प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग ७: अभ्यासाच्या वेळी प्रार्थना करणे
१. (क) बायबल अभ्यासाची सुरुवात आणि सांगता प्रार्थनेने करणे उचित का आहे? (ख) बायबल अभ्यासाची सुरुवात आणि सांगता प्रार्थनेने केली पाहिजे, याचे आपण कारण कसे सांगू शकतो?
१ बायबल विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक प्रगती करण्याकरता, यहोवाच्या आशीर्वादांची गरज आहे. (१ करिंथ. ३:६) यास्तव, बायबल अभ्यासाच्या आधी आणि नंतर प्रार्थना करणे उचित आहे. धार्मिक स्वभावाच्या लोकांबरोबर आपण अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा अगदी पहिल्या अभ्यासापासूनच आपण प्रार्थना करायला सुरुवात करू शकतो. इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत, आपल्याला, प्रार्थनेने अभ्यासाची सुरुवात व सांगता करण्यासाठी उचित संधी शोधावी लागेल. प्रार्थना का केली पाहिजे याचे कारण सांगण्यासाठी तुम्ही स्तोत्र २५:४, ५ तसेच १ योहान ५:१४ ही वचने दाखवू शकता; आणि, येशू ख्रिस्तामार्फत यहोवाला प्रार्थना करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी तुम्ही योहान १५:१६ हे वचन दाखवू शकता.
२. एक भगिनी, बाप्तिस्मा घेतलेल्या एखाद्या बांधवाबरोबर किंवा बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकाबरोबर अभ्यासाला जाते तेव्हा प्रार्थना कोणी करावी?
२ बायबल अभ्यासाच्या वेळी कोणी प्रार्थना केली पाहिजे? बाप्तिस्मा घेतलेला एखादा बांधव, एका भगिनीबरोबर बायबल अभ्यासाला गेला असेल तर तो प्रार्थना करेल; आणि भगिनी डोक्यावर पदर घेऊन अभ्यास चालवेल. (१ करिंथ. ११:५, १०) परंतु, जर बाप्तिस्मा न घेतलेला राज्य प्रचारक एखाद्या भगिनीबरोबर अभ्यासाला गेला असेल तर, भगिनी प्रार्थना करेल. अशावेळी तिने प्रार्थना करताना आणि बायबल अभ्यास चालवताना डोक्यावर पदर घ्यावा.
३. बायबल अभ्यासात सादर केल्या जाणाऱ्या प्रार्थनांत कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करणे उचित आहे?
३ प्रार्थनेत कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असू शकतो: बायबल अभ्यासाच्या वेळी केल्या जाणाऱ्या प्रार्थना लांबलचक नव्हे तर लहान आणि मुद्देसूद असाव्यात. बायबल अभ्यासावर देवाचा आशीर्वाद मागितल्यावर व सत्य शिकण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केल्यानंतर, आपण यहोवाची स्तुती केली पाहिजे, की तो या शिक्षणाचा स्रोत आहे. (यश. ५४:१३) बायबल विद्यार्थ्याबद्दल आपल्याला मनापासून काळजी आहे, यहोवा उपयोग करत असलेल्या संघटनेबद्दल आपल्याला कदर आहे, हे प्रार्थनेतील आपल्या शब्दांवरून व्यक्त झाले पाहिजे. (१ थेस्सलनी. १:२, ३; २:७, ८) विद्यार्थी जे शिकतो त्याचा अवलंब आपल्या जीवनात करण्यासाठी तो जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद आपण मागू शकतो. यामुळे, आपण “वचनाप्रमाणे आचरण करणारे” असणे किती महत्त्वपूर्ण आहे, हे विद्यार्थ्याला समजेल.—याको. १:२२.
४. बायबल अभ्यासाची सुरुवात आणि सांगता प्रार्थनेने केल्याने कोणते फायदे मिळतात?
४ प्रार्थनेचे अनेक फायदे आहेत. प्रार्थनेमुळे यहोवाचे आशीर्वाद मिळतात. (लूक ११:१३) प्रार्थनेमुळे देवाच्या वचनाच्या अभ्यासाची गंभीरता समजते. विद्यार्थी आपल्याला प्रार्थना करताना ऐकतो, तेव्हा तो प्रार्थना करायला शिकतो. (लूक ६:४०) शिवाय, देवाबद्दलच्या प्रेमाने व त्याच्या अतुलनीय गुणांबद्दलच्या गुणग्राहकतेने ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणाने केलेल्या प्रार्थनांमुळे विद्यार्थ्याला यहोवाबरोबर निकट संबंध जोडण्यास मदत होते.