सेवाकार्यात jw.org या वेबसाईटचा वापर करा
आपली वेबसाईट, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” सुवार्ता गाजवण्याचे काम सोपे करणारे एक प्रभावशाली साधन आहे. (प्रे. कृत्ये १:८) अनेक घरमालकांना jw.org ही वेबसाईट माहीत नसते. पण, जेव्हा एखादा प्रचारक त्यांना ती दाखवतो तेव्हाच त्यांना त्याबद्दल माहीत होते.
एक प्रवासी पर्यवेक्षक कशा प्रकारे या वेबसाईटचा वापर करतात त्याकडे लक्ष द्या. बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ त्यांनी फोनवर डाऊनलोड करून घेतला आहे आणि जेव्हाजेव्हा संधी मिळते तेव्हातेव्हा ते इतरांना तो दाखवतात. उदाहरणार्थ, घरोघरचे प्रचार कार्य करताना ते घरमालकाला असे म्हणतात: “मी लोकांची भेट घेऊन त्यांना तीन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास मदत करत आहे. जसं की, जगात दुष्टाई का आहे? देव कशा प्रकारे ती नाहीशी करेल? आणि तोपर्यंत आपण तिचा सामना कसा करू शकतो? या व्हिडिओत या प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.” असे म्हटल्यानंतर बांधव थेट तो व्हिडिओ प्ले करतात आणि घरमालकाची प्रतिक्रिया पाहतात. हा व्हिडिओ इतका आकर्षक आहे की लोक सहसा तो संपेपर्यंत पाहतातच. घरमालकाने व्हिडिओ पाहिल्यानंतर बांधव त्यांना म्हणतात: “तुम्ही आताच ऐकलं असेल की बायबल अभ्यासासाठी तुम्ही ऑनलाईन विनंती करू शकता. मी आलोच आहे तर बायबल अभ्यास कसा घेतला जातो ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवू का?” घरमालक तयार असल्यास आनंदाची बातमी या माहितीपत्रकाचा वापर करून बांधव त्यांना अभ्यास कसा घेतला जातो हे दाखवतात. पण, समजा घरमालकाजवळ वेळ नसेल तर बांधव त्यांची पुन्हा भेट घेण्याची व्यवस्था करतात. शिवाय, ते जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात तेव्हा त्यांच्या आसपास बसलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत मैत्रीपूर्ण संभाषण सुरू करतात आणि तिलाही वरीलप्रमाणेच तो व्हिडिओ दाखवतात. तुमच्या बाबतीत काय? तुम्हीही सेवाकार्यात jw.org या वेबसाईटचा वापर करत आहात का?