आध्यात्मिक आहाराविषयी तुमच्या सवयी कशा आहेत?
१ ‘खाण्याच्या सवयीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो,’ अशी एक म्हण आहे. खरेच, आपल्या खाण्याच्या सवयी ज्याप्रकारे असतील त्याप्रकारे आपली शारीरिक शक्ती व आरोग्य असेल. येशूने म्हटले: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” याचा अर्थ, आपल्या आध्यात्मिक आहाराच्या सवयींचा आपल्या आध्यात्मिक आरोग्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. (मत्त. ४:४) तेव्हा, तुम्ही आध्यात्मिक आहार कसा घेता? खाण्याच्या बाबतीत तुम्ही खूप नखरे करता का? तुम्हाला घाईघाईने खायला आवडते की नियमित, संतुलित व पोषक आध्यात्मिक अन्न हळूहळू चावून खायला जास्त आवडते?
२ आहाराचे परीक्षण: यहोवा देव, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी यथाकाळी’ “मिष्टान्नाची मेजवानी” देतो. (मत्त. २४:४५; यश. २५:६) या प्रेमळ योजनेचा पूर्ण लाभ आपल्याला हवा असेल तर आपण ते आध्यात्मिक अन्न वेळच्या वेळी खाण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
३ तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘मी दररोज दैनिक वचन आणि त्याखालील माहिती वाचतो का? मी दररोज बायबल वाचून त्यावर मनन करतो का? सभांमध्ये ज्या विषयांवर चर्चा होणार आहे त्याची मी पूर्व तयारी करतो का? मी अलीकडच्या मासिकांत आलेले सर्व लेख वाचून काढले आहेत का?’
४ येशूने असे अभिवचन दिले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असलेले धन्य. . . . जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.” (मत्त. ५:३, ६, NW) उत्तम आध्यात्मिक आहार घेतल्याने तुम्ही आध्यात्मिकरीत्या अधिक ताकदवान व सुदृढ व्हाल.