वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९९ पृ. ३-६
  • इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!
  • आमची राज्य सेवा—१९९९
  • मिळती जुळती माहिती
  • इंटरनेट याचा सुज्ञपणे उपयोग करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • इंटरनेटवरील धोके मला कसे टाळता येतील?
    सावध राहा!—२०००
  • इंटरनेटचे विनियोग आणि साधने
    सावध राहा!—१९९७
  • इंटरनेट सावध का असावे?
    सावध राहा!—१९९७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९९
km ११/९९ पृ. ३-६

इंटरनेटच्या धोक्यांपासून सावध!

१ यहोवाच्या लोकांना आपल्या बांधवांचा सहवास हवाहवासा वाटतो. एकमेकांशी बोलण्यात, क्षेत्र सेवेतील अनुभव एकमेकांना सांगण्यात त्यांना आनंद वाटतो, तसेच जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांसंबंधित आणि राज्य कार्यहालचालीसंबंधित होणाऱ्‍या विविध घडामोडींबद्दल एकमेकांकडून जाणून घेण्यास ते उत्सुक असतात. या शिवाय, विश्‍वभरातील आपल्या बांधवांसंबंधित कोणत्याही ठळक बातम्या, उदाहरणार्थ, संकटांत किंवा नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या आपल्या बांधवांविषयी आणि त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला काही करण्याची गरज आहे का अशा सर्व बाबी जाणून घेण्यास ते विलक्षण उत्सुक असतात. हा खरे तर आपल्यातील ऐक्याचा आणि खऱ्‍या प्रेमाचा पुरावाच आहे.—योहान १३:३४, ३५.

२ आज जागतिक घडामोडींविषयी जाणून घेण्यास आपल्याला जास्त वेळ लागत नाही. उदाहरणार्थ, रेडिओ आणि टीव्हीमुळे या घटनांचा एकएक तपशील लोकांना माहीत होतो; तर टेलिफोनद्वारे काही मिनिटांतच जगाच्या कोणत्याही कोपऱ्‍यात लोकांशी संपर्क साधणे शक्य होते. पण, अलीकडे दळणवळणाच्या जगात इंटरनेटला तुफान लोकप्रियता मिळत आहे.—ऑगस्ट ८, १९९७ चे सावध राहा! पाहा.

३ टेलिफोनचा शोध लागल्यामुळे लोकांना काही क्षणांत एकमेकांशी बोलणे शक्य झाले आहे. होय, टेलिफोनचे असे बरेच फायदे असले तरी ते कुसंगतीच्या किंवा अनुचित कृत्यांच्या जाळ्यात आपल्याला अडकवण्याचे एक साधन ठरू शकते; शिवाय, टेलिफोनचा वाजवीपेक्षा जास्त उपयोग खर्चिक असतो. तेव्हा, टेलिफोनचा वापर आपण कसा करतो त्यासंबंधी सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. तसेच, टीव्ही, रेडिओविषयी पाहता, शैक्षणिक जगात यांना वाढती मागणी असली तरी दुःखाची गोष्ट अशी, की त्यावरील बरेच कार्यक्रम अश्‍लील आणि वेळखाऊ असतात. तेव्हा, टीव्ही आणि रेडिओवरील कार्यक्रमांच्या बाबतीत डोळस निवड करणे सुज्ञतेचे आहे.

४ हेच इंटरनेटच्या बाबतीतही खरे आहे. इंटरनेटमुळे जगभरातील लक्षावधी लोकांसोबत अगदी स्वस्तात संपर्क साधणे सहजसोपे तर झालेच झाले पण इंटरनेटमुळे प्रचंड माहितीचे दालन आज आपल्यापुढे खुले झाले आहे. (सावध राहा! फेब्रुवारी ८, १९९८) पण, इंटरनेटचा अविचारीपणे उपयोग करणाऱ्‍या व्यक्‍तीच्या आध्यात्मिकतेला आणि नैतिकतेला मोठा धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

५ बऱ्‍याच जणांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट माहितीविषयी काळजी व्यक्‍त केली आहे. उदाहरणार्थ, यात शस्त्रे आणि बॉम्ब कसे बनवले जातात यांविषयीची माहिती कोणालाही अगदी सहज मिळवता येते. शिवाय, इंटरनेटचा वापर करण्यात कामगार आपला बराचसा वेळ खर्च करत असल्याच्या तक्रारी ऐकण्यात येतात. या शिवाय, इंटरनेटमुळे कोणते आध्यात्मिक धोके संभवू शकतात याविषयी आपल्या प्रकाशनांमधूनही बरेच काही सांगण्यात आले आहे. बहुतेक वेबसाईट्‌सवर सादर केले जाणारे हिंसक आणि अश्‍लील साहित्य ख्रिश्‍चनांसाठी निश्‍चितच योग्य नाही. (स्तोत्र ११९:३७) या धोक्यांव्यतिरिक्‍त, असाही एक छुपा धोका आहे ज्यापासून खासकरून ख्रिश्‍चनांनी चार हात दूर राहावे. तो कोणता?

६ एखाद्या अनोळखी व्यक्‍तीबद्दल काहीएक जाणून न घेताच तुम्ही तिला आपल्या घरात येऊ द्याल का? तिच्याविषयी जाणून घेणे शक्यच नसले तर? आणि अशा अनोळखी व्यक्‍तीसोबत तुम्ही आपल्या मुलांना एकटे सोडाल का? पण हीच गोष्ट इंटरनेटच्या माध्यमाने घडण्याची दाट शक्यता आहे.

७ इंटरनेटच्या माध्यमाने आपल्याला अनोळखी व्यक्‍तींना इलेक्ट्रॉनिक मेल पाठवता येते किंवा अनोखळी व्यक्‍तींकडून आपल्याला इलेक्ट्रॉनिक मेल मिळू शकते. इलेक्ट्रॉनिक चर्चापिठाच्या किंवा चॅटरूमच्या बाबतीतही हे खरे आहे. आणि चर्चेत सहभाग घेणारे लोक कदाचित यहोवाचे साक्षीदार असल्याचे सांगतील; पण, सहसा ते खोटे असते. तसेच, एखादी व्यक्‍ती आपले वय देखील खोटे सांगू शकते किंवा आपण एक स्त्री आहोत किंवा पुरूष आहोत असे खोटे सांगेल.

८ अशा लोकांनी तुम्हाला पाठवलेली माहिती आपल्या विश्‍वासांवरील अनुभवांच्या किंवा अभिप्रायांच्या रूपात असू शकते. हीच माहीती इतरांना पाठवली जाते आणि हे लोक पुढे आणखीन कितीतरी लोकांना ती पाठवतात. सहसा, आपल्याला पाठवलेली ही माहिती कितपत खरी आहे हे जाणून घेण्याचा मार्ग नसतो; ती खोटीही असू शकते. आपल्या विश्‍वासांवरील अभिप्रायांच्या नावाखाली कदाचित, धर्मत्यागी मतांचा प्रसार केला जात असेल.—२ थेस्सलनी. २:१-३.

९ हे धोके लक्षात घेता, इंटरनेटचा उपयोग करताना स्वतःला विचारा: ‘मी नेमकं कशासाठी याचा उपयोग करतो? ज्या पद्धतीनं मी याचा उपयोग करत आहे त्यामुळे काही आध्यात्मिक धोका तर मला संभवणार नाही ना? आणि इतरांच्या आध्यात्मिक हानीस मी कारणीभूत ठरत नाही ना?’

१० ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या’ वेबसाईट्‌स: उदाहरणार्थ, स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणवणाऱ्‍या काही लोकांनी सुरू केलेल्या इंटरनेट वेबसाईटचा विचार करा. आपल्या साईट्‌सवर प्रकाशित केलेले अनुभव वाचण्याचे आमंत्रण ते तुम्हाला देतात; हे अनुभव देखील स्वतःला साक्षीदार म्हणवणाऱ्‍या काही लोकांनी पाठवलेले असतात. तुम्हालाही संस्थेच्या प्रकाशनांबद्दल तुमचे विचार, तुमची मते काय हे त्यांना कळवण्याचे प्रोत्साहन दिले जाते. काहीजण, क्षेत्र सेवेत उपयोग करता येतील अशा प्रस्तुती देखील सुचवतात. या साईट्‌सवरून वेगवेगळ्या चॅटरूम्सशी संपर्क करण्याची सोय असते; ज्यातून तुम्ही टेलिफोनवर बोलता त्याप्रमाणेच इतरांसोबत हितगुज करू शकता. इतकेच नाही तर, जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांसोबत तुम्हाला ऑन-लाईन संपर्क राखता यावा म्हणून ते इतर वेबसाईट्‌सचे पत्ते देखील तुम्हाला देतात. पण, आपला हा संपर्क धर्मत्यागी लोकांनी घडवून आणलेला नसेल हे खात्रीने तुम्ही सांगू शकता का?

११ इंटरनेटच्या माध्यमाने सहवास राखणे इफिसकर ५:१५-१७ मध्ये दिलेल्या सल्ल्याच्या एकवाक्यतेत आहे असे म्हणता येणार नाही. तिथे प्रेषित पौल म्हणतो: “अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मुर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजुन घ्या.”

१२ ख्रिस्ती मंडळी हे एक ईश्‍वरशासित माध्यम असून आज ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ याच माध्यमातून आपले आध्यात्मिक भरणपोषण करत आहे. (मत्त. २४:४५-४७) देवाच्या संघटनेअंतर्गत आपल्याला जगिक प्रभावांपासून दूर राहण्याचे मार्गदर्शन आणि संरक्षण तसेच प्रभूच्या कामात व्यस्त राहण्याची प्रेरणा मिळते. (१ करिंथ. १५:५८) देवाच्या संघटित लोकांमध्ये स्तोत्रकर्त्याला आनंदाची आणि सुरक्षिततेची भावना मिळाल्याचे तो आपल्याला सांगतो. (स्तोत्र २७:४, ५; ५५:१४; १२२:१) मंडळीशी सहवास राखणाऱ्‍यांना मंडळी आध्यात्मिक आधार आणि साह्‍य देखील देते. ख्रिस्ती मंडळीत तुम्हाला एकमेकांवर प्रेम करणारे, एकमेकांची चिंता-काळजी करणारे मित्र—अडीअडचणीत आपल्या मदतीला धावून येणारे, आपल्या दुःखात सामील होणारे लोक भेटतील. (२ करिंथ. ७:५-७) तसेच, केलेल्या पापाबद्दल पश्‍चात्ताप करण्याची वृत्ती न दाखवणाऱ्‍या किंवा धर्मत्यागी विचारसरणीला बढावा देणाऱ्‍या लोकांना बहिष्कृत करण्याची जी बायबलआधारित तरतूद आहे त्यामुळे मंडळीच्या सदस्यांचे संरक्षण होते. (१ करिंथ. ५:९-१३; तीत ३:१०, ११) अशा सर्व प्रेमळ तरतुदी, इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी सहवास करताना मिळतील असे आपण म्हणू शकतो का?

१३ वास्तवात, उलटच घडत असल्याचे दिसून येते. काही वेबसाईट्‌स, धर्मत्यागी प्रचाराचे प्रसारकच आहेत असे म्हणता येईल. अर्थात, ते तसा दावा करणार नाहीत आणि एखाद्या साईटचा प्रायोजक, आपण खरोखर यहोवाचे साक्षीदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी तपशीलवार माहिती पुरवेल. आणि तुम्ही देखील यहोवाचे साक्षीदार आहात की नाही याची खात्री करण्यासाठी तो तुमच्याकडूनही माहितीची विनंती करेल.

१४ याबाबतीत तुम्ही आपल्या समजबुद्धीचा वापर करावा अशी अपेक्षा यहोवा करतो. का? कारण, समजबुद्धी अनेक धोक्यापासून तुमचे संरक्षण करील हे त्याला ठाऊक आहे. नीतिसूत्रे २:१०-१९ च्या सुरवातीलाच म्हटले आहे: “ज्ञान तुझ्या चित्तांत प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला संभाळील.” कशापासून? “कुमार्गापासून,” सरळ मार्ग सोडून देणाऱ्‍यांपासून, अनैतिक लोकांपासून आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत अशांपासून.

१५ आपण राज्य सभागृहात जातो तेव्हा आपण आपल्या बांधवांमध्ये असतो यात शंका नाही. आपण त्यांना ओळखतो. आपल्यातील बंधू प्रेमावरून सिद्ध होते की आपण सर्व बंधूभगिनी आहोत त्यासाठी कोणालाही प्रमाण द्यावे लागत नाहीत. तसेच, आपण खरोखरच यहोवाचे साक्षीदार आहोत ते सिद्ध करण्यासाठी कोणालाही पुरावे सादर करावे लागत नाही. एकमेकांना उत्तेजन देण्याची जी गोष्ट पौल इब्री लोकांस पत्र १०:२४, २५ मध्ये सांगतो ते खरे उत्तेजन याच ठिकाणी आपल्याला लाभू शकते. इंटरनेटच्या माध्यमाने बांधवांसोबत संगती करण्याचे प्रोत्साहन देणाऱ्‍या वेबसाईट्‌सवर आपल्याला खरे उत्तेजन मिळण्याची हमी नसते. स्तोत्रसंहिता २६:४, ५ चे शब्द लक्षात ठेवल्यास इंटरनेटवरील वेबसाईट्‌सचा उपयोग करताना सहज संभवू शकणाऱ्‍या धोक्यांपासून आपण सावध राहू.

१६ इंटरनेटवर उपलब्ध असलेली आणि इंटरनेटचा उपयोग करणाऱ्‍याच्या हाती लागणारी माहिती अफाट असते; तिला कोणत्याही मर्यादा नसतात. सहसा लहान मुले आणि किशोरवयीन अगदी सहजपणे या वातावरणातील हिंसेचे आणि अत्याचाराचे बळी ठरतात. याचे कारण मुले जात्याच कोणावरही भरवसा करणारी, जिज्ञासू असतात, आणि सायबरस्पेसच्या नव्या विश्‍वात भ्रमण करण्यास उत्सुक असतात. तेव्हा, संगीताची, चित्रपटाची निवड करण्यात पालक जसे आपल्या मुलांना मार्गदर्शन देतात त्याचप्रमाणे मुले इंटरनेटचा उपयोग करतात त्यावेळी देखील पालकांनी त्यांच्यावर देखरेख ठेवावी आणि बायबलच्या आधारे त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे.—१ करिंथ. १५:३३.

१७ पण, खेदाची गोष्ट अशी, की इंटरनेटवरील चॅटरूम्सच्या माध्यमातून जगिक लोकांशी सहवास सुरू केल्यामुळे आणि शेवटी अनैतिक कृत्य केल्यामुळे एकेकाळी आपले बंधूभगिनी असलेल्या काहींना बहिष्कृत करावे लागले. याबद्दल मंडळीतील वडिलांनी सादर केलेल्या धक्कादायक अहवालांवरून असे समजते, की इंटरनेटवरून एखाद्या व्यक्‍तीशी मैत्री झाल्यामुळे काहींनी चक्क आपल्या पतीला किंवा पत्नीला सोडून दिले आहे. (२ तीम. ३:६) तर धर्मत्यागी लोकांनी इंटरनेटवर पुरवलेल्या माहितीवर विश्‍वास ठेवल्यामुळे इतर काहीजण सत्यातून बाहेर पडले आहेत. (१ तीम. ४:१, २) हे गंभीर धोके विचारात घेता, इंटरनेटच्या माध्यमाने हितगुज करण्यासंबंधी सावधगिरी बाळगणे रास्त नाही का? निश्‍चित. नीतिसूत्रे २:१०-१९ मध्ये सांगितल्याप्रमाणे याबाबतीत ज्ञान, विद्या, विवेक आणि समंजसपणा आपले संरक्षण करील.

१८ लक्षात आलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे अनेकांनी सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी वेबसाईट्‌स सुरू केल्याचे दिसते. यांपैकी बऱ्‍याच साईट्‌सचे प्रायोजक प्रत्यक्षात आपलेच काही अविचारी बांधव असतात; तर, विश्‍वासात अढळ असणाऱ्‍यांना भुलवण्यासाठी सुरू केलेल्या इतर साईट्‌सचे प्रायोजक धर्मत्यागी लोक असतात. (२ योहा. ९-११) बांधवांनी अशाप्रकारचे वेबसाईट्‌स तयार करावेत की नाही याबद्दल नोव्हेंबर १९९७ ची आमची राज्य सेवा पृष्ठ ३ वर असे मार्गदर्शन दिले आहे: “कोणत्याही व्यक्‍तीला यहोवाच्या साक्षीदारांविषयी, आपल्या कार्यहालचालींविषयी किंवा विश्‍वासांविषयी इंटरनेट पेजेस तयार करण्याची गरज नाही. ज्यांना संबंधित माहिती जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपल्या अधिकृत साईटवर [www.watchtower.org] अचूक माहिती पुरवलेली आहे.”

१९ इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास सहायक? काहींना असे वाटले आहे, की निरनिराळ्या ईश्‍वरशासित कार्यांसबंधित संशोधनपर माहिती इंटरनेटवर प्रकाशित केल्याने ते एक प्रकारे आपल्या बांधवांना मदतच करत आहेत. उदाहरणार्थ, एखादा बांधव जाहीर भाषणाची तयार करताना संशोधन करील आणि ही संशोधनपर माहिती इंटरनेटवर प्रकाशित करील; त्याच्या मते, याच भाषणाची तयारी करताना इतर लोकांना या संशोधनपर माहितीचा उपयोग होईल. इतरजण येत्या सप्ताहात होणाऱ्‍या टेहळणी बुरूज अभ्यासात संदर्भासाठी वापरलेली सर्व शास्त्रवचने प्रकाशित करतील किंवा मग ईश्‍वरशासित सेवा सभेसाठी अथवा मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी नेमलेला भाग प्रकाशित करतील. काहीजण क्षेत्र सेवेत कोणत्या प्रस्तुतींचा उपयोग करावा यावर सल्ले देतील. पण, असे करून आपण खरोखरच इतरांना मदत करत असतो का?

२० यहोवाच्या संघटनेने पुरवलेल्या साहित्यांमुळे आपल्याला उभारणीकारक विचार करण्याची चालना मिळते शिवाय ‘चांगले आणि वाईट यात फरक करण्याचे’ प्रशिक्षणही मिळते. (इब्री ५:१४) पण, इतर लोक जर आपल्यासाठी संशोधन करू लागले तर हे सर्व फायदे आपल्याला मिळतील का?

२१ बिरुयातले लोक “थेस्सलनीकांतल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते” असे म्हटले जाते. का? कारण “त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्‍या गोष्टी अशाच आहेत की काय ह्‍याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले.” (प्रे. कृत्ये १७:११) खुद्द पौल आणि सीला यांनी त्यांना प्रचार केला असला तरी स्वतःच्या प्रयत्नांशिवाय त्यांना सत्य कधीच आपलेसे करता आले नसते.

२२ आपल्या भाषणाची किंवा सभांची तयारी करताना दुसऱ्‍या व्यक्‍तीने संशोधन केलेल्या माहितीचा उपयोग केल्यामुळे व्यक्‍तिगत अभ्यासाचा मूळ हेतूच नष्ट होतो. तुम्हाला स्वतःहून देवाच्या वचनावरील तुमचा विश्‍वास मजबूत करण्याची इच्छा नाही का? तुमच्या गाढ श्रद्धेवर आधारित तुम्ही तुमच्या भाषणांतून, सभांमधील तुमच्या उत्तरांतून आणि क्षेत्र सेवेतून तुमच्या विश्‍वासाची जाहीर वाच्यता करू शकता. (रोम. १०:१०) दुसऱ्‍यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग करणे याचा नीतिसूत्रे २:४, ५ मधील वर्णनाशी मेळ बसत नाही; कारण प्रत्येकाने ‘गुप्त निधीप्रमाणे त्याचा शोध करावा आणि त्याला उमगून काढावे,’ असे तिथे म्हटले आहे.

२३ उदाहरणार्थ, तुमच्या स्वतःच्या बायबलमधून शास्त्रवचने वाचताना तुम्ही प्रत्येक शास्त्रवचनाचा मागचा-पुढचा संदर्भ थोडक्यात पाहू शकता. आपले शुभवर्तमान लिहिताना लूकने केले त्याप्रमाणे तुम्ही “सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध” घेऊ शकता. (लूक १:३) असे करण्यासाठी तुम्ही जो अतिरिक्‍त वेळ देता त्यामुळे क्षेत्र सेवेत तसेच भाषण देताना शास्त्रवचने उघडण्यात तुम्ही प्रवीण व्हाल. यहोवाचे साक्षीदार अगदी सफाईदारपणे बायबलचा उपयोग करत असल्यामुळे अनेकजण प्रभावित झाल्याचे त्यांनी कबूल केले आहे. हीच गोष्ट आपल्याही बाबतीत म्हटली जाऊ शकते. पण, त्यासाठी आपल्याला स्वतःच्या बायबलमधून शास्त्रवचने उघडून वाचण्याची सवय लावून घ्यावी लागेल.

२४ वेळेचा सुज्ञतेने उपयोग करा: याबाबतीत विचारात घेण्याजोगी आणखी एक गोष्ट, इंटरनेटवर प्रकाशित करण्याच्या उद्देशाने माहिती तयार करण्यात, वाचण्यात आणि उत्तर देण्यात खर्च होणाऱ्‍या वेळेसंदर्भात आहे. स्तोत्र ९०:१२ आपल्याला पुढीलप्रमाणे प्रार्थना करण्याचे प्रोत्साहन देते: “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.” आणि पौलाने “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे” असे म्हटले. (१ करिंथ. ७:२९) आणि पुढे: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे,” असेही त्याने म्हटले.—गलती. ६:१०.

२५ वरील सल्ले, आपण वेळेचा किती सुज्ञपणे उपयोग करावा यावर जोर देतात. तेव्हा, दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा, देवाच्या वचनाचे वाचन करण्यात वेळ खर्च करणे किती लाभदायक! (स्तोत्र १:१, २) हितकर सहवास अनुभवण्याचे यापेक्षा चांगले आणखीन कोणते माध्यम असूच शकत नाही. (२ तीम. ३:१६, १७) पालकांनो, राज्य कार्यहालचालींसाठी आपल्या वेळेचा सुज्ञपणे उपयोग करण्यास तुम्ही आपल्या मुलांना शिकवत आहात का? (उप. १२:१) व्यक्‍तिगत आणि कौटुंबिक अभ्यास करण्यासाठी, सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि क्षेत्र सेवेत सहभाग घेण्यासाठी वेळ खर्च केल्यामुळे मिळणारे लाभ, इंटरनेटवरील माहिती वाचून मिळणाऱ्‍या लाभांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहेत.

२६ या संदर्भात, आध्यात्मिक गोष्टींवर आणि आपल्या ख्रिस्ती जीवनाशी संबंध असलेल्या अत्यावश्‍यक बाबींवर विशेष लक्ष देणे सुज्ञपणाचे ठरते. याचा अर्थ, कोणत्या गोष्टींसाठी आपला वेळ आणि विचारशक्‍ती खर्ची घालावी याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेणे जरूरीचे आहे. आपल्या ख्रिस्ती जीवनाशी संबंधित असलेल्या बाबींचा सारांश मांडताना ख्रिस्ताने म्हटले: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:३३) इतर कोणत्या कार्यहालचालींपेक्षा राज्य कार्यहालचालींना तुम्ही तुमच्या जीवनात प्राधान्य देता तेव्हा तुम्हाला सगळ्यात आनंदी असल्यासारखे वाटत नाही का?

२७ इंटरनेट ई-मेल: दूर राहणाऱ्‍या आपल्या कुटुंबियांना किंवा मित्रांना आपले अनुभव सांगणे ही एक चांगली गोष्ट असली तरी तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना न ओळखणाऱ्‍या इतर लोकांना ही माहिती पाठवणे खरोखरच प्रेमळपणाचे लक्षण आहे का? किंवा अक्षरशः कोणालाही ही माहिती वाचता यावी म्हणून वेब पेजवर ती प्रकाशित करावी का? आणि हे खासगी संदेश कॉपी करून कोणताही विचार न करता ओळखीच्या किंवा सर्वस्वी अनोळखी व्यक्‍तींना पाठवणे उचित आहे का? तसेच, काही संदेश, जे खरे तर तुम्हाला पाठवण्याचे नव्हेत असे संदेश चुकून तुम्हाला येतात तेव्हा ते तुम्ही आणखीन इतर लोकांना पाठवणे प्रेमळपणाचे ठरेल का?

२८ विचार करा: तुम्ही इतरांना पाठवलेली माहिती चुकीची असली तर? याचा अर्थ, असत्याला खतपाणी घालण्यात तुम्ही हातभारच लावत आहात असा होणार नाही का? (नीति. १२:१९; २१:२८; ३०:८; कलस्सै. ३:९) तेव्हा, “[आपण] अज्ञान्यासारखे नव्हे तर ज्ञान्यासारखे सभोवार नजर ठेवून जपून” चालत राहिलो तर या गोष्टीचा आपण जरूर विचार करू. (इफिस. ५:१५) आपले वार्षिक पुस्तक (इंग्रजी), टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांतील सर्व अनुभवांची सत्यता तपासून मगच ते प्रकाशित केले जातात; हे अनुभव यहोवाने दाखवलेल्या ‘मार्गावरून’ वाटचाल करत राहण्याची प्रेरणा आपल्याला देतात याबद्दल आपण किती आनंदी आहोत!—यश. ३०:२०, २१.

२९ आणखीन एक धोका विचारात घ्या. काही लोकांच्या बाबतीत प्रेषित पौलाने म्हटले: ‘घरोघर फिरून ते आळशी होतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे, तर वटवट व लुडबुड करणारे होतात, आणि बोलू नये ते बोलतात.’ (१ तीम. ५:१३) ही गोष्ट, आपल्या बांधवांना क्षुल्लक माहिती पाठवण्यासाठी उगाच आपला वेळ आणि श्रम वाया घालवण्याच्या विरोधात आहे.

३० तसेच, सतत भरमसाठ ई-मेल संदेश वाचून त्यांना उत्तरे देण्यात आपला किती वेळ वाया जातो त्याचाही विचार करा. यावर डेटा स्मॉग हे पुस्तक एक मनोरंजक विवेचन करते: “एखादा इंटरनेटवर अधिकाधिक वेळ खर्च करू लागतो तेव्हा काही काळानंतर इ-मेल याविषयीची त्याची नवलाई संपून ते एक वेळखाऊ बोझा बनते; कारण, सहकर्मचारी, मित्र, कुटुंबिय, . . . आणि अनाहूत सेल्सच्या जाहिराती यांच्याकडून आलेले डझनावारी संदेश वाचून त्यांना प्रत्युत्तर द्यावे लागते.” शिवाय, “अनेक इलेक्ट्रॉनिक माहितीवेड्या लोकांनी त्यांना मिळणारी हरएक मनोरंजक माहिती उदाहरणार्थ जोक्स, कथा, इलेक्ट्रॉनिक साखळी पत्रे आणि असे बरेच काही आपल्या इलेक्ट्रॉनिक ॲड्रेस बुकवरील प्रत्येक व्यक्‍तीला पाठवण्याची अतिशय वाईट सवय स्वतःला लावून घेतली आहे.”

३१ याची सत्यता अनेक बांधवांनी एकमेकांना पाठवलेल्या ई-मेलवरून पटते; उदाहरणार्थ, आपल्या सेवेसंबंधित काही जोक्स किंवा विनोदी गोष्टी; आपल्या विश्‍वासांवर आधारित कविता; संमेलने, अधिवेशने किंवा राज्य सभागृहात दिल्या गेलेल्या निरनिराळ्या भाषणांतून ऐकलेले दृष्टान्त; क्षेत्र सेवेतील अनुभव; आणि वरवरून अगदी निखालस, अनापायकारक वाटणारे असे बरेच काही. अशा ई-मेलचा स्रोत काय हे तपासून न पाहताच बरेचजण असे ई-मेल नित्यनियमाने एकमेकांना पाठवत असतात आणि हे ई-मेल मुळात कोणाकडून आलेले आहे हे माहीत होणे शक्य नसते; त्यामुळे, आपल्याला पाठवलेली माहिती खरोखरच सत्य आहे की नाही असा प्रश्‍न तुमच्या मनात आलाच पाहिजे.—नीति. २२:२०, २१.

३२ असे क्षुल्लक संदेश, तिमथ्याला लिहिताना पौलाच्या मनात असलेल्या सुवचनांच्या एकवाक्यतेत नसतात; त्याने म्हटले: “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीती ह्‍यामध्ये दृढपणे राख.” (तिरपे वळण आमचे.) (२ तीम. १:१३) बायबल सत्याच्या ‘शुद्ध वाणीमध्ये’ “सुवचनांचा नमुना” असून हा नमुना बायबलच्या मुख्य शीर्षकावर अर्थात देवाच्या राज्यामार्फत विश्‍वाचा सर्वश्रेष्ठ अधिकारी या नात्याने यहोवाचे समर्थन करण्यावर आधारित आहे. (सफ. ३:९) आणि याच उद्देशासाठी आपणही आपला वेळ आणि श्रम खर्ची घालण्यासाठी प्रयत्नशील असावे.

३३ सध्या आपण या व्यवस्थीकरणाच्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहंचलो आहोत; तेव्हा, आपण सतत सतर्क राहायला हवे. बायबल आपल्याला बजावते: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) ते पुढे असेही म्हणते: “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.”—इफिस. ६:११.

३४ इंटरनेटचा दुरुपयोग केल्यास त्याच्या आहारी गेलेल्या लोकांना कह्‍यात घेण्यासाठी सैतान या माध्यमाचा उपयोग करतो. इंटरनेटचा थोडाफार फायदा होत असला तरी खबरदारी बाळगली नाही तर धोका संभवू शकतो. आपली मुले इंटरनेटचा उपयोग कशासाठी करत आहेत यात पालकांनी जातीने लक्ष घातले पाहिजे.

३५ इंटरनेटचा संतुलित उपयोग केल्याने आपले संरक्षण होऊ शकते. यासाठी, पौलाने दिलेला इशारा किती समर्पक आहे हे समजते; त्याने म्हटले: “जे ह्‍या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे; कारण ह्‍या जगाचे बाह्‍य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथ. ७:२९-३१) इंटरनेटसंबंधित या सर्व बाबी लक्षात ठेवल्यास, इंटरनेटवरील माहितीसोबत आणखीन जी कोणती आमिषे हे जग आपल्याला दाखवते त्याला आपण आणि आपले कुटुंबिय देखील बळी पडणार नाहीत.

३६ त्यासाठी आपल्या बंधूभगिनींसोबत मंडळीत घनिष्ठ संबंध राखणे आणि उरलेल्या वेळेचा सुज्ञपणे उपयोग करणे अत्यंत जरूरीचे आहे; असे केल्याने राज्य हितांना बढावा देण्यासाठी आपल्याला वेळ देता येईल. सध्याचे व्यवस्थीकरण आपल्या अंतिम टप्प्यात पोहंचत असताना ‘परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालतात त्याप्रमाणे आपण ह्‍यापुढे चालू नये, तर प्रभूची इच्छा काय आहे हे आपण समजून घेऊ.’—इफिस. ४:१७; ५:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा