दारात उभे राहून व टेलिफोनवरून प्रगतीशील बायबल अभ्यास घेणे
१. बायबल अभ्यास घेण्यामागे आपला काय उद्देश आहे?
१ आपण एखादा बायबल अभ्यास सुरू करतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! पण बायबलचा अभ्यास करण्यास तयार असलेली व्यक्ती सापडणे ही तर केवळ सुरुवात आहे. बायबल अभ्यास करण्यामागचा हेतू, त्या व्यक्तीला ख्रिस्ताचा खरा शिष्य बनण्यास मदत करणे हा आहे. (मत्त. २८:१९, २०) हा हेतू आपण कसा साध्य करू शकतो?
२. दारात उभे राहून व टेलिफोनवरून बायबल अभ्यास करणे म्हणजे काय, व हे प्रभावकारी का आहे?
२ व्यग्र लोक: आजकाल लोकांचे जीवन दिवसेंदिवस धावपळीचे होत चालले आहेत. काही ठिकाणी, फार कमी असे लोक भेटतात की जे सुरुवातीला बायबलचा अभ्यास करण्यासाठी एक संपूर्ण तास खर्च करायला तयार असतात. अशा लोकांना साक्ष देण्याकरता आपण दारात उभे राहून किंवा टेलिफोनवरून बायबल अभ्यास सुरू करून तो संचालित करू शकतो. सुरुवातीला अशाप्रकारचे अभ्यास संक्षिप्त असतील आणि बायबल काय शिकवते पुस्तकासारख्या एखाद्या प्रकाशनातील एक किंवा दोन परिच्छेदांच्या साहाय्याने केवळ एक-दोन बायबल वचनांवरच आपल्याला चर्चा करता येईल. पुष्कळ प्रचारक सध्या अशाप्रकारे दारात उभे राहून किंवा टेलिफोनवरून बायबल अभ्यास संचालित करत आहेत, हे किती प्रशंसनीय आहे!
३. आपण दारात उभे राहून अभ्यास घेतो तेव्हा अभ्यासाचा अवधी वाढवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?
३ पण, असे अनिश्चित काळासाठी दारातच उभे राहून अभ्यास संचालित करण्यात आपण समाधान मानले पाहिजे का? नाही. आपण अभ्यास सुरू करतो तेव्हा आपण जास्त वेळ दारात बोलत उभे राहणे सुज्ञपणाचे नाही तरीपण, आमची राज्य सेवा जून १९९० अंकाच्या पृष्ठ ४ वर ही टिपणी करण्यात आली होती: “एकदा अभ्यास प्रस्थापित झाला व घरमालकाची आस्था वाढू लागली म्हणजे अभ्यासाचा कालावधी वाढवता येईल.” हे महत्त्वपूर्ण आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण लक्षात घ्या: पुष्कळ दिवसांपासून उपाशी असलेल्या मुलाला सुरुवातीला, त्याची जेवणाची इच्छा पूर्ववत होईपर्यंत त्याला छोट्या छोट्या प्रमाणात अन्न दिले जाते. पण समजा, त्याला महिनोंमहिने असेच थोडे थोडे अन्न दिले तर त्या बाळाला पूर्ण शक्ती मिळण्याची किंवा त्याची सृदृढ वाढ होण्याची आपण अपेक्षा करू शकू का? तसेच, बायबल विद्यार्थ्याने देवाचा एक प्रौढ सेवक बनण्याकरता, त्याला अधिक रीतसर व नियमित बायबल अभ्यास हवा.—इब्री ५:१३, १४.
४. घरात बसून बायबल अभ्यास करण्याचे फायदे काय आहेत?
४ घरात बसून बायबल अभ्यास करणे: बायबल अभ्यास खासगी ठिकाणी—घरात किंवा इतर कोणत्याही योग्य ठिकाणी घेतला पाहिजे, असे सुचवले जाते. यामुळे विद्यार्थ्याला शिकता येईल आणि देवाच्या वचनाचा अर्थ समजेल. (मत्त. १३:२३) शिवाय, शिक्षकाला देखील विद्यार्थ्याच्या गरजांनुसार अभ्यासाच्या साहित्यात फेरफार करता येईल. आणि, अधिक वेळाकरता अभ्यास केल्यामुळे देवाच्या वचनाची अधिक खोल व विश्वास मजबूत करणारी चर्चा करणे शक्य होईल.—रोम. १०:१७.
५. दारात उभे राहून तुम्ही करत असलेला अभ्यास आता तुम्ही घरात बसून कसा करू शकता?
५ दारात उभे राहून तुम्ही घेत असलेला बायबल अभ्यास आता घरात बसून कशाप्रकारे घेऊ शकता? संक्षिप्त काळासाठी अनेकदा अभ्यास केल्यानंतर, आता जास्त आणि ठराविक कालावधीसाठी अभ्यास करण्याचे तुम्ही घरमालकाला सुचवू शकता. किंवा कदाचित, “आज तुम्हाला थोडावेळ बसून एकत्र चर्चा करण्यास वेळ आहे का?” किंवा, “या विषयाची चर्चा करण्यासाठी आज तुम्ही किती वेळ देऊ शकाल?” असा मोघम प्रश्न तुम्ही विचारू शकता. घरमालक जर घरात बसून अभ्यास करण्यास राजीच होत नसेल तर दारात उभे राहून अभ्यास करण्यात काही गैर नाही. पुन्हा कधीतरी तुम्ही घरात बसून अभ्यास करण्याचा विषय छेडू शकता.
६. आपण कोणता हेतू मनात ठेवून सेवा केली पाहिजे, आणि हा हेतू साध्य करण्यासाठी या लेखातील सूचना आपल्याला कशाप्रकारे साहाय्य करू शकतात?
६ तर मग योग्य लोकांचा शोध घेत असताना, बायबल अभ्यास सुरू करून तो संचालित करण्यामागे आपला जो हेतू आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना यहोवाचे समर्पित व बाप्तिस्मा प्राप्त सेवक बनण्यास मदत करणे, हा आपला हेतू आहे. हा हेतू मनात ठेवून आपण सेवा करतो तेव्हा आपल्या प्रयत्नांवर त्याचे आशीर्वाद राहो!—२ तीम. ४:५.