ज्यांना नियतकालिके दिली जातात त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास कसा सुरू करावा?
१. नियतकालिके देण्याचा आपला उद्देश काय आहे?
१ शनिवारी सहसा आपण सेवेमध्ये टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिके देतो. परंतु, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सत्य शिकवण्याचे हे केवळ पहिले पाऊल आहे. आपण ज्यांच्याकडे पुन्हा जातो त्यांच्याशी बायबल काय शिकवते पुस्तक देऊन बायबल अभ्यास कसा सुरू करायचा याबाबत खाली काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा तुम्ही आपल्या क्षेत्रात अवलंब करू शकता आणि स्वतःच्या शब्दांत मांडायचा प्रयत्न करू शकता. तुम्हाला जर दुसरी एखादी पद्धत प्रभावी वाटत असेल, तर तुम्ही तिचाही उपयोग करू शकता.
२. बायबलचा अभ्यास सुरु करण्यासाठी आपण बायबल काय शिकवते पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो?
२ बायबल काय शिकवते पुस्तकाच्या सुरुवातीच्या पानांचा उपयोग करा: तुम्ही जेव्हा पुनर्भेट द्यायला जाता तेव्हा तुम्ही असे म्हणू शकता: “मी मागे तुम्हाला जी नियतकालिके दिली होती, त्यामध्ये बायबलविषयी सांगण्यात आले आहे. बायबलचे वाचन करणे इतके महत्त्वाचे का आहे, ते पाहा.” यशया ४८:१७, १८; योहान १७:३ किंवा दुसरे कोणतेही उचित शास्त्रवचन वाचून दाखवा. मग, बायबल काय शिकवते पुस्तक दाखवून ते घरमालकाच्या हातात दिल्यानतंर तुम्ही पुढे असे म्हणू शकता:
▪ “बायबल आपल्याला भवितव्यासाठी एक खरी आशा देते.” पाने ४-५ घरमालकाला दाखवल्यानंतर विचारा: “यांपैकी कोणत्या भविष्यवाण्या तुम्हाला पूर्ण झालेल्या पाहायला आवडतील?” त्याने निवडलेल्या शास्त्रवचनांतील अभिवचनाची चर्चा करणारा अध्याय उघडा आणि जर त्याने अनुमती दिली तर एक अथवा दोन परिच्छेदांची थोडक्यात चर्चा करा.
▪ किंवा तुम्ही असे म्हणू शकता: “बायबल जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देते.” पृष्ठ ६ काढून त्या पानावरील प्रश्न दाखवून त्याला विचारा, की त्याच्या मनात कधी यांपैकी कोणता प्रश्न आला होता का. त्याने निवडलेल्या प्रश्नाचे उत्तर ज्या अध्यायात दिले आहे तो अध्याय उघडा आणि मग थोडक्यात एक अथवा दोन परिच्छेदांची चर्चा करा.
▪ किंवा तुम्ही विषयसूचीतील काही शीर्षक दाखवून, त्याला कोणता विषय आवडला ते विचारू शकता. मग तो अध्याय उघडा आणि बायबल अभ्यास कसा करायचा ते थोडक्यात दाखवा.
३ पहिल्या भेटीत घरमालकाला एक प्रश्न विचारा: दुसरी एक पद्धत आहे, पुन्हा भेटण्याकरता, पहिल्या भेटीतच घरमालकाला एखादा प्रश्न विचारा. घरमालकाने नियतकालिके स्वीकारल्यानंतर, एखादा प्रश्न विचारा आणि आपण त्याचे उत्तर पुढल्या भेटीत देऊ असे सांगा. पुन्हा जाण्याची निश्चित योजना बनवा आणि सांगितल्याप्रमाणे जा. (मत्त. ५:३७) पुन्हा गेल्यावर, घरमालकाला त्या प्रश्नाची आठवण करून द्या. आणि मग, बायबल काय शिकवते पुस्तकातून त्या प्रश्नाचे उत्तर वाचून थोडक्यात चर्चा करा. घरमालकाला एक वेगळी प्रत द्या, जेणेकरून तो चर्चा चाललेली असताना आपल्या पुस्तकात पाहू शकेल. पुढे काही उदाहरणे दिली आहेत:
▪ तुम्ही दिलेले नियतकालिक, जगाच्या बिघडत चाललेल्या परिस्थितीविषयी असेल तर तुम्ही असे म्हणू शकता, “पुढच्या वेळी आपण, देव पृथ्वीवर कोणते बदल घडवून आणणार आहे? या प्रश्नाचे बायबलमध्ये दिलेल्या उत्तरावर चर्चा करूया.” तुम्ही पुन्हा जाता तेव्हा पुस्तकातून पृष्ठे ४-५ दाखवा. किंवा असा प्रश्न विचारा: “जगात होणाऱ्या दुःखद घटना देवाच्या इच्छेनुसार होतात का?” आणि मग पुढील भेटीत, अध्याय १ मधील ७-८ परिच्छेद दाखवा.
▪ तुम्ही दिलेले नियतकालिक, कौटुंबिक विषयावर असेल तर तुम्ही असा प्रश्न विचारू शकता, “जीवन आणखी सुखी होण्याकरता कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्यापरीने काय करू शकतो?” पुन्हा जाता तेव्हा अध्याय १४ मधील ४ थ्या परिच्छेदावर चर्चा करा.
▪ तुम्ही दिलेले नियतकालिक, बायबलच्या विश्वसनीयतेविषयी असेल तर पुढील भेटीत चर्चा करण्याकरता तुम्ही एक प्रश्न विचारू शकता: “बायबल जेव्हा वैज्ञानिक विषयांबद्दल बोलते तेव्हा ते अचूक माहिती देते का?” मग पुढील भेटीत, अध्याय २ मधील ८ व्या परिच्छेदावर चर्चा करा.
४ प्रत्येक चर्चेच्या शेवटी, पुढील भेटीत उत्तर देता येईल असा एक प्रश्न विचारा. नियमित अभ्यास स्थापित झाल्यावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत अशा एकेका अध्यायावर चर्चा करा. पण घरमालक जर बायबल काय शिकवते पुस्तक स्वीकारत नसेल तर? तरीपण त्याला नियतकालिके देत राहा आणि त्याच्याबरोबर बायबल आधारित चर्चा करीत राहा. हळूहळू त्याची आवड वाढल्यानंतर तो कदाचित बायबल अभ्यास करण्यास तयार होईल.
५. आपण लोकांना फक्त नियतकालिके देऊ नयेत तर आणखी काय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे?
५ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही नियतकालिके, बायबल नेमके काय शिकवते हे जाणून घेण्यास एखाद्याला प्रवृत्त करू शकतात. यास्तव, जे नियतकालिके स्वीकारतात अशांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करण्याचा खास प्रयत्न करा. अशाप्रकारे तुम्ही, “लोकांस शिष्य करा” या येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करू शकाल.—मत्त. २८:१९, २०.
३. (क) जगाची बिघडत चाललेली परिस्थिती? (ख) कुटुंब आणि (ग) बायबलचा खरेपणा, याविषयांवर चर्चा करणारे नियतकालिक घरमालकाला दिल्यानंतर आपण त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास कशाप्रकारे सुरू करू शकतो?
४. घरमालक जर बायबल काय शिकवते पुस्तक स्वीकारत नसेल तर काय?