प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग ५: एकावेळी किती साहित्य विचारात घ्यावे हे ठरवणे
१ येशूने आपल्या शिष्यांना शिकवताना त्यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या; म्हणूनच त्याने “त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे” त्यांना बोध केला. (मार्क ४:३३; योहा. १६:१२) त्याचप्रकारे, आजच्या काळात देवाच्या वचनाचे शिक्षण देणाऱ्यांनीही, बायबल अभ्यास घेताना किती साहित्य एकावेळी विचारात घ्यावे हे विचारपूर्वक ठरवले पाहिजे. किती साहित्य हाताळणे योग्य ठरेल, हे शिक्षकाच्या व विद्यार्थ्याच्या ग्रहणक्षमतेवर व परिस्थितीवर अवलंबून आहे.
२ दृढ विश्वास उत्पन्न करा: काही विद्यार्थी जो विषय एकाच अभ्यास सत्रात नीट समजून घेऊ शकतात तोच विषय समजून घेण्याकरता कदाचित इतर विद्यार्थ्यांना दोन किंवा तीन सत्र आवश्यक असतील. फक्त, भर भर पुढे जाण्याच्या प्रयत्नात, विद्यार्थ्याला विषय स्पष्टपणे समजला आहे किंवा नाही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला देवाच्या वचनावर नव्यानेच निर्माण झालेल्या आपल्या विश्वासाला पुष्टी देण्याकरता ठोस आधाराची गरज असते.—नीति. ४:७; रोम. १२:२.
३ प्रत्येक आठवडी अभ्यासादरम्यान, तुमचा विद्यार्थी देवाच्या वचनातून जे शिकत आहे ते त्याला नीट समजावे व मनापासून त्याचा स्वीकार करता यावा म्हणून त्याच्यासोबत पुरेसा वेळ खर्च करा. घाईघाईने पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे तुम्ही जी मौल्यवान सत्ये शिकवत आहात त्यांचा विद्यार्थ्याला काहीच फायदा होणार नाही. मुख्य मुद्द्यांकडे लक्ष आकर्षित करण्याकरता व आपण जे शिकवतो त्याला पुष्टी देणारी मुख्य शास्त्रवचने विचारात घेण्याकरता पुरेसा वेळ द्या.—२ तीम. ३:१६, १७.
४ अभ्यासादरम्यान वाहवत जाऊ नका: घाईघाईने अभ्यास घेण्याची आपली इच्छा नसली तरीसुद्धा, आपण मुद्द्यापासून वाहवत जाणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासोबत अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला जर वैयक्तिक समस्यांविषयी सविस्तर बोलण्याची सवय असेल तर या विषयांवर अभ्यासानंतर चर्चा करण्याची तुम्ही व्यवस्था करू शकता.—उप. ३:१.
५ दुसरीकडे पाहता, कधीकधी सत्याबद्दल आपल्याला वाटणाऱ्या आवेशामुळेही अभ्यासादरम्यान आवश्यकतेपेक्षा जास्त बोलण्याची समस्या निर्माण होऊ शकते. (स्तो. १४५:६, ७) अधूनमधून एखादा अतिरिक्त मुद्दा किंवा अनुभव सांगणे हिताचे ठरू शकते; पण आपण वारंवार अशा मुद्द्यांचा समावेश केला किंवा त्यांचे लांबलचक स्पष्टीकरण दिले तर विद्यार्थ्याला बायबलच्या मूलभूत शिकवणुकींचे सुस्पष्ट ज्ञान मिळवता येणार नाही.
६ प्रत्येक अभ्यास सत्रात वाजवी प्रमाणात साहित्य विचारात घेतल्यामुळे आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना ‘परमेश्वराच्या प्रकाशात चालण्यास’ मदत करतो.—यश. २:५.