एप्रिल २०००—आपल्यासाठी आजवरचा खास महिना ठरो
१ बुधवार एप्रिल, १९ हा दिवस आपल्या संपूर्ण सेवा वर्षाचा एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस ठरणार आहे. या दिवशी संध्याकाळी, सूर्य हळूहळू मावळतीला जात असताना जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांची हरएक मंडळी, हरएक समूह ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी पार पाडेल. अर्थात, आपल्या येथे कोणत्या का वेळी सूर्यास्त होवो, येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे स्मरण करणे ही आपल्याकरता वर्षभरातली एक वैशिष्ट्यपूर्ण घटना असेल. २००० कॅलेंडर ऑफ जेहोवाज व्हिटनेसेस यात एप्रिल महिन्यातील ही तारीख ठळक अक्षरात दाखवण्यात आली आहे.
२ आपल्या एकुलत्या एका पुत्राचे बलिदान देऊन यहोवाने आपल्यावर जे असीम प्रेम दाखवले आहे त्याबद्दल जिवेभावे कृतज्ञता दाखवण्याची एक अद्भुत संधी एप्रिल महिन्यात आपल्याला मिळेल. मग, ही कृतज्ञता आपण कशी दाखवू शकतो? प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले; आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की, जे जगतात त्यांनी पुढे स्वतःकरिता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे.” (२ करिंथ. ५:१४, १५) होय, देव राज्याचे प्रचारक या नात्याने आपण स्वतःकरता नव्हे तर जो आपल्यासाठी मरण पावला त्याच्याकरता जीवन जगून कृतज्ञता दाखवू शकतो. अशाप्रकारे, एप्रिल २००० हा आजवरचा एक खास महिना ठरेल!
३. एप्रिलमध्ये सहायक पायनियरिंग करण्यासाठी अर्ज भरा: प्रचार कार्याच्या बाबतीत प्रेषित पौलाचा उत्तम आदर्श आपल्यासमोर आहे. त्याने म्हटले: “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (प्रे.कृत्ये २०:२४) यहोवा देवाविषयीची सुवार्ता सांगण्यात हिरिरीने आणि पूर्णार्थाने सहभाग घेण्याची हीच सुसंधी आपल्यासमोर आहे. म्हणूनच, एप्रिल महिन्यात सहायक पायनियरिंग केल्यास आपल्यासाठी आजवरचा तो एक खास महिना ठरेल!
४ विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात ५ सप्ताह आहेत. तेव्हा, पायनियरिंग करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ आणखी कोणती असू शकते! एप्रिल १९९८ मध्ये आपण सहायक पायनियर कार्यात एक अभूतपूर्व उच्चांक गाठला होता. त्यावेळी २,१७० लोकांनी म्हणजे एकूण प्रचारकांपैकी १२ टक्के प्रचारकांनी सहायक पायनियर सेवा केली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९९९ च्या ऑगस्ट महिन्यात सेवा अहवाल देणाऱ्या एकूण प्रचारकांची संख्या १७ टक्क्यांपेक्षाही जास्त होती. याचा अर्थ, सहायक पायनियरांचा उच्चांक मागे टाकण्यासाठी आता भरपूर वाव आहे. त्यातच, पायनियरांना भरावे लागणारे तास कमी केल्यामुळे जास्तीत-जास्त लोकांना पायनियरींग करता येण्यासारखे आहे. तेव्हा, एप्रिल महिन्यात आपण सहायक पायनियरिंग करू शकतो की नाही याचा प्रत्येक प्रचारकाने प्रार्थनापूर्वक विचार करावा.
५ पुढच्या महिन्यात पायनियरिंग करण्यासाठी पूर्वयोजना करताना तुम्ही २००० कॅलेंडरवरचा एप्रिल महिना पाहू शकता. महिन्याच्या कोणकोणत्या दिवशी तुम्ही सेवेला जाणार आहात ते प्रथम ठरवा. तसेच, या संबंध महिन्यात तुम्हाला सेवेचे किती तास भरून काढता येतील ते मोजा. यात औपचारिक साक्षकार्यासोबतच अनौपचारिक साक्षकार्याचे तास मोजायला विसरू नका. मोजलेले तास सहायक पायनियरांच्या तासांच्या अपेक्षेच्या म्हणजे ५० तासांच्या आसपास येतात का? नसल्यास, तुमच्या आराखड्यात काही बदल करून सहायक पायनियरिंगसाठी तुम्हाला वेळ काढता येईल का? महिन्याभरात ५० तास भरून काढण्यासाठी तुम्हाला दररोज सरासरी केवळ १ तास आणि ४० मिनिटे सेवा करावी लागेल.
६ सहायक पायनियरांप्रमाणेच सामान्य पायनियरांचेही तास कमी केल्यामुळे तुम्ही पूर्ण-वेळेची सेवा हाती घेण्याचा विचार करत आहात का? एप्रिल महिन्यात दिवस मोठा असल्यामुळे पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याची हीच संधी आहे! दर महिन्याला ७० तास भरून काढता येतील की नाही अशी शंका वाटत असल्यास एप्रिल महिन्यात प्रथम सहायक पायनियरिंग करून त्या महिन्यात ७० तास भरून काढण्याचे ध्येय ठेवा. आणि ७० तास भरून काढणे फारसे अवघड नाही हे लक्षात आल्यावर मग सामान्य पायनियरिंगसाठी अर्ज भरण्यास तुम्ही लगेच तयार व्हाल.—आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे ११३-१४ पाहा.
७. प्रचारक या नात्याने पूर्णार्थाने सहभाग घ्या: प्रचारक असो अथवा पायनियर असो, देवासाठी आणि शेजाऱ्यांसाठी आपल्या मनात असलेले खरे प्रेम यहोवाच्या सेवेत आपल्या परीने होता होईल तितके जिवेभावे करण्यास आपल्याला प्रवृत्त करते. (लूक १०:२७) आणि यावरून आपण हेच दाखवून देतो, की ‘आपण श्रम व खटपट करितो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आपण आशा ठेवली आहे.’ (१ तीम. ४:१०) राज्य प्रचाराच्या कार्यात प्रत्येकाने सहभाग घेतल्यास एप्रिल महिन्यात आपण १०० टक्के सहभागाची अपेक्षा करू शकतो.
८ या बाबतीत येशूने दिलेली सूचना कधीही विसरू नका. त्याने म्हटले: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” त्यानंतर लगेच येशूने १२ प्रेषितांना जवळ बोलावून त्यांना प्रचाराच्या कामावर पाठवले. (मत्त. ९:३७, ३८; १०:१, ५, ७) एक वर्षानंतर हे १२ प्रेषित प्रचाराच्या कामात प्रवीण झाल्यावर येशूने “आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले.” यांनाही त्याने हीच सूचना दिली: “पीक फार आहे . . . म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” (लूक १०:१, २) त्यांच्या या प्रार्थनांचे यहोवाने कशाप्रकारे उत्तर दिले त्याबद्दल बायबलमधील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. तिथे म्हटले आहे, की सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ पर्यंत शिष्यांची संख्या १५० च्या आसपास पोहंचली होती. त्यानंतर एका पाठोपाठ एक असे ३,००० आणि ५,००० शिष्यांचे उच्चांक गाठले गेले. (प्रे. कृत्ये १:१५; २:४१; ४:४) आणि पुढे “शिष्यांची संख्या फार वाढत गेली.” (प्रे. कृत्ये ६:७) आपणही अधिकाधिक राज्य प्रचारकांसाठी धन्याला प्रार्थना करत राहिले पाहिजे आणि प्रार्थनेसोबत मंडळीतील प्रत्येक प्रचारकाने दर महिन्याला क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी निश्चित योजना केली पाहिजे.
९ आपल्या २००० कॅलेंडरवरील एप्रिल महिन्याकडे पुन्हा एकवार लक्ष द्या. एप्रिल महिन्याचे पहिले दोन दिवस शनिवार आणि रविवार आहेत याची नोंद घ्या. मग, महिन्याची सुरवातच चांगली व्हावी म्हणून या दोन्ही दिवशी तुम्ही क्षेत्र सेवेत सहभाग घेऊ शकता का? या सबंध महिन्यात तुमच्या पुस्तक अभ्यास गटासोबत तुम्ही हरएक ‘नियतकालिक दिवसात’ सहभाग घेऊ शकाल का? तसेच, दर रविवारी एक-दोन तास जास्त सेवा करणे तुम्हाला जमेल का? वर्षाच्या या काळात दिवस मोठा असल्यामुळे संध्याकाळी बऱ्याच वेळानंतर काळोख होऊ लागतो. मग, संध्याकाळी साक्षकार्य करण्याची काही व्यवस्था तुम्ही करू शकाल का? याशिवाय, नोकरीच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजात आणि दिवसभरात निरनिराळी कामे करत असताना अनौपचारिक कार्य करण्याचे विसरू नका. तुम्ही कोणकोणत्या दिवशी क्षेत्र सेवेत जाऊ शकता त्याची कॅलेंडरच्या एप्रिल महिन्यावर खूण करा आणि या संबंध महिन्यात क्षेत्रात खर्च केलेल्या वेळेची नोंद ठेवण्यासाठी कॅलेंडरचा उपयोग करा.
१० बाप्तिस्मारहित प्रचारक म्हणून वडिलांकडून मान्यता मिळालेल्या कार्यक्षम प्रचारकांना आपल्या सेवेची सुरवात करण्याचा हा एक उत्तम समय आहे. तुमच्या बायबल विद्यार्थ्यांविषयी काय? सुवार्तेचे प्रचारक बनण्यासाठी मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांशी स्वतः जाऊन बोलण्याइतकी प्रगती त्यांनी केली आहे का? तसेच, तुमच्या मुलांचा अद्याप बाप्तिस्मा झाला नसेल तर प्रचार कार्य सुरू करण्यासाठी ही एक चांगली वेळ असू शकते; मग, त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी तुम्ही वडिलांशी बोलला आहात का?—आपली सेवा करण्यासाठी संघटित पुस्तकातील पृष्ठे ९७-१०० पाहा.
११ एप्रिल २००० हा एक खास महिना व्हावा म्हणून प्रत्येकाने आवर्जून सेवा कार्यात सहभाग घ्यावा आणि महिन्याच्या शेवटी न विसरता आपला सेवा अहवाल द्यावा. (पडताळा मार्क ६:३०.) नव्याने क्षेत्र सेवा करणाऱ्या बाप्तिस्मारहित प्रचारकांना वेळच्या वेळी आपला सेवा अहवाल देण्याचे उत्तेजन दिले जावे. सेवा अहवाल वेळच्या वेळी देऊन एप्रिल महिन्यात होणाऱ्या सेवाकार्यात तुम्ही मोलाचा हातभार लावू शकता तसेच आपल्या परिश्रमी साक्षकार्याद्वारे यहोवाची महान स्तुती करणाऱ्यांमध्ये तुम्ही देखील सामील असाल.
१२ इतरांना स्मारक विधीला घेऊन या: ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला लोकांची अभूतपूर्व उपस्थिती पाहून तुम्हाला अत्यानंद होणार नाही का? निश्चित! पूर्वी कधी नव्हते इतके लोक यहोवा परमेश्वराने आणि येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या प्रेमाच्या महान अभिव्यक्तींबद्दल कृतज्ञता दाखवण्यास आलेले असतील! (योहा. ३:१६; १५:१३) तेव्हा, स्मारक विधीला उपस्थित राहण्यासाठी ज्या काही योजना करता येतील त्या करा. कुठल्याही परिस्थितीत स्मारक विधी चुकवू नका.
१३ लोकांना स्मारक विधीचे आमंत्रण देण्याची हीच वेळ आहे. तुम्हाला ज्यांना बोलवण्याची इच्छा आहे अशांची यादी तयार करा. यात, पूर्वी कधी बायबल अभ्यास करत असलेल्यांची, सध्या अभ्यास करत असलेल्यांची आणि ज्या कोणाची तुम्ही पुनर्भेट घेता अशांची नावे लिहा. त्यासोबतच, नोकरीच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजात, तुमच्या परिसरात तसेच व्यवसायाच्या निमित्ताने ज्या लोकांसोबत तुमचा संपर्क येतो अशा सर्व परिचितांची नावे यादीत लिहा. आणि हो, तुमच्या इतर मित्र-मंडळीची आणि नातेवाईकांचीही नावे लिहायला विसरू नका. यादी तयार केल्यानंतर प्रत्यक्ष भेटून प्रत्येकाला हार्दिक आमंत्रण द्यायला सुरू करा. स्मारक विधी नेमका कोणत्या तारखेला, कुठे आणि किती वाजता होईल याची अचूक माहिती द्या. आणि जसजशी एप्रिल १९ ची तारीख जवळ येते तसतसे प्रत्येकाला प्रत्यक्ष किंवा मग फोनवरून पुन्हा आठवण करून द्या. स्मारक विधीच्या दिवशी संध्याकाळी त्यांना घेऊन जाण्याची व्यवस्था तुम्ही करू शकता याची त्यांना कल्पना द्या म्हणजे ते तुमच्यासोबत येतील.
१४ संस्थेने आधी दिलेल्या सूचनेनुसार, सर्व अक्रियाशील बंधुभगिनींना स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे उत्तेजन देण्यासाठी वडीलवर्ग विशेष प्रयत्न करील. (मत्त. १८:१२-१४) यासाठी वडिलांनी संस्थेकडून आलेले फेब्रुवारी २, १९९९ चे पत्र वाचावे. पत्रात म्हटल्यानुसार, मंडळीच्या सचिवाने सर्व अक्रियाशील प्रचारकांची यादी तयार करावी. मग, अशा सर्व अक्रियाक बांधवांची भेट घेऊन त्यांना स्मारक विधीचे आमंत्रण देण्यासाठी सेवा पर्यवेक्षक वडिलांना नेमतील. त्यानंतर लवकरात लवकर मेंढपाळकत्वाच्या उत्तेजनात्मक भेटी दिल्यास या अक्रियाक बांधवांना एप्रिलपासूनच सेवेत पुन्हा क्रियाशील होण्यासाठी आवश्यक मदत करता येईल. एखाद्या अनुभवी प्रचारकासोबत त्यांना क्षेत्र सेवेत पाठवल्यास त्यांना निश्चित उत्तेजन मिळेल.
१५ सर्वांना हातभार लावण्याचे उत्तेजन द्या: मंडळीतील सर्व वडिलांनी, सेवा सेवकांनी आणि कुटुंब प्रमुखांनी सहकार्य केल्यास एप्रिल २००० हा नक्कीच आजवरचा एक खास महिना ठरेल. सर्व गोष्टींचे संघटन करण्यासाठी आणि पुढाकार घेण्यासाठी मंडळीतले वडील परिश्रम करतील. (इब्री. १३:७) सप्ताहाच्या दिवशी आणि सप्ताहांती क्षेत्र सेवेच्या सभांसाठी व्यावहारिक योजना करण्याची गरज आहे. यासोबत, दुपारच्या आणि संध्याकाळच्या कार्यासाठी देखील क्षेत्र सेवा सभांची योजना केली जाऊ शकते. एप्रिल महिन्यात सेवाकार्यासाठी जो आराखडा तयार केला जाईल तो मंडळीच्या सूचना फलकावर लावला जावा. तसेच, क्षेत्र सेवेच्या सभा घेण्यासाठी कोणा बांधवाला नेमले जावे. एनवेळी क्षेत्र कमी पडू नये म्हणून प्रत्येक गटाला पुरेसे क्षेत्र नेमून द्यावे.
१६ एप्रिल महिन्यात आपण सावध राहा! आणि टेहळणी बुरूज मासिके लोकांना देणार आहोत. परंतु, गृह बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आस्था दाखवणाऱ्या लोकांना अपेक्षा माहितीपत्रक दिले जाऊ शकते. तेव्हा, मासिकांचा आणि माहितीपत्रकांचा पुरेसा साठा जवळ ठेवा.
१७ महिना अखेरीस सर्व पुस्तक अभ्यास संचालकांनी आणि त्यांच्या सहायकांनी सेवेत सहभाग घेतलेल्या सर्व प्रचारकांचा सेवा अहवाल गोळा करावा. आपल्या गटातील प्रत्येक व्यक्तीला महिना संपताच आपला सेवा अहवाल देण्याचे उत्तेजन ते देतील. कदाचित, रविवारी एप्रिल ३० रोजी हे केले जाऊ शकते. शेवटी, सर्व अहवाल संकलित करताना एखाद्या प्रचारकाने अहवाल दिलेला नाही हे सचिवाच्या लक्षात येताच त्याने संबंधित व्यक्तीला मे ६ तारखेच्या आधी आपला अहवाल देण्याची प्रेमाने आठवण करून द्यावी. कारण या तारखेला मंडळीचा अहवाल संस्थेला पाठवावा लागतो. क्षेत्र सेवेच्या अहवालासंदर्भात प्रचारकांशी संपर्क साधण्यासाठी सचीव पुस्तक अभ्यास संचालकांची मदत घेऊ शकतात.
१८ यहोवाच्या लोकांसाठी स्मारक विधीचा समय हा अत्यंत महत्त्वाचा समय असतो. यहोवाच्या सेवेत असणाऱ्या आम्हा सर्वांसाठी हा एक व्यस्त समय असेल. सुवार्तेचा प्रचारक या नात्याने प्रत्येकाने सेवेत शक्य तितका सहभाग घेतल्यास, शक्य असल्यास सहायक पायनियरिंग केल्यास आणि इतरांना ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला घेऊन येण्यासाठी प्रयत्न केल्यास हा काळ जरूर सर्वांसाठी यहोवाच्या सेवेत व्यस्त राहण्याचा काळ ठरेल. एप्रिल २००० हा महिना आजवरचा एक खास महिना ठरावा म्हणून परिश्रम करत असतानाच या कार्यावर यहोवाचा समृद्ध आशीर्वाद असो अशी मनःपूर्वक प्रार्थना आपण करू या आणि देवाची स्तुती व गौरव करू या!—इब्री. १३:१५.
[३ पानांवरील संक्षिप्त आशय]
सहायक पायनियर
अभूतपूर्व उच्चांक: २,१७०
(एप्रिल १९९८)
[४ पानांवरील चौकट]
एकूण प्रचारक
अभूतपूर्व उच्चांक:२१,२१२
(ऑगस्ट १९९९)
[५ पानांवरील चौकट]
स्मारक विधीची उपस्थिती
आपला अभूतपूर्व उच्चांक: ४७,०८१
(१९९९)