उद्देश साध्य करणाऱ्या क्षेत्र सेवेच्या सभा
१. क्षेत्र सेवेच्या सभांचा काय उद्देश आहे?
१ प्रचार मोहिमेला निघण्याआधी येशूनं त्याच्या ७० शिष्यांना सूचना दिल्या. (लूक १०:१-११)a प्रचार कामात तुम्ही एकटे नाही आणि पिकाचा धनी यहोवा तुम्हाला मार्गदर्शन देईल, असं सांगून येशूनं त्यांना उत्तेजन दिलं. शिवाय या कामासाठी त्यांना तयार करणाऱ्या काही सूचना देऊन “दोघे दोघे” असं पाठवलं. आज, सेवेत जाण्याआधी घेतल्या जाणाऱ्या सभांचा काहीसा हाच उद्देश आहे. क्षेत्र सेवेच्या या सभांमुळं आपल्याला उत्तेजन मिळतं, सेवेसाठी आपण तयार व संघटित होतो.
२. क्षेत्र सेवेची सभा किती वेळेची असली पाहिजे?
२ क्षेत्र सेवेची सभा १०-१५ मिनिटांची असते. जोड्या लावणं, क्षेत्र नेमणं, प्रार्थना करणं या सर्व गोष्टी या सभेदरम्यान केल्या जातात. पण आता यात जरा फेरबदल करण्यात आला आहे. एप्रिलपासून क्षेत्र सेवेची सभा फक्त ५-७ मिनिटांचीच असेल. आणि, ही सभा मंडळीच्या सभेनंतर असेल, तर ती आणखी कमी वेळाची असली पाहिजे. कारण, मंडळीच्या सभेत शास्त्रवचनांवर बरीच चर्चा झालेली असते. क्षेत्र सेवेच्या सभेची वेळ कमी असेल तर सर्वांना सेवेत जास्त वेळ घालवता येईल. शिवाय, काही पायनियर किंवा प्रचारक क्षेत्र सेवेच्या सभेआधीच त्यांची सेवा सुरू करतात. अशा वेळी, क्षेत्र सेवेच्या सभेमुळं त्यांच्या तासांत जास्त वेळ खंड पडणार नाही.
३. सभा कशा प्रकारे संघटित कराव्यात जेणेकरून जास्तीतजास्त प्रचारकांचा फायदा होईल?
३ प्रचारकांचा जास्तीतजास्त फायदा होईल अशा प्रकारे क्षेत्र सेवेची सभा संघटित करावी. बहुतेक मंडळ्यांमध्ये, क्षेत्र सेवेचे गट एकत्र मिळून एकच सभा घेण्याऐवजी आपापल्या गटानुसार सभा घेतात. यामुळं, प्रचारकांना सभेला तसंच क्षेत्रात जायला सोपं जातं. प्रचारकांच्या जोड्या लगेच लावल्या जाऊ शकतात आणि गट पर्यवेक्षक त्यांच्या गटातील सदस्यांवर लक्ष ठेवू शकतात. मंडळीचा वडील वर्ग स्थानीय परिस्थिती लक्षात घेईल आणि जे योग्य आहे ते ठरवेल. सभेनंतर छोटीशी प्रार्थना केली जाईल. पण त्याआधी गटातील सर्वांना, ते कुणाबरोबर आणि कुठं सेवा करणार आहेत हे माहीत असलं पाहिजे.
४. क्षेत्र सेवेची सभा इतर सभांसारख्याच महत्त्वाच्या का आहेत?
४ मंडळीच्या सभांइतकीच महत्त्वाची: क्षेत्र सेवेच्या सभा, सेवेला जाणाऱ्या बांधवांच्या फायद्यासाठीच आहेत; पण मंडळीतील सर्वच या सभेला कदाचित उपस्थित राहणार नाहीत. याचा अर्थ हा होत नाही, की या सभा मंडळीतील इतर सभांपेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत. इतर सर्व सभांप्रमाणे ही सभादेखील यहोवानं केलेल्या तरतुदींपैकी एक आहे. या सभेतही आपल्याला प्रीती व सत्कर्मे करण्याचं उत्तेजन मिळतं. (इब्री १०:२४, २५) त्यामुळं, क्षेत्र सेवेची सभा घेणाऱ्या बांधवानं, सभेची चांगली तयारी करावी. यहोवाचा आदर होईल आणि उपस्थित असलेल्या सर्वांचा फायदा होईल अशा प्रकारे त्यानं चर्चा करावी. त्यामुळं, क्षेत्र सेवेला जाणाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा.
५. (क) सेवा पर्यवेक्षक क्षेत्र सेवेच्या सभांचं आयोजन कसं करतील? (ख) क्षेत्र सेवेची सभा घेण्यासाठी बहिणीला नेमल्यास तिनं ती सभा कशी घ्यावी? (पृष्ठ ६ वरील लेख पाहा.)
५ सभा घेणाऱ्या बांधवाची तयारी: सभेतील भाग चांगल्या प्रकारे सादर करण्याकरता ती नेमणूक त्याला बऱ्याच दिवसांआधी मिळाली पाहिजे. क्षेत्र सेवा सभा नेमणुकीच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. क्षेत्र सेवेचे गट वेगवेगळे जमतात तेव्हा गट पर्यवेक्षक किंवा त्यांचे साहाय्यक आपापल्या गटाची सभा घेतील. पण, मंडळीत सर्व गटांची एकत्र सभा होते तेव्हा सेवा पर्यवेक्षक कुणालातरी ही सभा घेण्यास नेमतील. काही सेवा पर्यवेक्षक सर्व सभा संचालकांना या नेमणूकांचा आराखडा देतील आणि आराखड्याची एक प्रत मंडळीतील सूचना फलकावर लावतील. सेवा पर्यवेक्षकानं काळजीपूर्वक सभा संचालकांची निवड करावी. कारण सभा घेणाऱ्या बांधवाकडं शिकवण्याचं व संघटन करण्याचं कौशल्य असेल तरच क्षेत्र सेवेची सभा दर्जेदार होईल. आठवड्यातील इतर दिवशी सभा घेण्यासाठी मंडळीतील कोणतेही वडील, सेवा सेवक किंवा बाप्तिस्मा घेतलेले बांधव उपलब्ध नसतील तर सेवा पर्यवेक्षक मंडळीतील एखाद्या बाप्तिस्मा घेतलेल्या सुयोग्य बहिणीला ही सभा घेण्यास सांगतील.—“बहिणीला क्षेत्र सेवेची सभा घ्यावी लागते तेव्हा” हा लेख पाहा.
६. सभा घेणाऱ्या बांधवानं उत्तम प्रकारे तयारी करणं महत्त्वाचं का आहे?
६ ईश्वरशासित सेवा प्रशालेत आपलं भाषण असेल किंवा सेवा सभेत आपला काही भाग असेल तर शेवटल्या मिनिटापर्यंत थांबून, सभेला जात असताना आपण त्याची तयारी करत नाही तर नेमणूक मिळाल्याबरोबर लगेच तयारीला लागतो. क्षेत्र सेवेच्या सभेची नेमणूकदेखील अशीच गांभीर्यानं घेतली जावी. आता ही सभा कमी वेळेची असल्यामुळं, सभेदरम्यान बांधवांना काहीतरी शिकता येईल असा एखादा मुद्दा सांगण्यासाठी व सभा वेळेवर संपवण्यासाठी चांगली तयारी करणं महत्त्वाचं आहे. चांगली तयारी करण्यामध्ये सेवेसाठी आधीच क्षेत्र निवडणंदेखील समाविष्ट आहे.
७. कोणकोणत्या गोष्टींची चर्चा क्षेत्र सेवेच्या सभेदरम्यान केली जाऊ शकते? (पृष्ठ ६ वरील चौकोन पाहा.)
७ कशावर चर्चा करावी: प्रत्येक क्षेत्रातील परिस्थिती वेगळी असल्यामुळं विश्वासू दासानं क्षेत्र सेवेच्या सभेसाठी ठराविक रूपरेषा दिलेली नाही. पण, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकेल ते, “क्षेत्र सेवेच्या सभेत चर्चा करण्याजोगे मुद्दे” या चौकोनात सांगितलं आहे. सहसा ही सभा चर्चेच्या रूपात होते. कधीकधी, चांगली तयारी केलेलं एखादं प्रात्यक्षिक किंवा jw.org या आपल्या वेबसाईटवरील व्हिडिओ दाखवला जाऊ शकतो. क्षेत्र सेवेची सभा घेणाऱ्या बांधवानं सभेची तयारी करताना, त्या दिवशी सेवेत जाणाऱ्यांना कोणत्या मुद्द्यामुळं उत्तेजन मिळेल आणि सेवेत भेटणाऱ्या लोकांशी बोलायला सज्ज करू शकेल यावर विचार करावा.
८. शनिवारी व रविवारी क्षेत्र सेवेच्या सभांमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर चर्चा केल्यानं बांधवांना फायदा होऊ शकतो?
८ शनिवारी बहुतेक प्रचारक टेहळणी बुरूज व सावध राहा! ही नियतकालिकं लोकांना देतात. शनिवारी क्षेत्रात जाणारे बहुतेक जण आठवड्यातल्या इतर दिवशी सेवेत जात नसल्यामुळं, कौटुंबिक अभ्यासादरम्यान त्यांनी तयार केलेली सादरता कदाचित त्यांना आठवणार नाही. म्हणून सभा घेणाऱ्या बांधवानं आपली राज्य सेवा याच्या मागील पानावरील नमुना सादरीकरणाची उजळणी केली तर सभेला आलेल्यांना फायदा होईल. नियतकालिक सादर करताना, एखाद्या स्थानिक बातमीचा, घटनेचा किंवा सुटीचा समावेश करून घरमालकाबरोबर कसं बोलायचं तेही दाखवलं जाऊ शकतं. किंवा, घरमालकानं नियतकालिकं घेतली असतील तर पुन्हा त्याची भेट घेण्यासाठी त्याला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यावरही या सभेत चर्चा केली जाऊ शकते. काही बंधुभगिनी जर आधीच ही नियतकालिकं सेवेत सादर करत असतील तर सभा घेणारा बांधव त्यांना, ती नियतकालिकं कशी सादर केली ते विचारू शकतो. आणि त्यांना आलेले चांगले अनुभवही विचारू शकतो. रविवारच्या क्षेत्र सेवा सभेतदेखील, सभा घेणारा बांधव महिन्याच्या सादरतेचा चर्चेत समावेश करू शकतो. देवाकडून आनंदाची बातमी व देवाचे ऐका ही माहितीपत्रकं आणि बायबल काय शिकवते हे पुस्तक आपण बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी वापरत असल्यामुळं ती कोणत्याही दिवशी सादर करू शकतो. तेव्हा, क्षेत्र सेवेच्या सभेत यांपैकी एखादं प्रकाशन कसं सादर करायचं त्यावरही थोडक्यात चर्चा केली जाऊ शकते.
९. एखाद्या निमंत्रण पत्रिकेची किंवा ट्रॅक्टची मोहीम चालू असेल तर आठवड्याच्या शेवटी घेतल्या जाणाऱ्या सेवा सभेत कशावर चर्चा करता येईल?
९ एखाद्या मोहिमेदरम्यान आठवड्याच्या शेवटी असलेल्या क्षेत्र सेवेच्या सभेत, सभा घेणारा बांधव नवीन नियतकालिकांसोबतच, मोहिमेची निमंत्रण पत्रिका किंवा ट्रॅक्ट कसे सादर करता येईल त्यावर किंवा, घरमालक आवड दाखवतो तेव्हा काय करू शकतो त्यावर चर्चा करू शकतो. अशा मोहिमा किती महत्त्वाच्या आहेत याबद्दलचे अनुभवदेखील तेव्हा सांगितले जाऊ शकतात.
१०, ११. क्षेत्र सेवेच्या सभेचा फायदा व्हावा म्हणून प्रचारकांनीदेखील तयारी करणं महत्त्वाचं का आहे?
१० प्रचारकांची तयारी: प्रचारकदेखील ही सभा उत्तेजनकारक बनवू शकतात. कौटुंबिक उपासनेदरम्यान, सेवेची चांगल्या प्रकारे तयारी केल्यामुळं क्षेत्र सेवेच्या सभेत त्यांना इतरांचा फायदा होईल असे मुद्दे मांडता येतील. चांगली तयारी करण्यामध्ये, क्षेत्र सेवेच्या सभेला येण्याआधी नियतकालिकांचा पुरेसा साठा जवळ ठेवणं समाविष्ट आहे. असं केल्यास सर्व जण वेळेवर सेवेला निघू शकतात.
११ क्षेत्र सेवेची सभा सुरू व्हायच्या आधीच हजर राहणंदेखील महत्त्वाचं आहे. आपण मंडळीच्या सभांना वेळेवर जातोच. पण, क्षेत्र सेवेच्या सभेला उशिरा गेलो तर सभा घेणाऱ्या बांधवाला थोडा त्रास होऊ शकतो. तो कसा? सभा घेणारा बांधव, जोड्या लावण्याआधी अनेक गोष्टी लक्षात घेत असतो. सभेला जर कमी प्रचारक असतील तर तो सर्वांनाच, मागील वेळेस उरलेल्या क्षेत्रात पाठवायचा विचार करत असेल. क्षेत्र जरा लांब असेल तर, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्याबरोबर गाड्या नसलेल्या प्रचारकांना पाठवायचा विचार करत असेल. क्षेत्रात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त असेल तर तो बांधवांना बहिणींसोबत किंवा त्यांच्या आसपास कार्य करण्यास सांगेल. चालायचा त्रास असलेल्या प्रचारकांना तो खालची घरं किंवा कमी पायऱ्या असलेल्या इमारतींमध्ये जायला सांगेल. नवीन प्रचारकांना अनुभवी प्रचारकांबरोबर पाठवेल. हे सर्व तो, सगळे जण क्षेत्र सेवेच्या सभेला लवकर आल्यास करू शकेल. पण प्रचारक जर सभेला उशिरा गेले तर, सभा घेणाऱ्या बांधवाला त्यानं केलेल्या व्यवस्थेमध्ये बदल करावे लागतील. उशिरा आलेल्यांची जोडी कुणाबरोबर लावायची हा प्रश्न त्याला पडेल. एखाद्या वेळेस आपल्याला उशीर होतो. पण उशिरा येण्याची आपल्याला सवयच असेल तर आपण स्वतःला विचारलं पाहिजे, की मी क्षेत्र सेवेच्या सभेला नेहमी उशिरा का येतो? ही सभा मला इतकी महत्त्वाची वाटत नाही म्हणून की माझ्या कामांचं नियोजन मला व्यवस्थित करता येत नाही म्हणून.
१२. तुम्ही जर सेवेच्या बाबतीत स्वतःच व्यवस्था करत असाल तर कोणत्या गोष्टींचा विचार करावा?
१२ क्षेत्र सेवेच्या सभेला येणारे प्रचारक, सभेच्या आधीच त्यांचा सोबती निवडून सेवेत जाण्याची व्यवस्था करू शकतात किंवा सभा घेणारा बांधव त्यांना जोडीदार नेमू शकतो. तुम्ही जर स्वतःच तुमचा जोडीदार निवडत असाल तर प्रत्येक वेळी तुमच्या जवळच्या मित्रांबरोबर सेवा करण्याऐवजी वेगवेगळ्या प्रचारकांबरोबर सेवा करून तुम्ही आपलं मन “विशाल” करू शकता. (२ करिंथ. ६:११-१३) अधूनमधून तुम्ही एखाद्या नवीन प्रचारकासोबत सेवेत जाऊन शिकवण्याच्या कलेत त्याला सुधारणा करण्यास मदत करू शकाल का? (१ करिंथ. १०:२४; १ तीम. ४:१३, १५) सभेदरम्यान दिल्या जाणाऱ्या सूचना, जसे की प्रचार कार्य कुठून सुरू करायचं यांसारख्या सूचना लक्ष देऊन ऐका. सभेत जी व्यवस्था ठरवली जाते ती सभेनंतर बदलायचा प्रयत्न करू नका. लवकरात लवकर क्षेत्रात जायचा प्रयत्न करा.
१३. सर्वांनी काळजीपूर्वक आपापली भूमिका बजावली तर क्षेत्र सेवेच्या सभांचा सर्वांना कोणता फायदा होऊ शकतो?
१३ येशूनं सेवेमध्ये पाठवलेले ७० जण “आनंदाने परत” आले. (लूक १०:१७) प्रचाराला निघण्याआधी येशूनं घेतलेल्या सभेचा त्यांना नक्कीच फायदा झाला. आजही क्षेत्र सेवा सभांचा प्रचारकांना फायदा होऊ शकतो. सर्वांनी काळजीपूर्वक आपापली भूमिका बजावली तर क्षेत्र सेवेच्या सभांमुळं उत्तेजन मिळू शकेल. तसंच “सर्व राष्ट्रांस” साक्ष देण्यास आपण तयार व संघटित होऊ.—मत्त. २४:१४.
a बायबलच्या काही प्राचीन हस्तलिपिंमध्ये “७०” शिष्य म्हटलं आहे तर काहींमध्ये “७२” म्हटलं आहे.
क्षेत्र सेवेच्या सभा मंडळीच्या सभांइतक्याच महत्त्वाच्या आहेत
क्षेत्र सेवेची सभा घेणाऱ्या बांधवानं सभेची तयारी करताना, त्या दिवशी सेवेत जाणाऱ्यांना कोणत्या मुद्द्यामुळं उत्तेजन मिळेल आणि सेवेत भेटणाऱ्या लोकांशी बोलायला सज्ज करू शकेल यावर विचार करावा