व्यवहारचातुर्याचा उपयोग करून सुवार्ता सादर करणे
१ अनेक राज्यांत जातीय दंगली वाढत चालल्यामुळे, इतर धर्मांविषयी बोलताना लोक जास्तच संवेदनशील झाले आहेत, असे आमच्या पाहण्यात आले आहे. हे ‘शेवटले दिवस’ आहेत आणि या दिवसांत लोक, “फिरून मैत्री संपादन करता न येणारे, . . . आत्मसंयमन न करणारे, क्रूर, . . . अहंकारी,” असे होतील असे पौलाने सांगितले. (२ तीम. ३:१-४, सुबोध भाषांतर.) तेव्हा, यहोवाच्या लोकांनी सुवार्ता सांगताना व्यवहारचातुर्याचा उपयोग करण्याची गरज आहे हे स्पष्ट होते.
२ व्यवहारचातुर्य म्हणजे काय? एका शब्दकोशात व्यवहारचातुर्याची व्याख्या पुढीलप्रकारे करण्यात आली आहे: “इतरांबरोबर चांगले संबंध राखण्यासाठी किंवा इतरांना न दुखावण्यासाठी एखाद्या कठीण अथवा नाजूक प्रसंगी, काय व कसे बोलावे याची अचूक जाणीव.” होय, ख्रिस्ती या नात्याने सर्व जातीच्या लोकांबरोबर चांगले संबंध राखण्याची आपली इच्छा आहे आणि कोणाचेही मन विनाकारण दुखावण्याची आपली इच्छा नाही. यास्तव, ‘शक्य तर सर्व माणसांबरोबर आपल्याकडून होईल तितके आपण शांतीने राहू या.’—रोम. १२:१८.
३ पौलाचे आपल्यापुढे उत्तम उदाहरण आहे; तो व्यवहारचातुर्य असलेला ख्रिस्ती साक्षीदार होता. अथैनेकरांशी बोलताना त्याने, त्यांच्या मूर्तीपूजेबद्दल आणि अनेक खोट्या दैवतांच्या उपासनेबद्दल त्यांची खरडपट्टी काढली नाही किंवा त्यांचा धिक्कार केला नाही; अर्थात या गोष्टींची त्याला चीड होती तरीसुद्धा त्याने असे केले नाही. (प्रे. कृत्ये १७:१६) या लोकांना अनेक दैवतांची आवड असल्याचे पाहून पौलाने अतिशय दक्षतेने आपल्या भाषणासाठी याच विषयावर प्रस्तावना निवडली.—प्रे. कृत्ये १७:२२-३१.
४ स्वतःच्या धार्मिक समाजाचा अभिमान असलेल्या लोकांशी आपली भेट घडते तेव्हा ते आपला हा अभिमान कदाचित आपल्याला बोलूनही दाखवतील. अशा वेळी आपण काय करू शकतो? आपण व्यवहारचतुर असले पाहिजे. आपलेच म्हणणे पुढे मांडण्याचे, आक्रमक किंवा टीकाखोर होण्याचे आपण टाळले पाहिजे. उलट, शक्य असेल तर दोघांचे एकमत होईल असे मुद्दे शोधण्याचा आपण प्रयत्न करून त्यावरच चर्चा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला संदेश स्वीकारत नसलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देण्याची गरज नाही.
५ चांगले ऐकणारे व्हा: व्यवहारचतुर होण्यामध्ये याचा देखील समावेश होतो. आपल्याला बोलत राहायला सोपे वाटेल, पण व्यवहारचातुर्य वापरून आपण घरमालकाला त्याचे विचार, मत मांडायला सांगतो तेव्हा आपल्याला त्याचे विचार कळतात. प्रश्न विचारणे देखील खूप फायदेकारक आहे पण यात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे; आपण असे कोणतेही प्रश्न विचारू नयेत ज्याचे उत्तर द्यायला त्याला कठीण वाटेल. तर, त्याच्या मनात काय आहे हे जाणण्यासाठी व त्याला बोलते करण्यासाठी आपण प्रश्न विचारू शकतो.
६ आपल्या बोलण्यावरून व चेहऱ्यावरील हावभावावरून, आपल्याला लोकांबद्दल काळजी आहे, प्रेम आहे आणि त्यांच्याबरोबर आपण मैत्री करू इच्छितो हे प्रकट होत असेल तर बहुतेक लोकांना हे चटकन दिसेल आणि ते आपल्याला चांगला प्रतिसाद देतील. पौलाचा सल्ला नेहमी लक्षात ठेवा: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे ते तुम्ही समजावे.”—कलस्सै. ४:६.