कौटुंबिक आराखडा—कुटुंब मिळून क्षेत्र सेवेत भाग
१ आपल्या नावाची स्तुती मुले करतात हे पाहून यहोवाला अत्यानंद होतो. (स्तो. १४८:१२, १३) येशूच्या दिवसांत तर ‘बाळकांनी व तान्ह्या मुलांनी’ देखील देवाची स्तुती केली. (मत्त. २१:१५, १६) आजही हे घडत आहे. पालकहो, आपल्या मुलांना ख्रिस्ती सेवेत यहोवाचे आवेशी स्तुतीकर्ते बनण्यास तुम्ही कशी मदत करू शकता? मंडळीच्या सभांविषयीच्या वरील लेखात ज्यावर जोर देण्यात आला आहे त्याच गोष्टीद्वारे अर्थात तुमच्या उत्तम उदाहरणाद्वारे तुम्ही आपल्या मुलांना मदत करू शकता. एका पित्याने जे म्हटले ते सर्व पालकांना लागू होते; तो म्हणाला: “तुम्ही जसे बोलता तसे मुले वागत नाहीत, पण तुम्ही जसे वागता त्यानुसार तीही वागतात!”
२ देव-भीरू पालकांनी जिचे संगोपन केले अशा एका भगिनीने आठवून सांगितले: “‘आज आपण सेवेला जाणार आहोत की नाही,’ असं शनिवारी सकाळी उठून आम्ही कधी विचारल्याचं आम्हाला आठवतं नाही. आम्ही जाणारच आहोत हे आम्हाला माहीत होतं.” तसेच, कुटुंब म्हणून क्षेत्र सेवेत भाग घेण्याचा आठवड्याचा एक नित्यक्रम बनवण्याद्वारे तुम्ही आपल्या मुलांच्या मनात प्रचार कार्याचे महत्त्व बिंबवू शकता. यामुळे तुमच्या मुलांना तुमच्याकडे पाहून बरेच काही शिकता येईल; शिवाय तुम्हालाही, त्यांची वृत्ती, त्यांचे वर्तन, त्यांच्यात उत्पन्न होणारी कौशल्ये पाहायला मिळतील.
३ प्रगतीशील प्रशिक्षण: मुले जर सेवेत प्रभावीपणे भाग घेण्यास तयार असतील तरच त्यांना सेवेचा आनंद लुटता येईल. पूर्वी जिचा उल्लेख करण्यात आला त्या भगिनीने असेही म्हटले: “आम्ही आमच्या आईवडिलांच्या मागे, त्यांच्या कामासाठी शेपटीसारखे जात नव्हतो. दारावरची बेल वाजवणं किंवा घरमालकाला पत्रिका देणं, फक्त इतकंच जरी असलं तरी या कामात आपलाही भाग आहे असं आम्हाला वाटायचं. प्रत्येक शनिवारी-रविवारी कार्याच्या आधी चांगल्याप्रकारे तयारी केल्यामुळे, आम्ही प्रचार कार्यात काय बोलणार आहोत, हे आम्हाला माहीत होतं.” तुम्ही देखील आपल्या मुलांना कौटुंबिक अभ्यासाच्या किंवा इतर वेळी, दर आठवडी सेवेत भाग घेण्यास त्यांना तयार करण्याकरता प्रशिक्षण देऊ शकता.
४ कुटुंब मिळून सेवेत एकत्र गेल्यामुळे तुम्हाला आपल्या मुलांच्या मनात सत्य बिंबवण्याची आणखी एक संधी मिळेल. एक ख्रिस्ती पिता जवळच्या खोऱ्यात राहणाऱ्या गावकऱ्यांना पत्रिका देण्यासाठी सहा मैल चालत जायचा तेव्हा तो आपल्या मुलीलाही सोबत न्यायचा. मुलगी आठवून सांगते, “आम्ही जेव्हा असं चालत जायचो तेव्हा बाबांनी माझ्या मनात सत्याचे बीज रोवले.” (अनु. ६:७) आपल्या आठवड्याच्या कौटुंबिक आराखड्यात क्षेत्र सेवेचा समावेश केल्यामुळे तुम्हालाही असाच आशीर्वाद मिळो!