प्रचार कार्यातला तुमचा आनंद द्विगुणीत करा
१ लोकांना सुवार्ता सांगण्यात मिळणारा आनंद—तुम्हाला सेवा करताना मिळतो का? आपण सावध राहिलो नाही तर, आपल्या सभोवार असलेल्या जगामुळे आपल्याला प्रचारकार्यात जायला भीती वाटू शकेल; यामुळे प्रचारकार्यात आपल्याला आनंद मिळणार नाही. लोक ऐकत नाहीत अशा क्षेत्रात काम केल्यामुळे देखील आपला आवेश थंड पडू शकतो. तेव्हा, प्रचारकार्यातला आनंद वाढवण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो?
२ सकारात्मक असा: सकारात्मक मनोवृत्ती बाळगल्याने आपल्याला खरोखरच मदत होऊ शकते. असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, “देवाचे सहकारी” होण्याचा आपल्याला जो विशेषाधिकार मिळाला आहे त्यावर मनन करणे. (१ करिंथ. ३:९) आपण हे कार्य करत असताना येशूही आपल्याबरोबर आहे. (मत्त. २८:२०) देवदूतांच्या सैन्यासह तो आपल्या पाठीशी आहे. (मत्त. १३:४१, ४९) तेव्हा आपल्या प्रयत्नांना देवाकडून मार्गदर्शन मिळते ही खात्री आपण बाळगू शकतो. (प्रकटी. १४:६, ७) त्यामुळे काही लोक आपल्या कार्याला चांगला प्रतिसाद देत नसले तरी आपल्याला स्वर्गातून मिळणारा प्रतिसाद जास्त आनंदविणारा आहे!
३ चांगली तयारी करा: चांगली तयारीसुद्धा आपल्या आनंदात भर टाकते. सेवेसाठी तयारी करायची म्हणजे आपल्याला खूप काही करायची गरज नाही. चालू मासिकांतील किंवा महिन्याच्या साहित्य सादरतेतील एखाद्या लक्षवेधक मुद्द्यावर विचार करायला फक्त काही मिनीटे लागतात. आमची राज्य सेवा यांतील “मासिके कशी सादर कराल?” या सदरांतील एखादी सादरता निवडा. जानेवारी २००२ अंकातील “क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या सादरता” ही पुरवणी पाहा. किंवा, प्रभावकारी सादरतेसाठी युक्तिवाद (इंग्रजी), पुस्तक पाहा. घरमालक सहसा अमुक एका गोष्टीवर नेहमी आक्षेप घेत असतात असे तुम्हाला आढळून येते तेव्हा, त्यांची शंका दूर होईल असे उत्तर तयार करा व एखाद्या लक्षवेधक विषयावर त्यांचे लक्ष आकर्षित करा. असे करण्यात युक्तिवाद पुस्तक अतिशय फायदेकारक आहे. या सर्व मदतदायी साहित्यांचा उपयोग केल्याने आपल्याला आनंदाने प्रचार कार्य करण्याचे धाडस मिळू शकते.
४ कळकळीने प्रार्थना करा: कायमस्वरूपी आनंद मिळण्यासाठी प्रार्थना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण यहोवाचे कार्य करत असल्यामुळे, आपण त्याच्या आत्म्यासाठी त्याच्याजवळ विनंती केली पाहिजे; आनंद, त्याच आत्म्याचे एक फळ आहे. (गलती. ५:२२) यहोवा आपल्याला प्रचार कार्य करीत राहण्यासाठी शक्ती देईल. (फिलिप्पै. ४:१३) आपल्या सेवेबद्दल यहोवाला प्रार्थना केल्याने, आपल्याला जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हाही उचित दृष्टिकोन बाळगण्यासाठी मदत होऊ शकते. (प्रे. कृत्ये १३:५२; १ पेत्र ४:१३, १४) आपल्याला भीती वाटत असते तेव्हा प्रार्थना केल्याने, धैर्याने व आनंदाने सेवा करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते.—प्रे. कृत्ये ४:३१.
५ संधी तयार करा: आपण लोकांना भेटून त्यांना साक्ष देतो तेव्हा आपली सेवा जास्त आनंदी होते, हे निश्चित आहे. नेहमीच्या वेळेला नव्हे तर एका वेगळ्या समयी, कदाचित दुपारी किंवा संध्याकाळी घरोघरी जाण्याची योजना केल्यास तुम्हाला चांगले यश मिळू शकते. रस्त्यावरून जाताना, खरेदारीसाठी जाताना, बसमधून प्रवास करताना किंवा बागेत फेरफटका मारताना तुम्हाला नेहमी लोक भेटतील. एक संक्षिप्त सादरता तयार करून, मैत्रीपूर्ण वाटणाऱ्या लोकांशी बोलण्यास पुढाकार घेऊन तुम्ही ती त्यांना सादर करू शकता. किंवा, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक शाळेत तुम्हाला अनेक लोकांशी बोलण्याची संधी मिळत असेल. लोकांची आस्था जागृत होईल असा शास्त्रवचनातील एखादा विषय काढून तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळू शकेल. जानेवारी २००२ च्या आमची राज्य सेवा यांतील पुरवणीच्या पहिल्या पानावर उत्तम सूचना आहेत. यांपैकी कोणत्याही सूचनेने एखाद्याला प्रचारकार्यातील आपला आनंद वाढवता येऊ शकतो.
६ आनंदामुळेच आपल्याला सहन करण्याची ताकद मिळत असल्यामुळे हा आनंदच कायम टिकवून ठेवणे किती महत्त्वाचे आहे! असे केल्याने आपल्याला, पुन्हा कधी केल्या न जाणाऱ्या कार्याच्या शेवटी एक मोठे प्रतिफळ मिळू शकेल. प्रतिफळाची ही आशाच प्रचारकार्यातील आपला आनंद वाढवू शकते.—मत्त. २५:२१.