पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करा
१ जीवनाचा आस्वाद आणखी आनंदाने व दीर्घकाळ घेण्यासाठी आपल्या हृदयाची काळजी घेण्याकरता आजकाल बरीच माहिती उपलब्ध आहे. आपल्या लाक्षणिक हृदयाची काळजी घेणे तर याहूनही महत्त्वाचे आहे. म्हणून, २००४ सालच्या सेवा वर्षादरम्यान आपण आनंद लुटलेल्या खास संमेलन दिवसाचा विषय किती उचित होता: “पूर्ण हृदयाने यहोवाची सेवा करणे.” (१ इति. २८:९, पं.र.भा.) या कार्यक्रमातून आपण काय शिकलो?
२ या संमेलनात विभागीय पर्यवेक्षकांनी “उत्सुक मनाने यहोवाची सेवा करण्यास इतरांना मदत करणे,” या विषयावर चर्चा केली. मुलाखतींमध्ये या गोष्टीवर जोर देण्यात आला, की लोकांमध्ये आस्था निर्माण केल्यामुळे व यहोवाची सेवा करू इच्छिणाऱ्या लोकांबरोबर बायबल अभ्यास संचालित केल्यामुळे मिळणारा आनंद अतुलनीय आहे. काहींना, यहोवाच्या जवळ या (इंग्रजी), या पुस्तकातून अभ्यास घेतल्यानंतर यहोवाच्या जवळ येण्यास मदत मिळाली आहे. तुम्हालाही असाच अनुभव आला आहे का? श्रोत्यांमधील सर्वांना, “एका त्रस्त जगात आपल्या हृदयाचे रक्षण करणे,” या विषयावर पाहुण्या वक्त्याने दिलेल्या पहिल्या भाषणातून सांत्वन व उत्तेजन मिळाले, यात शंका नाही. बाप्तिस्म्याच्या भाषणानंतर सकाळचा कार्यक्रम समाप्त झाला.
३ दुपारी, “मदतीचा हात पुढे करणे” या भागात, आपण सेवेमध्ये नवीन, अशक्त व अक्रियाशील बंधूभगिनींना कशाप्रकारे मदत करू शकतो ते सांगण्यात आले. पालक आपल्या मुलांच्या हृदयांचे वाईट प्रभावांपासून संरक्षण कसे करू शकतात व यहोवाच्या जवळ येण्यास मदत कशी करू शकतात? “यहोवाची आवड बाळगण्यास आपल्या मुलांना मदत करा” असा विषय असलेल्या भाषणात, व्यावहारिक सूचना देण्यात आल्या आणि हे कसे करता येईल ते दाखवण्यात आले.
४ आपले लाक्षणिक हृदय निरोगी व मजबूत ठेवण्याकरता यहोवा करत असलेल्या प्रत्येक तरतूदीचा आपण फायदा घेत आहोत का? पाहुण्या वक्त्याच्या शेवटल्या भाषणाचा विषय होता: “यहोवाची सेवा नेहमी पूर्ण हृदयाने करा.” या भाषणात, आपल्या आध्यात्मिक नित्यक्रमाच्या चार महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तुम्हाला ते चार पैलू आठवतात का? मनपूर्वक प्रार्थना करण्यासाठी, देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी, आवेशाने प्रचार करण्यासाठी आणि इतर ख्रिश्चनांबरोबर सहवास राखण्यासाठी तुम्ही किती वेळ खर्च करता व प्रयास करता? या क्षेत्रांत आपण प्रगती करू शकतो का?
५ “तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनांकडे लाव,” असे आमंत्रण यहोवा आपल्याला देतो. (नीति. २३:१२) संमेलनात शिकलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा अवलंब केल्याने तुम्हाला पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने यहोवाची सेवा करण्याची शक्ती मिळेल.