तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी आपल्या वेबसाईटचा उपयोग करा
१. आपल्या वेबसाईटवर मुलांसाठी असलेल्या साधनांमुळे काय शक्य होते?
१ आपली वेबसाईट, jw.org सर्व वयोगटाच्या लोकांना विचारात घेऊन तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर “प्रकाशने” या टॅबखाली लहान मुलांसाठी अनेक साधने दिलेली आहेत. या साधनांमुळे मुलांना आणि त्यांच्या पालकांना एकमेकांच्या व यहोवाच्या जवळ येणे शक्य होते. (अनु. ६:६, ७) मुलांना देवाविषयीचे शिक्षण देण्यासाठी तुम्ही आपल्या या वेबसाईटचा उपयोग कसा करू शकता?
२. मुलांचे वय विचारात घेऊन त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही उचित साधनाची निवड कशी करू शकता?
२ उचित साधनाची निवड करा: सगळीच मुले सारखी नसतात. (१ करिंथ. १३:११) तर मग, तुमच्या मुलांचे वय विचारात घेऊन त्यांना शिकवण्यासाठी तुम्ही उचित साधनाची निवड कशी करू शकता? स्वतःला विचारा: ‘माझ्या मुलांना सगळ्यात जास्त काय आवडेल? त्यांना ते कितपत समजेल? ती किती वेळ लक्ष केंद्रित करू शकतात?’ तीन किंवा त्यांहून कमी वय असलेल्या मुलांना तुम्ही आपल्या वेबसाईटवर (प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके पाहा) असलेल्या बायबल कथा पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रे दाखवून त्यांना गोष्टी सांगू शकता. काही कुटुंबे वेबसाईटवर (प्रकाशने > नियतकालिके पाहा) असलेल्या टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्तीमधील “आपल्या मुलांना शिकवा” या सदरात दिलेल्या कथा आपल्या मुलांसोबत वाचतात. यांशिवाय, पुढील साधनेही तुम्ही वापरू शकता.
३. कौटुंबिक उपासनेसाठी कोणती साधने उपयुक्त ठरू शकतात?
३ कौटुंबिक उपासनेसाठी उपयुक्त साधने: आपल्या वेबसाईटवर आणखीनही काही साधने आहेत ज्यांचा उपयोग आईवडील आपल्या कौटुंबिक उपासनेत करू शकतात. ही अशी साधने आहेत जी सर्व वयोगटांतील सदस्यांना उपयुक्त ठरू शकतात. आणि म्हणूनच कौटुंबिक उपासनेत या साधनांचा परिणामकारक रीत्या उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, यहोवाचे स्तवन करू या (प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके पाहा) या गीतपुस्तकातील गाण्यांचा तुम्ही आपल्या कौटुंबिक उपासनेत सराव करू शकता. तसेच, वेबसाईटवर (प्रकाशने > बायबल उताऱ्यांचे नाट्यवाचन पाहा) बायबल उताऱ्यांची नाट्यवाचने दिली आहेत; तीही तुम्ही कुटुंब मिळून ऐकू शकता.
४. आपल्या वेबसाईटवर मुलांसाठी आणखी कोणते साधन आहे?
४ मुलांसाठी असलेले व्हिडिओ: तुमच्या चिमुरड्यांच्या मनावर देवाचे वचन बिंबवण्यासाठी वेबसाईटवर (प्रकाशने > व्हिडिओ) खासकरून मुलांसाठी असलेल्या व्हिडिओंचासुद्धा परिणामकारकपणे उपयोग केला जाऊ शकतो. (अनु. ३१:१२) कार्टूनच्या रूपात असलेल्या प्रत्येक व्हिडिओत मुलांसाठी एक महत्त्वाचा धडा आहे. तसेच, यातील एका व्हिडिओत असलेले गाणेही मुलांना गायला आवडेल. गाण्यांतून शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात राहतात. तेव्हा, आपल्या मुलांना शिकवण्यासाठी या गाण्याचा चांगला उपयोग करा.
५. मुलांना सत्य शिकवण्यास मदत करता यावी म्हणून पालकांनी यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे?
५ पालकांनो, तुम्ही यशस्वी आईवडील बनावेत अशी यहोवाची इच्छा आहे. तेव्हा, तुमच्या मुलांना सत्य शिकवण्यास त्याने तुम्हाला मदत करावी म्हणून प्रार्थना करा. (शास्ते १३:८) यहोवाच्या मदतीने, तुम्ही नक्कीच तुमच्या मुलांना “तारणासाठी ज्ञानी” बनण्यास मदत करू शकाल.—२ तीम. ३:१५; नीति. ४:१-४.