वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०८ पृ. ३-४
  • ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला’
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “चल, माझ्यामागे ये”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ४/०८ पृ. ३-४

‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला’

१. आपण सुवार्ता प्रचाराच्या कार्यात परिणामकारक कसे होऊ शकतो?

१ येशूने रब्बींच्या अर्थात यहुदी धर्मगुरुंच्या शाळांमधून शिक्षण घेतले नव्हते. तरीसुद्धा, तो इतिहासातील सर्वात महान सुवार्तिक बनला. येशूच्या सेवाकार्याचा लिखित अहवाल आपल्याकरता जतन करून ठेवण्यात आला आहे याबद्दल आपण कृतज्ञ असू शकतो. जर आपल्यालाही येशूप्रमाणेच सुवार्ता प्रचाराच्या कार्यात परिणामकारक व्हायचे असेल, तर आपण ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले’ पाहिजे.—१ पेत्र २:२१.

२. ख्रिस्ताप्रमाणेच आपल्यालाही लोकांबद्दल मनात प्रेम कसे उत्पन्‍न करता येईल?

२ लोकांबद्दल प्रेम व्यक्‍त करा: येशूचे लोकांवर प्रेम होते. त्यांच्याबद्दल त्याला कळकळ होती. यामुळेच तो त्यांना मदत करण्यास प्रेरित झाला. (मार्क ६:३०-३४) आपल्या प्रचार क्षेत्रातील कित्येक लोक दुःखिकष्टी आहेत. त्यांना सत्याविषयी शिकून घेण्याची अतिशय गरज आहे. (रोम. ८:२२) त्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल तसेच यहोवाचे त्यांच्यावर किती प्रेम आहे व त्याला त्यांची किती काळजी आहे याबद्दल मनन केल्यास, आपल्याला प्रचार कार्य करत राहण्याची प्रेरणा मिळेल. (२ पेत्र ३:९) शिवाय, आपल्याला लोकांबद्दल मनापासून काळजी वाटते हे जर त्यांना जाणवले तर ते देखील आपल्या संदेशाला प्रतिसाद देण्याची जास्त शक्यता आहे.

३. येशूने इतरांना सुवार्ता सांगण्याकरता कोणकोणत्या प्रसंगांचा फायदा घेतला?

३ प्रत्येक संधीचा फायदा घ्या: इतरांना सुवार्ता सांगण्याकरता येशूने प्रत्येक संधीचा फायदा घेतला. (मत्त. ४:२३; ९:९; योहा. ४:७-१०) त्याच प्रकारे, आपणही आपले दैनंदिन व्यवहार करत असताना सत्याविषयी बोलण्यास तयार असले पाहिजे. काही जण कामाच्या ठिकाणी, शाळेत, तसेच प्रवास किंवा खरेदी करताना संधी मिळाल्यास सुवार्ता सांगता यावी म्हणून बायबल आणि थोडे साहित्य हाताशी ठेवतात.

४. आपण देवाच्या राज्याला आपल्या प्रचार कार्याचा मुख्य विषय कसे बनवू शकतो?

४ देवाच्या राज्याकडे लोकांचे लक्ष वेधा: देवाच्या राज्याची सुवार्ता हा येशूच्या प्रचाराचा मुख्य विषय होता. (लूक ४:४३) आपल्या सादरतेत आपण लगेच किंवा थेटपणे देवाच्या राज्याविषयी उल्लेख करणार नसलो, तरीसुद्धा या राज्याची आपल्याला किती गरज आहे याकडे घरमालकाचे लक्ष वेधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण शेवटल्या काळात राहत आहोत हे सिद्ध करण्याकरता कधीकधी आपण जगातल्या वाईट परिस्थितीविषयी उल्लेख करतो. पण असे करतानाही आपण प्रामुख्याने ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगितली’ पाहिजे.—रोम. १०:१५.

५. आपले सेवाकार्य परिणामकारक ठरावे म्हणून आपण बायबलचा कशा प्रकारे उपयोग करू शकतो?

५ देवाच्या वचनावर विसंबून राहा: येशू आपल्या सेवाकार्यात नेहमी शास्त्रवचनांवर विसंबून राहिला. त्याने स्वतःच्या मनाप्रमाणे काहीही शिकवले नाही. (योहा. ७:१६, १८) त्याने देवाचे वचन आत्मसात केले आणि त्यातील तत्त्वे स्वतःच्या परिस्थितीला लागू करून, सैतानाच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी त्यांचा वापर केला. (मत्त. ४:१-४) इतरांना परिणामकारक रीत्या शिकवता यावे, म्हणून आपणही दररोज बायबलचे वाचन केले पाहिजे व त्यातील माहितीचा वैयक्‍तिक जीवनात कसा उपयोग करता येईल यावर विचार केला पाहिजे. (रोम. २:२१) सेवाकार्यात लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देताना आपण जे काही सांगतो त्याकरता बायबलचा आधार घेतला पाहिजे आणि शक्यतो थेट बायबलमधूनच ते वाचून दाखवले पाहिजे. आपण स्वतःची मते नव्हे तर देवाचे विचार सांगत आहोत हे घरमालकाला दिसून यावे अशी आपली इच्छा आहे.

६. येशूने आपल्या श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचण्यासाठी काय केले?

६ शिकवताना मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” (योहा. ७:४६) येशूला अटक न करताच परत येण्याचे कारण शास्त्री व परूशांनी विचारले असता, सैनिकांनी येशूबद्दल वरील उद्‌गार काढले. येशू लोकांना शिकवताना केवळ माहिती देत नसे. तर त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीने तो लोकांच्या मनाचा ठाव घेई. (लूक २४:३२) आपण जे काही सांगत आहोत ते लोकांना सहज रीत्या समजावे म्हणून तो दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत असे. (मत्त. १३:३४) येशूने कधीही आपल्या श्रोत्यांवर एकाच वेळी खूप जास्त माहितीचे ओझे लादले नाही. (योहा. १६:१२) त्याने स्वतःकडे लक्ष वेधण्याऐवजी यहोवाकडे लोकांचे लक्ष वेधले. आपण ‘आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवले’ तरच आपल्याला येशूप्रमाणे चांगले शिक्षक बनता येईल.—१ तीम. ४:१६.

७. येशू सेवाकार्यात का टिकून राहू शकला?

७ थंड प्रतिसाद व विरोध असतानाही हार मानू नका: येशूने अनेक महत्कृत्ये केली, तरीसुद्धा बहुतेकांनी त्याचे ऐकले नाही. (लूक १०:१३) फार काय, येशूच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांनाही “त्याला वेड लागले आहे” असे वाटले होते. (मार्क ३:२१) तरीसुद्धा येशूने हार मानली नाही. आपल्याजवळ असलेल्या सत्यामध्ये मनुष्याला बंधमुक्‍त करण्याची ताकद आहे याची पूर्ण खात्री असल्यामुळेच येशू आशावादी दृष्टिकोन राखू शकला. (योहा. ८:३२) यहोवाच्या साहाय्याने, आपणही कधीच धैर्य न सोडण्याचा निर्धार केला आहे.—२ करिंथ. ४:१.

८, ९. सुवार्तेकरता त्याग करण्याच्या बाबतीत आपण कशा प्रकारे येशूचे अनुकरण करू शकतो?

८ पुरेपूर सहभाग घेण्याकरता त्याग करण्यास तयार असा: येशूने आपल्या सेवाकार्याकरता भौतिक सुखसोयींचा त्याग केला. (मत्त. ८:२०) प्रचार कार्य करण्यासाठी त्याने अथक परीश्रम घेतले. कधीकधी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो हे कार्य करत असे. (मार्क ६:३५, ३६) आपल्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करण्याकरता आपल्याजवळ मर्यादित काळ आहे याची येशूला जाणीव होती. आज “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे,” याची जाणीव बाळगून आपणही येशूप्रमाणे आपल्या वेळेचा, शक्‍तीचा व साधनसंपत्तीचा त्याग करण्यास तयार असले पाहिजे.—१ करिंथ. ७:२९-३१.

९ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी येशूचे अनुकरण केल्यामुळे ते आपल्या सेवाकार्यात परिणामकारक ठरले. (प्रे. कृत्ये ४:१३) आपण इतिहासातील या सर्वश्रेष्ठ सुवार्तिकाचे अनुकरण केल्यास आपणही आपली सेवा पूर्ण रीत्या साध्य करू शकतो.—२ तीम. ४:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा