वेळेचं पालन करण्याची स्वतःला सवय लावा
१. वेळेचं पालन करण्याच्या बाबतीत यहोवानं सर्वोत्कृष्ट उदाहरण कसं मांडलं आहे?
१ यहोवा देव सर्वकाही नेहमीच वेळेवर करतो. जसं की, तो आपल्या सेवकांना “योग्यवेळी” मदत पुरवतो. (इब्री ४:१६, पं.र.भा.) तो आध्यात्मिक अन्नदेखील “यथाकाळी” म्हणजे योग्य वेळी देतो. (मत्त. २४:४५) म्हणून आपण ही खातरी बाळगू शकतो, की त्याचा क्रोधाचा दिवस यायलादेखील “विलंब लागावयाचा नाही.” (हब. २:३) तो वेळेचं पालन करत असल्यामुळं आपल्याला किती फायदा होतो! (स्तो. ७०:५) पण आपण यहोवासारखे परिपूर्ण नाही. त्यामुळं वेळेचं पालन करणं आपल्याला खरोखरच जड जाऊ शकतं. असं असलं तरी आपण वेळेचं पालन का केलं पाहिजे?
२. वेळेचं पालन केल्यानं यहोवाचा गौरव कसा होतो?
२ या शेवटल्या दिवसांत पुष्कळ लोक स्वार्थी व असंयमी आहेत व फार कमी लोक वेळेचं पालन करणारे आहेत. (२ तीम. ३:१-३) त्यामुळं खरे ख्रिस्ती जेव्हा कामाला, कुणाला भेटायला किंवा सभांना वेळेवर जातात तेव्हा इतरांच्या हे लक्षात येतं आणि यहोवा देवाचा गौरव होतो. (१ पेत्र २:१२) पण मग असं होतं का, की नोकरीच्या ठिकाणी आपण आपलं काम सहसा वेळेवर सुरू करतो आणि सभांना, क्षेत्रसेवेला मात्र उशिरा जातो? सुरुवातीचं गीत व प्रार्थना सुरू व्हायच्या आत आपण पोहचतो तेव्हा हे दाखवून देत असतो की आपणही आपल्या स्वर्गातील पित्याप्रमाणं सर्वकाही सुव्यवस्थित रीत्या करतो.—१ करिंथ. १४:३३, ४०.
३. वेळेचं पालन करून आपण इतरांचं हित कसं पाहतो?
३ आपण वेळेचं पालन करतो तेव्हा इतरांचंही हित पाहत असतो. (फिलिप्पै. २:३, ४) जसं की, ख्रिस्ती सभांना तसंच क्षेत्र सेवेच्या सभांना आपण वेळेवर जातो तेव्हा आपण बाकीच्यांचं लक्ष विचलित करत नाही. पण उशिरा जाणं जर आपल्या अंगवळणीच पडलं असेल तर आपण इतरांना असं दाखवत असतो की, आपल्याला त्यांच्या नव्हे तर स्वतःच्या वेळेची जास्त किंमत आहे. वेळेचं पालन करून आपण दाखवून देतो, की आपण भरवशालायक व मेहनती आहोत. आणि लोकांना हेच गुण जास्त आवडतात.
४. तुम्हाला जर नेहमीच उशीर होत असेल तर सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय-काय करू शकता?
४ तुम्हाला जर नेहमीच उशीर होत असेल तर, उशीर का होतो त्याची कारणं शोधून काढा. तुम्हाला पाळता येईल असा एक आराखडा बनवा. यामुळं ठरलेल्या वेळी तुम्हाला कामं करता येतील. (उप. ३:१; फिलिप्पै. १:१०) मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. (१ योहा. ५:१४) देवानं इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रातील सर्वात मोठ्या दोन आज्ञा म्हणजे देवावर आणि शेजाऱ्यांवर प्रेम करणं. तर, वेळेचं पालन करून आपण देवाच्या या दोन मोठ्या आज्ञांबद्दल कदर दाखवू या.—मत्त. २२:३७-३९.