राज्याच्या सुवार्तेचे प्रचारक होण्यास बायबल विद्यार्थ्यांना मदत करा
१ मत्तय २८:१९, २० मध्ये येशूने आपल्या शिष्यांवर सोपवलेली कामगिरी व्यापक स्वरूपाची होती. ख्रिस्ताच्या शिष्यांना, आणखी शिष्य बनवण्याची सूचना देण्यात आली होती व या नवीन शिष्यांनी, शिष्य बनवण्याचे काम असेच पुढे चालू ठेवायचे होते. अशारितीने, अंत येण्याअगोदरच्या निर्णायक काळादरम्यान देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा संपूर्ण जगभर होणाऱ्या शेवटल्या घोषणेचा पाया घातला जाणार होता. आज आपण अंतसमयाच्या त्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात जगत आहोत.—मत्त. २४:१४.
२ आपले बायबल विद्यार्थी कदाचित आपलीच मुले किंवा मग आपल्याबरोबर बायबलचा अभ्यास करू इच्छिणारे लोक असतील. अशा लोकांना चांगल्याप्रकारे तयार करण्याची आपली मनापासून इच्छा आहे, जेणेकरून तेही इतरांना येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्यास मदत करण्याची त्यांची वैयक्तिक जबाबदारी पेलण्यास सज्ज होतील.—लूक ६:४०.
३ साक्ष देण्याकरता त्यांना तयार करा: तुम्ही ज्यांच्याबरोबर अभ्यास करता त्यांना, ते शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगण्यास आर्जवा. क्षेत्र सेवेत आलेले प्रोत्साहनदायक अनुभव त्यांना सांगा. आपल्या मुलांना लहान वयापासूनच त्यांच्या क्षमतेनुसार क्षेत्र सेवेत अर्थपूर्ण भाग घेण्याचे प्रशिक्षण द्या. (स्तो. १४८:१२, १३) ख्रिस्ती सेवेला तुमच्या जीवनात प्रथम स्थान आहे हे आपल्या बोलण्याद्वारे व उदाहरणाद्वारे दाखवा.—१ तीम. १:१२.
४ यहोवा केवळ अशांचा उपयोग करून घेतो जे त्याच्या धार्मिक दर्जांचा स्वीकार करतात व त्यानुसार जगतात. नवीन प्रचारकांना, अनुभवी, समर्पित व बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकांइतका अनुभव नसतो. तरीपण, नवीन प्रचारकांनी बायबल शिकवणींवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांना मूलभूत बायबल शिकवणी समजावून सांगता आल्या पाहिजे. (आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ पृष्ठे ७-१०) त्यांनी स्वतःला ‘मोठ्या बाबेलीतून’ पूर्णपणे वेगळे करायला हवे, राजकारणात त्यांचा कसलाही सहभाग नसला पाहिजे आणि त्यांनी मंडळीच्या सभांना नियमितरीत्या उपस्थित राहिले पाहिजे.—प्रकटी. १८:२, ४; योहा. १७:१६; इब्री १०:२४, २५.
५ तुमचा बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनण्यास पात्र आहे असे तुम्हाला वाटताच तुम्ही अध्यक्षीय पर्यवेक्षकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. अध्यक्षीय पर्यवेक्षक मग दोन वडिलांची बायबल शिक्षकाला व बायबल विद्यार्थ्याला भेटण्याची योजना करतील. हे वडील, तुमचा बायबल विद्यार्थी मंडळीसोबत राज्याच्या सुवार्तेचा प्रचारक होण्यास पात्र आहे किंवा नाही हे ठरवतील. मग तुम्हाला, तुमचा बायबल विद्यार्थी तुमच्यासोबत क्षेत्र सेवेत येईल तेव्हा आणखी प्रशिक्षण देण्याचा सुहक्क मिळेल.