सुवार्तेचा प्रचार दृढ विश्वासाने करणे
१ येशू ख्रिस्ताने पहिल्या शतकाच्या सुरवातीला आपल्या अनुयायांना देवराज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची आणि “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवण्याची आज्ञा दिली होती. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) येशूच्या या आज्ञेचे यहोवाच्या साक्षीदारांनी अगदी प्रामाणिकपणे पालन केले आहे. त्यामुळे, २० व्या शतकाच्या शेवटी, २३४ राष्ट्रांमध्ये शिष्यांची संख्या ५९,००,००० च्याही पुढे गेल्यामुळे जगभरातील आपल्या ख्रिस्ती बंधुत्वामध्ये विलक्षण वाढ झाली आहे. यावरून, आपल्या स्वर्गीय पित्याची, यहोवाची किती स्तुती होत आहे याचा अंदाज येत नाही का?
२ आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या आपल्या अतिमहत्त्वपूर्ण कार्यात काही ना काही विघ्न आणण्यासाठी आपला शत्रू सैतान दबा धरूनच बसलेला असतो. येशूने नेमून दिलेल्या कार्यापासून आपले लक्ष विचलित करण्यासाठी, आपला वेळ वायफळ खर्च करण्यासाठी आणि आपल्याला शिणवून टाकण्यासाठी तो अनावश्यक अशा नानाविध चिंता-काळज्या आपल्या वाट्याला आणतो. पण, कोणत्या गोष्टीला आपण जीवनात प्रथम स्थान द्यावे हे जगाने आपल्याला सांगायला नको. कारण देवाच्या वचनानुसार, यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालणे हेच काय ते आपले कर्तव्यकर्म आहे. (रोम. १२:२) यहोवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याचा अर्थ, ‘सुवेळी अवेळी वचनाची घोषणा करणे आणि आपल्याला सोपविलेली सेवा पूर्ण करणे’ असा होतो.—२ तीम. ४:२, ५.
३ दृढ विश्वास विकसित करा: सर्व ख्रिश्चनांना ‘देवाची संपूर्ण इच्छा दृढ विश्वासानिशी पूर्ण करण्यात पूर्णतः स्थिर’ राहण्याची गरज आहे. (कलस्सै. ४:१२, NW) “दृढ विश्वास” या शब्दाचा अर्थ, “ठाम मत, गाढ श्रद्धा अथवा एखाद्या गोष्टीची पूर्ण खात्री,” असा होतो. ख्रिश्चन असल्यामुळे आपल्याला या गोष्टीची खात्री असली पाहिजे, की देवाचे भविष्यसूचक वचन जरूर पूर्ण होईल आणि सध्या आपण अंताच्या अगदी जवळ येऊन पोहंचलो आहोत. त्यामुळे प्रेषित पौलाप्रमाणे आपलीही अशी गाढ श्रद्धा असली पाहिजे की, ‘विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या तारणासाठी ती [सुवार्ता] देवाचे सामर्थ्य आहे.’—रोम. १:१६.
४ लोकांना आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी आणि त्यांना संभ्रमात पाडण्यासाठी दियाबल सैतान दुष्ट आणि भोंदू लोकांचा उपयोग करतो. (२ तीम. ३:१३) याविषयी आधीच सावध केल्यामुळे आपल्याजवळ सत्य आहे याची पक्की खात्री करून घेण्यासाठी आपण पावले उचलतो. जीवनांतील चिंतांमुळे दबून जाऊन ख्रिस्ती कार्यहालचालींत निरुत्साही होण्याऐवजी आपण देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व देतो. (मत्त. ६:३३, ३४) तसेच, या व्यवस्थीकरणाचा अंत होण्यात अजून बराच अवकाश आहे अशी भाबडी समजूत करून सध्या आपण अत्यंत निकडीच्या काळात जगत आहोत या गोष्टीकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये. वास्तवात, या व्यवस्थीकरणाचा शेवट आता विलक्षण वेगाने जवळ येत आहे. (१ पेत्र ४:७) काही देशांमध्ये बरेचदा साक्षकार्य झाले असले तरी लोक देव राज्याच्या सुवार्तेकडे मनःपूर्वक लक्ष देत नसल्याचे आपल्या लक्षात आले असेल. पण याचा अर्थ, लोकांना सावध करण्याचे आपले काम आपण थांबवावे असा होत नाही. तर आपले हे काम आपण अखंडपणे चालू ठेवले पाहिजे.—यहे. ३३:७-९.
५ त्यामुळे आता स्वतःला असे विचारणे उचित आहे: ‘येशूने नेमून दिलेले शिष्य बनविण्याचे कार्य मी प्रामाणिकपणे पूर्ण करत आहे का? राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना देवाचे राज्य एक वास्तविकता आहे अशा दृढ विश्वासानिशी मी प्रचार करतो का? या जीवनदायी सेवाकार्यात शक्य तितका अधिक सहभाग घेण्याचा मी दृढ संकल्प केला आहे का?’ सध्या आपण शेवटल्या काळाच्या अगदी अखेरच्या भागात येऊन ठेपलो आहोत. त्यामुळे आपण स्वतःकडे तसेच प्रचार करण्याच्या आणि शिष्य बनविण्याच्या कार्याकडे विशेष लक्ष देण्यास हवे. असे केल्यास आपले स्वतःचे आणि आपले ऐकणाऱ्यांचेही तारण होईल. (१ तीम. ४:१६) तर मग, देवाचे सेवक या नात्याने आपल्याला आपला विश्वास आणखीन मजबूत कसा करता येईल?
६ थेस्सलनीकाकरांचे अनुकरण केल्याने: थेस्सलनीकामधील बांधवानी केलेल्या परिश्रमांची आठवण करून पौल त्यांना म्हणतो: “आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने व पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाकडे आले, तसेच तुम्हाकरिता आम्ही तुम्हामध्ये कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे, आणि तुम्ही फार संकटांत असता पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला.” (तिरपे वळण आमचे.) (१ थेस्सलनी. १:५, ६, पं.र.भा.) पौलाने थेस्सलनीका मंडळीची वाखाणणी काही उगाच केली नाही. निरनिराळ्या संकटांतसुद्धा या बंधुभगिनींनी ज्वलंत आवेशाने आणि अढळ विश्वासाने प्रचार कार्य केले. पण, नानाविध संकटांना तोंड देत असताही इतक्या उत्साहाने आणि विश्वासाने कार्य करणे त्यांना कसे जमले? अर्थात, प्रेषित पौलाने आणि त्याच्यासोबत कार्य करणाऱ्या लोकांनी दाखवलेल्या दांडग्या उत्साहाचा आणि अतूट विश्वासाचा त्यांच्या मनावर विलक्षण प्रभाव पडला होता. तो कसा?
७ पौलाने आणि त्यासोबत प्रवासी कार्य करणाऱ्यांनी ज्याप्रकारे जीवन व्यतीत केले त्यावरून अगदी स्पष्ट होते, की देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर होता आणि ते ज्या गोष्टीचा प्रचार करत होते त्याविषयी त्यांची पूर्ण खात्री पटली होती. पौल आणि सीला यांना थेस्सलनीकात येण्यापूर्वी फिलिप्पैमध्ये अतिशय अपमानास्पद वागणूक देण्यात आली. कोणतीही चौकशी न करता त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांना कैदेत टाकण्यात आले आणि त्यांचे पाय खोड्यात अडवण्यात आले. पण, सुवार्ता सांगण्यातील त्यांचा आवेश किंचितही कमी झाला नाही. त्यामुळेच, देवाने चमत्कारिकरित्या त्यांची तुरुंगातून सुटका केली. हा चमत्कार पाहून तुरुंग अधिकाऱ्याने आणि त्याच्या सर्व कुटुंबियांनी सुवार्तेचा स्वीकार केला आणि पौल व सीला यांना आपले सेवाकार्य चालू ठेवण्यास मार्ग मोकळा झाला.—प्रे.कृत्ये १६:१९-३४.
८ देवाच्या पवित्र आत्म्यामुळे पौल थेस्सलनीकात आला. तिथे आपल्या उपजीविकेसाठी तो स्वतः काम करत होता आणि नंतरच्या वेळात तेथील लोकांना सत्य शिकवण्यात त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. सुवार्तेची घोषणा करण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नाही. (१ थेस्सलनी. २:९) प्रचार कार्यातील पौलाच्या दृढ विश्वासाचा तिथल्या लोकांवर इतका जबरदस्त प्रभाव पडला, की त्यांनी मूर्तिपूजा करण्याचे सोडले आणि सत्य देवाची अर्थात यहोवाची ते उपासना करू लागले.—१ थेस्सलनी. १:८-१०.
९ नव्याने ख्रिस्ती झालेले हे लोक कोणत्याही गोष्टीने, अगदी छळसंकटांनी देखील सुवार्तेचा प्रचार करण्यापासून मागे हटले नाहीत. गवसलेल्या नव्या विश्वासामुळे तसेच भविष्यात आपल्याला चिरस्थायी आशीर्वाद लाभतील या गोष्टीची पूर्ण खात्री पटल्यामुळे उत्साहाने स्वीकारलेल्या सत्याची घोषणा करण्याची प्रेरणा थेस्सलनीकाकरांना मिळाली. ख्रिस्ती कार्यहालचालींमध्ये ही मंडळी इतकी उत्साही झाली होती, की त्यांच्या विश्वासाची, त्यांच्या आवेशाची वार्ता मासेदोनियात आणि इतकेच काय तर अखया प्रांतात पोहंचली नाही तरच नवल. त्यामुळे, पौलाने थेस्सलनीकाकरांना पत्र लिहिण्याआधीच त्यांच्या सत्कर्मांविषयी सर्वांना माहीत होते. (१ थेस्सलनी. १:७) होय, थेस्सलनीकाची मंडळी आदर्श होती यात तीळमात्र शंका नाही.
१० देवाविषयी आणि लोकांविषयीच्या प्रेमाने उत्तेजित होऊन: आज सुवार्तेचा प्रचार करताना आपल्या प्रत्येकाला थेस्सलनीकाकर मंडळीतील लोकांसारखा दृढ विश्वास कसा दाखवता येईल? त्यांच्याविषयी बोलताना पौलाने म्हटले: “तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रेमाने प्रेरित होऊन केलेले श्रम . . . ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करितो.” (१ थेस्सलनी. १:३; NW तळटीप) यावरून, देवाविषयी आणि ते ज्यांना सुवार्ता सांगत होते त्यांच्याविषयी थेस्सलनीकाकरांच्या मनात गाढ प्रेम होते हे दिसून येत नाही का? याच प्रेमामुळे पौल आणि त्याचे सोबती थेस्सलनीकाकरांना फक्त ‘देवाची सुवार्ताच नव्हे, तर आपला जीवही देण्यास राजी झाले.’—१ थेस्सलनी. २:८.
११ त्याचप्रमाणे देवावरील आणि सहमानवांवरील आपले मनस्वी प्रेम, देवाने नेमून दिलेल्या प्रचाराच्या कार्यात पूर्णार्थाने सहभाग घेण्यास आपल्याला प्रवृत्त करते. तसेच, सुवार्तेचा प्रचार करणे ही देवाकडून मिळालेली आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे याची जाणीवही याच प्रेमामुळे आपल्याला होते. आपल्याला ‘खऱ्या जीवनाची’ ओळख करून देण्याकरता आजवर यहोवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्यावर सकारात्मकरित्या आणि कृतज्ञतापूर्वक मनन केल्याने ज्या अद्भुत सत्यांची आपल्याला मनापासून खात्री पटली आहे त्या सत्यांविषयी इतरांना सांगण्यास आपण उत्तेजित होतो.—१ तीम. ६:१९.
१२ स्वतःला प्रचाराच्या कार्यात व्यस्त ठेवल्याने देवावरील आणि सहमानवांवरील आपले प्रेम निरंतर वृद्धिंगत होत जाते. याच प्रेमामुळे आपल्याला घरोघरच्या सेवाकार्यात आणि साक्षकार्याच्या इतर पैलूंमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याची प्रेरणा मिळेल. तसेच आपले नातेवाईक, शेजारीपाजारी आणि इतर मित्रमंडळी यांना अनौपचारिक साक्ष देण्यास आपण प्रत्येक संधीचा फायदा घेऊ. आपण लोकांना सांगत असलेल्या सुवार्तेचा लोकांनी विरोध केला किंवा राज्य प्रचाराच्या कामात व्यत्यय आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हे कार्य करत राहिल्याने आपल्याला एक प्रकारचा आंतरिक आनंद मिळतो. का? कारण देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्यात आणि तारण प्राप्त करण्यासाठी लोकांना मदत करण्यात आपण कोणतीही कसर सोडली नाही याची खात्री आपल्याला असते. तसेच, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शोधून काढण्यात यहोवा आपली मदत करील. जीवनात अनेक दबावांनी, समस्यांनी आपण घेरलेलो आहोत आणि सेवेतील आपला आनंद हिरावून घेण्यासाठी सैतान कितीही प्रयत्न करत असला तरी आपण अढळ विश्वासाने आणि ज्वलंत आवेशाने इतरांना साक्ष देत राहू. या कार्यात प्रत्येकाने आपापला वाटा उचलल्यास आपल्याही काळात थेस्सलनीकासारख्या मजबूत, उत्साही मंडळ्या स्थापन होतील.
१३ काही झाले तरी हार न मानणे: निरनिराळ्या परीक्षाप्रसंगांतून जात असतानाही दृढ विश्वासाची अत्यंत गरज असते. (१ पेत्र १:६, ७) येशूने आधीच आपल्या शिष्यांना याची कल्पना दिली होती, की त्याचे अनुयायी झाल्यामुळे ‘सर्व राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.’ (मत्त. २४:९) या गोष्टीचा पौल आणि सीला यांना फिलिप्पैमध्ये प्रत्यय आला. प्रेषितांची कृत्ये याच्या १६ व्या अध्यायातल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे, की पौल आणि सीला यांना आतल्या बंदिखान्यात टाकून त्यांचे पाय खोड्यात अडकविण्यात आले. त्या काळातील तुरुंगामध्ये सहसा दोन प्रकारच्या कोठड्या असायच्या. मुख्य कोठड्यांमध्ये भरपूर प्रकाश असायचा आणि त्यांमध्ये हवा देखील खेळती असायची; पण भूमिगत कोठड्या नेहमी अंधारलेल्या असून तेथे डांबलेल्या कैद्यांना अगदी गुदमरायला व्हायचे. पौल आणि सीला यांना अशाच एका अंधारकोठडीत डांबण्यात आले होते. त्यामुळे या गलिच्छ अंधाऱ्या कोठडीतील जीवघेण्या उकाड्यात आणि दुर्गंधीत त्यांना दिवस काढावे लागले. त्याचप्रमाणे, तास न् तास पाय बेड्यांत जखडल्यामुळे आणि पाठीवरील चाबकाच्या फटक्यांमुळे त्यांना झालेल्या जखमांतून रक्त ओघळत होते तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील याची आपल्याला कदाचित कल्पनाही करवणार नाही.
१४ पण, इतक्या हालअपेष्टा सोसूनही पौल आणि सीला विश्वासू राहिले. अर्थात, त्यांच्या अतूट विश्वासामुळेच त्यांना परीक्षाप्रसंगातही यहोवाची उपासना करत राहण्याचे बळ मिळाले. त्यांचा विश्वास किती मजबूत होता याबद्दल प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाच्या १६ व्या अध्यायातील २५ व्या वचनात आपल्याला वाचायला मिळते. तिथे म्हटले आहे, की पौल आणि सीला, “गाणे गाऊन देवाची स्तुती करीत” होते. त्यांना अंधारकोठडीत डांबण्यात आले असले तरी आपल्यावर देवाचा अनुग्रह आहे याची त्यांना इतकी खात्री होती, की इतर बंदिवानांना त्यांचे गाणे ऐकू येईल इतक्या मोठ्याने ते गात होते. छळसंकटांचा सामना करत असताना आपलाही विश्वास इतकाच दृढ असला पाहिजे.
१५ आज दियाबल सैतान निरनिराळी संकटे आपल्यावर आणतो. काहींना कदाचित आपल्याच कुटुंबातून छळत्रास सहन करावा लागत असेल; तर इतर अनेकांना कोर्टकचेऱ्याच्या कचाट्यातून जावे लागत असेल. काहींना धर्मत्यागी लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागत असेल; तर इतरांना बिकट आर्थिक समस्यांमुळे हातातोंडाची गाठ बांधता बांधता नाकी नऊ येत असेल. तसेच, शाळेतील मित्रमैत्रिणींच्या दबावामुळे आपल्या ख्रिस्ती मुलांची घुसमट होत असेल. अशा सर्व संकटप्रसंगांचा आपण यशस्वीरित्या सामना कसा करू शकतो? दृढ विश्वास दाखवण्यासाठी कशाची गरज आहे?
१६ सर्व प्रथम, आपल्याला व्यक्तिगतपणे यहोवा देवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याची गरज आहे. पौल आणि सीला यांना अंधारकोठडीत किंवा आतल्या तुरुंगात डांबण्यात आले तेव्हा ही सर्व संकटे आमच्यावरच का यावीत अशी तक्रार करण्यात त्यांनी आपला वेळ वायफळ घालवला नाही किंवा दुःखी होऊन ते कुढत बसले नाहीत. तर ते लगेच देवाची प्रार्थना आणि स्तुती करू लागले. का? कारण, त्यांनी आपल्या स्वर्गीय पित्यासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडला होता. आपण हे सर्व धार्मिकतेसाठी सहन करत आहोत आणि तारण यहोवाच्याच हातून होते याची त्यांना पूर्ण कल्पना होती.—स्तोत्र ३:८.
१७ आपल्यावरही संकटप्रसंगे ओढवतात तेव्हा मदतीसाठी आपण यहोवाची आस धरली पाहिजे. “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार . . . राखील” असे उत्तेजन पौल ख्रिश्चनांना देतो. (फिलिप्पै. ४:६, ७) संकटप्रसंगांतून जात असताना यहोवा कधीच आपला हात सोडणार नाही ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! (यश. ४१:१०) आपण जोपर्यंत खऱ्या विश्वासानिशी त्याची उपासना करू तोपर्यंत तो आपल्याबरोबर राहील.—स्तोत्र ४६:७.
१८ यहोवाच्या सेवेत व्यस्त राहणे हा दृढ विश्वास राखण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे. (१ करिंथ. १५:५८) पौल आणि सीला सुवार्तेचा प्रचार करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना कैदखान्यात डांबण्यात आले होते. पण, त्यामुळे त्यांनी आपले प्रचार कार्य थांबवले का? नाही. किंबहुना, तुरुंगात असताना देखील ते प्रचार करत राहिले आणि तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते थेस्सलनीकास गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी यहुद्यांच्या सभास्थानांत जाऊन “त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद [तर्कवितर्क] केला.” (प्रे.कृत्ये १७:१-३) आपली देखील यहोवावर गाढ श्रद्धा किंवा गाढ विश्वास असल्यास आणि आपल्याजवळ सत्य आहे याची पूर्ण खात्री पटल्यास कोणतीही गोष्ट, “ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.”—रोम. ८:३५-३९.
१९ दृढ विश्वासाची आधुनिक उदाहरणे: आज आपल्या काळातही, पौल आणि सीलाप्रमाणे दृढ विश्वास दाखवणाऱ्या अनेकांची उदाहरणे आहेत. ऑश्विट्झ छळछावणीत असताना आपल्या बंधुभगिनींनी किती अढळ विश्वास दाखवला याबद्दल त्याच छळछावणीतून निभावलेली एक बहीण असे सांगते: “छळ छावणीत एकदा आमची चौकशी चालू असताना एक अधिकारी मुठीचा धाक दाखवत माझ्या दिशेने तावातावाने चालत आला. ‘तुमच्यासमोर आता हात टेकण्याची पाळी आलीए. तुम्हाला अटक केलं तरी तुम्हाला त्याची पर्वा नाही; तुरुंगात डांबलं तरी अगदी निर्धास्त; छळछावणीत पाठवलं तरी तुम्हाला भीती वाटत नाही. मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्यावरही तुम्ही अगदी शांतपणे मरणाला सामोरे जाता. काय करावं तुम्हा लोकांचं?’” असे तो म्हणाला. अशा खडतर काळातसुद्धा बांधवांनी अतूट विश्वास दाखवला हे पाहून किती उत्तेजन मिळते! या खडतर काळात टिकून राहण्यासाठी त्यांनी नेहमी यहोवाची आस धरली.
२० अलीकडच्या काळात झालेल्या जातीय संघर्षात आपल्या अनेक बंधुभगिनींनी दाखवलेल्या अढळ विश्वासाची या ठिकाणी आठवण झाल्याशिवाय राहत नाही. डोक्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार असताना देखील जबाबदार बांधव इतर बंधुभगिनींना वेळच्या वेळी आध्यात्मिक अन्न मिळत आहे की नाही यात जातीने लक्ष घालतात. ‘आपल्यावर चालविण्याकरता घडिलेले कोणतेही हत्यार आपल्यावर चालणार नाही’ अशा पक्क्या खात्रीनिशी ते विश्वासूपणे सेवा करत आहेत.—यश. ५४:१७.
२१ सत्यात नसलेल्या विवाह सोबत्याबरोबर राहणारे आपले अनेक बंधुभगिनी देखील अतूट विश्वास आणि सहनशीलता दाखवतात. ग्वादेलूपमध्ये राहणाऱ्या एका बांधवाला सत्यात नसलेल्या त्याच्या पत्नीचा कडा विरोध सहन करावा लागला. त्याला सत्यापासून विचलित करण्यासाठी आणि त्याने ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू नये म्हणून ती त्याच्यासाठी स्वयंपाक करत नसे, त्याचे कपडे धूत नसे की त्याचे कपडे इस्त्री करत नसे. इतकेच नाही तर कित्येक दिवस ती त्याच्याशी अबोला धरायची. पण, अतूट विश्वासानिशी यहोवाची सेवा करत राहिल्यामुळे आणि मदतीसाठी वेळोवेळी यहोवाला प्रार्थना करत राहिल्यामुळेच हा बांधव हे सर्व शांतपणे सहन करू शकला. किती दिवस? चक्क २० वर्षांपर्यंत. वीस वर्षांनंतर हळूहळू त्याच्या पत्नीच्या मनोवृत्तीत बदल जाणवू लागला. शेवटी, देव राज्याच्या आशेचा तिने देखील स्वीकार केला तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल!
२२ शाळेत दररोज मित्रमैत्रिणींच्या दबावाचा आणि इतर आव्हानांचा सामना करणाऱ्या आपल्या तरुण बहीणभावांचाही जाता जाता उल्लेख करावासा वाटतो. शाळेतील इतर मुलांसारखे वागण्याबोलण्याच्या दबावासंबंधी साक्षीदार असलेली एक युवती म्हणते: “शाळेत जो तो शिक्षकांविरुद्ध बंड करण्याचे प्रोत्साहन देत असतो. तुम्ही नियम तोडण्याची जराशी हिंमत केली तरी मुलं तुम्हाला मानतात.” यावरून, तरुणांवर दररोज किती दबाव येतो याची कल्पना येत नाही का? अर्थात, अशा सर्व प्रसंगांचा प्रतिकार करण्यास तरुणांनी दृढनिश्चयी आणि खंबीर असले पाहिजे.
२३ निरनिराळ्या परीक्षाप्रसंगांत आपल्या विश्वासाला धरून राहणाऱ्या अनेक तरुणांची कितीतरी उदाहरणे आपल्याकडे आहेत. असेच एक उदाहरण, फ्रान्समध्ये राहणाऱ्या आपल्या एका तरुण बहिणीचे आहे. एकदा मधली सुट्टी झाल्यानंतर शाळेतली काही मुले तिला त्यांचे चुंबन घेण्यास गळ घालू लागले. पण, आपल्या या बहिणीने मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना केली आणि त्या मुलांचा निग्रहाने विरोध केला. त्यामुळे मुलांनी कंटाळून तिचा नाद सोडून दिला. काही वेळानंतर, त्यांतला एक मुलगा पुन्हा तिच्याकडे आला आणि तिने दाखवलेल्या धैर्याबद्दल त्याने तिचे कौतुक केले. त्यावर, आपल्या या बहिणीने त्याला देवाच्या राज्याविषयी चांगली साक्ष दिली आणि या राज्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी यहोवाने सर्वांसाठी घालून दिलेल्या उच्च दर्जांविषयी त्याला सांगितले. इतकेच नाही तर एकदा शाळेत तिने संपूर्ण वर्गाला आपल्या ख्रिस्ती विश्वासांविषयी सांगितले.
२४ आज यहोवा परमेश्वर आपल्या इच्छेबद्दल पूर्ण खात्रीने आणि दृढ विश्वासाने बोलणाऱ्या लोकांचा आनंदाने उपयोग करत आहे; अशा लोकांमध्ये आपण आहोत हा आपल्यासाठी किती मोठा विशेषाधिकार आहे! (कलस्सै. ४:१२; NW) त्याशिवाय, आपला सिंहासारखा शत्रू दियाबल सैतान आपल्यावर हल्ला करतो तेव्हा आपण यहोवाला किती विश्वासू आहोत हे सिद्ध करण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळते. (१ पेत्र ५:८, ९) राज्य संदेशाद्वारे यहोवा केवळ आपलाच नव्हे तर आपण ज्यांना हा संदेश सांगतो आणि जे लोक त्यास प्रतिसाद देतात अशा सर्वांचा तो उद्धार करणार आहे हे आपण केव्हाही विसरता कामा नये. आपले जीवनमान आणि जीवनात आपण जे काही निर्णय घेतो त्यावरून हेच दिसले पाहिजे, की आपल्या जीवनात आपण देवाच्या राज्याला प्राधान्य देतो. यास्तव, सुवार्तेचा प्रचार आपण दृढ विश्वासाने करत राहू या!