“मला यात रस नाही”
१ काही भागांत बहुतेक लोक आपल्या संदेशाला असाच प्रतिसाद देतात. पण क्षेत्रातल्या लोकांच्या उदासीन मनोवृत्तीमुळे हताश न होण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल? लोकांना सुवार्तेबद्दल आस्था वाटावी म्हणून आपण काय करू शकतो?
२ आनंदी मनोवृत्ती टिकवून ठेवा: बरेच लोक का उदासीन झाले आहेत हे आठवणीत ठेवल्यास आपल्याला आनंदी मनोवृत्ती टिकवून ठेवता येईल. ज्या लोकांना उत्क्रांतीचा सिद्धान्त शिकवण्यात आला आहे किंवा जे नास्तिकवादी समाजात वाढले आहेत, त्यांनी कदाचित बायबलला कधीच महत्त्व दिले नसेल. इतरजण कदाचित धार्मिक वर्तुळांतील ढोंगीपणा पाहून निराश झाले असतील. तर काहीजण त्यांच्यासमोर कोणतीही आशा नसल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन उदासीन झाले असतील. (इफिस. २:१२) इतरजण दैनंदिन जीवनातील दबावांनी भारावून गेल्यामुळे आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करतात.—मत्त. २४:३७-३९.
३ काहीजणांनी नकारात्मक प्रतिक्रिया दाखवली तरीसुद्धा, आपल्या प्रयत्नांमुळे आपण यहोवाचे गौरव करतो हे लक्षात ठेवल्यास आपल्याला सेवाकार्यात आनंदी मनोवृत्ती टिकवून ठेवता येईल. (१ पेत्र ४:११) शिवाय, लोकांना जरी सत्याचे मोल कळत नसले तरी, त्यांच्याशी सत्याविषयी बोलल्यामुळे आपला विश्वास दृढ होतो. आपल्या क्षेत्रातल्या लोकांकडे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास शिकले पाहिजे. “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही” अशा निनवेच्या लोकांची यहोवाला दया आली. (योना ४:११) आपल्या क्षेत्रातल्या लोकांना सुवार्तेची गरज आहे! तेव्हा, आपण निराश न होता बायबलच्या संदेशाबद्दल त्यांच्या मनात आस्था कशी जागृत करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे.
४ स्थानिक विषयांवर चर्चा करा: कदाचित तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत एखाद्या स्थानिक परिसरातील चर्चेचा विषय आणू शकता आणि त्यावर घरमालकाचे मत विचारू शकता. घरमालक बोलत असताना लक्ष देऊन ऐका आणि मग त्याने व्यक्त केलेल्या चिंतेशी सुसंगत बायबलमधील सांत्वनदायक संदेश त्याला दाखवा. एका विशिष्ट परिसरात काहीतरी दुर्घटना घडल्यानंतर एका साक्षीदाराने प्रत्येक दारावर घरमालकाशी बोलताना त्या दुर्घटनेविषयी मनापासून खेद व्यक्त केला. तो सांगतो, “एरवी फारशी आस्था न दाखवणारे लोक अचानक बोलू लागले. त्या दिवशी मला अनेकांशी उत्तम चर्चा करता आल्या कारण मी त्यांच्या जीवनाबद्दल आस्था दाखवली होती.”
५ मानवजातीसमोर असलेली प्रत्येक समस्या देवाच्या राज्याद्वारे सोडवली जाणार आहे. घरमालकाला त्यांपैकी कोणत्या समस्येविषयी सर्वात जास्त काळजी वाटते हे ओळखण्याचा प्रयत्न करा. कदाचित तो तुम्हाला बायबलमधील आशेचा संदेश सांगण्याची अनुमती देईल. आणि नाही दिली तरी, कदाचित “पुन्हा केव्हातरी” तो तुमचे ऐकून घेण्यास तयार होईल.—प्रे. कृत्ये १७:३२, कॉमन लँग्वेज.