तुम्ही पवित्र गोष्टींची कदर बाळगता का?
१ या प्रश्नाचे आपण लगेच “होय” असे उत्तर देतो. यहोवा देवाने या पवित्र गोष्टी आपल्यासाठी दिल्या आहेत. पण त्या पवित्र गोष्टी कोणत्या आहेत हे आधी आपण समजून घेतले पाहिजे.
२ पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला त्याच्याशी व्यक्तिगत नातेसंबंध जोडण्याची परवानगी दिली आहे. याबद्दल आपण त्याचे किती आभार मानतो! तो आपल्याला आश्वासन देतो, की आपण ‘जर त्याच्या जवळ गेलो तर तोही आपल्याजवळ येईल.’ (याको. ४:८) दुसरी गोष्ट म्हणजे, येशू ख्रिस्ताचे खंडणी बलिदान. यामुळेच मानवजातीला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली आहे. (योहा. ३:१६) या अमूल्य देणगीबद्दल आपल्या प्रार्थनेद्वारे दररोज आपण यहोवाचे आभार मानतो.
३ तिसरी गोष्ट आहे, देवाचे प्रेरित वचन बायबल. तसेच, यहोवाची पृथ्वीवरील संघटना देखील त्याच्या पवित्र देणग्यांपैकी एक आहे. बायबलच्या तत्त्वांचे व ईश्वरशासित व्यवस्थेचे पालन करण्याद्वारे, आपल्या ख्रिस्ती बांधवांवर प्रेम करण्याद्वारे व यहोवाच्या संघटनेत जे पुढाकार घेतात त्यांना सहकार्य देण्याद्वारे आपण यहोवाने दिलेल्या पवित्र गोष्टींची कदर करतो हे दाखवतो.—१ पेत्र १:२२.
४ आणि चौथी गोष्ट म्हणजे, विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी मिळणारे भरपूर आध्यात्मिक अन्न. “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनातूनही आपल्याला आध्यात्मिक अन्नाची मेजवानी तसेच काही महत्त्वपूर्ण सूचना मिळणार आहे. शिवाय आपल्याला ख्रिस्ती सहवासही लाभणार आहे. पण, या सर्व पवित्र गोष्टींबद्दल आपण मनापासून कदर कशी दाखवू शकतो?
५ देवाचे मंदिर सोडू नका: जेरुसलेमच्या भिंतींची पुनर्बांधणी करणाऱ्यांना नहेम्याने सांगितले: ‘आपल्या देवाचे मंदिर सोडू नका.’ (नहे. १०:३९) आज, यहोवाचे “मंदिर” म्हणजे उपासनेकरता त्याने केलेली व्यवस्था. यामध्ये आपल्या प्रांतीय अधिवेशनांचाही समावेश होतो. या व्यवस्थेकडे आपण दुर्लक्ष करू नये; तर तेथे हजर राहून मिळणाऱ्या प्रत्येक सूचनेकडे लक्ष देऊ. याद्वारे आपण यहोवाने दिलेल्या पवित्र गोष्टींबद्दल कदर व्यक्त करू शकतो. (इब्री. १०:२४, २५) या अधिवेशनाचा पुरेपूर फायदा घेण्याकरता आपण आतापासूनच कोणत्या योजना करू शकतो?
६ तिन्ही दिवस उपस्थित राहा: सर्वांनी तिन्ही दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता आतापासूनच योजना कराव्यात. तिन्ही दिवशी लवकर येण्याची आणि रविवारी शेवटच्या प्रार्थनेपर्यंत उपस्थित राहण्याची तुम्ही योजना करत आहात का? असे केल्याने तुमचा खूप लाभ होईल. सर्वांनाच सहजपणे अधिवेशनाला उपस्थित राहता येणार नाही, हे कबूल आहे. कदाचित तुम्हाला तुमच्या कामातून तीन दिवसांची रजा घ्यावी लागेल. तसेच, अधिवेशनाला जाणेयेणेही कदाचित सोयीचे नसेल. पण निराश होऊ नका. अधिवेशनाला कसेही करून उपस्थित राहण्याची योजना आखा आणि आतापासूनच प्रयत्नास लागा.
७ उल्लेखनीय उदाहरण: गेल्या वर्षी, एका आफ्रिकन राष्ट्रात अंतर्गत युद्ध चालले असल्यामुळे तंग वातावरण होते. तेथील आपले काही बांधव प्रांतीय अधिवेशनाला चालले होते. जात असताना त्यांना एका सैनिकी गटाने थांबले व विचारले, “तुम्ही कोण आहात, आणि कुठं चाललाय?” बांधवांनी त्यांना उत्तर दिले: “आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि आम्ही आमच्या प्रांतीय अधिवेशनाला चाललोय.” एका सैनिकाने म्हटले: “तुम्हा यहोवाच्या साक्षीदारांना तर कशाचीच भीती वाटत नाही. बरं जा. तुमचे अधिवेशन चांगले होईल. पण सैनिकांपासून जरा सावध राहा. नेहमी रस्त्याच्या मधून चाला. लोकांचा घोळका दिसला तरीसुद्धा, रस्त्याच्या मधूनच चाला.” साक्षीदारांनी असेच केल्यामुळे ते सुरक्षितपणे अधिवेशनाच्या ठिकाणी पोहंचले. या बांधवांनी पवित्र गोष्टींबद्दल कदर बाळगल्यामुळे त्यांना किती चांगले प्रतिफळ मिळाले!
८ आफ्रिकेतील आपल्या बांधवांप्रमाणे आपल्यालाही काही ना काही समस्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळेस आपणही त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करू शकतो आणि येणाऱ्या प्रांतीय अधिवेशनातील सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा निश्चय करू शकतो. आपल्याला काही अडचणी असतील तर यहोवाकडे प्रार्थनेद्वारे मार्गदर्शन मागू शकतो. अधिवेशनाला उपस्थित राहण्याकरता तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना तो जरुर यश देईल.
९ आशीर्वाद: देवाच्या वचनाप्रमाणे चालल्यानेच आपले तारण होऊ शकते हे माहीत असल्यामुळे आपण देवाचे वचन ऐकण्याची तीव्र इच्छा बाळगतो. (१ पेत्र २:२) येणाऱ्या प्रांतीय अधिवेशनाला आपण उपस्थित राहिलो तर देवाच्या वचनावरील आपला विश्वास आणखी पक्का होईल व यामुळे आपण सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकू. शिवाय, आपण यहोवाला आणि इतर लोकांना हे दाखवून देऊ, की आपण पवित्र गोष्टींची कदर करतो आणि आपण ‘माघार घेणाऱ्यांपैकी नाही तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत.’—इब्री. १०:३९; १२:१६; नीति. २७:११.
१० यहोवा देव लवकरच आकाश कपाटे उघडून आपल्यावर खूप आध्यात्मिक आशीर्वादांचा वर्षाव करेल. (मला. ३:१०) तेव्हा, “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” या प्रांतीय अधिवेशनाच्या सुरवातीपासून म्हणजे शुक्रवार सकाळपासून रविवारच्या कार्यक्रमापर्यंत अर्थात शेवटच्या “आमेनपर्यंत” होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ध्येयच ठेवा. असे केल्याने तुम्ही अत्यंत आनंदाने घरी परताल!