“तुमचे बोलणे सर्वदा . . . मिठाने रुचकर केल्यासारखे असावे”
१. आपले ‘बोलणे मिठाने रुचकर करणे’ याचा अर्थ काय?
१ “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.” (कलस्सै. ४:६) आपले बोलणे मिठाने रुचकर करणे याचा अर्थ बोलताना योग्य शब्द निवडणे आणि ऐकणाऱ्याला आपले बोलणे सुखकर वाटेल अशा पद्धतीत बोलणे. क्षेत्र सेवेत हे अतिशय महत्त्वाचे आहे.
२. येशू एका शोमरोनी स्त्रीला कशाप्रकारे साक्ष देऊ शकला?
२ येशूचे उदाहरण: एका विहिरीजवळ विश्रांती घेत असताना येशूने पाणी घेण्यासाठी आलेल्या एका शोमरोनी स्त्रीबरोबर स्वतःहून संभाषण सुरू केले. या दोघांचे संभाषण जितका वेळ चालले त्या दरम्यान या स्त्रीने अनेकदा, यहुदी व शोमरोनी यांच्यामध्ये असलेल्या वैरभावाचा उल्लेख केला. शोमरोनी लोक गैर-यहुद्यांचे वंशज होते असे यहुद्यांना ठामपणे वाटत होते, पण शोमरोनी याकोबाच्या वंशातून आले आहेत असा आपला विश्वास तिने व्यक्त केला. तिने व्यक्त केलेल्या मतांवर हुज्जत घालत बसण्याऐवजी येशूने त्यांचे संभाषण सकारात्मक ठेवले. यामुळे तो अशी साक्ष देवू शकला ज्यामुळे त्या स्त्रीचा आणि शहरातील इतर लोकांचा फायदा झाला.—योहा. ४:७-१५, ३९.
३. सेवेमध्ये आपण येशूच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?
३ प्रचार करताना आपण प्रचार करण्याचा आपला हेतू काय आहे हे सतत ध्यानात ठेवले पाहिजे—‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणे’ हा आपला हेतू आहे. (रोम. १०:१५) आपण घरमालकाला बायबलमधून त्याला आवडेल असा व त्याला उभारी मिळेल असा सुविचार सांगू इच्छितो. आपण त्याच्या धार्मिक विश्वासांवर हल्ला करण्यास आलो आहोत, असे आपण भासवू इच्छित नाही. तो जेव्हा चुकीचे मत व्यक्त करतो तेव्हा त्याचे उत्तर चूक आहे अशा आविर्भावात आपण त्याला उत्तर देत नाही. त्याने व्यक्त केलेल्या मतात असा कोणता मुद्दा होता का, की ज्यावर आपण त्याजशी सहमत होऊ शकतो किंवा मग त्याला मनापासून शाबासकी देण्याकरता त्याचा उपयोग करू शकतो? कदाचित एक शास्त्रवचन दाखवून आपण असे म्हणू शकतो: “या शक्यतेचा तुम्ही कधी विचार केला आहे का?”
४. घरमालक आपल्याबरोबर अपमानास्पदरीत्या बोलत असेल तर काय?
४ घरमालक आपल्याबरोबर अपमानास्पदरीत्या बोलत असेल किंवा त्याला आपल्याबरोबर फक्त वाद घालायचा असेल, हे स्पष्टपणे दिसत असेल तर काय? तरीसुद्धा, आपण आपल्या बोलण्यात सौम्यपणा दाखवला पाहिजे. (२ तीम. २:२४, २५) घरमालकाला राज्य संदेश आवडत नसेल तर आपण व्यवहारकुशलेतचा उपयोग करून अदबीने तेथून निघू शकतो.—मत्त. ७:६; १०:११-१४.
५. एका भगिनीने अदबीने उत्तर दिल्यामुळे तिला कोणते चांगले परिणाम मिळाले?
५ चांगले परिणाम: एका भगिनीने तिच्या शेजारणीला साक्ष द्यायचा प्रयत्न केला. पण ही शेजारी तिच्यावर खेकसली आणि भगिनीला नको त्या गोष्टी बोलली. आपल्या भगिनीने तिला दयाळुपणे म्हटले: “तुम्हाला असं वाटतय, हे ऐकून मला वाईट वाटलं. ठीक आहे, काळजी घ्या.” दोन आठवड्यांनंतर, ही शेजारीण आपल्या बहिणीच्या घरी गेली. तिने दार वाजवले आणि आपण त्या दिवशी कसे वागलो त्याबद्दल क्षमा मागितली आणि भगिनीला त्या दिवशी काय सांगायचे होते ते ऐकण्याची तयारी दर्शवली. अदबीने दिलेल्या उत्तराचे बहुधा चांगले परिणाम होतात.—नीति. १५:१; २५:१५.
६. सेवेमध्ये मिठाने रुचकर केलेले शब्द आवर्जून वापरणे का महत्त्वाचे आहे?
६ सुवार्तेची घोषणा करतेवेळी मिठाने रुचकर केलेले शब्द आवर्जून वापरा. घरमालकाने या वेळेला तुमचे बोलणे ऐकून घेतले नाही तरीपण, दुसऱ्या वेळेला जेव्हा साक्षीदार त्याच्याकडे जातील तेव्हा कदाचित तो ऐकून घेण्यास तयार असेल.