संवादी व्हा!
१ प्रचार आणि शिष्य बनवण्याची कामगिरी पार पाडण्यासाठी आपल्याला इतरांना माहिती प्रदान करावी लागते. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) मित्रांमध्येसुद्धा कधीकधी सुसंवाद साधणे आव्हानात्मक ठरू शकते. मग, अनोळखी लोकांना सुवार्ता सांगायला कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतील?
२ आधी अनोळखी मग मित्र: सेवेमध्ये भेटणाऱ्या लोकांच्या जागी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण समजू शकतो, की आजच्या जगात, काही लोकांना अनोळखी लोकांना पाहून शंका येते किंवा भीती वाटते. यामुळे संवाद होत नाही. तेव्हा तुम्ही सुरवातीलाच लोकांना वाटणाऱ्या या भीतीवर कशाप्रकारे मात करू शकता? त्यांच्याबरोबर बोलायला सुरवात करण्याआधी आपल्या शालीन पेहरावावरूनच आपण खरे तर त्यांच्याशी संवाद करतो. आपला सभ्य पोशाख आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व पाहून लोकांच्या मनातली भीती कुठल्या कुठे पळून जाऊ शकते.—१ तीम. २:९, १०.
३ संवाद साधण्याचा दुसरा मार्ग आहे, शांत, मैत्रीपूर्ण बोलण्याची ढब. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनातसुद्धा घालमेल होत नाही, आणि ती ऐकायला उत्सुक होते. यासाठी चांगल्या तयारीची आवश्यकता आहे. आपण कशावर बोलणार आहोत हे आपल्याला चांगल्याप्रकारे माहीत असते तेव्हा आपण स्वतःही निवांत असतो. आपली ही शांत मनःस्थिती पाहून इतरजण आपल्या संदेशाकडे आकर्षित होऊ शकतात. साक्षीदारांच्या भेटीविषयी एका स्त्रीने असे म्हटले: “मला तिचा तो हसमुख चेहरा आणि शांत मनःस्थिती चांगली आठवते. मी तिचं बोलणं ऐकायला आतुर झाले होते.” अशाप्रकारे त्या स्त्रीला सुवार्ता ऐकण्याची संधी मिळाली.
४ आकर्षक गुण: आपण लोकांमध्ये प्रामाणिक आस्था घेतली पाहिजे. (फिलिप्पै. २:४) असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, केवळ आपण बोलत राहू नये. कारण संवादात ऐकणे देखील समाविष्ट असते. आपण घरमालकांना त्यांचे मनोगत विचारतो आणि लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकतो तेव्हा त्यांना जाणीव होते, की आपल्याला खरोखरच त्यांच्याबद्दल काळजी वाटते. तेव्हा, घरमालक बोलत असताना, तुम्ही तयार केलेल्या सादरतेकडे संभाषण वळवण्याची घाई करू नका. शक्य असेल तर मनापासून त्यांची प्रशंसा करा आणि ते जे काही बोलतात त्यानुसार चर्चा वाढवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला, त्यांना नेमकी कशाची काळजी वाटते हे समजल्यास त्यानुसार मग तुम्ही त्यांच्याशी संवाद करू शकता.
५ लीनता आणि नम्रता या गुणांमुळे सुरळीत संवाद होऊ शकतो. (नीति. ११:२; प्रे. कृत्ये २०:१९) येशू “मनाचा सौम्य व लीन” असल्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. (मत्त. ११:२९) पण, स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या मनोवृत्तीमुळे लोक आपल्यापासून दूर पळतील. तेव्हा, आपल्याजवळ सत्य आहे हे आपल्याला ठामपणे माहीत असले तरी, आपण जे बोलतो तेच खरे, अशा आविर्भावात बोलण्याचे आपण सुज्ञपणे टाळावे.
६ घरमालकाच्या बोलण्यावरून त्याचे विश्वास बायबलच्या शिकवणुकींपासून अगदीच वेगळे असे वाटत असल्यास काय करावे? त्याची चूक दाखवून देण्याचे आपले कर्तव्य आहे का? होय, परंतु हे पहिल्याच भेटीत नव्हे तर हळूहळू आपण करू शकतो. सहसा, घरमालकाला स्वीकारायला कठीण जातील अशा बायबलच्या शिकवणुकी सांगण्यास सुरवात करण्याआधी, घरमालक आणि आपण बाळगत असलेल्या समान विचारांवर आपण बोलू शकतो. यासाठी धीर आणि व्यवहारचातुर्याची आवश्यकता आहे. याबाबतीत पौलाने, अरीयपगाच्या न्यायाधीशांना साक्ष देताना उत्तम उदाहरण मांडले.—प्रे. कृत्ये १७:१८, २२-३१.
७ या सर्वांहून अधिक म्हणजे, निःस्वार्थ प्रेम आपल्याला प्रभावी संवादी होण्यास मदत करेल. येशूप्रमाणे, आपल्याला देखील ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारख्या गांजलेल्या व पांगलेल्या’ लोकांबद्दल कळवळा वाटला पाहिजे. (मत्त. ९:३६) यामुळे आपल्याला त्यांना सुवार्ता सांगण्याची व जीवनाच्या मार्गावर येण्यास मदत करण्याची प्रेरणा मिळते. आपला संदेश हा प्रीतीचा संदेश आहे तेव्हा आपण तो प्रेमळ मार्गाने सांगू या. असे केल्याने आपण विश्वातील प्रमुख संवादी यहोवा देव आणि येशू ख्रिस्त यांचे अनुकरण करतो.