चांगली वार्ता सांगण्यास मी पात्र आहे का?
१. चांगली वार्ता सांगण्यास आपण पात्र नाही असा विचार आपण का करू नये?
१ तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर चिंता करू नका. शिक्षण किंवा आपल्या खास कौशल्यांमुळे आपण सेवक बनण्यास पात्र ठरत नाही. येशूच्या काही शिष्यांविषयी लोकांनी असे म्हटले, की ते “निरक्षर व अज्ञानी” आहेत. तरीपण, ते सुवार्तेचे प्रभावी प्रचारक बनले कारण त्यांनी येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा ठाम निश्चय केला होता.—प्रे. कृत्ये ४:१३; १ पेत्र २:२१.
२. येशूची शिकवण्याची पद्धत कशी होती?
२ येशूची शिकवण्याची पद्धत: त्याची शिकवण्याची पद्धत सोपी, सामान्य लोकांसाठी व त्यांना समजेल अशी होती. तो विचारत असलेले प्रश्न, तो वापरत असलेली उदाहरणे आणि संभाषण सहजपणे सुरु करण्याची त्याची पद्धत यांमुळे श्रोत्यांचे लक्ष एकाग्र व्हायचे. (मत्त. ६:२६) त्याने लोकांमध्ये खरी आस्था घेतली. (मत्त. १४:१४) शिवाय, तो आत्मविश्वासाने व अधिकार वाणीने बोलत असे. यहोवाने आपल्याला ही कामगिरी दिली आहे व ती पूर्ण करण्यासाठी तोच शक्ती देतो हे त्याला माहीत होते.—लूक ४:१८.
३. आपली सेवा पूर्ण करण्यास यहोवा आपल्याला कोणकोणती मदत पुरवतो?
३ यहोवा आपल्यालाही मदत करतो: आपला महान शिक्षक यहोवा, त्याचे वचन आणि त्याची संघटना यांद्वारे आपल्याला, चांगली वार्ता लोकांना यशस्वीपणे सांगण्यास आवश्यक ते प्रशिक्षण देतो. (यश. ५४:१३) येशूची शिकवण्याची पद्धत कशी होती याबद्दलचा अहवाल जपवून ठेवण्याची यहोवाने खात्री केल्यामुळे आज आपण येशूच्या शिकवण्याच्या पद्धतीचे परीक्षण करून त्याचे अवलंबन करू शकतो. यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो आणि मंडळीच्या सभांद्वारे आपल्याला प्रशिक्षित करतो. (योहा. १४:२६) तसेच, मंडळीत त्याने अनुभवी प्रचारकांची तरतूद केली आहे ज्यांच्याकडून आपण बरेच काही शिकून प्रभावी बनू शकतो.
४. चांगली वार्ता सांगण्यास आपण पात्र आहोत असा विश्वास आपण कोणत्या कारणामुळे बाळगतो?
४ ‘आपल्या अंगची पात्रता देवाकडून आली’ असल्यामुळे चांगली वार्ता सांगण्यास आपण पात्र आहोत असा विश्वास आपण बाळगू शकतो. (२ करिंथ. ३:५) आपण जर यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिलो व त्याच्या प्रेमळ तरतूदींचा विश्वासूपणे व पुरेपूर फायदा घेतला तर आपण “पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज” होऊ.—२ तीम. ३:१७.