पालकांनो—आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावा
१ चांगल्या सवयी आपोआप किंवा एकाएकी लागत नाहीत. त्यातल्या त्यात, मुलांना चांगल्या सवयी लावायला पुष्कळ वेळ लागतो. चांगल्या सवयी हळूहळू, टप्प्याटप्प्याने शिकवाव्या लागतात. ‘आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्यासाठी’ पालकांना सातत्याने प्रयत्न करावा लागतो.—इफिस. ६:४.
२ बालपणापासून सुरवात करा: अगदी लहान बालकांची नवीन गोष्टी शिकण्याची आणि करण्याची क्षमता उल्लेखनीय असते. सहसा प्रौढांना एखादी नवीन भाषा शिकायला फार जड जाते; परंतु, अद्याप शाळेत न जाणारी लहान बालके एकसाथ दोन-तीन भाषा सहजासहजी शिकू शकतात. म्हणून, चांगल्या सवयी लावण्यास आपले मूल अजून खूपच लहान आहे असा विचार करू नका. बायबलमधील सत्याची शिकवण लवकर द्यायला सुरवात केली आणि ती नियमितपणे दिली तर दोन-तीन वर्षांचे होईस्तोवर त्या बालकाचे मन ‘तारणासाठी ज्ञानी करणाऱ्या’ माहितीने भरून जाईल.—२ तीम. ३:१५.
३ क्षेत्र सेवेची सवय लावा: कोवळ्या वयातच देवाच्या राज्याच्या सुवार्तेची नियमितपणे घोषणा करण्याची चांगली सवय मुलांना लावली पाहिजे. पुष्कळ पालक आपल्या मुलांना तान्ही बाळे असतानाच घरोघरच्या सेवाकार्याकरता सोबत नेतात आणि अशाप्रकारे त्यांना ही सवय लावतात. पालकांनी साक्षकार्यात नियमित सहभाग घेतल्यामुळे मुलांच्या मनात सेवाकार्याबद्दल कदर आणि आवेश निर्माण होतो. क्षेत्र सेवेच्या प्रत्येक पैलूत कशी साक्ष द्यावी याविषयी पालक मुलांना शिकवू शकतात.
४ ईश्वरशासित सेवा प्रशालेत सहभाग घेतल्यानेही मुलांना मदत होते. कारण मुलांना चांगला अभ्यास करण्याची आणि अर्थ समजून वाचन करण्याची सवय लागते. बायबलबद्दल चर्चा करायला, पुनर्भेटी द्यायला आणि बायबल अभ्यास चालवायला ते शिकतात. असे शिक्षण त्यांना पायनियरींग करायला आणि सेवेचे खास विशेषाधिकार मिळवायला प्रेरणा देऊ शकते. अनेक बेथेल सदस्य आणि खास पायनियरांना सेवा प्रशालेतील पूर्वीचे दिवस आठवतात. त्यांच्या मते, प्रशालेत भाग घेतल्यामुळे त्यांना चांगल्या सवयी लावायला मदत मिळाली.
५ आपण सर्वजण महान कुंभार, यहोवा याच्या हातातल्या मातीसारखे आहोत. (यश. ६४:८) चिखल जितका ओला तितकेच आकार देणे सोपे जाते. तो जास्त वेळ ठेवल्यास सुकून कडक होतो. हेच सवय लावण्याच्याबाबतीतही आहे. मुले जितकी लहान असतील तितके बरे कारण लहान मुलांना वळण देणे सोपे असते. कोवळ्या वयातच ते संस्कारक्षम असतात. त्या वयात दिलेल्या संस्कारांमुळे एकतर त्यांचे भविष्य घडते नाहीतर बिघडते. तर मग, एक जबाबदार पालक या नात्याने आपल्या मुलांना ख्रिस्ती सेवेच्या चांगल्या सवयी लावायला होता होईल तितकी लवकर सुरवात करा.