तीन दिवसांचा आध्यात्मिक तजेला
१. या वर्षाच्या अधिवेशनामधून आपण काय मिळण्याची आशा करू शकतो?
१ आध्यात्मिक अर्थाने होरपळून गेलेल्या सैतानाच्या या जगात, यहोवा त्याच्या सेवकांना तजेला देत आहे. (यश. ५८:११) आपल्याला तरतरीत ठेवण्यासाठी यहोवाची एक योजना म्हणजे आपले प्रांतीय अधिवेशन. या वर्षाचे अधिवेशन जसजसे जवळ येते तसतसे आपण आध्यात्मिक तजेला मिळवण्यासाठी आणि इतरांना तो तजेला देण्यासाठी कसे तयार होऊ शकतो?—नीति. २१:५.
२. आपण कोणती तयारी करण्याची गरज आहे?
२ आतापर्यंत जर तुम्ही तयारी केली नसेल तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामाचे व नोकरीचे नियोजन करा जेणेकरून तुम्ही तिन्ही दिवस अधिवेशनाला उपस्थित राहू शकाल. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी कार्यक्रम सुरू होण्याआधी वेळेवर पोहचण्यास तुम्हाला किती वेळ लागेल याचा तुम्ही विचार केला आहे का? तरतरी आणण्यासाठी यहोवाने योजलेले आध्यात्मिक अन्न आपल्यापैकी कोणालाही चुकवावेसे वाटणार नाही. (यश. ६५:१३, १४) तुमची राहण्याची आणि प्रवासाची सोय झालेली आहे का?
३. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कार्यक्रमातून पुरेपूर फायदे मिळण्यासाठी कोणत्या सूचना मदतदायी ठरतील?
३ लक्ष देऊन कार्यक्रम ऐकण्याकरता तुम्ही काय करू शकता? शक्य असल्यास, अधिवेशनाच्या प्रत्येक रात्री पुरेपूर झोप घ्या. वक्त्यावर आपली नजर ठेवा. सांगितलेले प्रत्येक वचन तुमच्या बायबलमध्ये उघडून पाहा. थोडक्यात नोंदी घ्या. कुटुंबांनी एकत्र बसावे जेणेकरून आईवडील त्यांच्या मुलांना कार्यक्रमावर लक्ष देण्यास मदत करू शकतात. (नीति. २९:१५) संध्याकाळी कदाचित तुम्ही कार्यक्रमातील ठळक मुद्द्यांवर चर्चा करू शकता. अधिवेशनानंतरही तुमच्या कुटुंबाला तजेला मिळावा म्हणून कौटुंबिक उपासना संध्याकाळी तुम्ही कुटुंबाला लागू होणाऱ्या विशेष मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ काढू शकता.
४. आपल्या मंडळीत इतरांना आध्यात्मिक तजेला मिळण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो?
४ दुसऱ्यांना तजेला मिळवण्यास मदत करा: इतरांनाही आध्यात्मिक तजेला मिळावा अशी आपली इच्छा आहे. मंडळीमध्ये वृद्ध प्रचारक किंवा असे कोणी दुसरे आहेत का ज्यांना अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मदतीची गरज आहे? तुम्ही त्यांना मदत करू शकता का? (१ योहा. ३:१७, १८) वडिलांनी, खासकरून गट पर्यवेक्षकाने अशा प्रचारकांना मदत मिळत आहे का ते पाहिले पाहिजे.
५. अधिवेशनाच्या वेळी आपण निमंत्रण पत्रिकांचे वाटप कसे करू शकतो? (पृष्ठ ५ वरील चौकोन पाहा.)
५ मागच्या वेळेप्रमाणे, आताही आपण अधिवेशन सुरू होण्याच्या तीन आठवड्यांआधी, अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे इतरांना निमंत्रण देण्याच्या मोहिमेत भाग घेणार आहोत. सर्व मंडळ्यांनी, त्यांना दिलेल्या निमंत्रण पत्रिकांचा साठा वाटण्याचे आणि होता होईल तितके क्षेत्र पूर्ण करण्याचे ध्येय ठेवावे. एखादे क्षेत्र संवेदनशील असल्यास, घरमालकाला निमंत्रण पत्रिका देण्याआधी, त्याला खरोखरच आवड आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. जर तुमच्या कुटुंबाच्या निमंत्रण पत्रिका शिल्लक राहिल्या असतील तर त्या अधिवेशनाला येताना सोबत घेऊन या जेणेकरून अनौपचारिक कार्य करताना त्या तुमच्या उपयोगी पडतील. याबद्दलची जास्त माहिती शुक्रवारच्या कार्यक्रमात दिली जाईल. ज्या शहरात अधिवेशन होत आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि तुमचे कुटुंब निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करणार नसाल तर त्या तुम्ही अटेंडंटला द्याव्यात. पण स्वतःसाठी एक प्रत ठेवा कारण रविवारच्या शेवटच्या भाषणादरम्यान तुम्हाला ती लागेल.
६. अधिवेशनादरम्यान आपण सभ्य आचरण कसे दाखवू शकतो?
६ तजेला देणारे सभ्य आचरण: आजच्या जगात बहुतेक लोक “स्वार्थी” आहेत आणि ते इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. पण, सभ्य आचरण दाखवणाऱ्या बांधवांच्या सहवासात राहणे किती तजेलादायक आहे! (२ तीम. ३:२) अधिवेशन हॉलचे दार ८:०० वाजता उघडले जाते तेव्हा आपण शांतपणे आणि व्यवस्थित रीत्या आत जाऊन व आपल्या घरात राहणाऱ्यांसाठी, आपल्या सोबत कारमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी व आपण ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करत आहोत अशा आपल्या बायबल विद्यार्थ्यांसाठीच फक्त जागा धरून सभ्य आचरण दाखवतो. चेअरमन जेव्हा आपापल्या जागेवर बसून कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणारे संगीत ऐकण्याची आपल्याला सूचना देतात तेव्हा आपण ती पाळतो. कार्यक्रम सुरू असताना इतरांचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून आपले मोबाईल बंद केल्यानेही आपले चांगले आचरण दिसून येते. कार्यक्रमादरम्यान, कोणाशीही विनाकारण न बोलण्याने, एसएमएस न करण्याद्वारे, काहीही न खाण्याद्वारे, किंवा गरज नसताना बाहेर न फिरण्याद्वारेदेखील आपण सभ्य आचरण दाखवतो.
७. बांधवांबरोबर संगती करताना आपण स्वतः तजेला कसा मिळवू शकतो व इतरांनाही कसा देऊ शकतो?
७ तजेला देणारी संगती: अधिवेशनांमुळे आपल्याला, तजेलादायक ख्रिस्ती एकतेचा आणि बंधुत्वाचा अनुभव घेण्याची आणखी एक संधी मिळते. (स्तो. १३३:१-३) तर आपण आपली ‘अंतःकरणे विशाल’ करून, इतर मंडळ्यांतून आलेल्या बंधुभगिनींना भेटण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो, नाही का? (२ करिंथ. ६:१३) तुम्ही कदाचित प्रत्येक दिवशी एका नव्या व्यक्तीला किंवा एका नवीन कुटुंबाला भेटण्याचे ठरवू शकता. असे करण्यास दुपारच्या जेवणाची वेळ सोईस्कर ठरू शकेल. जवळपासच्या हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी किंवा तेथे जेवायला जाण्यापेक्षा, अधिवेशनाला येताना आपण आपल्यासोबत हलकेफुलके जेवण आणू शकतो आणि बांधवाशी संगती करू शकतो. यामुळे, आपली नवनवीन मित्रांबरोबर मैत्री होऊ शकते आणि ही मैत्री कायमची टिकू शकते.
८. आपण अधिवेशनामध्ये स्वच्छेने काम का केले पाहिजे आणि ते आपण कसे करू शकतो?
८ आपल्या बांधवांबरोबर देवाची पवित्र सेवा करणे किती तजेलादायक आहे! तुम्ही स्वेच्छेने एखाद्या विभागात किंवा तुमच्या मंडळीला स्वच्छता कार्यामध्ये मदत करू शकता का? (स्तो. ११०:३) जर तुम्हाला आधीपासूनच काही काम नेमून दिलेले नसेल तर अधिवेशनातील स्वयंसेवक सेवा विभागाला, तुमची स्वेच्छेने काम करण्याची तयारी आहे असे तुम्ही सांगू शकता. अनेक जणांनी मिळून काम केल्याने ते काम हलके व आनंददायी होते.
९. अधिवेशनादरम्यान आपण आपल्या आचरणाकडे आणि पेहरावाकडे खासकरून लक्ष का दिले पाहिजे?
९ आपल्या वर्तनामुळे आपले निरीक्षण करणाऱ्यांना तजेला मिळतो: आपण अधिवेशनाला आल्यामुळे केवळ तीन दिवसांच्या कार्यक्रमादरम्यानच आपले आचरण चांगले ठेवत नाही. त्यामुळे, अधिवेशन होणाऱ्या शहरात उपस्थित असताना लोकांना, आपल्यात आणि यहोवाचे साक्षीदार नसलेल्यांमध्ये फरक करता आला पाहिजे. (१ पेत्र २:१२) अधिवेशनात, आपण जेथे उतरलो आहोत तिथे आणि हॉटेलमध्ये जाताना आपला पेहराव शालीन हवा जेणेकरून यहोवाचा गौरव होईल. (१ तीम. २:९, १०) आपण जर बॅज कार्ड लावले तर आपल्याला पाहणारे लोक आपण यहोवाचे साक्षीदार असल्याचे ओळखतील. यामुळे आपल्याला त्यांना अधिवेशनाबद्दल सांगण्याची आणि चांगली साक्ष देण्याची संधी मिळू शकते.
१०. आपल्या अधिवेशनाबद्दल हॉटेल आणि रेस्टोरेंटमधील कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन असावा म्हणून आपण काय करू शकतो?
१० आपण हॉटेलमधील आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांना सहकार्य कसे देऊ शकतो? गरजेपेक्षा जास्त रूम आपण बुक करू नयेत. नाहीतर, अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या इतर बांधवांना रूम मिळणार नाही आणि यात हॉटेलचेही नुकसान होऊ शकते. हॉटेलमध्ये जेव्हा आपण राहायला येतो किंवा हॉटेल सोडून जेव्हा जात असतो तेव्हा जर तिथे कर्मचाऱ्यांची घाई गडबड चालली असेल तर अशा वेळी आपण सहनशीलता दाखवली पाहिजे आणि अदबीने वागले पाहिजे. (कलस्सै. ४:६) आपले सामान उचलणाऱ्या, आपल्या रूमची साफसफाई करणाऱ्या व इतर कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षिसी देण्याची किंवा टिप्स देण्याची प्रथा असेल तर आपण ती दिली पाहिजे.
११. आपल्या ख्रिस्ती आचरणामुळे, चांगली साक्ष मिळाल्याची कोणती उदाहरणे आहेत?
११ आपल्या चांगल्या आचरणाचा इतरांवर कोणता प्रभाव पडतो? एका वृत्तपत्रात आलेल्या एका लेखानुसार, अधिवेशनासाठी वापरल्या गेलेल्या एका हॉलच्या मॅनेजरने सांगितले: “या लोकांचे आचरण खूप सभ्य आहे. प्रत्येक वर्षी त्यांनी याच ठिकाणी यावं यासाठी आम्ही उत्सुक असतो.” अधिवेशनात उपस्थित राहणारे लोक ज्या हॉटेलमध्ये राहत होते तेथे एका साक्षीदार नसलेल्या व्यक्तीचे पाकीट हरवले. जेव्हा ते पाकीट जसेच्या तसे मॅनेजरला देण्यात आले तेव्हा ज्याचे ते पाकीट होते त्याला तो मॅनेजर म्हणाला: “बरं झालं यहोवाच्या साक्षीदारांचं इथंच अधिवेशन असल्यामुळे बहुतेक जण इथं उतरले होते. नाहीतर तुम्हाला तुमचं पाकीट परत मिळालं नसतं.”
१२. अधिवेशन जसजसे जवळ येते तसतसे आपले काय ध्येय असले पाहिजे, आणि का?
१२ या वर्षाची अधिवेशनेही जवळ येत आहेत. अधिवेशनाचा कार्यक्रम आणि तेथील वातावरण तजेलादायक बनवण्याकरता खूप मेहनत घेण्यात आली आणि वेळ खर्च करण्यात आला आहे. तिन्ही दिवस उपस्थित राहण्याचे ध्येय ठेवा, आणि यहोवाने व त्याच्या संघटनेने तुमच्यासाठी जे तयार केले आहे ते घेण्यासाठी तयार असा. सभ्यपणा, आनंदी संगत आणि चांगले आचरण ठेवून इतरांना तजेला देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आणि इतरांना, मागील वर्षी अधिवेशनाला आलेल्या एका स्त्रीप्रमाणे वाटेल. तिने लिहिले: “असा समाधानकारक अनुभव मला पूर्वी कधी आल्याचे आठवत नाही!”
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
मागच्या वेळेप्रमाणे, आताही आपण अधिवेशन सुरू होण्याच्या तीन आठवड्यांआधी, अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्याच्या मोहिमेत भाग घेणार आहोत
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
अधिवेशनात, आपण जेथे उतरलो आहोत तिथे आणि हॉटेलमध्ये जाताना आपला पेहराव शालीन हवा जेणेकरून यहोवाचा गौरव होईल
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
सभ्यपणा, आनंदी संगत आणि चांगले आचरण ठेवून इतरांना तजेला देण्याचा प्रयत्न करा
[४ पानांवरील चौकट]
२०११ च्या प्रांतीय अधिवेशनासाठी लक्षात ठेवायच्या सूचना
◼ कार्यक्रमाची वेळ: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:२० वाजता सुरू होईल. सभागृहाचे दरवाजे सकाळी ८:०० वाजता उघडले जातील. सुरुवातीचे संगीत सुरू होते तेव्हा सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय पद्धतीने होईल. कार्यक्रम, शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी ४:५५ वाजता आणि रविवारी ३:४० वाजता संपेल.
◼ पार्किंग: पार्किंगची जागा सभागृहाच्या व्यवस्थापनाने आपल्या ताब्यात दिली असल्यास, गाड्या जसजशा येतील तसतसे त्यांना पार्किंगसाठी जागा दिली जाईल. पार्किंगची जागा सहसा कमी पडत असल्यामुळे, होईल तितके कारपूलींग (प्रत्येकाने आपापल्या गाड्या आणण्यापेक्षा दुसऱ्याच्या गाडीत जागा असल्यास एकाच गाडीने प्रवास) करावा.
◼ बसण्याची व्यवस्था: तुमच्यासोबत एकाच कारमधून आलेल्या किंवा एकाच घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्यांसाठी तसेच बायबल अभ्यास घेत असलेल्यांसाठीच आसने राखून ठेवली जाऊ शकतात.—१ करिंथ. १३:५.
◼ दुपारचे भोजन: दुपारच्या जेवणासाठी अधिवेशनाचे ठिकाण सोडून बाहेर जाण्याऐवजी कृपया सोबत साधे जेवण आणा. जेवण लहानशा डब्यात आणले तर ते खुर्चीखाली ठेवता येऊ शकेल. जेवणाचे मोठमोठे डब्बे व काचेची भांडी अधिवेशनाच्या ठिकाणी आणण्यास मनाई आहे. अधिवेशन होणाऱ्या ठिकाणी भोजन किंवा अल्पोपहार दिला जाणार नाही.
◼ दान: जगभरात चाललेल्या कार्यासाठी, अधिवेशनात असलेल्या दानपेट्यांमध्ये स्वेच्छेने दान टाकून आपण अधिवेशनाच्या व्यवस्थेकरता कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनात दिलेले चेक “द वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय केले पाहिजे.
◼ अपघात आणि आपत्कालीन प्रसंग: अधिवेशनाच्या ठिकाणी आणीबाणीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाल्यास कृपया जवळच्या अटेंडंटला कळवावे. तो लगेच प्रथमोपचार विभागाशी संपर्क साधेल. मग आमचा प्रशिक्षित वैद्यकीय विभाग परिस्थिती किती गंभीर आहे तिचा अंदाज घेतल्यावर त्यानुसार मदत देईल. गरज पडल्यास, प्रथमोपचार विभाग ॲम्ब्युलन्स बोलवेल. यामुळे, तातडीच्या उपचार विभागाला अनेक जणांकडून फोन कॉल येणार नाहीत.
◼ औषधोपचार: तुम्ही जर गोळ्या-औषधे घेत असाल तर ते सोबत आणा कारण अधिवेशनात ती दिली जाणार नाहीत.
◼ पादत्राणे: उचित पादत्राणे न घातल्यामुळे दर वर्षी अनेक अपघात होतात. अधिवेशनगृहात, पायऱ्यांवरून किंवा जाळी असलेल्या मार्गावर सुरक्षितपणे चालता यावे म्हणून योग्य व आपल्याच मापाची पादत्राणे घालणे उचित असेल.
◼ अत्तरे: बहुतेक अधिवेशने बंद ठिकाणी होत असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने हवा खेळती ठेवण्याची सोय केली जाते. त्यामुळे, अशा ठिकाणी उग्र वासाची अत्तरे, कोलोन व परफ्यूम वापरण्याचे टाळून, ज्यांना श्वसनाचे व श्वसनसंबंधित इतर विकार असल्यामुळे या गोष्टींचा त्रास होतो त्यांच्याप्रती आपण प्रेम दाखवतो.—१ करिंथ. १०:२४.
◼ प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्म्स: अधिवेशनाच्या वेळी आपण अनौपचारिक साक्ष दिल्यानंतर जर कोणी आस्था दाखवली तर त्या व्यक्तीविषयीची माहिती देण्याकरता प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा उपयोग केला पाहिजे. प्रचारकांनी अधिवेशनाला येताना एक किंवा दोन फॉर्म्स सोबत आणावेत. पूर्ण भरलेले फॉर्म एकतर पुस्तक विभागाला दिले जाऊ शकतात किंवा अधिवेशनाहून परतल्यावर तुमच्या मंडळीतल्या सचिवांना दिले जाऊ शकतात.—आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००९, पृ. ३ पाहा.
◼ रेस्टॉरंट: हॉटेल्समध्ये व रेस्टॉरंट्समध्ये गेल्यास, आपल्या उत्तम वागणुकीद्वारे यहोवाच्या नावाला गौरव आणा. अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवेनुसार बक्षिसी देण्याची प्रथा असेल तर ती द्या.
◼ हॉटेल्स:
(१) गरजेपेक्षा अधिक खोल्यांचे कृपया आरक्षण करू नका; आणि जितक्या लोकांना एका खोलीत राहण्याची परवानगी आहे त्यापेक्षा अधिक लोकांना खोलीत राहायला घेऊ नका.
(२) गंभीर परिस्थिती असल्या शिवाय आरक्षण रद्द करू नका आणि रद्द करावे लागलेच तर लवकरात लवकर हॉटेलला कळवा.—मत्त. ५:३७.
(३) तुम्हाला लागेल तेव्हाच सामान वाहण्याची ट्रॉली (लगेज कार्ट) घ्या आणि काम झाल्यावर लगेच परत करा म्हणजे इतरांची गैरसोय होणार नाही.
(४) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका.
(५) हॉटेल कर्मचारी तुमचे सामान उचलून नेत असतील तर त्यांना व हाऊसकीपरला प्रत्येक दिवशी बक्षिसी द्या.
(६) हॉटेलमध्ये पाहुण्यांकरता नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांसारख्या मोफत दिल्या जाणाऱ्या सोयींचा गैरफायदा घेऊ नका. या सोयी फक्त हॉटेलमध्ये राहणाऱ्यांच्याच वापराकरता असतात.
(७) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांशी वागताना सर्ववेळी आत्म्याचे फळ प्रदर्शित करा. त्यांना अनेक पाहुण्यांकडे लक्ष द्यावे लागते. आपण त्यांच्याशी दयाळुपणे, सहनशीलतेने व समजंसपणे वागतो ते त्यांना आवडते.
(८) सुचवलेल्या हॉटेलांच्या यादीत दाखवलेले खोल्यांचे भाडे हे दर दिवसाचे भाडे आहे, पण यात टॅक्सचा समावेश नाही. जर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी, तुम्ही न मागवलेल्या किंवा न वापरलेल्या गोष्टींचे अतिरिक्त पैसे मागितल्यास ते देऊ नका आणि लवकरात लवकर अधिवेशनातील रूमिंग विभागाला याविषयी कळवा.
(९) जर तुमच्या हॉटेलच्या खोलीसंबंधी काही समस्या निर्माण झाली तर रूमिंग विभागाला अधिवेशनात याविषयी सांगा.
(१०) हॉटेलमध्ये रूम बुक करताना तुम्ही जर तुमचे डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करत असाल तर तुमच्या खात्यात, रूम बुकींगसाठी त्याचबरोबर तुम्ही राहत असताना काही आकस्मिक प्रसंगात उपयोगी पडतील यासाठी पुरेसे पैसे असतील याची खात्री करून घ्या. तुम्ही हॉटेलमधून निघून गेल्यावर काही दिवस खात्यातील पैसा उपयोगात आणू शकणार नाही.
◼ स्वयंसेवा विभाग: अधिवेशनात आवश्यक असलेले काम करण्यासाठी स्वेच्छेने पुढे आल्यामुळे, अधिवेशनाला उपस्थित राहिल्याने मिळणारा आनंद द्विगुणित होतो. (प्रे. कृत्ये २०:३५) काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी अधिवेशनातील स्वयंसेवा विभागाशी संपर्क साधावा. वयाने १६ पेक्षा कमी असलेली मुलेदेखील पालकांच्या किंवा पालकांची अनुमती असलेल्या एखाद्या प्रौढ भावाच्या अथवा बहिणीच्या देखरेखीखाली कामाला हातभार लावू शकतात.
[५ पानांवरील चौकट]
तुम्ही निमंत्रण पत्रिका कशी द्याल?
जास्तीत जास्त क्षेत्र पूर्ण करण्यासाठी, आपण थोडक्यात बोलले पाहिजे. आपण असे बोलू शकतो: “नमस्ते. आम्ही, जगभर होत असलेल्या निमंत्रण पत्रिका वाटपाच्या कार्यात भाग घेत आहोत. तुमच्यासाठी ही निमंत्रण पत्रिका. या पत्रिकेत तुम्हाला जास्त माहिती मिळेल.” निमंत्रण पत्रिकेचे मुखपृष्ठ आकर्षक असल्यामुळे ती सरळ घरमालकाच्या हातात अशा प्रकारे द्या जेणेकरून तो ते पहिले पान पाहू शकेल. आवेशी असा. शनिवारी-रविवारी वाटप केले जाते तेव्हा उचित असल्यास, नियतकालिके देणे योग्य राहील.