तुम्ही संधीचा फायदा घ्याल का? स्मारकविधीच्या वेळी कृतज्ञता दाखवण्याची संधी
१. स्मारकविधीच्या वेळी आपल्याला कोणती खास संधी मिळेल?
१ यहोवाने आपल्यासाठी जे काही केले त्याबद्दल कृतज्ञता वाढवण्याची व ती दाखवण्याची खास संधी १४ एप्रिल रोजी होणाऱ्या स्मारकविधीच्या वेळी आपल्याला मिळेल. कृतज्ञतेबद्दल यहोवाला आणि येशूला कसे वाटते ते लूक १७:११-१८ मधील वृत्तान्तातून दिसून येते. दुःखाची गोष्ट म्हणजे या वृत्तान्तात सांगितलेल्या १० कुष्ठरोग्यांपैकी फक्त एकाने कृतज्ञता व्यक्त करण्याच्या संधीचा फायदा घेतला. खंडणीच्या तरतुदीमुळे भविष्यात सर्व रोगराईचे समूळ उच्चाटन केले जाईल आणि लोक सदासर्वकाळ जीवन जगू शकतील! अशा सर्व आशीर्वादांसाठी नवीन जगात तुम्ही दररोज यहोवाचे आभार मानाल यात शंका नाही. पण, येणाऱ्या आठवड्यांत आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो?
२. खंडणीच्या तरतुदीबद्दल आपण कृतज्ञता कशी वाढवू शकतो?
२ कृतज्ञता वाढवा: एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात आपोआप कृतज्ञता जागी होत नसते. ती जागी करण्यासाठी त्या गोष्टीबद्दल विचार करावा लागतो. खंडणीच्या तरतुदीबद्दल आपली कृतज्ञता वाढवण्यासाठी स्मारकविधीच्या खास बायबल वाचनाचा आराखडा ठिकठिकाणी देण्यात आला आहे. जसे की, कॅलेंडरमध्ये आणि शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करा या पुस्तिकेमध्ये. स्मारकविधीचे हे खास बायबल वाचन आपण आपल्या कुटुंबासोबत करू शकतो. असे केल्यामुळे खंडणीच्या तरतुदीबद्दल आपली कदर आणखी वाढेल. आणि याचा आपल्या आचरणावर चांगला परिणाम घडून येईल.—२ करिंथ. ५:१४, १५; १ योहा. ४:११.
३. स्मारकविधीच्या वेळी आपण कोणकोणत्या मार्गांनी कृतज्ञता दाखवू शकतो?
३ कृतज्ञता दाखवा: कृतज्ञतेची भावना कार्यांतून दाखवली जाते. (कलस्सै. ३:१५) ज्या कुष्ठरोग्याला मनापासून कृतज्ञता वाटली त्याने येशूला शोधून त्याचे आभार मानण्याची तसदी घेतली. शिवाय, आपल्याला चमत्कारिक रीत्या कसे बरे करण्यात आले त्याबद्दलही तो इतरांशी भरभरून बोलला यात शंका नाही. (लूक ६:४५) लोकांना स्मारकविधीचे आमंत्रण देण्यासाठी आयोजित केलेल्या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेऊन तुम्हीदेखील खंडणीच्या तरतुदीबद्दल कृतज्ञता दाखवू शकता का? कृतज्ञता दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्मारकविधीच्या काळात साहाय्यक पायनियर सेवा करणे किंवा सेवाकार्यातील आपला सहभाग वाढवणे. तसेच, स्मारकविधीसाठी आलेल्या लोकांचे स्वागत करण्याद्वारे व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याद्वारेदेखील आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
४. कृतज्ञता दाखवण्याची खास संधी आपल्या हातून जाऊ नये म्हणून आपण काय करू शकतो?
४ हा आपला शेवटला स्मारकविधी असेल का? (१ करिंथ. ११:२६) सांगता येत नाही. पण, एक मात्र आपण सांगू शकतो. ते म्हणजे, एकदा का हा स्मारकविधी उलटून गेला की कृतज्ञता दाखवण्याची खास संधी आपल्या हातून जाईल. तर मग, या संधीचा तुम्ही फायदा घ्याल का? यहोवाने मोठ्या उदारपणे आपल्यासाठी खंडणीची तरतूद केली आहे. तेव्हा, आपल्या आभारपूर्वक शब्दांनी व विचारांनी आपण त्याचे मन आनंदित करू या.—स्तो. १९:१४.