शिष्टाचार—देवाच्या लोकांचा खास गुण
१ आजच्या जगात फार तुरळक लोकांना शिष्टाचार माहीत आहेत. असे का? लोकांचे जीवन इतके घाईगडबडीचे झाले आहे, की त्यांना “कृपया,” “धन्यवाद,” किंवा “माफ करा,” यांसारखे मूलभूत शिष्टाचार पाळण्यासाठीही वेळ नाही. देवाच्या वचनात, शेवटल्या दिवसांत लोकांची वागणूक बिघडत जाईल याविषयी भाकीत करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे, की लोक ‘स्वार्थी, बढाईखोर, गर्विष्ठ, उपकार न स्मरणारे, असंयमी, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे, हूड’ असे होतील. (२ तीम. ३:१-४) या सर्व गुणांमुळे एखादी व्यक्ती असभ्यपणे वागते. परंतु देवाचे लोक या नात्याने ख्रिश्चनांनी, इतरांबद्दल अनादर दाखवण्याची जगिक मनोवृत्ती आत्मसात न करण्याविषयी दक्ष असले पाहिजे.
२ शिष्टाचार म्हणजे नेमके काय? इतरांच्या भावनांची बारकाईने जाणीव ठेवणे, इतरांबरोबर सलोख्याने राहण्याची क्षमता याला शिष्टाचार म्हणतात. समंजसपणा, आदर, दयाळुपणा, सभ्यता, व्यवहारचातुर्य व विचारीपणा, हे सर्व गुण शिष्टाचाराचे वेगवेगळे पैलू आहेत. देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीत हे गुण आपल्याला पाहायला मिळतात. (लूक १०:२७) हे गुण दाखवायला आपल्याला पैसे पडत नाहीत; परंतु इतरांबरोबर आपले संबंध सुधारण्याकरता मात्र अतिशय मौल्यवान ठरतात.
३ येशू ख्रिस्ताने याबाबतीत आपल्यापुढे एक परिपूर्ण उदाहरण मांडले. तो नेहमी या सुवर्ण नियमाप्रमाणे वागला: “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीहि त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) येशूचा आपल्या शिष्यांशी केलेला समंजस व प्रेमळ व्यवहार पाहून आपल्याला आश्चर्य वाटत नाही का? (मत्त. ११:२८-३०) त्याची चांगली वागणूक, शिष्टाचाराविषयीचे नियम असलेल्या पुस्तकातील नियमांचे पालन केल्यामुळे नव्हती. तर ती त्याच्या प्रामाणिक व उदार अंतःकरणातून होती. त्याच्या या उत्तम उदाहरणाचे आपणही अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
४ ख्रिश्चनांनी कोणकोणत्या प्रसंगी शिष्टाचार दाखवण्याची गरज आहे? फक्त खास प्रसंगी, म्हणजे लोकांवर छाप पाडायची असते तेव्हा? की, इतरांना प्रभावीत करण्यासाठी? नाही. आपण सर्ववेळी शिष्टाचार पाळले पाहिजेत. मंडळीत आपण एकमेकांबरोबर संगती करतो तेव्हा कोणत्या काही खास मार्गांद्वारे आपण शिष्टाचार दाखवू शकतो?
५ राज्य सभागृहात: राज्य सभागृह हे आपल्या उपासनेचे ठिकाण आहे. यहोवा देवाने आपल्याला आमंत्रण दिलेले असते. त्याअर्थी, आपण त्याचे पाहुणे असतो. (स्तो. १५:१) आपण राज्य सभागृहात येतो तेव्हा आदर्श पाहुणे असतो का? आपली वेशभूषा व केशभूषा यांकडे आपण उचित लक्ष देतो का? गबाळा किंवा फारच भपकेबाज पेहराव आपण निश्चितच टाळला पाहिजे. अधिवेशनांना जाताना असो किंवा मंडळीच्या साप्ताहिक सभांना जाताना असो, देवाचा आदर करण्याचा दावा करणाऱ्यांना शोभेल अशाप्रकारे पेहराव करणारे लोक म्हणून यहोवाच्या लोकांची प्रशंसा केली जाते. (१ तीम. २:९, १०) अशाप्रकारे, आपल्याला आमंत्रित करणाऱ्या स्वर्गीय देवाच्या आणि इतर आमंत्रित पाहुण्यांच्या प्रती आपण आदर व विचारशीलपणा दाखवतो.
६ सभांच्या बाबतीत शिष्टाचार दाखवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सभांसाठी वेळेवर येणे. हे नेहमीच सोपे नसते हे कबूल आहे. काही जण सभागृहापासून खूप दूर राहत असतील किंवा मोठे कुटुंब असल्यामुळे काहींना तयार व्हायला वेळ लागत असेल. परंतु, काही मंडळ्यांमध्ये असे पाहण्यात आले आहे, की २५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रचारकांना सुरवातीचे गीत व प्रार्थना संपल्यावर येण्याची जणू सवयच जडली आहे. ही एक गंभीर बाब आहे. शिष्टाचाराचा संबंध इतरांच्या भावनांची कदर करण्याशी आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मनःपूर्वक निमंत्रण देणाऱ्या यहोवा देवाने आपल्या लाभास्तव या आध्यात्मिक मेजवानीचे आयोजन केले आहे. शिवाय, सभांना वेळेवर येऊन आपण त्याला कृतज्ञता व कदर दाखवू शकतो. शिवाय, सभांना उशीरा आल्याने इतरांचे लक्ष विचलित होते आणि लवकर आलेल्या बंधूभगिनींचा अनादर होतो.
७ आपण सभेला येतो तेव्हा नवीन लोकांकडे लक्ष देतो का? नवीन लोकांचे स्वागत करणे हा शिष्टाचाराचा एक भाग आहे. (मत्त. ५:४७; रोम. १५:७) विनम्र अभिवादन, प्रेमळपणे हातात हात देणे किंवा एक स्मितहास्य—या अगदी लहानसहान गोष्टी आहेत; परंतु याच गोष्टी आपण खरे ख्रिस्ती असल्याची ओळख करून देण्यात भर पाडतात. (योहा. १३:३५) पहिल्यांदाच राज्य सभागृहात आलेल्या एका मनुष्याने म्हटले: “मी लहानाचा मोठा ज्या चर्चमध्ये झालो तेथे मला पूर्णपणे अनोळखी लोकांकडून कधीही असे निःस्वार्थ प्रेम मिळाले नाही, जे मला इथे पहिल्याच दिवशी मिळाले. मला सत्य मिळालं आहे, हे मला स्पष्टपणे कळलं.” या मनुष्याने त्याच्या जीवनात बदल केले आणि अवघ्या सात महिन्यांनंतर त्याने बाप्तिस्मा घेतला. होय, शिष्टाचाराचे दूरगामी परिणाम होऊ शकतात!
८ अनोळख्यांबरोबर जर आपण सभ्यतेने वागतो तर ‘विश्वासाने एका घरचे झालेल्यांबरोबर विशेषतः’ वागू नये का? (गलती. ६:१०) “वृध्दाला [किंवा वृद्धेला] मान दे” हे तत्त्व या ठिकाणी लागू होते. (लेवी. १९:३२) सभांमध्ये यांच्याकडे केव्हाही दुर्लक्ष होता कामा नये.
९ लक्ष देऊन ऐकणे: मंडळीच्या सभांदरम्यान, देवाचे ख्रिस्ती सेवक आपली उभारणी करण्याकरता आध्यात्मिक कृपादान देण्याच्या उद्देशाने बोलत असतात. (रोम. १:११) तेव्हा, सभांमध्ये आपण जर डुलक्या घेत असू, काही खात असू, च्युईंगम चघळत असू, शेजारी बसलेल्यांबरोबर वारंवार कुजबूज करत असू, प्रसाधनगृहाला विनाकारण फेऱ्या मारत असू, कार्यक्रमाशी संबंधित नसलेले साहित्य वाचत असू किंवा भलतेच काहीतरी करत असू तर यावरून निश्चितच, आपण शिष्टाचार पाळत नाही हे स्पष्टपणे दिसेल. याबाबतीत वडिलांनी सर्वांपुढे उत्तम उदाहरण मांडले पाहिजे. ख्रिस्ती सभ्यता आपल्याला स्टेजवरून भाषण देणाऱ्या बांधवाचे भाषण पूर्ण लक्ष देऊन ऐकण्याद्वारे त्याला आणि तो सादर करत असलेल्या बायबल आधारित संदेशाला आदर दाखवण्यास प्रेरित करेल.
१० याशिवाय, वक्ता आणि श्रोते यांचा विचार करून, इलेक्ट्रॉनिक पेजर आणि मोबाईल फोन यांमुळे आपल्या सभांमध्ये व्यत्यय येणार नाही याची आपण खबरदारी घेऊ.
११ शिष्टाचार व मुले: पालकांनी सतत आपल्या मुलांच्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे. लहान मूल रडू लागते किंवा सभांमध्ये चुळबूळ करते व त्यामुळे इतरांचे लक्ष विचलित होत असेल तर पालकांनी त्याला शांत करण्यासाठी होता होईल तितक्या लवकर सभागृहाच्या बाहेर न्यावे. असे करणे कधीकधी कठीण असू शकते; परंतु असे केल्याने तुम्ही हे दाखवाल की तुम्हाला इतरांच्या भावनांची कदर आहे. काही पालक, चुळबूळ करणाऱ्या लहान मुलांना घेऊन राज्य सभागृहाच्या शेवटच्या ओळीत बसतात. यामुळे शक्यतो फार कमी लोकांना त्रास होतो आणि सभेदरम्यान गरज पडल्यास पालक आपल्या मुलांना बाहेरही लगेच घेऊन जाऊ शकतात. अर्थात, मंडळीतील इतर बंधूभगिनींची इच्छा असेल तर, मागची ओळ अशा कुटुंबांसाठी ठेवून ते त्यांच्याबद्दल विचारशीलपणा दाखवू शकतात.
१२ पालकांनी सभांआधी आणि सभांनंतरही आपल्या मुलांच्या वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांनी सभागृहाच्या आत धावपळ करू नये; यामुळे अपघात होऊ शकतात. सभागृहाच्या बाहेरही, खासकरून संध्याकाळी अंधार पडायला लागल्यावर धावपळ करणे धोकेदायक ठरू शकते. मोठमोठ्याने बोलल्याने शेजाऱ्यांना त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या उपासनेबद्दलही नकारात्मक विचार केला जाऊ शकतो. सभागृहाच्या आत आणि बाहेर आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रशंसा केली पाहिजे. कारण, यामुळे ऐक्याने एकत्र आलेल्या बंधुभगिनींचा सहवास आणखीनच सुखदायक वाटतो.—स्तो. १३३:१.
१३ पुस्तक अभ्यासात: मंडळीच्या सभांसाठी आपले घर खुले करणाऱ्या बांधवांच्या आदरातिथ्याची आपल्या सर्वांना कदर आहे. यास्तव, अशा बांधवांच्या घरी सभेसाठी आपण जातो तेव्हा आपण त्यांच्या मालमत्तेची काळजी घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे. घरात शिरण्यापूर्वी आपण बाहेरील पायपूसावर आपले बूट/चप्पल व्यवस्थित पुसले पाहिजेत जेणेकरून घरातील कारपेट किंवा फरशी घाण होणार नाही. पुस्तक अभ्यासासाठी जितकी जागा ठरवली आहे त्या जागेतच आपली मुले बसली आहेत की नाही याची खात्री पालकांनी केली पाहिजे. पुस्तक अभ्यास गट, लहान असेल आणि वातावरण घरच्यासारखेच असल्यामुळे पुस्तक अभ्यासासाठी आलेल्या बांधवांनी याचा गैरफायदा घेऊन, आपल्या मर्यादा ओलांडू नयेत. मुलाला जेव्हा शौचालयाला जायचे असते तेव्हा पालकांपैकी एकाने मुलाबरोबर जावे. तसेच, पुस्तक अभ्यास देखील मंडळीच्या सभांपैकी एक असल्यामुळे आपण राज्य सभागृहात जाताना ज्याप्रकारे पेहराव करतो त्याचप्रकारे पुस्तक अभ्यासासाठी देखील केला पाहिजे.
१४ शिष्टाचार पाळणे महत्त्वाचे आहे: ख्रिस्ती व्यक्ती शिष्टाचार पाळत असल्यास, सेवेवर त्याचा चांगला परिणाम होतोच शिवाय इतरांबरोबरचा आपला नातेसंबंध देखील चांगला राहतो. (२ करिंथ. ६:३, ४, ६) आपण आनंदी देवाचे उपासक असल्यामुळे, सर्वांबरोबर हसमुख व प्रसन्न राहायला, इतरांना आनंद होईल अशी लहानसहान प्रेमळ कार्ये करायला आपल्याला जड वाटू नये. अशाप्रकारच्या सभ्य गुणांमुळे देवाचे लोक या नात्याने आपले जीवन अधिक सुखकर होईल.