कौटुंबिक आराखडा—मंडळीच्या सभा
१ तुम्ही ख्रिस्ती पालक असाल तर, आपली मुले जसजशी मोठी होत जातील तसतसे त्यांनी यहोवावर प्रेम करावे आणि त्याची सेवा करावी आणि कालांतराने देवाच्या वचनयुक्त नव्या जगात सार्वकालिक जीवन मिळवावे, असे तुम्हाला वाटते. मग यहोवाच्या उपासनेला जीवनात प्रथम स्थान देण्यास तुम्ही त्यांना मदत कशी करू शकता? असे करण्याचा एक प्रमुख मार्ग आहे स्वतःचे उत्तम उदाहरण मांडण्याद्वारे. (नीति. २०:७) एका भगिनीने सत्यात असलेल्या आपल्या आईच्या उदाहरणाची आठवण करीत म्हटले: “आज सभांना जायचं की नाही, याविषयी आमच्या मनात कधीच शंका नव्हती.” यामुळे या भगिनीच्या मनावर कायमची छाप पडली.
२ तुमच्या कुटुंबाला, मंडळीच्या सभांचा काय उद्देश आहे, याची जाणीव आहे का? या सभांमध्ये मिळणाऱ्या सुचनांमुळे, देवाची इच्छा करीत राहण्यास आपल्यात जोम येतो आणि आपल्या बंधूभगिनींबरोबर सहवास राखल्यामुळे आपल्याला अतिशय मौल्यवान असलेले उत्तेजन मिळते. (यश. ५४:१३; रोम. १:११, १२) परंतु, या सभांचा मुख्य उद्देश म्हणजे “जनसभांत” यहोवाची स्तुती करणे, हा आहे. (स्तो. २६:१२) ख्रिस्ती सभांमुळे आपल्याला, यहोवावर आपले किती प्रेम आहे हे दाखवण्याची आणि त्याची उपासना करण्याची संधी मिळते.
३ “सभोवार नजर ठेवून जपून चाला”: आपल्या सभांचा पवित्र उद्देश समजल्यामुळे आपल्याला, “सभोवार नजर ठेवून जपून” चालण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे आपल्याला लहानसहान कारणांवरून सभा चुकवण्याची हळूहळू सवय लागणार नाही. (इफिस. ५:१५, १६; इब्री १०:२४, २५) कौटुंबिक आराखडा तयार करताना सर्वप्रथम, तुम्ही मंडळीच्या सभांच्या वेळा लिहून त्यावर खूण करून ठेवू शकता. वेळ लिहिल्यावर, त्या वेळेत इतर कोणत्याही कामाला आड येऊ देऊ नका. सभांना उपस्थित राहणे, याला कुटुंबातील प्रत्येकजण प्राधान्य देतो, याची खात्री करा.
४ आपल्या बांधवांना, सभांना व संमेलनांना येण्यासाठी कितीतरी अडीअडचणींचा सामना करावा लागतो, हे आपण वाचतो तेव्हा आपण प्रभावित होत नाही का? तुम्हाला कदाचित त्यांच्याइतका त्रास घ्यावा लागत नसेल पण कदाचित तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागत असेल. यहोवाची उपासना करण्यास त्याच्या लोकांना दिवसेंदिवस जड जावे म्हणून सैतान खूप प्रयत्न करीत आहे. पण तुमची मुले, मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याकरता तुमचे कुटुंब दृढनिश्चियी होऊन करत असलेले प्रयत्न जरूर पाहतील, ही खात्री बाळगा. होय, असे करण्याद्वारे तुम्ही त्यांना एक आध्यात्मिक बक्षीस देऊ शकाल ज्याचा त्यांना कधीच विसर पडणार नाही.