भक्कम विश्वासाचा पुरावा!
१. येशूने कोणत्या भयानक गोष्टींचे भाकीत केले?
१ येशू जेव्हा आपल्या प्रेषितांना त्याच्या उपस्थितीविषयी आणि व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी सांगत होता तेव्हा ते लक्ष देऊन त्याचे बोलणे ऐकत होते. मानवजातीवर भयानक गोष्टी कोसळणार होत्या—युद्धे, अन्नटंचाई, भूमिकंप, मऱ्या. नंतर येशूने म्हटले, की त्याच्या अनुयायांचा द्वेष केला जाईल, त्यांना पकडून त्यांचा छळ केला जाईल व त्यांना ठार मारले जाईल. खोटे संदेष्टे येऊन पुष्कळ लोकांना बहकवतील. बहुतेक लोकांचे प्रेम थंडावेल.
२. सुवार्तेचा प्रचार संपूर्ण जगभर होत आहे ही गोष्ट उल्लेखनीय का आहे?
२ हे सर्व सांगितल्यानंतर, येशूने जेव्हा असे म्हटले, की देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा सर्व पृथ्वीवर प्रचार होईल तेव्हा त्याच्या प्रेषितांना जरा आश्चर्यच वाटले असेल. (मत्त. २४:३-१४) आज आपण ही लक्षवेधक भविष्यवाणी उल्लेखनीयरीत्या पूर्ण होत असल्याचे पाहतो. आपण कठीण काळात जगत असलो तरी, यहोवाचे साक्षीदार अगदी जोमाने सुवार्तेचा प्रचार करीत आहेत. जगातील लोकांचे प्रेम थंडावत चालले आहे आणि आपल्यामधील प्रेम वाढत चालले आहे. “सर्व राष्ट्रे” आपला द्वेष करीत असले, तरीसुद्धा आपण जवळजवळ सर्वच राष्ट्रांत प्रचार करतो.
३. जगभराच्या अहवालातील कोणती संख्या तुम्हाला प्रोत्साहनदायक वाटते?
३ पृष्ठे ३ ते ६ वर गेल्या सेवा वर्षाचा अहवाल देण्यात आला आहे. या अहवालातून यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यांची उजळणी केल्याने किती प्रोत्साहन मिळू शकते. लागोपाठ १६ वर्षांपासून १०० कोटींपेक्षा अधिक तास प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यात खर्च करण्यात आले आहेत. यहोवाच्या साक्षीदारांच्या भक्कम विश्वासाचा हा किती मोठा पुरावा आहे! पायनियरांच्या संख्येत ५.८ टक्के, प्रचारकांच्या संख्येत ३.१ टक्के आणि बायबल अभ्यासांच्या संख्येत ४.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाप्तिस्मा घेतलेल्यांच्या संख्येत गेल्या सेवा वर्षापेक्षा २०.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतिहासात पूर्वी कधीही इतक्या मोठ्या संख्येने लोक यहोवाची सेवा करत नव्हते तितके आज करत आहेत; जवळजवळ ७० लाख लोक यहोवाची विश्वासूपणे सेवा करत आहेत. सेवा वर्षाच्या अहवालाचे परीक्षण करताना कोणती गोष्ट तुम्हाला खास प्रोत्साहनदायक वाटली?
४. बाप्तिस्मा घेण्याकरता एका मनुष्याला कोणत्या समस्यांवर मात करावी लागली?
४ या संख्या भारावून टाकणाऱ्या असल्या तरीसुद्धा आपण एक गोष्ट विसरता कामा नये, या संख्येत अशाही बांधवांच्या सेवेचा अहवाल आहे ज्यांनी आपला विश्वास शाबीत करून दाखवला. बोलिव्हियात वाढलेल्या गिलयेरमोचे उदाहरण घ्या. त्याचा जन्म १९३५ साली झाला होता. वयाच्या नवव्या वर्षापासून तो कोकाची लागवड करणाऱ्या ठिकाणी काम करू लागला. आपल्याला किती काबाड कष्ट करावे लागतात या गोष्टीचे त्याला सतत वाईट वाटत असे. म्हणून हे दुःख विसरण्यासाठी तो कोकाची पाने खाऊ लागला. अशा प्रकारे त्याला बालपणापासूनच कोकाची पाने खायची सवय जडली. नंतर तो दारू पिऊ लागला आणि सिगारेट ओढू लागला. पण जेव्हा त्याने यहोवा त्याच्याकडून काय अपेक्षितो हे शिकले तेव्हा त्याने धुम्रपान व पिणेही सोडून दिले. कोकाची पाने खाण्याची बालपणीच जडलेली सवय तोडायचे सर्वात मोठे आव्हान त्याच्यासमोर होते. त्याने याबाबतीत निरंतर प्रार्थना केली आणि एके दिवशी तो या सवयीतून मुक्त झाला. आपल्या वाईट सवयी मागे सोडून त्याने बाप्तिस्मा घेतला. “आता मी शुद्ध व आनंदी आहे,” असे तो म्हणतो.
५. आपली काय इच्छा आहे?
५ यहोवाला लोकांची खरोखरच काळजी आहे. सर्वांनी पश्चात्ताप करावा, अशी त्याची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) आपली देखील हीच इच्छा आहे. प्रामाणिक मनाच्या लोकांना आपल्यासारखेच यहोवाला ओळखण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास त्यांना मदत करण्याकरता आपण आपल्यापरीने होता होईल तितका प्रयत्न करीत राहू या.