प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग ६: विद्यार्थी प्रश्न विचारतो तेव्हा
१ पद्धतशीर बायबल अभ्यास सुरू झाला की, एका विषयाहून दुसऱ्या विषयावर जाण्यापेक्षा एकावेळी एकाच बायबल शिकवणीची चर्चा करणे फायदेकारक आहे. यामुळे विद्यार्थ्याला अचूक ज्ञानाचा पक्का पाया घालता येतो आणि आध्यात्मिक प्रगती करायला मदत होते. (कलस्सै. १:९, १०) पण पुष्कळदा विद्यार्थी, अभ्यासादरम्यान वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारतात. अशावेळी काय करता येईल?
२ समजदारी दाखवा: अभ्यासाच्या माहितीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे लगेच देता येऊ शकतात. एखाद्या प्रश्नाची चर्चा पुढे होणार असेल तर ते विद्यार्थ्याला सांगणे पुरेसे असेल. परंतु, विद्यार्थ्याने समजा असा प्रश्न विचारला ज्याचा अभ्यासाच्या माहितीशी कसलाच संबंध नाही किंवा ज्याचे ठोस उत्तर देण्याकरता संशोधन करावे लागणार असेल तर अभ्यासाच्या नंतर किंवा इतर वेळी त्याचे उत्तर देणे उचित ठरेल. काही प्रचारक, विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न लिहून घेतात; यामुळे विद्यार्थ्याला ही खात्री मिळते की आपल्या प्रश्नाची दखल घेतली जात आहे. शिवाय, अभ्यासाच्या दरम्यान विषयांतर होण्याऐवजी अभ्यास सुरळीत चालू राहतो.
३ आपल्या मूलभूत बायबल अभ्यास साहित्यांत बायबलच्या अनेक शिकवणुकींची केवळ संक्षिप्त चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला विशिष्ट शिकवण स्वीकारायला कठीण वाटत असेल किंवा तो/ती आपला खोटा विश्वास सोडायला तयार नसेल तर? अशावेळी त्या विषयावर बायबल काय म्हणते त्याची चर्चा करणाऱ्या जादा साहित्याची चर्चा करणे फायद्याचे ठरेल. तरीसुद्धा विद्यार्थ्याची खात्री पटली नाही तर तो विषय तसाच सोडा आणि अभ्यास चालू ठेवा; आणि मग दुसऱ्यावेळी त्या विषयावर चर्चा करा. (योहा. १६:१२) विद्यार्थी जसजसे बायबलचे ज्ञान घेत राहील आणि आध्यात्मिक प्रगती करील तसतसे त्याला बायबल शिकवणुकी समजतील.
४ नम्र असा: तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर आपल्या मनचे उत्तर देण्याचा मोह टाळा. (२ तीम. २:१५; १ पेत्र ४:११) या विषयावर तुम्ही संशोधन कराल आणि उत्तर शोधून काढाल, असे विद्यार्थ्याला सांगा. तुम्ही कदाचित संशोधन कसे करायचे हे विद्यार्थ्यालाही शिकवू शकता. यहोवाच्या संघटनेने पुरवलेल्या संशोधन साहित्याचा उपयोग कसा करायचा ते हळूहळू त्याला/तिला दाखवा. यामुळे कालांतराने तो/ती स्वतःच्या प्रश्नांचे उत्तर स्वतःच देऊ शकेल.—प्रे. कृत्ये १७:११.