“हर्षाने परमेश्वराची सेवा करा”
१. यहोवाच्या सेवकांना कोणत्या गोष्टीमुळे आनंद वाटतो?
१ “प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा” असे प्रेषित पौलाने लिहिले. (फिलिप्पै. ४:४) सुवार्ता सांगण्याचा आणि मेंढरासमान लोकांना यहोवाची उपासना करण्यास मदत करण्याचा आपल्याला जो सन्मान मिळाला आहे त्यामुळे आपल्याला खूप आनंद वाटतो. (लूक १०:१७; प्रे. कृत्ये १५:३; १ थेस्सलनी. २:१९) परंतु कधीकधी आपल्याला सेवेत आनंद मिळत नाही असे वाटू लागते तेव्हा आपण काय करू शकतो?
२. आपल्याला मिळालेली कामगिरी ही कोणाकडून मिळाली आहे यावर लक्ष केंद्रित ठेवल्याने आपल्याला आनंद कसा मिळू शकतो?
२ देवाने नियुक्त करून दिलेले कार्य: प्रचार कार्याची कामगिरी ही यहोवाकडून आपल्याला मिळालेली आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. “देवाचे सहकारी” होऊन राज्याचा संदेश सांगण्याचा व शिष्य बनवण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे. (१ करिंथ. ३:९) पुन्हा कधी न होणाऱ्या या कार्यात ख्रिस्त येशूही आपल्याबरोबर आहे. (मत्त. २८:१८-२०) स्वर्गदूतही सक्रियपणे या कार्यात आपल्याबरोबर गोवलेले आहेत आणि आज होणाऱ्या महान आध्यात्मिक कापणीच्या कामात ते आपल्याबरोबर कार्य करत आहेत. (प्रे. कृत्ये ८:२६; प्रकटी. १४:६) या कार्याला यहोवाचा पाठिंबा आहे याचा बिनचूक पुरावा, शास्त्रवचनांवरून आणि देवाच्या लोकांच्या अनुभवावरून पाहायला मिळतो. त्यामुळे, आपण प्रचार कार्याला जातो तेव्हा वास्तविकतेत “देवाच्या द्वारे . . . देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे” असे होतो. (२ करिंथ. २:१७) आनंदाचे किती हे ठोस कारण!
३. आपल्या सेवेतील आनंद टिकवून ठेवण्यात प्रार्थनेची काय भूमिका आहे?
३ देवाच्या सेवेतील आनंद टिकवून ठेवण्याकरता प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे. (गलती. ५:२२) आपण देवाचे कार्य केवळ त्याच्या शक्तीनिशीच करू शकत असल्यामुळे, त्याच्या आत्म्यासाठी आपण त्याला कळकळीने विनंती करू शकतो, कारण जे त्याच्याकडे मागतात अशांना तो सढळ हाताने देतो. (लूक ११:१३; २ करिंथ. ४:१, ७; इफिस. ६:१८-२०) आपल्या सेवेविषयी प्रार्थना केल्यामुळे आपल्याला, नकारात्मक प्रतिसाद मिळतो तेव्हा उचित दृष्टिकोन ठेवण्यास मदत मिळते. प्रार्थनेमुळे आपण धैर्याने व आनंदाने प्रचार करीत राहू.—प्रे. कृत्ये ४:२९-३१; ५:४०-४२; १३:५०-५२.
४. चांगली तयारी केल्याने सेवेतील आपला आनंद कसा वाढू शकतो आणि काही व्यावहारिक मार्ग कोणते आहेत ज्यांची आपण तयारी करू शकतो?
४ चांगली तयारी करा: सेवेत आपला आनंद वाढवण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे आपण चांगली तयारी केली पाहिजे. (१ पेत्र ३:१५) अशी तयारी करण्याकरता जास्त वेळ लागत नाही. चालू नियतकालिकांसाठी सुचवलेल्या सादरता पाहायला किंवा तुम्ही सादर करू इच्छिणाऱ्या प्रकाशनासाठी उचित असलेली सादरता पाहायला केवळ काही मिनिटे लागतात. उचित प्रस्तावनेसाठी, तुम्ही युक्तीवाद पुस्तकाचा किंवा आमची राज्य सेवा हिचे जुने अंक पाहू शकता. काही राज्य प्रचारकांना, एका लहानशा कागदावर, संक्षिप्त सादरता लिहून ठेवल्याने मदत झाली आहे. मग ते वेळोवेळी या कागदावरील सादरतेवर ओझरती नजर टाकतात. यामुळे त्यांची मानसिक चलबिचल कमी होते आणि धैर्याने प्रचार करण्यास आत्मविश्वास मिळतो.
५. आनंदामुळे आपल्याला आणि इतरांना लाभ कसा होतो?
५ आनंदामुळे अनेक लाभही मिळतात. आनंदी मनोवृत्तीमुळे आपण आपला संदेशही आनंदाने सादर करतो. आनंदामुळे आपल्याला सहन करण्याची शक्ती मिळते. (नहे. ८:१०; इब्री १२:२) या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे, आपल्या आनंदी सेवेमुळे यहोवाचे गौरव होते. यास्तव, आपण “हर्षाने परमेश्वराची सेवा” करू या.—स्तो. १००:२.