशी सहनशीलतेने वागा आणि त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा.—नीतिवचनं १८:२४.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ २७१-२७२
चिठ्ठ्या
पूर्वीच्या काळी, निर्णय घेण्यासाठी छोटे-छोटे दगड, लाकडाचे तुकडे किंवा दगडी पाट्यांचे तुकडे वापरले जायचे. ते एखाद्या कापडात किंवा भांड्यात टाकून हालवले जायचे. आणि जो तुकडा बाहेर पडायचा किंवा काढला जायचा तो निवडला जायचा. हे सहसा प्रार्थना करून केलं जायचं. (यहो १४:२; स्तो १६:५; १२५:३; यश ५७:६; यिर्म १३:२५) प्राचीन इस्राएलमध्ये वाद सोडवण्यासाठी खासकरून चिठ्ठ्या टाकल्या जायच्या.—नीत १८:१८; १६:३३.
२३-२९ जून
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं १९
भाऊबहिणींचे खरे मित्र बना
टेहळणी बुरूज२३.११ ११-१२ ¶१६-१७
एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो?
१६ आपल्या भाऊबहिणींच्या कमतरतांवर नाही, तर त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष द्या. यासाठी एक उदाहरण घ्या. कल्पना करा, की तुम्ही भाऊबहिणींसोबत एकत्र वेळ घालवत आहात. तुम्ही छान वेळ घालवता आणि शेवटी काही फोटोपण घेता. आणि एखादा फोटो खराब आला तर तुमच्याकडे निदान चांगले फोटो असावेत म्हणून तुम्ही एक नाही तर दोन-तीन फोटो घेता. आता समजा तुमच्याकडे तीन फोटो आहेत. पण त्यांतल्या एका फोटोमध्ये एका भावाचा फोटो चांगला आलेला नाही. मग त्या फोटोचं तुम्ही काय कराल? तुम्ही तो फोटो नक्कीच डिलीट कराल, कारण बाकीच्या दोन फोटो चांगले आहेत आणि सगळ्यांचेच चेहरे हसरे आहेत.
१७ या फोटोची तुलना आपण आपल्या आठवणींशी करू शकतो. आपल्याजवळ सहसा भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्याच्या चांगल्या आठवणी असतात. पण समजा अशाच एखाद्या प्रसंगी एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी बोललं किंवा केलं, तर अशा वाईट आठवणींचं तुम्ही काय कराल? जो फोटो चांगला आला नाही, त्याला आपण फोनमधून काढून टाकतो. तसंच या वाईट आठवणींना आपण आपल्या मनातून काढून टाकू नये का? (नीति. १९:११; इफिस. ४:३२) आपण या वाईट आठवणी मनातून काढून टाकू शकतो. कारण त्या भावासोबत किंवा बहिणीसोबत आपल्या बऱ्याच चांगल्या आठवणीही आहेत. त्या आठवणी आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि आपण त्यांना जपून ठेवलं पाहिजे.
तुमचं प्रेम वाढवत राहा!
१० आपणसुद्धा वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या भाऊबहिणींची मदत करायचा प्रयत्न केला पाहिजे. (इब्री १३:१६) आधीच्या लेखात उल्लेख केलेल्या ॲनाचंच उदाहरण घ्या. एका भयंकर वादळानंतर ती आणि तिचे पती एका साक्षीदार कुटुंबाला भेटायला गेले होते. त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराचं छत पडलं होतं. आणि त्यामुळे त्या घरातल्या लोकांचे सगळे कपडे खराब झाले होते. ॲना म्हणते, “आम्ही त्यांचे कपडे आणले, स्वच्छ धुतले आणि इस्त्री करून, घडी घालून त्यांना परत दिले. ही खरंतर छोटीशीच गोष्ट होती. पण यामुळे आमची त्यांच्याशी चांगली मैत्री झाली. आणि ती आजपर्यंत टिकून आहे.” ॲना आणि तिच्या पतीचं भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळेच, ते व्यावहारिक मार्गाने त्यांना मदत करायला पुढे आले.—१ योहा. ३:१७, १८.
११ आपण जेव्हा इतरांशी दयाळूपणे आणि प्रेमळपणे वागतो, तेव्हा त्यांना दिसून येतं की आपण यहोवाचं अनुकरण करायचा प्रयत्न करत आहोत. आपण त्यांच्यासाठी जे करतो, त्या गोष्टीची त्यांना किती कदर आहे, हे आपल्या कदाचित लक्षातही येणार नाही. आधी उल्लेख केलेल्या कहन नावाच्या बहिणीला ज्यांनी मदत केली होती, त्यांच्याबद्दल आठवून ती असं म्हणते, “ज्या बहिणी मला प्रचारात घेऊन जायच्या, त्यांचे मी खरंच खूप आभार मानते. त्या मला घ्यायला यायच्या, नाष्ट्यासाठी, जेवणासाठी बोलवायच्या आणि पुन्हा घरी आणून सोडायच्या. त्या माझ्यासाठी किती मेहनत घेत होत्या, ते आता मला समजतं. आणि माझ्यावर असलेल्या प्रेमामुळेच त्यांनी हे केलं.” हे खरंय की आपण ज्यांची मदत करतो, ते सगळेच आपले आभार मानणार नाहीत. पण कहनला ज्यांनी मदत केली, त्यांच्याबद्दल ती म्हणते, “त्यांनी मला जो दयाळूपणा दाखवला, त्याची परतफेड मी करावी असं मला खूप वाटतं. पण आता सध्या त्या सगळ्या कुठे राहतात, हे मला माहीत नाही. पण यहोवाला ते माहीत आहे. आणि त्याने त्यांची परतफेड करावी अशी मी त्याला प्रार्थना करते.” या बहिणीचं म्हणणं अगदी खरंय. आपण एखाद्याला छोटीशी मदत जरी केली, तरी यहोवा ती पाहतो. आपण इतरांना जी मदत करतो, तिला तो एक मौल्यवान अर्पण समजतो. आपण जणू यहोवाला उसनं दिलंय असं तो समजतो. आणि त्याची तो नक्की परतफेड करेल.—नीतिवचनं १९:१७ वाचा.
एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा
६ माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमाचं एक उदाहरण आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. एकदा पौल आणि त्याच्यासोबत असलेले लोक जहाजातून प्रवास करत होते. अचानक समुद्रात मोठं वादळ आलं आणि त्यांचं जहाज मिलिता नावाच्या बेटाजवळ येऊन फुटलं. पौल आणि त्याच्यासोबतचे लोक कसेबसे मिलिता बेटावर येऊन पोहोचले. त्या वेळी बेटावरच्या लोकांनी त्यांना मदत केली. खरंतर, बेटावरचे ते लोक पौलला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना ओळखत नव्हते. त्यांच्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. पण तरीही त्यांनी पौलला आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना मदत केली. आणि बायबल म्हणतं, की त्यांनी त्यांना “खूप दया” दाखवली. (प्रे. कार्य. २८:२, ७) पौल आणि त्याच्यासोबतच्या लोकांचं जहाज फुटलं होतं, दुर्घटना झाली होती. म्हणून, फक्त माणुसकीच्या नात्याने बेटावरच्या लोकांनी त्यांना प्रेम दाखवलं होतं. त्यामुळे त्याला एकनिष्ठ प्रेम म्हणता येणार नाही.
७ एकनिष्ठ प्रेम हे माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमापेक्षा वेगळं कसं आहे? त्यासाठी बायबलमध्ये ज्यांनी एकनिष्ठ प्रेम दाखवलं, त्यांनी ते का दाखवलं यावर विचार करू या. त्यांनी ते फक्त करावं लागतं म्हणून किंवा फक्त कर्तव्य म्हणून केलं नाही, तर मनापासून इच्छा असल्यामुळे केलं. दावीदचाच विचार करा. योनाथानचे वडील दावीदला मारून टाकायचा प्रयत्न करत होते. पण तरी दावीदने आपल्या प्रिय मित्रावर, योनाथानवर एकनिष्ठ प्रेम केलं. योनाथान आपला मित्र आहे म्हणून फक्त कर्तव्यापोटी दावीदने त्याच्यावर प्रेम केलं नाही, तर योनाथानवर त्याचं मनापासून प्रेम होतं म्हणून त्याने ते केलं. नंतर योनाथानचा मृत्यू झाला त्याच्या कित्येक वर्षांनंतरसुद्धा दावीद त्याच्या मुलाला, म्हणजे मफीबोशेथला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला.—१ शमु. २०:९, १४, १५; २ शमु. ४:४; ८:१५; ९:१, ६, ७.
आध्यात्मिक रत्नं शोधा
तरुणांनो तुम्ही आनंदी व्हावं अशी निर्माणकर्त्याची इच्छा आहे
१ तरुणांनो, भविष्यासाठी तुम्हाला कदाचित अनेक सल्ले मिळतील. तुम्हाला कदाचित शिक्षक, सल्लागार किंवा इतर जण म्हणतील की भरपूर पैसा कमवण्यासाठी उच्च शिक्षण किंवा चांगलं करियर करणं गरजेचं आहे. पण यहोवा तुम्हाला खूप वेगळा सल्ला देतो. त्याला वाटतं की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही अभ्यासात मेहनत घ्यावी. (कलस्सै. ३:२३) पण त्याला हेही माहीत आहे की तरुण असताना तुम्हाला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि या निर्णयांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होईल. म्हणूनच तुमचं मार्गदर्शन करण्यासाठी तो तुम्हाला तत्त्वं देतो. या तत्त्वांमुळे तुम्हाला शेवटच्या काळात त्याच्या मर्जीनुसार जीवन जगायला मदत होईल.—मत्त. २४:१४.
२ यहोवाला सर्वकाही माहीत आहे हे लक्षात असू द्या. जसं की, भविष्यात कोणत्या गोष्टी घडणार आहेत आणि या व्यवस्थेचा शेवट किती जवळ आहे. (यश. ४६:१०; मत्त. २४:३, ३६) तसंच, यहोवाला तुमच्याबद्दलही माहीत आहे. कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद होतो आणि कोणत्या गोष्टीमुळे दुःख होतं हेदेखील तो जाणतो. मानवांनी दिलेले सल्ले आपल्याला चांगले वाटू शकतात. पण जर ते देवाच्या वचनावर आधारित नसले तर ते सुज्ञ नसतात.—नीति. १९:२१.
३० जून–६ जुलै
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं नीतिवचनं २०
डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?
डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?
३ डेटींगचा काळ जरी आनंदाचा असला, तरी तो तितकाच गंभीरसुद्धा आहे. कारण त्यामुळे एक मुलगा आणि मुलगी लग्न करायचं, की नाही या गोष्टीविषयी निर्णय घेतात. लग्नाच्या दिवशी हे जोडपं यहोवासमोर अशी शपथ घेतं, की जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ते एकमेकांवर प्रेम करतील आणि एकमेकांचा आदर करतील. आणि अशा प्रकारची कोणतीही शपथ घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. (नीतिवचनं २०:२५ वाचा.) डेटींगमुळे एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेता येतं आणि योग्य निर्णय घेता येतो. डेटींग करणारे एकतर लग्न करायचा निर्णय घेतील किंवा डेटींग (कोर्टशिप) तिथेच थांबवायचा निर्णय घेतील. मुलाने आणि मुलीने डेटींग तिथेच थांबवायचा (ब्रेकअपचा) निर्णय घेतला, तर डेटींग यशस्वी झाली नाही असं म्हणता येणार नाही. उलट डेटींगचा हेतू साध्य झाला असं म्हणता येईल. कारण यामुळे त्या दोघांना एक चांगला निर्णय घ्यायला मदत झाली.
४ डेटींगबद्दल योग्य दृष्टिकोन असणं का गरजेचं आहे? जर एखाद्या अविवाहित मुलाचा किंवा मुलीचा डेटींगबद्दल योग्य दृष्टिकोन असेल, तर ते अशा व्यक्तीसोबत डेटींग करणार नाहीत ज्यांच्याशी त्यांना लग्न करायचं नाही. पण डेटींगबद्दल फक्त अविवाहित मुलाने किंवा मुलीनेच योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं नाही. आपण सगळ्यांनीच योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ, काही जण असा विचार करतात, की जो मुलगा किंवा मुलगी डेटींग करत आहेत त्यांनी लग्न केलंच पाहिजे. पण अशा दृष्टिकोनामुळे एखाद्या अविवाहित भावावर किंवा बहिणीवर कसा परिणाम होऊ शकतो? अमेरिकेत राहणारी मेलिसा नावाची एक अविवाहित बहीण म्हणते: “डेटींग करणाऱ्या भाऊबहिणींनी लग्न करावंच असा दबाव इतर जण त्यांच्यावर टाकत असतात. त्यामुळे डेटींग करणारे काही भाऊबहीण त्यांचं एकमेकांशी जरी जुळत नसलं तरी डेटींग करत राहतात. तसंच असेही काही जण आहेत जे लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी डेटींग करायचंच टाळतात. अशा प्रकारचा दबाव इतरांकडून असल्यामुळे त्यांना खूप तणावातून जावं लागतं.”
योग्य विवाह जोडीदार कसा शोधायचा?
८ एखाद्या व्यक्तीला समजू न देता तुम्ही तिच्याबद्दल माहिती कशी काढू शकता? त्यासाठी तुम्ही मंडळीच्या सभांमध्ये किंवा सोबत वेळ घालवण्यासाठी भाऊबहीण एकत्र येतात, तेव्हा त्या व्यक्तीची आध्यात्मिकता, तिचं व्यक्तिमत्त्व आणि इतरांसोबतचं तिचं वागणं-बोलणं या गोष्टींचं तुम्ही परीक्षण करू शकता. तसंच त्या व्यक्तीचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत? ती नेहमी कोणत्या गोष्टींबद्दल बोलत असते? (लूक ६:४५) तिची आणि तुमची ध्येयं सारखीच आहेत का? या गोष्टींविषयीसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. यासोबतच, त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या एखाद्या वडिलांना किंवा अनुभवी भावाला किंवा बहिणीला तुम्ही तिच्याबद्दल विचारू शकता. (नीति. २०:१८) तसंच मंडळीत त्या व्यक्तीचं नावं कसं आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे, हेसुद्धा तुम्ही विचारू शकता. (रूथ २:११) पण हे सगळं करत असताना सतत तिच्या अवतीभोवती राहून तिच्याविषयी सगळं काही जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका. म्हणजे अशी कोणतीही गोष्ट करू नका, ज्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटेल.
डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?
७ एखादी व्यक्ती आतून कशी आहे हे तुम्ही कसं समजून घेऊ शकता? यासाठी चांगला मार्ग म्हणजे त्या व्यक्तीसोबत मन मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलणं. त्यासाठी तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकता आणि जेव्हा ती बोलते तेव्हा तिचं लक्ष देऊन ऐकू शकता. (नीति. २०:५; याको. १:१९) हे करण्यासाठी तुम्ही अशा काही गोष्टी सोबत मिळून करू शकता, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत बोलता येईल. जसं की, एकत्र जेवणं, सार्वजनिक ठिकाणी फिरायला जाणं किंवा प्रचार करणं. तसंच तुम्ही मित्रांसोबत आणि घरच्यांसोबत वेळ घालवतानाही एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकता. त्यासोबतच अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे ती व्यक्ती वेगवेगळ्या लोकांसोबत आणि परिस्थितींमध्ये कशी वागते हे तुम्हाला समजेल. नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या अश्विनने काय केलं याचा विचार करा. आलिशासोबत डेटींग करताना त्याने काय केलं याबद्दल तो म्हणतो: “आम्ही अशा गोष्टी करायचा प्रयत्न केला, ज्यांमुळे आम्हाला एकमेकांना जाणून घेता आलं. त्यासाठी आम्ही सोबत मिळून जेवण बनवलं आणि घरची इतर कामं केली. या सगळ्या साध्याशाच गोष्टी होत्या. पण त्या करत असताना आम्हाला एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी आणि कमतरतासुद्धा समजून आल्या.”
८ आध्यात्मिक विषयांवर सोबत मिळून चर्चा केल्यामुळेसुद्धा तुम्ही एकमेकांबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकता. जर तुमचं लग्न झालं, तर यहोवाची उपासना तुमच्या विवाहात एक महत्त्वाचा भाग असावा म्हणून तुम्हाला कौटुंबिक उपासनेसाठी वेळ काढावाच लागेल. (उप. ४:१२) मग डेटींग सुरू असतानाच सोबत अभ्यास करण्यासाठी वेळ का काढू नये? हे खरंय की डेटींग करणारा भाऊ आणि बहीण अजून एक कुटुंब नाही किंवा तो भाऊ अजून तिचा मस्तक नाही. पण तरीसुद्धा सोबत मिळून नियमितपणे अभ्यास केल्यामुळे एकमेकांचं यहोवासोबतचं नातं कसं आहे, हे समजायला तुम्हाला मदत होईल. अमेरिकेत राहणाऱ्या मॅक्स आणि लायसाला आणखी एक गोष्ट फायद्याची असल्याचं दिसून आलं. तो म्हणतो: “आम्ही डेटींग, विवाह आणि कौटुंबिक जीवन अशा विषयांवर आपल्या प्रकाशनांमधून डेटींग सुरू असतानाच अभ्यास करायचो. त्यामुळे आम्हाला अशा काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करता आली जे सहसा आम्हाला जमलं नसतं.”
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ १९६ ¶७
दिवा
“माणसाचा श्वास” किंवा त्याच्या शब्दांवरून त्याचं खरं व्यक्तिमत्त्व कळतं. तो आतून नेमका कसा आहे यावर ते प्रकाश टाकतं.—प्रेका ९:१ सोबत तुलना करा.