प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग ९: विद्यार्थ्यांना अनौपचारिक साक्ष देण्याकरता तयार करणे
१ येशूच वचनयुक्त मशिहा आहे, हे आंद्रिया व फिलिप्प यांनी ओळखले तेव्हा ही आनंदाची बातमी, आपण कधी एकदाचे इतरांना सांगतो, असे त्यांना झाले होते. (योहा. १:४०-४५) तसेच आजही, बायबल विद्यार्थी शिकत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू लागतात तेव्हा त्यांनाही त्या गोष्टी इतरांना सांगण्याची उत्कंठा लागते. (२ करिंथ. ४:१३) अनौपचारिक साक्ष देण्यास आपण त्यांना उत्तेजन कसे देऊ शकतो व असे प्रभावीपणे करण्यास तयार कसे करू शकतो?
२ तुम्ही विद्यार्थ्याला विचारू शकता, की तो बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगत आहे किंवा नाही. तो त्याच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना अभ्यासाच्या वेळी येऊन बसण्यास सुचवू शकतो. त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांनी, शाळा सोबत्यांनी किंवा त्याच्या ओळखीच्या इतर कोणी आस्था दाखवली आहे का, हे त्याला विचारा. आस्था दाखवल्यास तो साक्ष देण्यास सुरूवात करू शकतो. यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल इतरांना सांगत असताना समंजसपणा, आदर व दयाळुपणा का दाखवला पाहिजे, हे त्याला समजावून सांगा.—कलस्सै. ४:६; २ तीम. २:२४, २५.
३ इतरांना आपल्या विश्वासांविषयी सांगणे: आपल्या विश्वासांविषयी इतरांना सांगताना देवाच्या वचनाचा उपयोग करण्यास बायबल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे अतिशय महत्त्वाचे आहे. अभ्यासादरम्यान, विशिष्ट मुद्द्यांच्या वेळी विद्यार्थ्याला विचारा: “तुमच्या कुटुंबाला हे सत्य समजावून सांगताना तुम्ही बायबलचा उपयोग कसा कराल?” किंवा “तुमच्या एखाद्या मित्राला हे शाबीत करून दाखवण्यासाठी तुम्ही बायबलमधील कोणते वचन दाखवाल?” तो या प्रश्नांची उत्तरे कशी देतो ते पाहा. आपण देत असलेली शिकवण ही शास्त्रवचनांवर कशी आधारित असली पाहिजे, ते त्याला दाखवा. (२ तीम. २:१५) असे करण्याद्वारे तुम्ही, विद्यार्थ्याला अनौपचारिक आणि तो पात्र ठरल्यानंतर मंडळीबरोबर संघटित प्रचार कार्यात भाग घेण्यास तयार करत आहात.
४ बायबल विद्यार्थ्यांना, विरोधाचा सामना करण्यास तयार करणे उचित आहे. (मत्त. १०:३६; लूक ८:१३; २ तीम. ३:१२) इतर जेव्हा यहोवाच्या साक्षीदारांविषयी प्रश्न विचारतात किंवा अभिप्राय व्यक्त करतात तेव्हा विद्यार्थ्याला साक्ष देण्याची संधी मिळू शकते. यहोवाचे साक्षीदार—कोण आहेत? त्यांचा काय विश्वास आहे? हे माहितीपत्रक त्यांना ‘उत्तर देण्यास सिद्ध’ करू शकते. (१ पेत्र ३:१५) या माहितीपत्रकात अचूक माहिती आहे जी, आपल्या हिताची चिंता करणाऱ्या मित्रांना व कुटुंबातील सदस्यांना, आपले बायबल आधारित विश्वास व कार्ये समजावून सांगण्यास या नवीन विद्यार्थ्यांना मदत करू शकते.