प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग २: अभ्यास चालवण्याआधी करावयाची तयारी
१ बायबल अभ्यासात परिणामकारक पद्धतीने शिकवणे म्हणजे केवळ दिलेल्या भागाची चर्चा करणे आणि उल्लेखलेली वचने वाचणे इतकेच नव्हे. विद्यार्थ्याच्या हृदयाला ती माहिती स्पर्श करेल अशा पद्धतीने ती मांडणे गरजेचे आहे. यासाठी त्या विशिष्ट विद्यार्थ्याला मनात ठेवून अभ्यासाची संपूर्ण तयारी करणे आवश्यक आहे.—नीति. १५:२८.
२ तयारी कशी करावी: सर्वात आधी त्या व्यक्तीबद्दल व तिच्या गरजांबद्दल यहोवाला प्रार्थना करा. विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत पोचण्यास यहोवाची मदत मागा. (कलस्सै. १:९, १०) यानंतर, मुख्य विषय काय आहे हे स्पष्टपणे समजून घेण्याकरता, क्षणभर अध्यायाच्या अथवा पाठाच्या शीर्षकाकडे, उपशीर्षकांकडे व चित्रे इत्यादी असल्यास त्यांकडे लक्ष द्या. स्वतःला प्रश्न विचारा, ‘या माहितीचे उद्दिष्ट काय आहे?’ असे केल्यामुळे अभ्यास घेतेवेळी, तुम्हाला मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यास साहाय्य होईल.
३ यानंतर, संपूर्ण साहित्यातील परिच्छेदांची क्रमवार उजळणी करा. छापील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि केवळ मुख्य शब्दांना व वाक्यांशांना अधोरेखित करा. उल्लेखलेली शास्त्रवचने त्या विशिष्ट परिच्छेदाच्या मुख्य मुद्द्याशी कशाप्रकारे संबंधित आहेत याचे परीक्षण करा आणि अभ्यासादरम्यान कोणती वचने वाचायची ते ठरवा. समासात संक्षिप्त टिपा लिहून घेणेही साहाय्यक ठरू शकते. देवाच्या वचनातून आपण काय शिकत आहोत हे विद्यार्थ्याला स्पष्टपणे समजले पाहिजे.—१ थेस्सलनी. २:१३.
४ विद्यार्थ्याच्या गरजांनुरूप माहिती जुळवून घेणे: यानंतर, खास त्या विद्यार्थ्याला मनात ठेवून पाठातील माहिती विचारात घ्या. तो कोणते प्रश्न विचारू शकतो, आणि कोणते मुद्दे समजण्यास अथवा स्वीकारण्यास त्याला कठीण जाऊ शकते याविषयी विचार करा. स्वतःला प्रश्न विचारा: ‘आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी त्याने काय समजून घेण्याची अथवा कोणत्या मुद्द्यावर कार्य करण्याची गरज आहे? या माहितीने त्याच्या हृदयाला स्पर्श करावा म्हणून मला ती कशाप्रकारे मांडता येईल?’ तद्नुसार तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीत फेरबदल करा. कधीकधी, विशिष्ट मुद्दा अथवा शास्त्रवचन विद्यार्थ्याला नीट समजण्यासाठी एखादे उदाहरण, स्पष्टीकरण किंवा अनेक विचारप्रवर्तक प्रश्न तयार करण्याची आवश्यकता आहे असे कदाचित तुम्हाला आढळेल. (नहे. ८:८) पण जिचा मुख्य विषयाशी थेट संबंध नाही अशा अनावश्यक माहितीचा समावेश करण्याचा मोह टाळा. अभ्यासाच्या शेवटी मुख्य मुद्द्यांची फेरउजळणी केल्यास विद्यार्थ्याला ते आठवणीत ठेवण्यास सोपे जाईल.
५ नवीन व्यक्ती नीतिमत्त्वाचे फळ उत्पन्न करून यहोवाचे गौरव करतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! (फिलिप्पै. १:११) हे ध्येय साध्य करण्यास त्यांना मदत करण्यासाठी, बायबल अभ्यास घेण्याआधी प्रत्येक वेळी उत्तम तयारी करण्यास विसरू नका.