आपल्या मुलांना यहोवाची स्तुती करण्यास शिकवा
१. लहान मुले यहोवाची स्तुती करू शकतात का?
१ स्तोत्र १४८:१२, १३ मध्ये मुलामुलींना “परमेश्वराच्या नावाचे स्तवन” करण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. यहोवाचे स्तवन केलेल्या मुलांची अनेक उदाहरणे शास्त्रवचनांमध्ये आहेत. जसे की, “शमुवेल बाळ . . . परमेश्वराची सेवा करीत असे.” (१ शमु. २:१८) इस्राएलमधील यहोवाचा संदेष्टा, नामानाचे कोड बरे करू शकतो, असे एका ‘लहान मुलीने’ नामानाच्या बायकोला सांगितले. (२ राजे ५:१-३) येशूने जेव्हा मंदिरात प्रवेश करून महत्कृत्ये केली तेव्हा, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना” असा गजर करणारी “मुले” होती. (मत्त. २१:१५) पालक आपल्या मुलांना यहोवाची स्तुती करण्यास कसे शिकवू शकतात?
२. पालकांनी आपल्या मुलांपुढे स्वतःचे चांगले उदाहरण मांडणे महत्त्वाचे का आहे?
२ उदाहरण: आपल्या मुलांच्या हृदयात सत्य बिंबवण्याअगोदर इस्राएली पित्यांना, स्वतःच्या हृदयात यहोवाबद्दल प्रेम बाळगण्याची व त्याच्या आज्ञा पाळण्याची सूचना देण्यात आली होती. (अनु. ६:५-९) तुम्ही जर सेवेविषयी सकारात्मक गोष्टी बोललात व दर आठवडी सेवेमध्ये भाग घेतलात तर, क्षेत्र सेवा ही एक महत्त्वाची व समाधानकारक सेवा आहे, अशी छाप तुमच्या मुलांच्या मनावर पडेल.
३. आपल्या पालकांच्या उदाहरणाचा एका भगिनीला कसा लाभ झाला आहे?
३ एक भगिनी अतिशय आनंदाने एक जुनी आठवण सांगते; ती म्हणते: “मी लहानाची मोठी होत असताना, कुटुंब मिळून आम्ही करत असलेल्या गोष्टींपैकी, दर शनिवार-रविवार क्षेत्र सेवेत भाग घेणे ही एक गोष्ट होती. आईबाबांना प्रचार करायला किती आवडायचे, हे मी पाहत होते. क्षेत्र सेवा ही आनंद देणारी गोष्ट आहे, याच विचारानं आम्ही लहानाचे मोठे झालो.” वयाच्या सातव्या वर्षी ही भगिनी बाप्तिस्मा न घेतलेली प्रचारक बनली आणि आता ती पूर्ण वेळेच्या तिच्या ३३ व्या वर्षात आहे.
४. मुलांना प्रगतीशील प्रशिक्षण देण्याचा काय अर्थ होतो?
४ प्रगतीशील प्रशिक्षण: तुम्ही क्षेत्र सेवेत भाग घेता तेव्हा आपल्या मुलांना देखील समाविष्ट करा. कदाचित ते दारावरची बेल वाजवू शकतात, घरमालकाला एखादी पत्रिका देऊ शकतात किंवा एखादे वचन वाचून दाखवू शकतात. यामुळे त्यांना क्षेत्र सेवेत भाग घ्यायला आनंद वाटेल आणि राज्याचा संदेश सांगण्याचा त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. ते जसजसे मोठे होतील तसतसे सेवेतील त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. यास्तव, त्यांना प्रगती करण्यास मदत करा आणि ते कोणती ध्येये ठेवू शकतात, यावर विचार करण्यात त्यांना मदत करा.
५. तुमच्या मुलाला बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याच्या पात्रतेचे व्हायचे असेल तर काय आवश्यक आहे?
५ तुमची मुले बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक बनण्याच्या योग्यतेची झाली आहेत असे तुम्हाला वाटल्याबरोबर आणि मुले देखील तुम्हाला तसे बोलून दाखवतात तेव्हा लगेच याबाबतीत वडिलांशी बोला. प्रचारक बनल्याने, यहोवाची स्तुती करण्याची आता आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे, ही गोष्ट त्यांच्या मनावर छाप पाडेल. बाप्तिस्मा घेण्याच्या पात्रतेचे होण्याआधी, बाप्तिस्मा घेतलेल्या प्रौढांना जितकी माहिती असते तितकी माहिती तुमच्या मुलांना माहीत असलीच पाहिजे, असे नाही. तुमच्या मुलाला बायबलच्या मूलभूत शिकवणुकी माहीत आहेत का? तो बायबलच्या नैतिक दर्जांचे पालन करतो का? त्याला सेवेत जाण्याची व स्वतःला यहोवाचा साक्षीदार म्हणून ओळखण्याची इच्छा आहे का? जर होय तर वडीलजन, तो बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याच्या पात्रतेचा आहे किंवा नाही हे ठरवतील.—कृपया आमची राज्य सेवा नोव्हेंबर २००६ मधील पुरवणी पाहा.
६. आपल्या मुलांना प्रशिक्षण दिल्याने पालकांना काही फायदा होतो का?
६ मनापासून यहोवाची स्तुती करण्यास मुलांना शिकवण्याकरता परिश्रम करावे लागतील. परंतु, आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रगती करताना पाहून पालकांना जो मोठा आनंद मिळतो, तो क्वचितच इतर गोष्टीतून मिळू शकेल. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आपली मुले जेव्हा यहोवाच्या अद्भुत कार्यांविषयी इतरांना सांगतात तेव्हा यहोवाला अतिशय आनंद वाटतो.