नम्र लोकांना देवाच्या मार्गात चालण्यास शिकवा
१. शिष्य बनवण्यात कशाचा समावेश आहे?
१ पहिल्या शतकात, ख्रिस्ताच्या शिष्यांना “तो मार्ग” अनुसरणारे असे म्हणत. (प्रे. कृत्ये ९:२) खऱ्या ख्रिस्ती धर्माचा एका व्यक्तीच्या सबंध जीवनातील मार्गाक्रमणावर परिणाम होतो. (नीति. ३:५, ६) म्हणूनच, बायबल अभ्यास चालवताना, एका व्यक्तीला केवळ बायबलमधील सिद्धान्तांचे अचूक ज्ञान देणे पुरेसे नाही. तर आपण आपल्या बायबल विद्यार्थ्याला यहोवाच्या मार्गात कसे चालायचे हे देखील शिकवले पाहिजे.—स्तो. २५:८, ९.
२. कोणती गोष्ट बायबल विद्यार्थ्याला देवाच्या आज्ञांचे पालन करण्यास प्रेरित करू शकते?
२ यहोवाबद्दल व येशूबद्दल प्रेम: आपली विचारसरणी, मनोवृत्ती, व वागणेबोलणे यांचा देवाच्या इच्छेशी मेळ बसवणे अपरिपूर्ण मानवांकरता निश्चितच सोपे नाही! (रोम. ७:२१-२३; इफिस. ४:२२-२४) पण जर एका व्यक्तीला देवाबद्दल व त्याच्या पुत्राबद्दल प्रेम असेल तर या प्रेमापोटी ती व्यक्ती हे कठीण आव्हान स्वीकारेल. (योहा. १४:१५; १ योहा. ५:३) आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना हे प्रेम उत्पन्न करण्यास कशी मदत करू शकतो?
३. आपण बायबल विद्यार्थ्यांना यहोवा व येशू यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न करण्यास कशी मदत करू शकतो?
३ यहोवाला एक व्यक्ती म्हणून जाणून घेण्यास तुमच्या विद्यार्थ्याला मदत करा. एका बंधूने या संदर्भात अशाप्रकारे खुलासा केला: “लोक ज्याला ओळखतच नाही, त्याच्यावर ते कसे प्रेम करतील? म्हणूनच अभ्यासाच्या अगदी सुरुवातीपासूनच मी माझ्या विद्यार्थ्यांना बायबलमधून देवाचे नाव दाखवतो आणि यहोवाच्या गुणांवर प्रकाश टाकण्याच्या संधी शोधत राहतो.” येशूचे उदाहरण अधोरेखित करण्याद्वारे आपण हे सर्वात चांगल्याप्रकारे करू शकतो. (योहा. १:१४; १४:९) याशिवाय, बायबल काय शिकवते या पुस्तकातील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी असलेला उजळणीचा चौकोन अतिशय उपयुक्त आहे. याच्या मदतीने तुम्ही विद्यार्थ्याला देवाच्या व त्याच्या पुत्राच्या गुणांविषयी मनन करण्याचे प्रोत्साहन देऊ शकता.
४. (क) बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रचार कार्यात सहभाग घेणे कठीण का वाटते? (ख) आपण आपल्या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती सेवाकार्यात सहभाग घ्यायला सुरुवात करण्यास कशाप्रकारे साहाय्य करू शकतो?
४ तुमचा आदर्श: शिक्षक व मार्गदर्शक या नात्याने आपण आपल्या कृतींतून विद्यार्थ्याला दाखवू शकतो की देवाच्या मार्गात चालण्याचा काय अर्थ होतो. (१ करिंथ. ११:१) उदाहरणार्थ, बहुतेक बायबल विद्यार्थ्यांना अनोळखी लोकांकडे जाऊन आपल्या विश्वासांबद्दल त्यांना सांगण्याची कल्पना थोडी विचित्रच वाटेल. तेव्हा, प्रचार कार्यात व शिष्य बनवण्याच्या कार्यात सहभागी होण्याकरता आवश्यक असणारे प्रेम, विश्वास व धैर्य उत्पन्न करण्यास, तुम्हाला अतिशय धीराने व निपुणतेने त्यांना साहाय्य करावे लागेल. (२ करिंथ. ४:१३; १ थेस्सलनी. २:२) आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जर आपल्याला उत्सुकता असेल, तर ख्रिस्ती सेवाकार्यात ते प्रथमच सहभाग घेऊ लागतात तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी राहून त्यांना मदत केली पाहिजे.
५. देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचा काय अर्थ होतो हे विद्यार्थ्यांना तुमच्या उदाहरणावरून कशाप्रकारे समजू शकते?
५ तुमच्या आदर्शातून विद्यार्थ्यांना ख्रिस्ती जीवनाच्या इतर महत्त्वाच्या पैलूंविषयीही बरेच काही शिकायला मिळू शकते. तुम्ही आजारी असणाऱ्या बांधवांना भेटायला जाता, किंवा मंडळीच्या सभांत इतरांशी प्रेमाने बोलता, त्यांची विचारपूस करता तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती प्रेम कशाप्रकारे व्यक्त केले जाते हे प्रत्यक्ष पाहायला मिळते. (योहा. १५:१२) तुम्ही राज्य सभागृहाच्या साफसफाईत मदत करता किंवा निरनिराळ्या मार्गांनी इतरांना मदत करता तेव्हा तुम्ही त्यांना सेवाभावी वृत्ती राखण्याचे धडे देत असता. (योहा. १३:१२-१५) तुम्ही आपली राहणी साधी ठेवता, तेव्हा ‘पहिल्याने राज्य मिळवण्यास झटण्याचा’ काय अर्थ होतो हे त्यांना पाहायला मिळते.—मत्त. ६:३३.
६. नम्र लोकांना यहोवाची सेवा करण्यास मदत केल्यामुळे कोणता परिणाम घडून येतो?
६ देवाच्या वचनातून इतरांना शिकवण्याकरता व शिष्य बनवण्याकरता बरेच परिश्रम घ्यावे लागतात यात शंका नाही. पण नम्र लोक “सत्यात चालतात” तेव्हा त्यांना पाहून आपल्याला किती आनंद वाटतो!—३ योहा. ४.