बायबलमधून वचन केव्हा दाखवायचे व प्रकाशने कधी सादर करायची?
बायबलचा प्रभाव कोट्यवधी लोकांच्या जीवनावर पडला आहे. बायबल हे देवाचे वचन असल्यामुळे, आपण जे काही बोलू त्यापेक्षा बायबलमधील वचन अधिक प्रभावशाली ठरते. (इब्री ४:१२) आपण लोकांना सांगत असलेला संदेश हा आपला नव्हे तर देवाच्या वचनातला आहे, हे त्यांना समजावे अशी आपली इच्छा आहे. ज्या लोकांना ख्रिस्ती लोक आवडत नाहीत अशा लोकांना बायबलबद्दल मात्र आदर असतो. त्यामुळे आपण बायबलचा उपयोग करतो. जे ऐकून घेऊ इच्छितात अशा लोकांना आपण सरळ बायबलमधूनच वचन वाचून दाखवतो.
पण समजा, आपण अशा क्षेत्रात साक्षकार्य करत आहोत जिथे, बायबलमधून आपण सांगत असलेल्या संदेशाचा काही लोक विरोध करतात किंवा आपल्या सेवेत अडथळा आणण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे, तर मग काय? अशा क्षेत्रात साक्षकार्य करताना, घरमालकाला बायबलमधून संदेश ऐकून घेण्याची आवड आहे किंवा नाही, हे ठरवण्याआधीच जर आपण बॅगमधून बायबल काढून त्यातून वचने वाचून दाखवत राहिलो तर आपण जो संदेश सांगायला आलो आहोत तो संदेश त्याच्यापर्यंत पोहचणारच नाही. (मत्त. १०:११) आपल्या हातात बायबल बघताच त्याचा गैरसमज होऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण प्रेषित पौलाचे अनुकरण करू शकतो. अथेनै येथील अरीयपगात पौल जेव्हा ग्रीकांशी बोलत होता तेव्हा त्याने शास्त्रातूनच लगेच बोलायला सुरुवात केली नाही. लोकांना ज्या गोष्टी माहीत होत्या आणि ते ज्या गोष्टी मानत होते त्या गोष्टींचा उल्लेख करून त्याने बुद्धीला पटेल असा तर्क केला आणि त्यांना निर्माणकर्ता व त्याचे उद्देश यांबद्दलचा विचार करण्यास प्रवृत्त केले.—प्रे. कृत्ये १७:२२-३१.
आपणही, घरमालकाच्या एखाद्या आवडीच्या विषयावर संभाषण सुरू करू शकतो. संभाषण सुरू झाल्यावर कुशलतेने ते राज्य संदेशाकडे वळवा. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ‘देवाचा,’ ‘निर्माणकर्त्याचा’ उल्लेख कराल किंवा तुमचा संदेश आध्यात्मिक स्वरूपाचा आहे हे सूचित करणारे शब्द तुम्ही वापरायला सुरुवात कराल तेव्हा घरमालकाची प्रतिक्रिया काय आहे त्याकडे लक्ष द्या. आध्यात्मिक विषयावर चर्चा करायला त्याला आवडेल असे जर तुम्ही ताडले, तर तुम्ही ज्या विषयावर चर्चा करत आहात त्या विषयाशी संबंधित बायबलमधून एखादे वचन दाखवले तर चालेल का, असे तुम्ही त्याला विचारू शकता. पण तुम्हाला जर वाटत असेल, की “बायबल” हा शब्द वापरल्याबरोबर तो कदाचित ऐकण्यास तयार होणार नाही, तर त्याऐवजी तुम्ही “पवित्र पुस्तक,” किंवा “धार्मिक ग्रंथ” असे म्हणू शकता. किंवा तुम्ही, बायबल न उघडता त्यातले एखादे वचन सांगू शकता. कोणत्या गोष्टी बोलू नयेत हे समजण्याकरता व्यवहार कुशलतेची आवश्यकता आहे. (योहा. १६:१२) दुसऱ्या बाजूला पाहता, तुम्हाला जर वाटते, की घरमालकाला बायबलविषयी आदर आहे व तुम्ही त्याला सांगत असलेला संदेश आवडत आहे तर मग आपण बायबल उघडून त्याला वचन दाखवण्यास कचरू नये.—योहा. १०:२७.
घरमालकाला बायबल प्रकाशने देण्याविषयी काय? आपली बायबल आधारित प्रकाशने सर्व काळांना लागू होणारी आणि प्रभावकारी आहेत. ती लोकांमध्ये आवड निर्माण करतात आणि त्यांना राज्याविषयीचे ज्ञान देतात. प्रकाशने देऊन आपण इतरांचे धर्मांतर करत आहोत, असा गैरसमज कदाचित काही लोक करून घेतील म्हणून ती देताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. ज्या लोकांना आपल्या प्रकाशनांची किंमत आहे आणि जे लोक त्यातून फायदा मिळवू पाहतात केवळ अशा लोकांनाच आपण ती देऊ इच्छितो. यास्तव, घरमालकाची मनःस्थिती जाणून घेण्याबाबतीत आपण जागृत असले पाहिजे. जेणेकरून आपण सेवेमध्ये बायबलचा आणि आपल्या बायबल आधारित प्रकाशनांचा प्रभावीपणे उपयोग करू शकतो.—नीति. १:५, ७ख.