यहोवाचे नाव संपूर्ण पृथ्वीवर घोषित करा
१ येशूने आपल्या शिष्यांना, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्षकार्य करण्याची आज्ञा दिली. (प्रे. कृत्ये १:८) पण, येशूने केवळ आज्ञा दिली नाही; तर असे करण्यात त्याने स्वतः त्यांच्यापुढे एक आदर्शही ठेवला होता. दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि जेथेकोठे लोक भेटतील तेथे जाऊन तो देवाच्या उद्देशांविषयी त्यांच्यासोबत बोलला. येशू ख्रिस्ताचा हाच आदर्श पुढे ठेवून आज विश्वासू आणि बुद्धिमान दास वर्ग देखील “सर्व पृथ्वीवर” यहोवाचे नाव घोषित किंवा “विदित” करण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा अवलंब करीत आहेत.—यश. १२:४, ५.
२ गतकाळात अवलंबिलेल्या पद्धती: गतकाळात वृत्तपत्रांद्वारे प्रवचने प्रकाशित केली जायची; पुढे ‘फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशनची’ निर्मिती करून लाखो लोकांना हा ड्रामा दाखवण्यात आला. याशिवाय, मोठमोठे लाउडस्पिकर बसवलेल्या वाहनांचा, फोनोग्राफचा आणि काही काळ रेडिओचा देखील उपयोग करण्यात आला. या सर्व साधनांचा आणि माध्यमांचा उपयोग करण्यामागचा उद्देश सबंध पृथ्वीवर सुवार्तेचा प्रचार व्हावा हा होता. यहोवाच्या नावाची घोषणा करण्यासाठी अशा निरनिराळ्या माध्यमांचा उपयोग करण्यात आला असला तरी लोकांना प्रत्यक्ष भेटून साक्ष देण्याची आपली नेहमीची पद्धत केव्हाही कालवश झाली नाही; किंबहुना असे म्हणता येईल, की सुरवातीपासून याच गोष्टीवर भर देण्यात आला आहे, की लोकांची प्रत्यक्ष भेट घेतल्यामुळे त्यांनी दाखवलेल्या आस्थेला खतपाणी घालणे सहज शक्य होते. संपूर्ण पृथ्वीवर यहोवाच्या नावाची घोषणा करण्यासाठी घरोघरचे साक्षकार्य सगळ्यात परिणामकारक आणि उत्तम माध्यम असल्याचे सिद्ध झाले आहे.—प्रे. कृत्ये ५:४२.
३ आज अवलंबिल्या जाणाऱ्या पद्धती: परंतु, आज काळ बदलला आहे. लोकांचे जीवन विलक्षण धावपळीचे झाले आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोक घरी भेटतही नाहीत. जे काही लोक भेटतात त्यांच्यापैकी फारच कमी लोकांना आध्यात्मिक गोष्टींविषयी वाचायला, त्यांवर विचार करायला आवडते. तेव्हा, या बदलत्या परिस्थितीशी आपण आपली सेवा जुळवून घेण्यास हवी. म्हणजे घरोघर जाऊन साक्ष देण्याशिवाय जेथेकोठे आपल्याला लोक भेटतील तेथे जाऊन त्यांना आपल्यापाशी असलेल्या आशेविषयी सांगण्यास आपण “नेहमी सिद्ध” किंवा तयार असले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) याचा हाच अर्थ होतो, की आपल्या कामाच्या ठिकाणी, शाळाकॉलेजात, रस्त्यावर, सार्वजनिक उद्यानांत किंवा पार्किंगच्या ठिकाणी तसेच दुकानादुकानांत आणि आणखीन जेथेकोठे लोक भेटतील तिथे जाऊन साक्ष देण्याकरता आपण नेहमी तत्पर असले पाहिजे. हे कार्य करत असताना यहोवा आपल्या पाठीशी असल्यामुळे आपले प्रयत्न यशस्वी होतील यात तीळमात्र शंका नाही. पण प्रश्न आहे, की जेथेकोठे लोक भेटतील तिथे जाऊन त्यांना साक्ष देण्याचा तुम्ही प्रांजळपणे प्रयत्न करत आहात का?
४ आपल्या क्षेत्रातील लोकांना यहोवाच्या नावाविषयी सांगण्याच्या कामात आपण कोणतीच कसर सोडू नये. असे केल्यास, नम्र अंतःकरणाच्या लोकांना सत्याकडे आकर्षित करण्यासाठी यहोवाची आस धरत असताना आपण आपले सेवाकार्य पूर्ण करत असल्याचे आंतरिक समाधान आपल्याला मिळेल.—योहा. ६:४४.