तुमचे कुटुंब बचावाची तयारी करत आहे का?
१ या दुष्ट जगाचा अंत फार जवळ आल्याचा खातरीदायक पुरावा, पूर्ण झालेल्या बायबल भविष्यवाणीतून मिळतो. जलप्रलय येण्याआधी जशी परिस्थिती होती अगदी तशाच कठीण काळात आपण जगत आहोत. (मत्त. २४:३७-३९) नोहा ‘देवाबरोबर चालल्यामुळे’ त्या प्राचीन जगाच्या विनाशातून वाचला. (उत्प. ६:९) नोहाने आपल्या कुटुंबाला यहोवाच्या मार्गांविषयीची शिकवण दिल्यामुळेच तेही त्या विनाशातून वाचले. आपण नोहाचे अनुकरण कसे करू शकतो आणि या दुष्ट युगाच्या नाशातून वाचण्याकरता संपूर्ण कुटुंब मिळून तयारी कशी करू शकतो?
२ नीतिमत्त्वाचा उपदेशक: “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणून नोहा सुमारे ४० ते ५० वर्षे टिकून राहिला. (२ पेत्र २:५) नोहाच्या शेजाऱ्यांनी, कदाचित देहधारण केलेल्या बंडखोर देवदूतांच्या प्रभावामुळे की काय तो करत असलेल्या प्रचार कार्यामुळे त्याची थट्टा केली असावी. अनेकदा लोकांना आपला संदेश ऐकून घेण्याची इच्छा नसते आणि ते आपली थट्टा करतात तेव्हा यावरून जगाचा नाश खरोखरच जवळ असल्याचे कळून येते. (२ पेत्र ३:३, ४) फरक इतकाच, की नोहाच्या दिवसांतील अनेक लोकांनी त्याचा संदेश ऐकला नाही. पण आपल्या दिवसांत अनेक लोक राज्य संदेशाला प्रतिसाद देऊन यहोवाची उपासना करण्यासाठी त्याच्या ‘डोंगराकडे लोटत’ आहेत. (यश. २:२) आपण टिकून राहिलो तरच आपण ‘स्वतःचे व आपले ऐकणाऱ्यांचे तारण साधू.’ (१ तीम. ४:१६) यामुळे पालकांनी आपल्या मुलांना, बोलण्याद्वारे व उदाहरणाद्वारे प्रचार कार्य करणे किती गरजेचे आहे, हे शिकवणे महत्त्वाचे आहे.—२ तीमथ्य ४:२.
३ त्याने ‘सांगितल्याप्रमाणे केले’: यहोवाने दिलेल्या मार्गदर्शनाचे काळजीपूर्वक पालन केल्यानेच नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव होणार होता. (उत्प. ६:२२) बायबलमध्ये दिलेल्या व विश्वासू बुद्धिमान दास देत असलेल्या मार्गदर्शनाचे “तत्परतेने पालन” करण्याची तयारी दाखवणे देखील आज तितकेच महत्त्वाचे आहे. (याको. ३:१७, NW) सहा मुलांचे संगोपन केलेल्या एका पित्याने यहोवाच्या संघटनेकडून मिळालेल्या सल्ल्यांचे पालन केले. उदाहरणार्थ, यहोवाच्या संघटनेने सुचवल्याप्रमाणे, तो दर आठवडी आपल्या कुटुंबाचा अभ्यास घेत असे व कुटुंबाला क्षेत्र सेवेसाठी नेत असे. दर आठवडी तो आळीपाळीने आपल्या मुलांना सेवेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असे. जे ‘सांगितले’ होते ते विश्वासूपणे केल्याने त्याच्या मुलांवर चांगलीच छाप पडली. त्याची सहाही मुले मोठी झाल्यावर यहोवाचे विश्वासू सेवक बनले.
४ या युगाचा अंत अचानक होईल. (लूक १२:४०) नोहाचे अनुकरण केल्याने व तारणासाठी आवश्यक असलेला विश्वास प्रदर्शित केल्याने आपण व आपले कुटुंब बचावाकरता नक्कीच तयार असू.—इब्री ११:७.