मैत्रीपूर्ण संभाषणे अंतःकरणापर्यंत पोहचू शकतात
१ संभाषणाची व्याख्या, “विचारांची तोंडी देवाणघेवाण” अशी केली जाऊ शकते. इतरांना चिंतित करणाऱ्या विषयांवर मैत्रीपूर्ण संभाषण सुरू केल्यामुळे त्यांच्यात आवड निर्माण होऊ शकते आणि यामुळे राज्याचा संदेश त्यांच्या हृदयापर्यंत पोहचवण्यास आपल्याला मदत मिळू शकते. अनुभवावरून दिसून आले आहे, की थेट सुवार्ता सांगण्यापेक्षा मैत्रीपूर्ण आणि निवांतपणे केलेल्या संभाषणामुळे अधिक चांगले परिणाम घडून येतात.
२ मैत्रीपूर्ण संभाषणाची सुरुवात कशी करावी? इतरांशी संभाषण करण्याचा अर्थ लक्षवेधक विचार किंवा शास्त्रवचने मांडणे असा होत नाही; तर निव्वळ समोरच्या व्यक्तीला संभाषणात गोवून घेणे असा होतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या शेजाऱ्याशी मैत्रीपूर्ण संभाषण करतो तेव्हा त्याच्याशी अनौपचारिक पद्धतीने बोलत नाही, तर अगदी सहजपणे बोलतो. पुढे काय बोलायचे याचा आपण विचार करत नाही, तर तो जे बोलतो त्याला आपण सहजपणे प्रतिसाद देतो. त्याचे बोलणे आपण लक्षपूर्वक ऐकले तर तो पुढेही संभाषण चालू ठेवू शकतो. इतरांना साक्ष देताना आपण असेच बोलले पाहिजे.
३ मैत्रीपूर्ण संभाषण सुरू करण्यासाठी आपण निरनिराळ्या विषयांवर बोलू शकतो. उदाहरणार्थ हिंसा, तरुणांसमोर असलेल्या समस्या, स्थानिक समस्या, जगातील परिस्थिती किंवा हवामान. लोकांच्या जीवनाशी संबंधित विषयांवर बोलल्यामुळे त्यांची आस्था जागृत होण्याची जास्त शक्यता असते. अशा प्रकारे संभाषण सुरू केल्यानंतर आपण हळूहळू ते राज्याच्या संदेशाकडे वळवू शकतो.
४ निवांतपणे संभाषण करण्याचा अर्थ पूर्वतयारी करण्याची गरज नाही असा होत नाही. त्यासाठी तयारी केलीच पाहिजे. पण, एक विशिष्ट रूपरेषा तयार करण्याची किंवा सुवार्ता तोंडपाठ करण्याची गरज नाही; कारण आपण जर असे केले तर आपले संभाषण समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीशी जुळणारे नसेल. (१ करिंथकर ९:२०-२३ पडताळून पाहा.) तयारी करण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे ज्यांवर तुम्हाला संभाषण सुरू करता येईल असे एकदोन बायबल आधारित विषय निवडणे.
५ मैत्रीपूर्ण संभाषण सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले गुण: इतरांशी बोलताना आपण अगदी प्रेमळपणे व मनापासून बोलले पाहिजे. हसरा व आनंदी चेहरा आपल्याला हे गुण दाखवण्यास मदत करतील. आपण जो संदेश सांगतो तो जगातील सर्वात उत्तम संदेश आहे; नम्र अंतःकरणाच्या लोकांना तो सहज भावतो. लोकांना एक चांगला संदेश सांगण्याच्या इच्छेमुळे आपण त्यांच्याबद्दल आस्था दाखवतो हे जर त्यांना जाणवले तर ते आपला संदेश ऐकण्यास प्रवृत्त होतील.—२ करिंथ. २:१७.
६ संभाषण सुरू करणे हा एक आनंददायक अनुभव असला पाहिजे. म्हणून, आपण राज्याचा संदेश अगदी प्रेमळपणे व विचारपूर्वक सादर केला पाहिजे. (गलती. ५:२२; कलस्सै. ४:६) व्यक्तीच्या मनावर सकारात्मक प्रभाव पडेल अशा पद्धतीने संभाषण संपवा. असे केल्यामुळे, आपण सुरुवातीला जरी तिच्या मनापर्यंत पोहचू शकलो नाही तरी पुढच्या वेळी एखादा साक्षीदार तिला भेटला तर ती त्याचे बोलणे कदाचित अधिक चांगल्या प्रकारे ऐकून घेईल.
७ एखादा गुंतागुंतीचा विषय कुशलतेने सादर केल्याने मैत्रीपूर्ण संभाषण शक्य होत नाही. मैत्रीपूर्ण संभाषणासाठी केवळ एक गोष्ट करणे गरजेचे आहे. ती म्हणजे, एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची चिंता वाटते त्याबद्दल तिची आस्था जागृत करणे. आपण जर पूर्वतयारी केली तर लोकांशी मैत्रीपूर्ण संभाषण करण्यास आपण तयार असू. तर मग, आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांना सर्वात उत्तम संदेश अर्थात सार्वकालिक राज्याच्या आशीर्वादांचा संदेश सांगून त्यांच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करू या.—२ पेत्र ३:१३.