संदेष्ट्यांचं अनुकरण करा—हबक्कूक
१. आपल्यालाही संदेष्टा हबक्कूकसारखं का वाटू शकतं?
१ या जगातील दुष्टतेचा सामना करत असताना आपल्यालाही संदेष्टा हबक्कूकसारखं वाटू शकतं. तो यहोवाला म्हणाला होता: “लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.” (हब. १:३; २ तीम. ३:१, १३) आज आपणसुद्धा यहोवाच्या न्यायाच्या दिवसाची वाट पाहत आहोत. हबक्कूकचा संदेश आणि विश्वासूपणा यांवर मनन केल्यानं, आपल्याला या दुष्ट जगात त्या दिवसापर्यंत टिकून राहण्यासाठी मदत मिळेल.—२ पेत्र ३:७.
२. आज आपण विश्वासानं जगत आहोत हे आपल्या जीवनातून कसं दाखवू शकतो?
२ विश्वासानं जगा: दुष्ट परिस्थितीचा सामना करताना हबक्कूक कधीच दुःखात बुडून गेला नाही; याउलट त्यानं वेळेचं भान ठेवलं आणि देवाच्या सेवेत आवेशी राहिला. (हब. २:१) यहोवा देवानं त्याला आश्वासन दिलं, की त्यानं दिलेलं वचन योग्य वेळी पूर्ण होईल आणि धार्मिक “आपल्या विश्वासाने वाचेल.” (हब. २:२-४) आज आपणसुद्धा अंताच्या अगदी जवळ आहोत तेव्हा आपल्यासाठी देवाच्या या वचनाचा काय अर्थ होतो? अंत कधी येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा तो नक्की येईल असा भरवसा असणं गरजेचं आहे. याच विश्वासामुळं आपण सेवाकार्याला जीवनात प्रथम स्थान देऊ आणि आपल्यालादेखील वेळेचं भान आहे हे दाखवू.—इब्री १०:३८, ३९.
३. यहोवाच्या सेवेतला आनंद आपण का टिकवून ठेवला पाहिजे?
३ यहोवाच्या सेवेत आनंदी राहा: मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करेल तेव्हा आपल्या विश्वासाची खरी परीक्षा होईल. (यहे. ३८:२, १०-१२) आपण या युद्धात जिंकणार असलो, तरी युद्ध जिंकणाऱ्यांनादेखील हाल सहन करावे लागतात. कदाचित अन्नाची कमतरता भासेल, आपली संपत्ती नष्ट होईल किंवा आपल्याला हलाखीत दिवस काढावे लागतील. अशा वेळी आपली प्रतिक्रिया काय असेल? हबक्कूकला येणाऱ्या संकटांची आधीपासूनच कल्पना होती. म्हणून यहोवाच्या सेवेतील आपला आनंद टिकवण्याचा त्यानं निश्चय केला होता. (हब. ३:१६-१९) “परमेश्वराविषयीचा” आनंद आपल्यालादेखील भविष्यात येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला मदत करेल.—नहे. ८:१०; इब्री १२:२.
४. आपण आज आणि भविष्यातदेखील कोणता आनंद मिळवू शकतो?
४ यहोवा त्याच्या न्यायाच्या दिवशी ज्यांना वाचवेल, त्यांना पुढंही त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी शिकवत राहील. (हब. २:१४) ज्यांचं पुनरुत्थान केलं जाईल त्यांनादेखील यहोवाबद्दल शिकण्याची संधी असेल. मिळेल त्या संधीला आपण यहोवा आणि त्याच्या महान कार्यांबद्दल सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे.—स्तो. ३४:१; ७१:१७.