अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास कसा सुरू करावा
१ जगभरातील अहवालांवरून दिसून येते की, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक लोकांना सत्य शिकवण्याचे एक परिणामकारक साधन आहे. किंबहुना, याच माहितीपत्रकातून दर आठवडी हजारो बायबल अभ्यास सुरू केले जातात. तुमच्याबाबत काय? अपेक्षा माहितीपत्रकातून तुम्हाला कधी बायबल अभ्यास सुरू करून तो पुढे चालू ठेवता आला का?
२ हे माहितीपत्रक लोकांना देणे तसे कठीण नाही, पण त्यानंतर अभ्यास सुरू करणे काही बांधवांना कठीण वाटते, पुढे काय बोलावे त्यांना सुचत नाही. पण काही बांधवांना कोणत्या पद्धतींचा उपयोग केल्यामुळे अपेक्षा माहितीपत्रकातून अभ्यास सुरू करण्यात यश आले आहे? या संदर्भात, पुढे सुचवलेल्या काही गोष्टी कदाचित तुम्हालाही उपयोगी पडतील.
३ अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवा: पहिल्या भेटित किंवा पुनर्भेट करताना, तुम्हाला बायबल अभ्यास करायला आवडेल का, फक्त असे म्हणण्याऐवजी अभ्यास कसा घेतला जातो हे घरमालकाला प्रत्यक्ष दाखवावे. यामुळे “अभ्यास” या शब्दासंबंधी घरमालकाच्या मनात निर्माण झालेली कोणतीही भीती, शंका नाहीशी होऊ शकते. बायबल अभ्यासाचे प्रात्यक्षिक आपल्याला जमले, की मग अभ्यास सुरू करण्यासाठी केवळ एक साधीसोपी प्रस्तावना पुरेशी आहे.
४ तयारी करणे जरूरीचे: बायबल अभ्यास सुरू करण्याबद्दल आपण किती उत्सुक आहोत हे तयारी करण्यावर अवलंबून आहे. पूर्वतयारी केल्यास, बायबल अभ्यास सुरू करण्याविषयी आपल्या मनात असलेली भीती नाहीशी होऊ शकते. तसेच, आपल्या प्रस्तुतीचा बरेचदा सराव केल्याने आपण घरमालकाशी अधिक स्वाभाविकपणे, मनापासून आणि स्वतःच्या शब्दांत बोलू शकू. आणि फक्त आपल्यालाच नाही, तर घरमालकाला देखील मनमोकळेपणे संभाषण करता येईल.
५ प्रस्तुतीचा सराव करत असताना किती वेळ लागतो याकडेही लक्ष द्या म्हणजे घरमालकाला अभ्यासाचे प्रात्यक्षिक करून दाखवताना किती वेळ लागेल हे तुम्ही त्याला सांगू शकता. या बाबतीत एका बांधवाचे उदाहरण विचारात घ्या. घरमालकाला आपली ओळख करून दिल्यानंतर तो म्हणतो: “आम्ही मोफत बायबल अभ्यास चालवतो; आणि तो कशाप्रकारे चालवतो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. फक्त पाचएक मिनिटं लागतील. पाच मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे?” अपेक्षा माहितीपत्रकातील पहिल्या पाठाचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी केवळ पाचएक मिनिटंच लागतात. अर्थात, इतक्या कमी वेळात पाठातील सर्व शास्त्रवचने वाचणे शक्य नाही; तेव्हा काही निवडक शास्त्रवचने वाचा. अशाप्रकारे केवळ काही मिनिटांत संपूर्ण पाठ विचारात घेतल्याने घरमालकाने नकळत पहिल्या अभ्यासाचा अनुभवही घेतलेला असतो. मग, पुढच्या वेळी दुसऱ्या पाठाचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा येऊ तेव्हा केवळ १५ मिनिटे घेऊ असे घरमालकाला सांगा.
६ अनेकदा यशस्वी ठरलेली ही एक पद्धत विचारात घ्या:
◼ “देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकातून एक अतिशय साधा आणि संक्षिप्त गृह बायबल अभ्यासक्रम आम्ही चालवतो; त्याचे प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवू इच्छितो. दर आठवडी फक्त १५ मिनिटं, याप्रमाणे केवळ १६ आठवड्यांत बऱ्याच जणांना बायबलमधून अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत.” त्यानंतर, घरमालकाला विषयसूची दाखवा. मग, पहिला पाठ उघडा आणि म्हणा: “तुम्ही फक्त ५ मिनिटं दिलीत तर हा अभ्यास कसा केला जातो हे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. पहिल्या पाठाचे शीर्षक आहे, ‘देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे तुम्ही कसे शोधून काढू शकता.’” त्यानंतर, पाठात दिलेले तीन प्रश्न वाचा आणि प्रत्येक प्रश्नाच्या पुढे कंसात दिलेला आकडा कशाला सूचित करतो ते सांगा. मग, परिच्छेद १ वाचा आणि पहिल्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे हे घरमालकाला दाखवा. दुसरा परिच्छेद विचारात घेताना तुम्ही घरमालकाला परिच्छेद वाचायला सांगू शकता. परिच्छेद वाचल्यानंतर असे विचारा: “आता तुम्ही जे काही वाचलंत त्यातून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता का? [प्रश्न पुन्हा वाचा आणि घरमालकाला उत्तर देण्यासाठी वेळ द्या.] तुम्ही पाहिलंच असेल, की प्रत्येक परिच्छेदात शास्त्रवचनं दिलेली आहेत. जे प्रश्न विचारले आहेत त्यांविषयी बायबल काय म्हणते हे दाखवण्यासाठी ही शास्त्रवचनं दिलेली आहेत. उदाहरणार्थ, आपण २ तीमथ्य ३:१६, १७ हे शास्त्रवचन वाचून पाहू आणि बायबलचा लेखक कोण या प्रश्नाचं तुम्ही जे उत्तर दिलंत त्याला बायबल आधार देते की नाही ते पाहू.” हीच पद्धत पुढच्या परिच्छेदांसाठीही लागू करा; परिच्छेद ३ वाचा, त्यावरील तिसरा प्रश्न विचारा आणि योहान १७:३ हे शास्त्रवचन वाचा; अशाप्रकारे पाठ १ ची उजळणी केल्यामुळे घरमालकाला जे ज्ञान मिळाले त्याविषयी त्याला सांगा. त्यानंतर लगेच दुसरा पाठ उघडा आणि त्यात दिलेला शेवटचा प्रश्न वाचा: “कोणत्या दोन मार्गांनी आपण देवाबद्दल शिकू शकतो?” मग, घरमालकाला विचारा: “या प्रश्नाचे उत्तर काय हे पाहण्यासाठी दुसऱ्या पाठाचीही अशाचप्रकारे केवळ १५ मिनिटं उजळणी करण्यासाठी तुम्हाला पुन्हा केव्हा वेळ आहे?”
७ अतिशय साध्या पद्धतीने चर्चा करा आणि शक्य तेव्हा घरमालकाची प्रशंसा करा. पुढच्या भेटीची वेळ ठरवताना घरमालकाला अभ्यास करत राहण्याची इच्छा आहे की नाही असा प्रश्न विचारण्याऐवजी पुढच्या पाठाचीही अशाचप्रकारे तयारी करण्याचे उत्तेजन घरमालकाला द्या. तुम्ही पुन्हा त्याची भेट घेऊ इच्छिता हे त्याला कळू द्या. वेळ नसल्यास काही प्रचारक घरमालकासोबत फोनवरून एखाद्या पाठाची उजळणी करतात. पुढच्या वेळी माहितीपत्रक लगेच सापडावे म्हणून ते जपून ठेवण्याची तुम्ही घरमालकाला आठवण करून देऊ शकता.
८ निश्चयी असा: बायबल अभ्यासाच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी तयारी करणे अत्यंत जरूरीचे आहे हे मान्य. पण, तयारीसोबतच घरमालकाची नियमितपणे भेट घेण्याचा दृढनिश्चय करणेही जरूरीचे आहे. एखादा पाठ केवळ काही मिनिटांत शिकवणे ही काही साधीसोपी गोष्ट नाही; तेव्हा, आत्मविश्वासाने बोलता येत नाही तोपर्यंत प्रस्तुतीचा सराव करा. घरोघरच्या प्रचार कार्यात, अनौपचारिक कार्यात आणि टेलिफोनवरून साक्ष देताना प्रत्येकाला अभ्यासाच्या पद्धतीविषयी सांगण्याचा प्रयत्न करा. तरीही बायबल अभ्यास सुरू करणे कठीण जात असल्यास निराश होऊ नका. इतरांना सत्य शिकवण्याच्या प्रांजळ इच्छेसह दृढ निश्चयाने प्रयत्न करत राहा, म्हणजे तुम्हीही बायबल अभ्यास सुरू करण्यात जरूर यशस्वी व्हाल.—गलती. ६:९.
९ वरील सल्ले प्रत्यक्ष लागू केल्यास, अपेक्षा माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू करून तो चालू ठेवल्याने एखाद्याला जीवनाच्या मार्गावर आणण्याची बहुमोल संधी तुम्हालाही लाभेल.—मत्त. ७:१४.