नियतकालिक दिन कार्यात तुम्ही भाग घेता का?
१ भारतात, १८ कोटींपेक्षा अधिक लोक नियमितरीत्या नियतकालिके व बातमीपत्रके विकत घेतात. ही वृत्तपत्रे मग आणखी कोट्यवधी लोक वाचतात. हे लोक टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके वाचू लागले तर ते त्यांच्याकरता किती हितकारक ठरेल! आपण नियतकालिक दिन कार्यात आवेशाने भाग घेतल्यास असे खरोखर घडू शकते.
२ आपल्या २००४ कॅलेंडरवर प्रत्येक शनिवार नियतकालिक दिन असल्याचे सूचित केले आहे. या अनुषंगाने, पुष्कळ मंडळ्यांनी नियतकालिक साक्षीकार्यासाठी एक खास दिवस ठरवला आहे. नियतकालिक दिनामुळे बरेच क्षेत्र व्यापण्याची संधी मिळते कारण नियतकालिके सादर करताना आपण दर महिन्यातील आमची राज्य सेवा यात सुचवलल्या संक्षिप्त सादरतांचा उपयोग करत असतो. इतर दिवशी आपण घरमालकाबरोबर जागतिक घडामोडींविषयी बोलण्यात, ज्या प्रकाशनाची मोहीम आहे ते प्रकाशन सादर करण्यात किंवा अपेक्षा माहितीपत्रकातून बायबल अभ्यास संचालित करण्यात पुष्कळ वेळ खर्च करतो.
३ तुमच्या मंडळीच्या नियतकालिक दिन कार्याला तुम्ही सहकार्य कसे देऊ शकाल?
◼ नियतकालिके वाचा: एका प्रवासी पर्यवेक्षकाने असे सांगितले, की त्यांच्या विभागातील सरासरी वीस प्रचारकांपैकी फक्त एक प्रचारक टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंतचे वाचन करतो. तुम्ही वाचता का? प्रत्येक लेख वाचताना स्वतःला विचारा: ‘ही माहिती कोणाला आवडू शकेल—एका आईला, एका हिंदू व्यापाऱ्याला, एका मुस्लिम युवकाला?’ नियतकालिकाच्या तुमच्या व्यक्तिगत प्रतीत, असे एखाद दोन मुद्दे अधोरेखीत करा ज्यांचा तुम्हाला नियतकालिक सादर करताना उपयोग करता येईल. मग केवळ एक किंवा दोन वाक्यातच तुम्ही त्या विषयावर घरमालकाची आस्था कशी वाढवू शकता यावर विचार करा.
◼ ठराविक संख्येत नियतकालिकांची मागणी करा: नियतकालिकांचे काम पाहणाऱ्या बांधवाला, प्रत्येक अंकाची तुम्हाला लागतील इतक्याच एका ठराविक संख्येची ऑर्डर द्या. अशाप्रकारे तुमच्याकडे व तुमच्या कुटुंबाकडे नियतकालिकांचा नियमित व पुरेसा साठा असेल.
◼ एक नियमित नियतकालिक दिन ठरवा: मंडळीने ठरवलेल्या नियतकालिक दिनांपैकी एक किंवा अधिक दिन निवडा आणि नियमितरीत्या नियतकालिक साक्षकार्यात भाग घ्या. हे शक्य नसेल तर, तुम्ही सेवेत घरोघरचे साक्ष कार्य करताना किंवा नियतकालिक मार्गासाठी जाता तेव्हा अधूनमधून रस्त्यावरील नियतकालिक साक्षकार्य करण्याचा व नियतकालिकांच्या व्यक्तिगत वाटप कार्यात भाग घेण्याचा प्रयत्न करा.
◼ एका संक्षिप्त नियतकालिक सादरतेचा सराव करा: दर महिन्याला “मासिके कशी सादर कराल” या सदरात, सादरतांचा नमुना दिला जातो. तुमच्याकडे जुनी किंवा इतर भाषेतील नियतकालिके असली तरी, चालू नियतकालिक सादर करण्याची योजना करा आणि सुचवलेल्या सादरतांशी सुपरिचित व्हा.
◼ “टेहळणी बुरूज” व “सावध राहा!” नियतकालिक सादर करण्याचे भान ठेवा: प्रवास करताना किंवा बाजारहाट करायला जाताना सोबत नियतकालिकांच्या प्रती बाळगा. तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांना, शेजाऱ्यांना, शाळासोबत्यांना किंवा शिक्षकांना ती देण्याचा प्रयत्न करा.
४ मंडळीचे वडील कशाप्रकारे मदत करू शकतील?
◼ नियतकालिक कार्याची आखणी करा: क्षेत्राच्या सर्व भागात व्यावहारिक योजना केल्याने पुष्कळांना भाग घेण्याचे उत्तेजन मिळू शकते.
◼ मेंढपाळाच्या भेटींदरम्यान मदत देणे: पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक, त्यांच्या नेहमीच्या मेंढपाळाच्या भेटींच्या वेळी, कुटुंबांना साध्या नियतकालिक सादरतांची तयारी करायला व त्यांचा सराव करायला मदत करू शकतात. पुष्कळ प्रचारकांनी उत्तम सराव केलेल्या नियतकालिक सादरतेचा उपयोग करण्याद्वारे सेवेमध्ये पहिल्यांदा बोलायला सुरवात केली.
◼ क्षेत्र सेवेच्या सभा घ्या: नियतकालिक दिनी, क्षेत्र सेवेत जाण्याआधी गटाबरोबर १० ते १५ मिनिटांसाठी चालू सादरतांची उजळणी करा.
◼ क्षेत्रात प्रचारकांबरोबर कार्य करा: असे केल्याने नियतकालिके प्रभावीपणे सादर कशी करायची हे त्यांना दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि नवीन प्रचारकांना लाभदायक प्रशिक्षणही देता येईल.
५ आणखी कोट्यवधी लोकांनी अद्याप सुवार्ता ऐकलेली नाही. फक्त एका नियतकालिकातील माहिती कदाचित त्यांना सत्य शिकण्यास प्रेरणा देणारी माहिती असू शकेल! यहोवाने आपल्याला, घोषणा करण्यासाठी रोमांचकारी संदेश दिला आहे आणि आपली नियतकालिके हा संदेश इतरांपर्यंत पोहंचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तेव्हा, येणाऱ्या दिवसांत तुम्ही नियतकालिकांचे वाटप करण्याविषयी अधिक जागरूक राहाल का? येत्या शनिवार-रविवारी तुम्ही येथे सुचवलेल्या काही सूचनांचा अवलंब कराल का? केल्यास, तुम्हाला समृद्ध आशीर्वाद मिळतील.