“देवाच्या प्रेमात टिकून राहा”
१. “देवाच्या प्रेमात टिकून राहा” हे पुस्तक कोणत्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आले आहे?
१ जानेवारी ४ ने सुरू होणाऱ्या आठवड्यापासून मंडळीच्या बायबल अभ्यासात “देवाच्या प्रेमात टिकून राहा” या पुस्तकाचा अभ्यास करण्यास आपण सर्वच जण खूप उत्सुक आहोत. नियमन मंडळाने यहोवावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उद्देशून लिहिलेल्या पत्राच्या शेवटी असे म्हटले: “हे प्रकाशन तुम्हाला, दररोजच्या जीवनात सत्याने वागल्यामुळे ‘सार्वकालिक जीवनासाठी . . . देवाच्या प्रीतिमध्ये’ राहण्यास मदत करेल, असे आम्हाला मनापासून वाटते.”—यहू. २१.
२. जीवनाच्या कोण कोणत्या क्षेत्रात हे नवीन पुस्तक आपल्याला मदत करेल?
२ या पुस्तकातून आपल्याला काय शिकायला मिळेल: मित्रमैत्रिणींची निवड, मनोरंजन, अधिकाराच्या अधीन राहणे, वैयक्तिक सवयी, विवाह, संभाषण आणि चालीरिती या सर्व बाबतीत आपण बायबलची तत्त्वे कशी लागू करू शकतो? देवाच्या वचनात सांगितलेल्या उच्च धार्मिक दर्जांनुसार कार्य करण्यास आपला विवेक प्रशिक्षित केला जाईल. (स्तो. १९:७, ८) यहोवाच्या मार्गाबद्दल आपली समज जसजशी वाढते तसतशी त्याला आनंदित करण्याची तीव्र इच्छा आपल्यात निर्माण होईल व त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आज्ञाधारक राहण्यास आपण प्रवृत्त होऊ.—नीति. २७:११; १ योहा. ५:३.
३. प्रत्येक आठवड्याच्या बायबल अभ्यासात जास्तीत जास्त उत्तरे देण्याचा आपण सर्वांनी का प्रयत्न केला पाहिजे?
३ उत्तरे देण्याचा निर्धार करा: अभ्यासाची तयारी करत असताना देवाच्या लोकांमध्ये त्याची स्तुती करण्याचे ध्येय ठेवा. (इब्री १३:१५) संपूर्ण मंडळी मिळून या नव्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहे. प्रत्येक आठवडी आपण थोड्या थोड्या भागाचा अभ्यास करणार असल्यामुळे आपल्याला चांगली तयारी करता येईल व शिकलेल्या गोष्टी इतरांना धैर्याने सांगता येतील. आपण चांगल्या प्रकारे तयार केलेल्या व संक्षिप्त उत्तरांमुळे इतरांना प्रीती व सत्कर्मे करावयास मदत मिळेल व अभ्यास उत्साही व अर्थपूर्ण बनेल. (इब्री १०:२४) शिवाय आपण जेव्हा उत्तरांद्वारे आपला विश्वास प्रकट करतो तेव्हा आपलाही आनंद द्विगुणित होईल.
४. यहोवाच्या आज्ञांचे पालन करणे इतके निकडीचे का आहे?
४ येशूने पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या रात्री हे सांगितले की यहोवाच्या प्रेमात टिकून राहण्यासाठी त्याच्या आज्ञांचे पालन करणे गरजेचे आहे. (योहा. १५:१०) ‘देवाचे प्रेम’ या पुस्तकाच्या मदतीने दैनंदिन जीवनात बायबलच्या तत्त्वांना लागू करण्याचा व देवाच्या प्रेमात टिकून राहण्याचा आपला निर्णय पहिल्यापेक्षा अधिक दृढ होईल.—यहू. २१.